''पूर्वांचलाला मुख्य प्रवाहाची आस''- राज्यपाल मा. पद्मनाभ आचार्य

03 Dec 2018 12:02:00

नागालँडचे राज्यपाल माननीय पद्मनाभजी आचार्य

कै. मधुकरराव महाजन स्मृती पुरस्काराच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पूर्वांचलातील स्थिती आणि भारतीयांची मानसिकता याकडे लक्ष वेधले. त्यांनी मांडलेले विचार उपस्थितांना अंतर्मुख करून गेले. त्यांच्या भाषणाचा हा स्वैर अनुवाद.

 या कार्यक्रमाच्या माध्यमातून मधुकरराव महाजनांच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे. सामाजिक कार्य, उद्योजकता आणि पत्रकारिता या तीन माध्यमांतून समाजाची सेवा करणाऱ्यांना महाजन स्मृती पुरस्काराने गौरवलं जातं. मी पूर्वांचलमध्ये असताना या तिन्ही माध्यमांचा अनुभव घेतला आहे.

 संघविचारांच्या नियतकालिकांना माध्यमात टिकून राहायचं असेल, तर त्यांना आर्थिक आधाराची गरज असते. आकाराने छोटया असलेल्या नियतकालिकांमध्ये बरेचदा एकाच व्यक्तीला सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात. त्या सगळया यशस्वीपणे पार पाडण्याची त्याची क्षमता असते असं नाही. आणि सर्व कामं एकटयाने करताना त्याची दमछाक होते, ही व्यथा आसाममधील आलोक साप्ताहिकाच्या संपादकांशी बोलताना माझ्या लक्षात आली. यावर काही उपाय करायला हवा असं मला वाटलं आणि त्यातूनच वृत्तपत्राला आर्थिकदृष्टया कणखर बनविण्यासाठी जाहिरात एजन्सी सुरू करण्याची कल्पना मला सुचली. मी एक जाहिरात एजन्सी सुरू केली. ही एजन्सी सुरू केल्यानंतर अनेक प्रकारच्या लोकांशी संबंध आला. एकदा अरविंद मफतलाल यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांच्या सचिवाने विचारले, ''कोण आहात?'' मी त्यांना विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असल्याचे आणि अरविंद मफतलाल यांना भेटण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. त्यांनी ''काय काम आहे?'' असं विचारल्यावर मी त्यांना सांगितलं की, ''तुमच्या कंपनीच्या उत्पादनांची पूर्वांचलात चर्चा झाली पाहिजे. तुमच्या उत्पादनांची जाहिरात तिथल्या दोन दैनिकांमध्ये येते. पण दैनिकातल्या जाहिरातीचं आयुष्य एक दिवसाचं असतं. तुम्ही जर साप्ताहिकात जाहिरात दिलीत, तर ती आठवडाभर लोकांच्या नजरेसमोर राहू शकते. म्हणूनच मी तुमच्याशी सहा साप्ताहिकांच्या ग्रूपसाठी बोलणी करायला आलो आहे.'' अशा तऱ्हेने मी जाहिरातींचा ओघ आपल्या नियतकालिकांकडे वळविण्यासाठी जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून तीन वर्षं प्रयत्न केले.

 विद्यार्थी परिषदेचं काम वाढवण्यासाठी, तिचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारिता खूपच महत्त्वाची आहे, हे लक्षात आल्यावर मीही पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मला काम करताना त्याचा नक्कीच फायदा झाला. 

