रूपकुंड सफरनामा - 1

28 Dec 2018 16:48:00

 

रूपकुंड... नंदादेवीच्या कैलासाला जाण्यापूर्वीचं विश्रांतीचं ठिकाण. तिची तहान भागवण्यासाठी महादेवांनी त्रिशूल जमिनीत खुपसून निर्माण केलेलं सुंदर, अलौकिक तळं. या स्थळाविषयी आणि येथे पोहोचण्याच्या मार्गाविषयीची रंजक माहिती.


उत्तराखंडात गढवाल व कुमाऊँ यांच्या सीमेवर आहे नंदादेवी नॅशनल पार्क. नंदादेवी अभयारण्याच्या मध्यावर नंदादेवीची दोन शिखरं आहेत. उंची 7816 मी. - भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं शिखर अन तिथल्या देवतेला, नंदादेवीला उत्तराखंडातले लोक मानतात. तिची पूजा करतात. सातव्या शतकात गढ़वालचे राजे शालिपाल यांनी राजधानी चांदपूर गढीहून देवी श्रीनंदा हिला दर बारा वर्षांनी माहेराहून कैलासावर पाठवण्याची परंपरा सुरू केली.

दर बारा वर्षांनी होणाऱ्या 'नंदा जात' यात्रेचा गढवालींना फार अभिमान. नंदादेवीला 'राजराजेश्वरी' म्हटलं जातं. नंदादेवीविषयी अनेक कथा प्रचलित. काहींच्या मते ती पार्वतीची बहीण, दक्ष प्रजापतीची कन्या. अनेक मतं. पण ती पार्वतीचं रूप आहे हे प्रामुख्याने मानलं जातं. नंदादेवीची अनेक नावं, त्यापैकी शिवा, सुनन्दा, शुभानन्दा, नन्दिनी. नंदादेवी हे गढवाली लोकांच्या श्रध्देचं प्रतीक आहे व परंपरेनुसार दर बारा वर्षांनी नंदादेवी राजजातचं - नंदा जात यात्रेचं भव्य आयोजन केलं जातं.

'नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व्ह (NDBR)' असं या भागाला संबोधलं जातं. या भागाला जागतिक वारशाचा दर्जा (UNESCO World Heritage) प्राप्त झालाय.

नंदादेवी शिखरांभोवती अगणित हिमशिखरं (6000 मी.हून जास्त उंच). वर्तुळाकार कडी करून. निल एटकेन यांच्या 'द नंदादेवी अफेअर'मध्ये नंदादेवी पर्वत हे पार्वतीचं निवासस्थान असल्याच्या पौराणिक माहितीला उपग्रहावरून काढलेल्या फोटोमुळे पुष्टी मिळते, कारण नंदादेवीला वेढणाऱ्या शिखरांचा आकार हुबेहूब 'ॐ'सारखा दिसतो व तिबेटमधला कैलास (कैलास पाच आहेत, त्यातले चार भारतात आणि एक तिबेटमध्ये) हा त्यावरच्या चंद्रबिंदूसारखा दिसतो.

लोकांची दृढ धारणा आहे की नंदादेवी भाद्रपद कृष्ण पक्षात आपल्या माहेरी येते व अष्टमीला तिची माहेरून पाठवणी केली जाते. नंदा जात ही चमोली जिल्ह्यातल्या कर्णप्रयाग तहसीलमध्ये असलेल्या नौटी गावातल्या नंदादेवी मंदिरापासून सुरू होऊन 280 कि.मी. पायी यात्रा करून हिमालयाच्या पर्वतशिखरांमध्ये असणाऱ्या होमकुंड या ठिकाणी पूजा करून पुन्हा नौटीला येऊन पूर्ण होते. या यात्रेची अंतिम पाच ठिकाणं उच्च हिमालयीन क्षेत्रातल्या निर्जन भागात आहेत.

