भाजे – लयनशिल्पांचा श्रीगणेशा!

07 Feb 2018 12:47:00

 

लोणावळ्याजवळ मळवली नावाचं रेल्वे स्टेशन. त्याच्या साधारण पूर्वेकडे भाजे नावाचं एक लहानसं गाव. त्या गावाला वळसा घालून शेशंभर पावलं पुढे गेलं की डाव्या हाताच्या डोंगरचढावर असलेल्या पायऱ्या तुम्हाला अर्धा डोंगर वर चढवतात. शेवटच्या पायरीवर पाय घालेपर्यंत काही दिसत नाही, काही जाणवत नाही. धापा आवरत पायरी ओलांडली की डाव्या हाती अभिजात शिल्पकलेचा एक देखणा नमुना आपल्या नजरेसमोर उभा ठाकतो...

महाराष्ट्र या नावासोबत नजरेसमोर काही ठाशीव गोष्टी उभ्या राहतात. शिवछत्रपती आणि त्यांचे दुर्ग, मधमाशीच्या पोळ्यागत डोंगरात पोखरलेली बौद्ध अन ब्राह्मणी लेणी, पंढरीचा श्रीहरी आणि कोल्हापूर-तुळजापूरची माताभवानी..! महाराष्ट्राचा आत्मा या चार गोष्टींभोवती कायमच घोटाळत राहिलेला आहे.

यांपैकी दुर्ग आणि लेणी ही महाराष्ट्राच्या इतिहासाचे प्राचीनतम साक्षीदार आहेत. ज्या काळापासून लिखित स्वरूपात घटनांची नोंद घ्यायला सुरुवात झाली, ती इतिहासकालाची सुरुवात असे साधारणपणे मानले जाते. महाराष्ट्राची ऐतिहासिक सुरुवात सम्राट अशोकाच्या सोपाऱ्याच्या शिलालेखापासून झाली असे इतिहासतज्ज्ञ व पुरातत्त्वज्ञ मानतात. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थापत्य व दृश्य कलेची सुरुवात मौर्यकालापासून झाली असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही.

सह्याद्रीच्या गिरिकुहरात कोरलेली लेणीही याच निकषावर पाहिली जातात. भारतभरात सुमारे हजारभर लेणी आहेत. पैकी दोन तृतीयांश लेणी एकट्या महाराष्ट्रात आहेत. बिहारच्या बाराबर टेकड्यांमध्ये बुद्धकाळाच्या सुरुवातीला सुदामा व लोमश अशी दोन लेणी कोरली गेली. बौद्ध भिख्खूंना पावसाळ्यात राहण्याची सोय म्हणून ‘वर्षावास’ या नावाने ओळखले जाणारे तात्पुरते निवारे बांधले जात असत. हे वर्षावास गावांच्या आजूबाजूला असत, जेणेकरून अन्न व निवारा या दोन्हींची सोय नीट लागत असे.

बौद्धमताच्या प्रसारासाठी विंध्य-नर्मदा पार करून दक्षिणेत उतरलेल्या भिख्खूंना सह्याद्रीचे कातळकडे दिसले आणि बहुधा त्यांच्या सर्जनाला धुमारे फुटले. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात सह्याद्रीच्या छातीवर पहिलं लेणं कोरलं गेलं. सोपाऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर लोणावळ्याजवळच्या लोहगड-विसापूर या दुर्गांच्या कुशीत भाजे इथे महाराष्ट्रातलं पहिलं लेणं कोरलं गेलं. येथील चैत्यगृह हे महाराष्ट्रातलं सर्वात प्राचीन चैत्यगृह मानलं जातं.

लोणावळ्याजवळ मळवली नावाचं रेल्वे स्टेशन. त्याच्या साधारण पूर्वेकडे भाजे नावाचं एक लहानसं गाव. त्या गावाला वळसा घालून शेशंभर पावलं पुढे गेलं की डाव्या हाताच्या डोंगरचढावर असलेल्या पायऱ्या तुम्हाला अर्धा डोंगर वर चढवतात. शेवटच्या पायरीवर पाय घालेपर्यंत काही दिसत नाही, काही जाणवत नाही. धापा आवरत पायरी ओलांडली की डाव्या हाती अभिजात शिल्पकलेचा एक देखणा नमुना आपल्या नजरेसमोर उभा ठाकतो...