समाजाला सुदृढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असते, हे आपण जाणतो. अभाविपच्या माध्यमातून मी पूर्वांचलमध्ये काम केलं आहे आणि गेली 4 वर्षं मी नागालँडचा राज्यपाल आहे. आजपर्यंत पूर्वांचलातील 4 राज्यांचं राज्यपालपद सांभाळले आहे. त्रिपुरा, आसाम, अरुणाचल आणि आता नागालँड. त्यामुळे ईशान्य भारतातील लोकांची पीडा, समस्या जवळून अनुभवली आहे. भौगोलिकदृष्टया अरुणाचल प्रदेश हे आसामपेक्षाही मोठं राज्य आहे. मात्र आजही चीन अरुणाचलवर दावा सांगत आहे. त्यामुळे हे राज्य वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. भारताचं अभिन्न अंग असलेल्या या राज्याच्या वेदना आपल्याला जाणवतात का? अरुणाचलचा प्रत्येक नागरिक राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन या संकटाच्या विरोधात उभा आहे. मात्र आपण त्यांच्या मागे ठामपणे उभे आहोत का? आसामची लोकसंख्या 3-4 कोटींच्या आसपास आहे. या लोकसंख्येच्या शास्त्रीय अभ्यासातून या राज्यात 40 लाख बांगला देशी घुसखोर असल्याचं समोर आलं आहे. पूर्वांचलातील ही आठही राज्यं फुटीरतावादाचा सामना करत आहेत. आपण एक भारतीय म्हणून आपल्याकडील सामर्थ्याचा उपयोग या दुर्बल राज्यांच्या मदतीसाठी करू शकतो का? असा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे.

नागालँडची लोकसंख्या 20 लाखांच्या आसपास आहे आणि तेथे 5 विद्यापीठं आहेत. त्यांपैकी दोन ख्रिश्चन विद्यापीठं आहेत. 3 लाखांच्यावर पदवीधर आहेत. त्यात वैद्यकीय, इंजीनिअरिंग असे सर्वच प्रकारचे पदवीधर आहेत. तरीही इथे बेकारी प्रचंड आहे. संपूर्ण पूर्वांचल दीर्घकाळ संघर्षाच्या छायेत आहे. बंडखोर गट, सैन्य दल यांच्या संघर्षात सामान्य माणूस मरतोय. किती तरी मुलं अनाथ होतात. याचा अचूक फायदा घेत ख्रिश्चन मिशनरी तेथे अनाथाश्रम चालवतात, शाळा-कॉलेज चालवतात, रुग्णालय चालवतात. आणि हिंदुत्ववादी विचारांच्या शाळा अभावानेच दिसतात. ख्रिश्चनांची संख्या तुलनेने कमी असूनही ते आपला प्रभाव निर्माण करतात. भगवान येशू त्यांना शक्ती देतो, तर आमचा परमेश्वर आम्हाला का शक्ती देत नाही?

मी कामानिमित्त देशभरात जिथे जिथे जातो, तिथल्या लोकांना पूर्वांचलात येण्याचं निमंत्रण देतो. मदतीचं आवाहन करतो. हा प्रदेश अधिक मजबूत बनविण्यासाठी त्याच्या अधिकाधिक जवळ गेलं पाहिजे. त्या लोकांच्या नित्य संपर्कात राहिलं पाहिजे. पण उर्वरित भारतातून तिथे येणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. नागालँडमधले आणि मिझोराममधले लोक किती कठीण परिस्थितीत राहत आहेत, हे तिथे जाऊन पाहिल्याशिवाय कळणार नाही.

 सेवेशिवाय विचारांना काहीच अर्थ नाही. वनवासी कल्याण आश्रमाने तिथे सेवा कार्यांची उभारणी केली, ती निश्चितच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. मात्र अशा अनेक कामांची आजही तिथे गरज आहे. एका महाविद्यालयात मी कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे 3000 विद्यार्थी आले होते. त्यांच्यापैकी कोणीही उग्रवादी विचार करणारा, त्या विचारांना जवळचा मानणारा कोणी आम्हाला दिसला नाही. काळ पुढे गेला आहे. हे बदल समजून घेत आपल्यालाही मानसिकता बदलावी लागेल. विधायक कामासाठी जोपर्यंत उर्वरित भारतातून मनुष्यबळ पूर्वांचलात जाणार नाही, तोपर्यंत आपल्या बोलण्याला फारसा अर्थ राहत नाही. या भागातील 98 टक्के सीमा या आंतरराष्ट्रीय सीमा असून चीन, म्यानमार, बांगला देश, तिबेट या देशांना संलग् आहेत. बाकी 2 टक्के सीमा देशांतर्गत आहेत. देशातील अन्य राज्यांपासून असलेलं हे वेगळेपण आणि त्यापासून असलेले धोके समजून घ्यायला हवेत.