नंदा राजजातचा सर्वात अद्भुत टप्पा आहे, तो म्हणजे 'रूपकुंड'... चमोली जिल्ह्यातलं नंदाकोट, नंदाखात व त्रिशूल या विशाल हिमशिखरांमधे वसलेलं रूपकुंड, ग्लेशिअर तळं.. 4800 मी. उंचीवर असणारं.

एकदा कैलासावर जाताना देवी नंदाला तहान लागली. देवी नंदाचं सुकेलेलं मुख बघून भगवान शिवांनी आपला त्रिशूळ तिथे जमिनीत खुपसला. तिथे जलधारा अवतरित झाल्या. त्यातलं पाणी नंदाने प्राशन केलं अन त्या पाण्यात शिव व नंदादेवी यांची प्रतिबिंबं पडली, म्हणून रूपकुंड.


याच्या सफरनाम्याची ही पार्श्वभूमी. या प्रवासादरम्यान आपल्याला अनेक हिमशिखरांचं दर्शन होतं, त्यातली मुख्य नंदादेवी, नंदाघुंटी / नंदाघुंगटी, त्रिशूल ही शिखरं अन अतिशय निसर्गरम्य असा हा प्रवास.

रूपकुंड हे सांगाडयांचं तळं म्हणून ओळखलं जातं. रूपकुंड हे नुसतं सुंदरच नव्हे, तर रूपकुंडात साधारण 600-1000 वर्षांपूर्वीचे 500-600 मानवी सांगाडे अस्तित्वात आहेत, ज्यांचे आकार सामान्य मनुष्याच्या आकारापेक्षा मोठे. बर्फ वितळल्यावर हे सांगाडे, अवशेष पाण्याबाहेर दिसायला लागतात.

तर असं हे रूपकुंड. नंदादेवीच्या कैलासाला जाण्यापूर्वीचं विश्रांतीचं ठिकाण.

****

रूपकुंड... नंदादेवीच्या कैलासाला जाण्यापूर्वीचं विश्रांतीचं ठिकाण. तिची तहान भागवण्यासाठी महादेवांनी त्रिशूल जमिनीत खुपसून निर्माण केलेलं सुंदर, अलौकिक तळं.

या मार्गाच्या छोटया छोटया भागांची माहिती -

रूपकुंड यात्रेच्या मार्गात एक अत्यंत सुंदर असं कुरण -गढवाली भाषेत 'बुग्याल' आपल्या समोर येतं. हे आहे बेदिनी बुग्याल अन त्याच्या जवळ आहे ते अली बुग्याल. बेदिनी बुग्यालपासून रूपकुंडाकडे जाण्याचा एकच रस्ता आहे. पण बेदिनीपर्यंत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक आहे तो लोहाजंगहून कुलिंग, वानहून बेदिनी व दुसरा लोहाजंगहून कुलिंग, दीदना, आली बुग्यालपर्यंत. लोहाजंगहून कुलिंगवरून वानपर्यंत वाहन योग्य रस्ता बनवला आहे. पण बसेस लोहाजंगपर्यंतच येऊ शकतात. लोहाजंगहून वानपर्यंत जाण्यासाठी छोटया गाडयांचा वापर केला जातो. अन्यथा हा रस्ता पायी जाण्यासाठी योग्य. अंतर दहा कि.मी.

1) वान ते बेदिनी बुग्याल - सुंदर पायवाट आहे. एकदा या मार्गावरून चालायला सुरुवात केली की बेदिनीपर्यंत मार्ग तोच. वानहून सुरुवात करताना मध्यम चढाई अनुभवायला मिळते जवळजवळ तीन किमी. नंतरचा रस्ता उतरणीचा आहे. नीलगंगा नदीच्या पुलापर्यंत उतरत जायचंय. वानची उंची 2460 मी. आहे. तीन कि.मी.नंतर ही उंची 2717 मी. इतकी वाढत जाते. यानंतर नीलगंगेवरचा पूल 2558 मी.वर आहे. नीलगंगेनंतर अत्यंत तीव्र चढण अनुभवायला मिळते. पाच कि.मी.नंतर बेदिनी बुग्यालच्या सीमेत आपण प्रवेश करतो. बुग्याल सुरू होतो अन इथून कॅम्प साइट जवळजवळ दीड कि.मी. दूर आहे. बेदिनी बुग्यालची उंची 3473 मी. आहे.

