भक्तिपंथे-राघवाच्या पंथे जायचे म्हणजे नेमके काय करायचे? असा प्रश् मनाला पडू नये म्हणून समर्थ काही आचरण विषयक सोप्यासोप्या सूचना अत्यंत सलगीने करतात. इंग्रजीत ज्याला डू ऍंड डोन्ट (Do and Don'tं) म्हणतात तशा प्रकारच्या या सूचना आहेत. समर्थ म्हणतात समाजाने ज्या गोष्टी निंद्य-वाईट मानल्या आहेत त्या तू करू नकोस. मग काय कर? तर समाजाने ज्या गोष्टी वंदनीय-स्तुत्य मानल्या आहेत त्या गोष्टीचे तू आचरण कर. या दोन रूळावरून तुझी गाडी सुखरूप इष्टस्थानी पोचेल...
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे।
जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे। जनी वंद्य ते सर्व भावे करावे॥
समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकातील या श्लोकात मनाला 'सज्जना' असे म्हणतात. प्रत्येक माणसाचे मन स्वभावत: सज्जन, सरळ, निष्पापच असते. हे मन दहा इंद्रियांच्या शरीररूपी रथाचे सारथी आहे. आपल्या दहा इंद्रियांचे (2 डोळे, 2 कान, नाक, तोंड, 2 हात, 2 पाय) सारे नियंत्रण 'मन' हे अकरावे इंद्रिय करीत असते की जे दिसत नाही, जे सोनोग्राफीतही सापडत नाही. अशा मनाचा सज्जनपणा संगत, विषय (उपभोग) आणि विकार (मद, मोह, द्वेष, मत्सर इ.) यामुळे नष्ट होतो. आणि मनाचे सज्जनपण जसजसे मलिन होत जाते तसतसे माणसाचे आचरण दुराचरण होऊ लागते. मनावर विवेक विचाराचा प्रभाव सतत राहिला तर माणूस सदाचरणी राहतो आणि मनावर विवेकाऐवजी विकार व विषयांनी ताबा मिळवला की माणसे दुराचरणी होतात, एवढेच नव्हे तर आपले दुर्गुण-दुराचार हेच त्याला योग्य वाटू लागतात. तो त्याचे समर्थनही करतो असे दिसते. हे सर्व लक्षात घेऊन समर्थ थेट मनाला 'सज्जना' म्हणून गोंजारतात व मोठया सलगीने भक्तिपंथी जाण्याची, जनी निंद्य ते न करण्याचे व जनी वंद्य ते आस्थेने करण्याचा उपदेश करतात.
'मन' हेच माणसाच्या आचरणाचा मुख्य कर्ता असल्याने समर्थ सारा उपदेश थेट मनालाच करतात. आपले शरीर जरी प्रत्यक्ष आचरण करीत असले तरी त्यामागे मन हेच कर्ता असते. महात्मा कबीर यांनीही 'मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर। नही खींची कमान तो कहाँसे छूटेगा तीर।' असा उपदेश केलेला आहे. शरीर आणि मनाचा संघर्ष हा माणसाच्या जीवनातील नित्याचाच अंतरंग युध्दसंग्राम आहे. 'रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग।' असे संत तुकोबा म्हणतात ते याच अर्थाने. इष्ट, अनिष्ट, लाभ, हानी, अनुकूल-प्रतिकूल याबद्दल इंद्रिये व मन यांचे एकमत होतेच असे नाही. जे शरीरस्वास्थ्याला हितकारक असते ते जीभेला चविष्ट असतेच असे नाही. आणि जे चमचमीत, मसालेदार चविष्ट असते ते जीभेला खूप आवडले तरी पोटाला-स्वास्थ्याला हितकारक ठरेलच असे नाही. मन व इंद्रिय संघर्षात मनाची भूमिका निर्णयात्मक असते. त्यामुळेच मनाचे हे मोठेपण लक्षात घेऊन सर्वच ऋषी, मुनी, संतांनी मनाला उपदेश केलेला आढळतो. गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला अनेक ठिकाणी मनाचे हे वैशिष्ट्य लक्षात आणून देऊन सावध केलेले आहे. श्रीमद् भगवद्गीतेतील 'चंचल हि मन: कृष्णप्रमाथि बलवद्दृढम ।' किंवा 'मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो।' ही वचने लक्षात घेण्यासारखी आहेत. