चीनमधून आलेल्या महायान बौध्द पंथाबरोबर अनेक हिंदू देवतांचेसुध्दा जपानमध्ये आगमन झाले. या देवतांनी तिथे जपानी नावे धारण केली आणि तिथेच रमल्या. जपानमधील शिंतो देवांबरोबरच हिंदू देवतासुध्दा पूजल्या जातात. भारतीय संस्कृतीचा जपानवरील परिणाम त्यांच्या लिपीवरसुध्दा दिसतो. जपानमधील भारतीय संस्कृतीच्या खुणा दर्शवणारा लेख.
चीन रेशीम मार्गाने बौध्द धर्म भारतातून अफगाणिस्तानात व तिथून मध्य आशिया, चीन आणि नंतर कोरियामध्ये पोहोचला. पाचव्या शतकात गांधार प्रांतातून 5 बौध्द भिक्षू या मार्गाने जपानमध्ये दाखल झाले. त्यांनी जपानमध्ये बौध्द धर्माचा प्रचार केला व जपानच्या लोकांना बौध्द धर्माची ओळख झाली. पुढे चीन व कोरियामधून अनेक बौध्द भिक्षू जपानची राजधानी नारामध्ये आले. जपानमध्ये अशी कथा सांगितली जाते की कोणी एक भिक्षू बुध्दाचा दात घेऊन आला होता. तो दात छिन्नी-हातोडयाने तोडण्याचा प्रयत्न केला गेला. छिन्नी आणि हातोडा तुटले, पण दात काही तुटला नाही! तेव्हा सोगा सम्राटाने असुका येथे बुध्दाचे पहिले मंदिर बांधले. आजही या मंदिरात बुध्दाची पूजा होते.
जपानची बुध्दावरील श्रध्दा बुध्दमूर्तीच्या रूपात दिसते. सातव्या शतकातील असुका येथील बुध्दमूर्तीपासून ते अगदी अलीकडे म्हणजे 1993मधील 120 मीटर उंच बुध्दमूर्तीपर्यंत जपानमध्ये सातत्याने बुध्दमूर्ती निर्माण केल्या गेल्या. यापैकी अनेक बुध्दमूर्ती राष्ट्रीय ठेवा (National Treasure) म्हणून जपल्या जातात, तर काही मूर्ती जागतिक वारसा म्हणून मान्यताप्राप्त आहेत.
सातव्या शतकात दोश्शो नावाचा एक जपानी बौध्द भिक्षू अतिशय अवघड प्रवास करून चीनमध्ये आला ते शुआन झांगच्या शोधात. आपल्याला माहीत असलेला 'प्रवासी' शुआन झांग, चीनमध्ये विद्वान गुरू म्हणून मान्यता पावला होता. शुआन झांग नालंदा विद्यापीठात शीलभद्र यांच्याकडून योगाचार शिकून आला होता. शुआन झांगकडून दोश्शोने योगाचाराची दीक्षा घेतली. जपानला परतल्यावर त्याने होस्सो नावाचा एक बौध्द पंथ स्थापन केला. जपानमधील 6 बौध्द पंथांपैकी हा एक पंथ. नंतरच्या काळात योगाचार पंथावर आधारित असलेला झेन (Zen) पंथ निर्माण झाला. 'झेन' या शब्दाचे मूळ योगाचारमधील 'ध्यान' या शब्दात व ध्यान पध्दतीमध्ये आहे. हा पंथ व यामधील झेन गुरूंच्या कथा जगभर प्रसिध्द आहेत.
चीनमधून आलेल्या महायान बौध्द पंथाबरोबर अनेक हिंदू देवतांचेसुध्दा जपानमध्ये आगमन झाले. या देवतांनी तिथे जपानी नावे धारण केली आणि तिथेच रमल्या. जपानमधील शिंतो देवांबरोबरच हिंदू देवतासुध्दा पूजल्या जातात.
हिंदू देवतांपैकी लोकप्रिय देवता आहे बेंझेटेन. बेंझेटेन अर्थात सरस्वती. जपानमध्ये बेंझेटेन ही पाणी, शब्द, वाचा, भाषण, संवाद, संगीत आणि विद्येची देवता आहे. तिच्या हातात वीणेसारखे बिवा नावाचे तंतुवाद्य दिसते. जपानमध्ये बेंझेटेनची अनेक मंदिरे पाहायला मिळतात.
