मुळात 31 डिसेंबर साजरा करणं / न करणं यावरून आपल्याकडे बरंच सांस्कृतिक युध्द होत असतं. कदाचित सभोवतालच्या वातावरणाचा प्रभाव असेल किंवा 'वर्षारंभ' साजरा करण्याऐवजी 'वर्षअखेर' साजरी करण्याच्या रिवाजामुळे असेल, सरत्या वर्षामुळे येणारी कातरता 31 डिसेंबरलाच जास्त जाणवते! एकूणच 'साल'असो वा 'शक', बदलताना एक हुरहुर मनात दाटतेच.
तकाळची पसरे शांती,
मुले माणसे स्वस्थ घोरती;
धूम्रदीप रस्त्यांत तेवतो;
फिकट पांढरी दीप्ति पसरितो.
मध्यरात्रिचा निर्जन रस्ता
प्रकाशांत त्या वितरि विकटता.
दचकचुनि तों - बारा ठणठण
घडयाळ साङ्गे स्पष्ट वाजवुन,
''वर्षाची या सरती घटिका,
पहा चालली सोडुन लोकां!''
वर्ष बिचारें गेलें, गेलें
करपलों जणू वियोगानलें!
अंत:करणीं ये कालवुनी,
विषादतमिं मी गेलों बुडुनी!
अगणित वर्षे आली गेलीं,
कितीक लोकें जन्मा आलीं,
हंसली, रडली, म्हुनी गेलीं,
'उदो' 'उदो' हो त्या त्या काळीं,
स्मृतीहि न त्या अमरांची उरली!
आजहि अगणित जगती मरती,
त्यांत कुणी अजरामर होती
किति अमरत्वा परि पचवोनी,
काळ बसे हा 'आ' वासोनी!
उदास असले विचार येती,
लाज परी मज वाटे चित्ती.
असेल काळाहाती मरणें,
परी आमुच्या हाती जगणें!
कां नच मग वीरोचित जगणें,
अभिमानाने हांसत मरणे?
विचार असले जो मनिं आले,
अंत:करणहि पार निवळलें,
दिव्य कांहि तरि मनि आठवुनी,
झोंपी गेलों अश्रू पुसुनी.
वर्षाच्या अखेरच्या तारखेचं शीर्षक असणारी ही अनंत काणेकरांची कविता.
मुळात 31 डिसेंबर साजरा करणं / न करणं यावरून आपल्याकडे बरंच सांस्कृतिक युध्द होत असतं. कदाचित सभोवतालच्या वातावरणाचा प्रभाव असेल किंवा 'वर्षारंभ' साजरा करण्याऐवजी 'वर्षअखेर' साजरी करण्याच्या रिवाजामुळे असेल, सरत्या वर्षामुळे येणारी कातरता 31 डिसेंबरलाच जास्त जाणवते! एकूणच 'साल' असो वा 'शक', बदलताना एक हुरहुर मनात दाटतेच.
सरत्या वर्षात काय कमावलं, काय गमावलं याचे हिशेब घातले जातात. नव्या वर्षासाठी नव्या उमेदीने संकल्प केले जातात!
काणेकरांनी ही कविता लिहिली, तेव्हा ते जेमतेम 22 वर्षांचे असतील. देशात इंग्रजी सत्तेविरुध्द संघर्ष धुमसत होता. देशप्रेमाने व उत्तुंग व्यक्तित्वांच्या कार्याने तरुण भारावून जात होते. काणेकरांनी बारा-तेराव्या वर्षी पहिली कविता लिहिली, तीही स्वदेशावरच. त्यानंतर टिळकांच्या निधनानंतरही त्यांनी दीर्घकविता लिहिली होती. ते पदवीधर झाले, तेव्हा महाराष्ट्रात जोरात असलेल्या कम्युनिस्ट चळवळीत ओढले गेले. त्याच वेळी त्यांचं कवितालेखनदेखील भरात आलेलं होतं.
त्याकाळी आजसारखा सरत्या वर्षाला जल्लोशात निरोप दिला जात नसे. एक कविमनाचा विचारी तरुण त्या निरोपाच्या क्षणाकडे एकटाच पाहत असलेला या कवितेत दिसतो.
रात्रीची शांत वेळ आहे. आजूबाजूची सारी माणसं गाढ झोपेत आहेत. मीच काय तो एकटा जागा! रस्त्यावरचा रॉकेलचा दिवा तेवढा धूर सोडत फिकट पांढऱ्या प्रकाशाची पखरण करतो आहे. मध्यरात्रीच्या वेळी त्या दिव्याच्या प्रकाशात लांबच लांब पसरलेला हा निर्मनुष्य रस्ता भयाण दिसतोय. कुठे कसली चाहूल नाही. त्या गोठलेल्या शांततेत एकदमच ठणठण करत घडयाळ बारा टोले देतं, अन मी दचकतोच!
माझ्या विचारतंद्रीला भंग करत घडयाळ जणू परत परत सांगू लागलं... या 1926ची घटका भरली बरं आता! ते पहा, ते या जीवनलोकाला सोडून चाललंय! हीच ती शेवटची घडी. वियोगाची घडी.