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या साहित्यातही मनाला उद्देशून बोध केल्याचे आढळते. 'मन करारे प्रसन्न। सर्व सिध्दीचे कारण।' हे तुकोबांचे अभंगवचन सर्वश्रुत आहे. एवढेच नव्हे तर आधुनिक कवी, गीतकार यांनीही मनाला उद्देशून केलेली गीते, कविता दाखले म्हणून पाहण्यासारख्या आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरींचे 'मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं गुरं।' यामध्ये मनाची सारी गुणवैशिष्टये सरळसोप्या शब्दात गुंतलेली आहेत. हिंदी काव्य जगतातील गीतकार-शायर साहिल लुधियानवी यांचे 'तोरा मन दर्पण कहलाये।' हे चित्रगीत पहा. ते म्हणतात - मनही देवता, मनही ईश्वर, मन सबका आधार. कविवर्य गुलझार हे आजच्या तरुण पिढीचे लाडके गीतकार आहेत. ते एका चित्रगीतात म्हणतात- 'मन जहाँ मानले माँझी वहि है किनारा।' अशाप्रकारे मनाचे मानवी जीवनव्यवहारात अनन्यसाधारण महत्त्व असून ते लक्षात घेऊनच समर्थांनी थेट मनालाच उपदेश केलेला आहे.
यावरील श्लोकात समर्थ भक्तिपंथी मार्गक्रमण करण्यास सांगतात. भक्ती म्हणजे केवळ भजन-पूजन नव्हे तर भक्तीचा अर्थ व्यापक व उदात्त आहे आणि तोच समर्थांना अपेक्षित आहे. अलिकडच्या काळात 'भक्तीला सामाजिक शक्ती' (Bhakti is social force) म्हणून अनेकांनी गौरविलेले आहे. भक्तीबद्दल समर्थ म्हणतात- 'भक्तिचेन योगेदेव। निश्चयेपावती मानव।' नराचा नारायण करण्याची शक्ती भक्तीच्या ठायी आहे. म्हणून समर्थ मनाला भक्तिपंथी मार्गस्थ होण्यास सांगतात. कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती या साधनांपैकी समर्थ भक्तीपंथाला महत्त्व देतात हे लक्षात घेण्यासारखे आहे.
भक्तिपंथी जाण्याचा फायदा काय? हेसुध्दा समर्थ याच श्लोकात सांगतात. ते म्हणतात 'तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे।' ईश्वरप्राप्तीचा आनंद हेच मानवी जीवनाचे अंतिम लक्ष मानले जाते आणि ते भक्तिपंथी मार्गस्थ झाल्यावर स्वाभाविकपणे प्राप्त होते. या श्लोकात समर्थ ईश्वराच्या अनेक नावांपैकी 'श्रीहरी' या नामाचा उपयोग करतात, राघव, रघुनाथ या नावांचा करीत नाहीत हा सूक्ष्म भेद लक्षात घेण्यासारखा आहे. मनाच्या श्लोकाच्या पहिल्या श्लोकात समर्थ 'गमूपंथ आनंत या राघवाचा।' असे म्हणतात, पण या दुसऱ्या ओवीत भक्तिपंथी गेल्यावर 'श्रीहरी पाविजेतो स्वभावे' असे म्हणतात. पंथ राघवाचा, भक्तिपंथ आणि श्रीहरीची प्राप्ती यामध्य ेकोणताही विरोधाभास नसून त्या सर्व शब्दरचनांमागे एकच भावार्थ आहे. समर्थांसह सकल संतांच्या मनामध्ये ईश्वरनामाच्या विविधतेबद्दल आपपर भाव नाही, पण काही भाविकांना नाम भेद अस्वस्थ, विचलित करतो. अशा अपरिपक्व भक्तांना, श्रीहरी काय व राघव-रघुनाथ काय हे एकाच ईश्वरी तत्त्वाची नावे आहेत हे समर्थ या ओवीतून अप्रत्यक्षपणे सांगतात. समर्थांची व सकल संतांची ही समत्व दृष्टी भक्तीपंथीय समस्त भाविकांनी लक्षात घेऊन शुद्र भेदाभेदाच्या वर उठले पाहिजे. आज आपला समाज अनेक प्रकारच्या अकारण भेदाभेदांनी ग्रस्त झालेला आहे अशा काळात समर्थांचा हा उपदेश विशेष उपयुक्त ठरणारा आहे.
