मुंबईत वीरगळही आहेत. बोरिवलीतील देवीपाड्याला, पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या शेजारी आहे. हा वीरगळ जवळजवळ शंभरेक वर्षं गावदेवी या नावाने साडीचोळी लेवून तिथे सुखाने नांदतोय. याचंच नाव त्या भागाला पडून तो भाग देवीपाडा या नावाने ओळखला जातोय. हा वीरगळ भक्तांना प्रसन्न होतोय. यात्रा-जत्रा भरवून घेतोय. भंडारे घालून अन्नदानही करतोय. दुसरा वीरगळ बोरिवली स्टेशनच्या वायव्येला आहे.
एखादा जातिवंत भटक्या जेव्हा भटकत असतो, तेव्हा तो डोळे आणि मन उघडे ठेवून भटकत असतो. किंबहुना जातिवंत भटक्याचे हे प्रमुख लक्षण असते. या भटक्यांचे दोन मुख्य प्रकार - एक डोंगरात फिरणारे आणि दुसरे समुद्रसपाटीवर भटकणारे. जे डोंगरात फिरणारे, त्यांचेही दोन प्रकार - एक दुर्ग भटकणारे आणि दुसरे दोर लावून कडेकपारींशी झट्या घेणारे. दुर्ग भटकणारे, त्यांना बहुधा इतिहासाची आवड. त्यातही शिवाजीराजांचा इतिहास, त्या राजाच्या पराक्रमाच्या कथा याविषयी त्यांना कमालीचा अभिमान. त्याचा अनुषंगाने त्याचं वाचन. चरित्र, बखरी, पोवाडे, कथा-लोककथा असं बरंच काही. या वाचनाच्या जोडीला भटकंतीही सुरू असतेच. वाचलेलं ताडून पाहिलं जात असतं. कधी पडके तटबुरूज, कधी दगड निखळलेली महाद्वारं, कधी झाडंझुडपं दाटलेले घरांचे पडके चौथरे, कधी कुठे एखाद्या आंब्या-जांभळीखालचा एकुटवाणा रानदेव, कधी कुठे एखादी जीर्णशीर्ण समाधी, कधी कुठे ढासळू आलेलं कुण्या दैवताचं रानवाटेवरलं मंदिर, तर कधी कधी कुण्या गावच्या शिवेवर दिसतो एक उभा धोंडा. चारेक फूट उंचीचा. फूटभर रुंदीचा. कधी त्यावर वरून खालपर्यंत तीन-चार चित्रं कोरलेली असतात. हा असतो वीरगळ. एखाद्या हातघाईच्या युद्धात कामी आलेल्या कुण्या अनाम वीराचा स्मृतिस्तंभ. त्याच्या या पराक्रमाची कथा कुणाला ठाऊक नसते. त्याची दखल कुणी घेतलेली नसते. निसर्गाचे प्रहार झेलत, उन्हाळे, पावसाळे सोसत, येत्याजात्याची मूक दखल घेत हा वीरगळ अवघ्या राहाळावर लक्ष ठेवून असतो. वीरगळ, गोवर्धन स्तंभ, कीर्तिस्तंभ व छायास्तंभ अशा अनेक नावांनीही याची ओळख पटते. सतीगळ, गधेगळ असे याचे काही उपप्रकारही आढळतात.
मुंबईचा इतिहास प्राचीन आहे. हजारभर वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे लिखित संदर्भ सापडतात. शिलालेख आहेत. बखरी आहेत. दोन हजार वर्षांपासूनचे पुरातत्त्वीय अवशेष देखण्या बौद्ध अन् शैव लेण्यांच्या स्वरूपात आहेत. वालुकेश्वर, बाणगंगा, अंबरनाथ यासारखी मंदिरं आहेत. त्यातली काही मध्ययुगीन आहेत. अशा या मुंबईत वीरगळही आहेत. त्यातले दोन प्रसिद्ध आहेत - किंबहुना त्यांना हल्लीच जास्त प्रसिद्धी मिळालीय. दोन्ही पश्चिम उपनगरात आहेत. बोरिवलीला. एक आहे देवीपाड्याला, पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या शेजारी. हा वीरगळ जवळजवळ शंभरेक वर्षं गावदेवी या नावाने साडीचोळी लेवून तिथे सुखाने नांदतोय. याचंच नाव त्या भागाला पडून तो भाग देवीपाडा या नावाने ओळखला जातोय. हा वीरगळ भक्तांना प्रसन्न होतोय. यात्रा-जत्रा भरवून घेतोय. भंडारे घालून अन्नदानही करतोय. दुसरा वीरगळ बोरिवली स्टेशनच्या वायव्येला आहे.