त्याच्या त्या जाणीव करून देण्याने मी एकदम उदासलो! आपल्यासोबत बारा महिन्यांचा काळ व्यतीत केलेलं हे वर्ष आता जाणार, या वियोगाच्या कल्पनेने हृदयात आग पेटली आणि माझं मन त्यात करपूनच गेलं! काळजात कालवाकालव झाली. खेदाचा, दु:खाचा अंधारसमुद्र पसरला अन त्यात मी पार बुडूनच गेलो.
अशीच येऊन निघून जाणारी अगणित वर्षं मला दिसू लागली. ठरल्या वेळी काळ कूस बदलतो, एक नवं वर्ष त्याच्या कुशीत जन्माला आलेलं असतं. काही वर्षं हसरी - आनंदी असतात, तर काही रडवी - दु:ख देणारी! काही इतकी कर्तबगार निपजतात की जग त्यांना डोक्यावर घेऊन नाचतं! असं वाटतं की हे वर्ष कधीच विसरलं जाणार नाही. याची स्मृती कायम कोरली जाणार. हे अमर होणार खास!
एकेका वर्षात किती माणसं जन्मतात, किती माणसं काहीतरी भव्यदिव्य करून जातात. तेव्हा असं वाटतं की या सम हेच! पण अशा अजरामर झालेल्या वर्षांची वा त्यात जन्माला येऊन अमरपदाला पोहोचलेल्या लोकांची पुसटशी तरी आठवण आजच्या जगात उरली आहे काय?
असं म्हणत असलो, तरी या वर्तमानकाळातही अशीच कितीक वर्षं ये-जा करत आहेत. त्यातही किती जण अमरत्वाला पोहोचण्यासारखं काम करत आहेतच. पण हा महाकाल आपला अकराळविकराळ जबडा उघडून बसलाच आहे, अन एकामागे एक माणसं नि वर्षांमागून वर्षं तो गिळंकृत करतोच आहे. सारं काही करून शेवटी या कालमुखातच त्यांच्या आहुती पडणार असतील अन त्यांच्या कर्तृत्वाची इवली खूणही मागे राहणार नसेल, तर या चक्राला अर्थ तरी काय? कशासाठी हे सारं चाललं आहे? काळ तरी पुन्हा का ही वर्षं जन्माला घालतो आहे? आणि आम्ही तरी काळाच्या या नाशिवंत तुकडयावर आमचं नाव कोरायचा खटाटोप कशासाठी करतो आहोत? अशा उदास विचारांच्या लाटांमागून लाटा माझ्या मनात या विझत चाललेल्या क्षणाकडे पाहताना येत आहेत.
पण माझ्यातलं काहीतरी आत जागं होतं आणि मग मलाच या दुबळया विचारांची लाज वाटू लागते.
काळाच्या या तुकडयांची आहुती पडण्यापूर्वी त्यावर आपल्या कर्तृत्वाच्या खुणा उठवणारे वीर मला आठवतात. त्याच्या निर्दय स्वाहाकारापुढे न नमता पुन्हा नव्याने जन्मलेल्या प्रत्येक क्षणाला सजवूनच पाठवणारे कलाकार मला स्मरतात.
अन मग मीच मला प्रश्न करतो - भले आमचा घास घेणं काळाहाती असेल, पण त्याच्या मुखी पडण्यापर्यंतचा वेळ तर माझा आहे! माझा स्वत:चा आहे. माझ्या हातात आहे. माझ्या मरणाचा क्षण त्याने निश्चित केला असेना का! जगतानाचे क्षण तर माझे आहेत! ते क्षण वापरणं, ते सुंदर करणं, त्याला काहीतरी कर्तृत्वाचा टिळा लावणं माझ्या हातात आहेच.
मग मृत्यूलाही आव्हान देणाऱ्या एखाद्या वीरासारखं मी का जगू नये? इथे आलो नि नुसताच गेलो नाही, काहीतरी करून गेलो असा अभिमान घेऊन का जाऊ नये? मिळालेलं आयुष्य सार्थ केल्याचा आनंद, ते समाधानाचं हसू मी का मिरवू नये?
आणि हे विचार येताच आधीचे ते गढूळ विचार पार विरून गेले. चित्त निवळशंख पाण्यासारखं शुध्द झालं. काळया काळया रात्रीच्या, सरत्या वर्षाच्या त्या अंधाराला माझ्या उजळलेल्या मनाने वितळवूनच टाकलं.
माझ्यातला दिव्यत्वाचा अंश जागा होऊन माझ्या अंधाऱ्या मनाला तेजाळून गेला. काहीतरी नवं निर्माण करण्याच्या माझ्या मनाच्या ऊर्मीने माझे निराशेपोटी ओघळलेले अश्रू पुसले.
उद्याच्या दिवशी काळाच्या कुशीत पुन्हा एक कोवळं रसरशीत वर्ष मुठी चोखत पडलेलं मला दिसणार आहे नि त्याला मी माझ्या हातून घडणाऱ्या काही चांगल्या कामांनी नटवणार आहे, या समाधानाने त्या सरत्या क्षणाला निरोप देऊन मी शांतपणे झोपी गेलो.
नव्या उमेदीने जागा होण्यासाठी!