पूर्वांचलात 200-300 बंडखोर गट आहेत. त्यांपैकी 5 नागालँडमध्ये आहेत. केंद्र सरकार त्या गटांशी बोलणी करत असते. येथील लोक 70 वर्षांपासून युध्दविरामासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक भागात काही ना काही उणिवा आहेत. त्या दूर करण्यासाठी तिथे पोहोचलं पाहिजे. तरच आपण ही जी राष्ट्रवादाची चर्चा करत आहोत, तिला अर्थ आहे. आपल्या विचारांचं 'आलोक' साप्ताहिक चालविण्यासाठी इतके प्रयत्न करावे लागले. गेली चार वर्षं तो पेपर बंद आहे.

पूर्वांचल हे नैसर्गिक साधनसंपत्तीचं भांडार आहे. भारतात पेट्रोलियम पदार्थ इथेच पहिल्यांदा सापडले. कोळसा तर लक्षावधी टनाने आहे. मोठमोठे जलप्रपात आहेत. या तिन्ही गोष्टी वीजनिर्मितीसाठी, उद्योगांसाठी महत्त्वाच्या आहेत. एकदा नानाजी देशमुख म्हणाले होते, ''आगामी काळात अरुणाचल प्रदेश किंवा नागालँड एक मोठं राज्य होईल.'' त्यांच्या बोलण्याचा अर्थ त्या वेळी मला कळला नव्हता. कारण त्या वेळी जनजाती सोडलं तर तिथे दुसरं वैशिष्टय मला दिसत नव्हतं.  नानाजी पुढे म्हणाले, ''या भागात इतके मोठे जलप्रपात आहेत, इतकं नैसर्गिक सौंदर्य आहे. ही नैसर्गिक संपन्नता म्हणजे सुप्तावस्थेतली ऊर्जेची कोठारं आहेत. याचा उपयोग करून ही राज्यं देशातली श्रीमंत राज्यं बनू शकतात.'' मात्र आजही आपण हे विधान गांभीर्याने घेतलेलं नाही.

आपल्या देशातील विद्यापीठांवर मला टीका करायची नाही, पण एक मुद्दा आवर्जून मांडायचा आहे. आपल्या विद्यापीठांतून वेगवेगळे 300 प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. मी 7-8 प्राचार्यांना भेटलो. प्रत्येक वेळी माझा एकच प्रश्न असे की आपल्या सभोवती समुद्र आहे, पण आपल्याकडे ओशनोलॉजी हा विषयच नाही. जी नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध आहे, त्याच्याशी संबंधित कोणताही अभ्यासक्रम आपल्याकडे दिसत नाही. उद्योग, व्यापार, वाणिज्य या विषयात त्या त्या राज्यांची वैशिष्टयं काय आहेत, यांचा विचार अभ्यासक्रम तयार करताना केला जात नाही.

नागालँडमध्ये दर वर्षी लाखो विद्यार्थी पदवीधर होतात. मात्र त्यांना नोकऱ्याच उपलब्ध नाहीत. नोकऱ्यांसाठी ते दिल्लीला जातात. नागालँड बिमारू राज्यावरून भिकारी राज्य बनले. 40 ते 50 कोटी इतकंही राज्याचं बजेट नाही. आमचे पदवीधर सुशिक्षित बेकार म्हणून राहतात, कारण या पाच विद्यापीठांनी समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक काय आहे हे समजूनच घेतलं नाही.