साधारण पहिल्या शतकाच्या आसपास, 'सुवर्णप्रभास सूत्र' हे काही बौध्द प्रवचनांद्वारे उत्तर भारतात सांगितले गेले. त्यानंतर ते ग्रंथबध्द झाले. या संस्कृत ग्रंथाचे चीनमध्ये भाषांतर झाले - Sutra of the Golden Light या नावाने. या ग्रंथातील एक भाग सरस्वती देवीवर आहे. यामध्ये काही ठिकाणी सरस्वती ही महिषासुरमर्दिनीप्रमाणे अष्टभुजा रूपात वर्णिली आहे. जपानमधील काही मंदिरांतून बेंझेटेन महिषासुरमर्दिनी रूपातसुध्दा दिसते. या अष्टभुजा देवीच्या हातात शस्त्र असून ती राष्ट्राचे रक्षण करते, असे मानले जाते. चीन, कोरिया व जपान या देशांमध्ये राष्ट्ररक्षणार्थ या सूत्राचे पारायण होत असे.
आणखी एक शक्तिशाली देव आहे - कांगीतेन किंवा बिनायक-तेन (विनायक देव) अर्थात गणपती. सातव्या-आठव्या शतकात जपानमध्ये आलेल्या गणपतीची पूजा आजही केली जाते. हा देव सुख देणारा आहे. त्याला अवलोकितेश्वरसुध्दा म्हटले जाते. अवलोकितेश्वर हा सर्वांचे हित करणारा, संकटात मदत करणारा बौध्द देव आहे. आणखी एक विशेष असे की कांगीतेनला तळलेल्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो!
लक्ष्मी, कुबेर, चित्रगुप्त आदी देवतांसह हिंदू धर्मातील 12 आदित्यांप्रमाणे, जपानमध्येदेखील 12 देवतांचा एक समूह आहे. या देवांना 'जुनितेन' म्हणतात. (जुनी = 12, तेन = देव) या बारा देवता आहेत-
1) Bonten - ब्रह्मदेव. बॉनतेनचे वाहन हंस आहे. 2) Taishakuten - इंद्र देव. हा देवांचा राजा आहे. 3) Katen - अग्निदेव. यज्ञात स्थापन करून याला हवी अर्पण करतात. 4) Suiten - वरुण देव.
5) Bishamon - वैश्रवण, कुबेर. हा संपत्तीचा देव आहे. 6) Ishanaten - इशान किंवा शंकर. त्रिशूल धारण केलेली इशानतेनची मूर्ती इथे पाहायला मिळते.
7) Futen - वायुदेव. 8) Rasetsuten - राक्षस. नैर्ॠत्य दिशेचा देव. रक्षण करणारा. 9) Enmaten - मृत्यूची देवता - यम देव. दक्षिण दिशेची देवता. 10) Jiten - पृथ्वी देवता. 11) Gatten - चंद्र देव. याच्या हातात सशाचे चित्र असलेला अर्धचंद्र दाखवतात. 12 ) Nitten - सूर्यदेवता. त्याच्या उजव्या हातात सूर्याचा तेजस्वी गोळा दाखवला जातो.
भारतीय संस्कृतीचा जपानवरील परिणाम त्यांच्या लिपीवरसुध्दा दिसतो. आधी जपानमध्ये फक्त कांजी ही चिनी लिपी वापरली जात असे. बौध्द धर्माबरोबर, सहाव्या शतकानंतर अनेक संस्कृत ग्रंथ जपानमध्ये पोहोचले होते. तेव्हापासून बौध्द भिक्षूंना संस्कृतचा अभ्यास करण्याची गरज उद्भवली. आठव्या शतकातील जपानी बौध्द भिक्षू कूकई हा संस्कृत पंडित होता. याने संस्कृत भाषेचा व उच्चारांचा अभ्यास करून, काताकाना ही नवीन लिपी तयार केली. या लिपीमध्ये देवनागरी / सिध्दम् लिपीप्रमाणे अ - इ - उ - ए - ओ या क्रमाने स्वर येतात. तसेच या लिपीमधील 9 व्यंजने बाराखडीप्रमाणे चालवली जातात. आजही काही जपानी मठांमधून मंत्र लिहिण्यासाठी सिध्दम् लिपीचा वापर केला जातो. गंमत अशी की सिध्दम् लिपी ही ब्रह्माने तयार केलेल्या ब्राह्मी लिपीची कन्या. जपानमध्ये सिध्दम् अक्षरांना 'बॉन्जी ' (Bonji) - म्हणजे ब्रह्माची अक्षरे म्हटले जाते. सध्या लोकप्रिय असलेल्या 'Bonji Tshirts'ना 'ब्रह्माक्षर TShirts' म्हणणे वावगे ठरणार नाही!
तर, आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या पंतप्रधानांना संस्कृत भगवद्गीता भेट देतात, तेव्हा त्याला पूर्वी भारतातून जपानमध्ये गेलेल्या ज्ञानगंगेचा संदर्भ असतो. आणि तो दोन देशांना मैत्रीच्या धाग्याने पुन्हा एकदा एकत्र आणणारा दुवा असतो.
References -