2) लोहाजंग ते दीदना - हा लोहाजंगहून बेदिनीपर्यंत जाण्याचा दुसरा रस्ता आहे. पहिला रस्ता वान या गावावरून जातो, ज्याचं वर्णन वरती केलंय.

लोहाजंगहून वानपर्यंतच्या रस्त्यावर चार कि.मी.नंतर कुलिंग गाव आपल्याला दिसतं. कुलिंगहून नीलगंगेच्या दुसऱ्याा बाजूला दीदना गाव नजरेस पडतं. दीदनाला जाण्यासाठी खाली उतरून अन मग नीलगंगा पार करून वर चढून जावं लागतं. या मार्गात कुलिंगहून नीलगंगेपर्यंत अवघड अशी उतरण आहे अन नीलगंगा पार करून दीदनापर्यंत जबरदस्त चढणही आहे. कुलिंग ते दीदना हे अंतर जवळजवळ चार कि.मी. आहे.

लोहाजंगची उंची 2350 मी., कुलिंग 2310 मी., नीलगंगेचा पूल 1950 मी. व दीदना 2433 मी. एवढया उंचीवर आहेत. याशिवाय लोहाजंगहून कुलिंगला न जाता सरळ नीलगंगा पुलापर्यंत जाण्यासाठीही एक रस्ता आहे, पण अवघड असा. फारसा न वापरला जणारा.

3) दीदनाहून अली बुग्याल ते बेदिनी बुग्याल - दीदनाहून चढण सतत आहेच. दोन किलोमीटरवर तोलपानी नावाचं एक स्थान आहे. काही घरांची वस्ती. ही तीव्र चढण बेदिनी बुग्यालला जाऊनच संपते. अली बुग्यालला पोहोचल्यावर दर्शन होतं ते त्रिशूल शिखराचं.

अली बुग्यालहून बेदिनी तीन कि.मी. अंतरावर आहे. रस्ता हिरव्यागार कुरणातून जाणारा, त्यामुळे तो कसा अन कधी संपतो हे कळतही नाही. दीदना 2433, तोलपानी 2872, अली बुग्याल 3450 व बेदिनी बुग्याल 3473 मी. इतक्या उंचीवर आहेत. एक शॉर्ट कट दीदनाहून बेदिनीला जातो.

4) बेदिनी बुग्यालहून पत्थर नाचनी - पत्थर नाचनी, पथेर नाचणी, याला पातर नचौणियांही म्हटलं जातं. बेदिनी कॅम्प साइटहून अर्धा कि.मी. पुढे बेदिनी कुंड आपल्याला दिसतं. सुंदरसं. थोडी चढण आहे. ही चढाई चार कि.मी.वर पत्थर नाचनीपर्यंतच आहे. पत्थर नाचनीची उंची समुद्रसपाटीपासून 3892 मी. आहे. पत्थर नाचनीला फायबर हट्स बांधल्या आहेत.

5) पत्थर नाचनी ते कालू विनायक - बुग्याल संपतात व एक जीवघेणी चढण. अंतर अडीच कि.मी. अन आपण येतो 4324 मी. उंचीवर.