आसाममध्ये तेजपूर विद्यापीठाच्या प्राचार्यांना एकदा भेटलो. त्यांना विचारलं, ''आसामची अर्थव्यवस्था चहाच्या मळयांवर अवलंबून आहे. मग तुमच्याकडे कोणी चहाच्या मळयांवर संशोधन केलंय का?'' ते म्हणाले, ''17 जणांनी केलंय.'' त्यापैकी काही लोकांनी चहाच्या मळयांचा अभ्यास केला होता, तर काहींनी चहामळयांमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या स्थितीवर संशोधन केलं. मी त्यांच्याकडे ते संशोधन मागितलं, तेव्हा त्यांनी धुळीने माखलेली ती कागदपत्रं दिली. चहाच्या मळयांमध्ये काम करणाऱ्या लोकांविषयी जे काही संशोधन होतं, त्या संशोधनातल्या निष्कर्षांनंतर त्यांच्या परिस्थितीत काही फरक पडला नव्हता. कारण त्या संशोधनाला प्रत्यक्ष कृतीची जोडच दिलेली नव्हती. मग या संशोधनांचा समाजाला उपयोग काय? हे म्हणजे डॉक्टरांनी नुसतंच रोगनिदान करून औषध न देण्यासारखंच आहे.

फक्त नागालँडमध्येच 16 जनजाती आहेत. वेगवेगळया बोलीभाषा तिथे बोलल्या जातात. आपल्या देशात 800 विद्यापीठं आहेत. त्या बहुतेक विद्यांपीठांमध्ये परदेशी भाषा विभाग असतो. पण एकाही विद्यापीठात आपल्याकडील बोलीभाषांच्या अभ्यासाचा विभाग नाही.

आपण जोपर्यंत या लोकांना आत्मीयतेने जवळ करणार नाही, त्यांचं दिसणं, त्यांचा पोशाख, त्यांचं खाणं याविषयी जोपर्यंत आपुलकी दाखवणार नाही, तोपर्यंत त्यांना आपल्याविषयी प्रेम वाटणार नाही. तुम्ही लोक काहीही खाता, तुम्ही मंगोलियन दिसता, असे तुच्छ भाव आपल्या बोलण्यात असतील तर काहीही शक्य नाही. विविधतेत एकता हे आपल्या देशाचं वैशिष्टय आहे. भारतासारखा सुंदर देश जगाच्या पाठीवर कुठेही आढळणार नाही. मी मुंबईतील एका विद्यापीठाच्या प्राचार्यांना, उपप्राचार्यांना भेटलो आणि त्यांना राणी गायडिन्यूलू, तिरोट सिंह यांसारख्या पूर्वांचलातील 10 प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वांची नावं सांगितली. ती कोणालाही ठाऊक नव्हती. देशाच्या स्वातंत्र्यलढयात पूर्वांचलाचाही सहभाग कमी नव्हता. मात्र त्यांचं स्मरण कोणाला नाही, हे दुर्दैव आहे.

उर्वरित भारतातील लोकांना फिरण्यासाठी मोठया शहरांमध्ये, परदेशात जायचं असतं. पूर्वांचलात येण्याची त्यांना भीती वाटते. पण तिथेही लोक राहतात. आम्ही 365 दिवस तिथे राहतो. नागालँडसारख्या छोटया राज्याचा राज्यपाल बनणं ही शिक्षा असल्याचं लोक मानतात. पण माझ्या शपथविधीला संपूर्ण सभागृह भरलेलं होतं. आतापर्यंत जितके राज्यपाल इथे आले, त्यांच्या शपथविधीला अर्धं सभागृह तर सरकारी अधिकाऱ्यांनीच भरलेलं असे. मी ज्या संस्थेशी निगडित होतो, त्या माय होम इंडिया या संस्थेने इथे छोटी छोटी अनेक कामं केली आहेत. त्या प्रेमापोटी लोक आले होते.