बोरिवली स्टेशनच्या वायव्येला दोनेक कि.मी. अंतरावर पूर्वी एक सुरेखसा तलाव होता. काठावर छान आमराई होती. त्या तळ्याच्या पश्चिम काठावर एक मंदिर अन् त्याशेजारी सहा वीरगळ होते. त्यांच्यापैकी चार वीरगळ जवळजवळ आठ फूट उंचीचे अन् तीन फूट रुंदीचे. उरलेले दोन त्यापेक्षा काहीसे लहान. पैकी एक तुटलेला. उरलेले सारेच वीरगळ उत्तम कोरलेल्या अवस्थेत. ही काही वर्षांपूर्वीची कथा... आता तेथे तळे उरले नाही, न राहिले मंदिर. त्या जागी एक उत्तुंग इमारत उभी आहे आणि त्याच्या एका दुर्लक्षित कोनाड्यात सहाच्या जागी आहेत चारच वीरगळ. त्यातील केवळ दोन अखंड आहेत. उरलेले दोन भग्नावस्थेत आहेत. एक शिलालेखही आहे, मात्र तो अगम्य आहे. एकसरच्या या युद्धगळांवर नाविक युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत. त्यात सात शिडांच्या बोटी आहेत. त्या वल्हवणारे नाविक वीर आहेत. त्यांची लांबसडक वल्ही आहेत. एका गळावर सहा बोटी विरुद्ध दिशेने एकमेकांवर चाल करून येताना दिसताहेत. सहसा वीरगळावर त्या कुण्या अनाम योद्ध्याची मृत्युकथा कोरलेली असते, ज्याच्या स्मृतीसाठी तो उभारलेला असतो. एकसरच्या या वीरगळांचे वैशिष्ट्य म्हणजे यांवर युद्धपट कोरलेले आहेत. तेही एरवीचे मैदानी युद्ध नव्हे. यावर कोरले आहेत ते कुण्या नाविक युद्धाचे स्मृतिपट. त्या युद्धात कामी आलेल्या योद्ध्यांचे स्मृतिपट. हे अद्वितीय आहे.
हडप्पा काळापासून भारताला नाविक परंपरा आहे. लोथल येथे असलेली कोरडी गोदी हे याचे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. जी संस्कृती जहाजांचे तळ दुरुस्त करण्यासाठी कोरडी गोदी बंधू शकते, ती नौकानयनात किती प्रगत होती हा संशोधनाचा एक उत्तम विषय होऊ शकतो. हडप्पाच्या अनेक मृत्तिका मुद्रांवर जहाजांची चित्रे आढळतात. येथल्या अनेक मुद्रा इजिप्तच्या पिरॅमिड्समधील ममीशेजारी आढळल्या आहेत. इतिहासकाळाच्या सुरुवातीच्या कालखंडातील काही चांदीच्या नाण्यांवर जहाजांची चित्रे आहेत. भारहूत, सांची अन अमरावती येथील इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकातील स्तूपांच्या शिल्पपट्टावर जहाजे दाखवलेली आहेत. याच काळातील सातवाहनांच्या नाण्यांवरही जहाजांच्या आकृती आहेत. अजिंठ्याच्या गुहांमधल्या भिंतींवर रंगवलेल्या जातककथा या तर प्राचीन भारतीयांच्या नौकानयनाच्या नैपुण्याची जिवंत स्मारके आहेत.
सागरी युद्धाशी संबंधित वीरगळ भारतात दोनच ठिकाणी सापडले आहेत. एकसरखेरीज दुसरे ठिकाण आहे गोव्यातील पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय. तेथील वीरगळ कदंब या प्राचीन राजघराण्याशी संबंधित आहेत. एकसरचे युद्धगळ हे उत्तर कोकणच्या शिलाहारांच्या कालखंडातील – साधारण अकराव्या शतकातील आहेत. श्रीस्थानक अथवा आजचे ठाणे ही यांची राजधानी. मुंबई वसवलेल्या अनहिलवाडच्या प्रतापबिम्बाने यांचे उच्चाटन करेपर्यंत या शिलाहारांनी ठाण्याहून आपले वर्चस्व गाजवले. काही इतिहासकारांच्या मते, पुरी अथवा घारापुरी ही या शिलाहारांची राजधानी होती. मुंबई आणि घारापुरी ही दोन्ही प्राचीन काळापासूनची उत्तम बंदरे. या शिलाहारांच्या राजधान्या. या वीरगळाच्या मिसे शिलाहार राजांचे दर्यावर्दीपण तर निश्चितच अधोरेखित होतेच, मात्र भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर सुरू असलेल्या लढाऊ जहाजबांधणीच्या उद्योगाचेही यातून यथार्थ दर्शन होते. हडप्पा संस्कृतीच्या नौकानयनाचा वारसा थेट मध्ययुगापर्यंत पुरातत्त्वीय अवशेषांमधून दृग्गोचर होण्याचे इतके स्पष्ट उदाहरण भारतीय इतिहासात विरळेच म्हणावे लागेल!
-डॉ. मिलिंद पराडकर