भक्तिपंथे-राघवाच्या पंथे जायचे म्हणजे नेमके काय करायचे? असा प्रश् मनाला पडू नये म्हणून समर्थ काही आचरण विषयक सोप्यासोप्या सूचना अत्यंत सलगीने करतात. इंग्रजीत ज्याला डू ऍंड डोन्ट (Do and Don'tं) म्हणतात तशा प्रकारच्या या सूचना आहेत. समर्थ म्हणतात समाजाने ज्या गोष्टी निंद्य-वाईट मानल्या आहेत त्या तू करू नकोस. मग काय कर? तर समाजाने ज्या गोष्टी वंदनीय-स्तुत्य मानल्या आहेत त्या गोष्टीचे तू आचरण कर. या दोन रूळावरून तुझी गाडी सुखरूप इष्टस्थानी पोचेल. त्यासाठी भक्तिपंथाचे शास्त्र समजून घेण्याच्या प्रदीर्घ प्रक्रियेत पडण्याची गरज नाही. समर्थ पुढच्या श्लोकात म्हणतात -
प्रभात मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा।
सदाचार हा थोर सांडून येतो। जनी तोचि तो मानवी धन्य होतो॥
याआधीच्या श्लोकात समर्थांनी मनाला काय करू नको व काय कर ते सोप्या पध्दतीने सांगितले. आता या तिसऱ्या ओवीत ते मनाला भक्तिपंथातील 'नामस्मरण' भक्तीचा पहिला धडा देतात. आपल्याकडे 'नवविध' म्हणजे भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत. 1) श्रवणभक्ती 2) कीर्तनभक्ती 3)नामस्मरणभक्ती 4) पादसेवनभक्ती 5) अर्चनभक्ती 6) वंदनभक्ती 7) दास्यभक्ती 8) सख्यभक्ती आणि 9) आत्मनिवेदनभक्ती असे हे भक्तीचे नऊ प्रकार आहेत. या प्रत्येक प्रकारावर समर्थांनी दासबोधामध्ये स्वतंत्र एकेक समास (प्रकरण) लिहिलेला आहे. तो जिज्ञासूंनी मूळातून वाचावा. वरील ओवीत समर्थ मनाला सांगतात - प्रभातसमयी राम नामाचे चिंतन कर. आणि नंतर मुखाने - वैखरी, वाणीने रामनामाचा उच्चार कर. नामस्मरण भक्तीच्या या दोन सोप्या गोष्टी समर्थ मनाला सांगतात व हे करीतअसताना सदाचार सोडू नको असे बजावतात. का? तर सदाचारानेच माणूस जगात व जनात धन्य होतो. पद व पैसा याने माणसाला लौकिक-प्रतिष्ठा मिळते - मिळवता येते, पण ती धन्य करणारी नसते. जय जय रघुवीर समर्थ ।
विद्याधर मा. ताठे
9881909775,