6) कालू विनायक ते भगुवाबासा - सोपा रस्ता व उतरत जाणारा. उंची 4276 मी. भगुवाबासामध्ये कॅम्प साइट, सरकारी फायबर हट्स आहेत. लोक बेदिनी बुग्यालहून भगुवाबासापर्यंत येऊन थांबतात. रात्री मुक्काम करून मग पुढच्या टप्प्यासाठी चालायला लागतात. महत्त्वाची एक गोष्ट आहे की, बेदिनी बुग्यालनंतर भगुवाबासालाच पाणी मिळतं. बेदिनीपासून याचं अंतर आठ कि.मी.

7) भगुवाबासा ते रूपकुंड - अंतर पाच कि.मी. व शेवटचं एक कि.मी. अतिशय अवघड, जीवघेणं. सुरुवातीचे चार कि.मी. बरा रस्ता. या ठिकाणी हवेतल्या ऑॅक्सिजनची कमतरता जाणवायला लागते. शेवटचा एक कि.मी. उभी चढण चढून जावं लागतं, जी तुटलेल्या मोठया दगडांच्या छोटया छोटया तुकडयांच्या रस्त्याची. इथे स्लेटी (पायऱ्यापायऱ्यांचे) दगड आहेत, जे ऊन व सावली व बर्फवृष्टी यामुळे लवकर तुटत जातात अन यांचे तुकडे वरून खाली ढासळत येतात, पडतात. याचमुळे या भागात ट्रेकर्स, गाईड यांचे सर्वात जास्त अपघाती मृत्यू होतात.

रूपकुंडात साधारण 600-1000 वर्षांपूर्वीचे 500-600 मानवी सांगाडे अस्तित्वात आहेत

 

भगुवाबासा 4276 मी., तर, रूपकुंडाची उंची 4782 मी. आहे.

रूपकुंडाच्या पुढे दोन दिशांना अत्यंत विशाल दगड दिसतात, ज्यांवर चढणं असंभव आहे. तिसऱ्याा बाजूला जुनारगली खिंड आहे, जिथून दुसऱ्या बाजूला जाता येतं. ज्यांना जुनारगली खिंड पार करायची इच्छा असते, ते सकाळी भगुवाबासाहून दुपार होण्याआधी ही पार करतात. दुपारनंतर हिमालयातल्या प्रत्येक अतिउंचीवरील भागांप्रमाणेच इथेही ढग येतात व हवामान खराब होतं. बर्फवृष्टी होते. जुनारगलीहून पुढे शिलासमुद्र ग्लेशियर अन होमकुंड - जिथे नंदादेवी राजजात समाप्त होते.

लोहाजंगपर्यंत कसं जावं - ही आहे लोहाजंगहून रूपकुंडला जाण्याची कथा, त्याचे टप्पे. लोहाजंगला कसं जायचं?

लोहाजंग प्रशासकीय स्वरूपात चमोली जिल्ह्यात, म्हणजे गढवालमध्ये आहे, पण लेकिन भौगोलिक स्वरूपात कुमाऊँ व गढवाल यांच्या सीमाभागात.

हरिद्वारहून प्रवास सुरू केला, तर हरिद्वार-बद्रिनाथ मार्गावर कर्णप्रयागपर्यंत जावं लागतं. कर्णप्रयागहून सिमली, थराली, देवाल, मुंडोली व लोहाजंग.

कुमाऊँमधून जायचं झालं, तर हल्द्वनीहून काठगोदाम, अल्मोडा, सोमेश्वर, कौसानी, बैजनाथ, ग्वालदम, थराली, देवाल, मुण्डोली व लोहाजंग. ग्वालदमहून थरालीला न जाता सरळ देवालपर्यंत जाता येतं. पण सध्या हा रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे दोन्हीही मार्गांनी थरालीपर्यंत वाहनं उपलब्ध आहेत.

पण हे नक्कीच विसरू नये...

पहाड़ों के सीधे रास्ते तो बडे गहरे होते हैं।...

डॉ. अमिता कुलकर्णी

pourohitamita62@gmail.com

(क्रमश:)

 

Powered By Sangraha 9.0