इथल्या लोकांना वाटतं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीचे लोक नेते बनण्याच्या लायक नसतात, त्यांना समाज स्वीकारत नाही. माझं आडनाव आचार्य आहे. त्यामुळे  माझ्याविषयीही त्यांच्या मनात गैरसमज होतो. इतक्या वर्षांच्या गुलामीमुळे ही सवय लागली आहे. आज नरेंद्र मोदींसारखा महान नेता देशाच्या पंतप्रधानपदी आहे. संपूर्ण जगात भारताची ताकद वाढली आहे. 125 कोटीची लोकसंख्या आहे. एकेकाळी ही लोकसंख्या आपल्यासाठी शाप वाटत होता, आज ती वरदान बनली आहे. त्यातील 68 टक्के युवा आहेत. त्यांना कुशल बनवलं पाहिजे. आताच्या शिक्षण व्यवस्थेतून पदवीधर झालेले तरुण पारंपरिक कौशल्याची कामं करू शकत नाहीत. त्यांना नोकरीही मिळत नाही. एकेकाळी मीदेखील जाहिरात एजन्सी चालवून माझा उदरनिर्वाह करत होतो. विद्यापीठामुळे मी घडलो नाही, तर माझ्या सभोवतालचे लोक, विचारी मित्र आणि परिस्थिती यामुळे घडलो. कॉलेजमध्ये जेव्हा कॉन्व्होकेशन असायचं, त्यात दहा जणांना सुवर्णपदक मिळायचं. त्यांपैकी 8 जण तरी सुवर्णपदक घ्यायला जागेवरच नसायचे. ते आधीच पुढच्या शिक्षणासाठी परदेशात पळायचे. ब्रिटिशांनी तयार केलेल्या शिक्षणपध्दतीचे हे परिणाम आहेत.

आपली जीवनपध्दती वेगळी होती. पण आपण ब्रिटिशांनी लादलेल्या जीवनपध्दतीचे गुलाम बनलो. त्यांनी आपल्याला 'मोस्ट ओबेडिएंट सर्व्हंट' बनायला शिकवलं. नागालँडमध्ये कोणीही तरुण कुशलतेचं काम करण्यास तयार नाही. पदवीधर तरुणांना हाताने काही काम करायला नको आहे. सर्वांना नुसती सही करून सरकारी पगार घ्यायचा आहे.

या भागाच्या विकासात विद्यापीठं महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मात्र तसं घडताना दिसत नाही. मी अनेक प्राध्यापकांना विचारतो, ''तुम्हाला जन धन योजना माहीत आहे का? सरकारच्या कोणत्याही योजनेविषयी माहिती आहे का?'' ते सांगू शकत नाहीत. विद्यापीठं ही शिक्षणाची केंद्रं असलीच पाहिजेत, त्याचबरोबर त्यांनी त्या भागातील विकासाचे नोबेल एजंट बनण्याची जास्त गरज आहे. आपल्या देशातले विद्यार्थी शिक्षित आहेत, पण रोजगारक्षम नाहीत. विद्यापीठांनी सध्या अशी परिस्थिती केली आहे की, भारत संपन्न देश आहे, पण भारतीय गरीब आहेत. आर्थिक स्थितीत जी दरी निर्माण झाली आहे, त्यामुळे नक्षलवादी चळवळी होणं स्वाभाविकच आहे. पूर्वांचलातील फुटीरतावादी गटांना मारून प्रश्न सुटणार नाहीत. विकास हेच त्याचं उत्तर आहे. या लोकांसाठी चांगले उद्योग सुरू केले पाहिजेत. चांगल्या शाळा, चांगली रुग्णालयं, चांगले अनाथाश्रम सुरू केले पाहिजेत. मात्र त्यासाठी कोणी तयार आहे का? तर नाही.

माझं सर्वांना आवाहन आहे की, आपण वेळात वेळ काढून पूर्वांचलात यावं. तिथल्या समाजासाठी जे जमेल ते योगदान द्यावं. या अष्टभगिनींना मुख्य प्रवाहात आणणं ही भारतीय म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा विषय तुमच्यासमोर मांडायची मी संधी साधली.

शब्दांकन : सपना कदम-आचरेकर

 

सामाजिक कार्य, उद्योजकता आणि पत्रकारिता या तीन माध्यमांतून समाजाची सेवा करणाऱ्यांना महाजन स्मृती पुरस्काराने गौरवले

 

Powered By Sangraha 9.0