 

 

नितळ कातळात कोरलेलं एक सुरेख चैत्यगृह आपल्या नजरेसमोर उभं असतं. लाकडी वास्तूंच्या आराखड्यावर आधारलेली सुबक पिंपळपानी कमान. आधारासाठी असलेले किंचितसे कललेले अष्टकोनी दगडी खांब. छताला तोलणाऱ्या प्राचीन लाकडी फासळ्या. चैत्यगृहात अंतर्भागात असलेला तो दगडी स्तूप. त्यावरली ती हर्मिका. चैत्याच्या डाव्या-उजव्या बाजूंना असणारे भिख्खूंचे तेवढेच प्राचीन विहार, या सगळ्याला तोलून धरणारं ते काहीसं गंभीर शांत वातावरण अन या अवघ्याला छेद देणारी दारातल्या झाडांच्या पानांची सुखद सळसळ. मी काहीसा एकांतात रमणारा जीव, म्हणून सहसा गर्दी टाळतो. एरवी गर्दीने फुलणाऱ्या अशा जागी कधीकधी चिटपाखरूही नसतं अन मग शांतावलेल्या मनाला त्या वास्तूतली स्पंदनं जाणवतात. ‘सरणं गच्छामी’ची अनाहत कंपनं मनाच्या तारांवर झंकारू लागतात. अनावर मन मग गतकाळाशी झट्या देऊ लागतं.

कल्याण सोपारा येथून निघून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या किंवा चौलाहून ठाणाळे लेणी करीत सवाष्णीच्या घाटाने वा उंबरखिंडीतून लोणावळे करीत पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर लेण्यांची अक्षरशः रेलचेल आहे. बहुधा हे प्राचीन व्यापारी मार्ग आणि भाजे लेणे समकालीन आहे. महाराष्ट्रातील आद्य लेणे म्हणून भाजे लेण्यांचा मान आहे. महाराष्ट्रातील लेणी कोरण्याचा ओनामा भाजे येथल्या लेण्यांपासून झाला. त्यानंतर कोंडाणे, मग बेडसे, शेलारवाडी अन सरतेशेवटी कार्ले असा साधारण क्रम लागतो. हा सारा परिसर प्राचीन इतिहासात, संस्कृतीत आकंठ बुडालेला आहे. राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, कुवारीगड, ढाक, मृगगड, सुधागड, सरसगड अशा बलदंड दुर्गांनी हा परिसर वेढलेला आहे. पाठीचा कणा ताठ ठेवणारा धर्म अन त्या धर्माला राखणारे रक्त या दोहोंचा अनोखा संगम येथल्या वातावरणात झालेला आहे. गंध स्वातंत्र्याचा अन रंग रक्ताचा असलेल्या या अद्भुत परिसराचा साक्षीदार असलेले भाज्याचे लेणे या अवघ्यावर नजर ठेवून आहे.

हीनयान पंथाची बावीस लेणी अन गजपृष्ठाकार छत असलेला चांपाकार चैत्य, शिलालेख, पाणपोढ्या, प्राचीन बौद्ध आचार्यांचे स्मृतिस्तूप, सूर्यगुंफा आदींनी नटलेला हा लयनसमूह पुराविदांच्या मते इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकात कोरला गेला आहे. हे कोरताना ज्या ज्या चुका झाल्या, त्या त्या नंतरच्या काळात कोरल्या गेलेल्या लेण्यांमध्ये दुरुस्त केल्या गेल्या अन सरतेशेवटी कार्ल्याचे देखणे, भव्य शैलशिल्प उभे राहिलेले आहे. त्या संक्रमणाची सुरुवात भाजे येथून झालेली आहे..!

हा तुमचा-आमचा वारसा आहे. तुमच्या-आमच्या संस्कृतीची नाळ या वारशाशी थेट जोडलेली आहे. गेल्या अडीच हजार वर्षांपासून दिमाखाने उभी असलेली मानवी सर्जनाची, आभाळाला हात घालण्याच्या जिद्दीची ही प्रतीकं मुद्दाम जाऊन पाहावी, अनुभवावी अशी खचितच आहेत..!

डॉ. मिलिंद पराडकर

९६१९००६३४७, ८१६९४४८७५७

----------------------------------------------------------

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
धन्यवाद
https://www.facebook.com/VivekSaptahik/

Powered By Sangraha 9.0