अध्ययन समस्या

17 Dec 2018 14:52:00

अध्ययन अक्षमता म्हणजे एखादी गोष्ट आत्मसात करताना येणारी अडचण. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना वाचन, लेखन, गणित, शुध्दलेखन, व्याकरण ही विविध कौशल्यं शिकताना, आत्मसात करताना काही अडचणी येतात. आपण एखादी गोष्ट शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये त्याचं प्रोसेसिंग होत असतं. परंतु अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांच्या मेंदूमध्ये हे प्रोसेसिंग योग्य प्रकारे होत नाही.

 

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

मुलांना अभ्यास करताना येणारी अडचण, त्यांना परीक्षेत मिळणारे कमी माक्र्स यामुळे पालक नेहमीच चिंतित असलेले आपण बघतो. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा असं पालक, शिक्षक यांना वाटत असलं, तरीही त्यांचं मुख्य लक्ष मुलांच्या अभ्यासाकडेच असतं. बऱ्याचदा टोकाच्या दोन भूमिका असणारे पालक बघायला मिळतात. एक पालकवर्ग फक्त अभ्यास, मार्क यावरच लक्ष केंद्रित करताना दिसतो. सतत अभ्यासाबद्दल, मार्कांबद्दल बोलणं, त्याबद्दल मुलांना सतत सांगत राहणं. तर दुसरा पालकवर्ग, ज्यामध्ये पालक अभ्यासाबरोबर इतर गोष्टींनासुध्दा तितकंच महत्त्व देतात. माझा मुलगा अगदी नंबरात आला नाही तरी चालेल, पण त्याला बाकीच्या गोष्टीसुध्दा शिकता आल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं असतं. तर मी काही पालक असेही बघितले आहेत की ज्यांची मुलं खरंच अभ्यासात मागे पडलेली असतात, परंतु योग्य वेळी त्यांचे पालक त्यावर काही उपाय शोधताना दिसत नाहीत आणि मग एकदम आठवी-नववीमध्ये आल्यानंतर हे पालक मुलांना आमच्याकडे घेऊन येतात.

आजकाल शाळांमध्ये शिक्षणपध्दतीत पूर्वीपेक्षा बराच बदल झाला आहे. बऱ्याच शाळांमध्ये ज्युनिअर-सिनियर केजीमध्ये लिखाणावर तितकासा भर नसतो. मग पहिलीत गेल्यावर अचानक वाचन आणि लेखन सुरू होतं. पहिली-दुसरीमध्ये आजकाल काही ठिकाणी परीक्षाही नसतात. तिसरीत गेल्यावर मग अचानक अभ्यास वाढल्यासारखा वाटतो. या वयात मुलांना जेव्हा वाचायला, लिहायला किंवा अर्थ समजून घ्यायला कठीण जातं, तेव्हा त्याकडे काही वेळा तितकंसं लक्ष दिलं जात नाही. पहिली-दुसरीत असताना आत्ताच अभ्यास सुरू झालाय म्हणून कठीण जात असेल, तिसरी-चौथीत एकदम अभ्यास वाढला म्हणून कठीण जात असेल, पुढच्या वर्षी होईल सुधारणा असं करत करत मुलगा सहावी-सातवी-आठवीमध्ये येऊन पोहोचतो, पण तरीही म्हणावी तितकी प्रगती झालेली दिसत नाही. काही मुलं तर अगदी दर वर्षी नापास होतात, परंतु पुढच्या वर्गात जातात, त्यामुळे पालकांनासुध्दा त्याचं गांभीर्य म्हणावं तितकं समजत नाही.


 

मुलं अभ्यासात मागे पडतात, तेव्हा त्याची अनेक कारणं असू शकतात. काही वेळा मुलांना अभ्यासाबद्दल गांभीर्य आलेलं नसतं, काही वेळा एखादा विषय कठीण जात असतो, काही जणांना अभ्यासामध्ये रस नसतो, काहींना लिहायला, वाचायला किंवा एखादी संकल्पना समजून घ्यायला कठीण जातं, काही मुलं चंचलतेमुळे मागे पडतात, काहींना अभ्यास नेमका कसा करावा हे कळत नसतं, काहींना परीक्षेची भीती असते. सातत्याने अभ्यासात येणाऱ्या अपयशामुळे बऱ्याचदा शिक्षकांना आणि पालकांना असं वाटतं की या मुलाला डोकंच कमी आहे. गतिमंदत्व (Slow Learner), मतिमंदत्व (Mentally Challenged), स्वमग्नता (Autism), बहुविकलांगता, इतर शारीरिक, मानसिक, भावनिक, बौध्दिक व्यंग, अतिचंचलता या कारणांमुळेच सर्वसाधारणत: मुलं अभ्यासात मागे पडू शकतात असा आपला समज असतो. पण यापेक्षा वेगळा असणारा मुलांचा एक गट आहे, जो आपल्या सर्वांनाच बुचकळयात टाकतो. या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचं व्यंग नसतं, ती दिसतातही चारचौघांसारखी. त्यांची बुध्दिमत्ता सर्वसाधारण, उत्तम किंवा अतिउत्तम असते. विषय आकलन चांगलं होत असल्याने ही मुलं तोंडी उत्तरही व्यवस्थित देऊ शकतात. पण लेखी परीक्षेत मात्र ती नापास होतात. अशा परिस्थितीत त्यांचं अभ्यासात मागे पडणं पालक आणि शिक्षक दोघांनाही बुचकळयात टाकतं. मग या मुलांवर 'आळशी', 'हट्टी', 'धांदरट', 'लक्षच नसतं कधी' असे शिक्के बसायला लागतात.

मग अशा वेळी या मुलांना नेमकं काय होतं? कोणतंही व्यंग नसताना ही मुलं अभ्यासात का मागे पडतात? तर याचं एक कारण 'अध्ययनविषयक अक्षमता' (Learning Disability) हे असू शकतं. आमीर खानचा 'तारे जमीं पर' हा चित्रपट आला, तेव्हा Learning Disability अशी काही समस्या असू शकते हे लोकांना कळलं. अध्ययन अक्षमता (LD) असणाऱ्या मुलांना परीक्षेच्या वेळी आवश्यकतेनुसार काही सवलती मिळतात, ही गोष्ट कळल्यानंतर काही पालक स्वत:हून आपल्या मुलांना LD तपासणीसाठी घेऊन येतात. मी शाळेत काम करत असताना असे अनेक पालक मला भेटले. आपला मुलगा केवळ पास व्हावा यासाठी त्याला एखाद्या Disorderचा शिक्कासुध्दा चालेल, ही वृत्ती फारच अचंबित करणारी आहे. यासाठी पालकांना याबद्दल योग्य ती माहिती मिळायला हवी आणि त्यासाठी त्यांच्याकडून योग्य ते प्रयत्न व्हायला हवेत, म्हणून या विषयावर लिहावंसं वाटलं.

अध्ययन अक्षमता म्हणजे एखादी गोष्ट आत्मसात करताना येणारी अडचण. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना वाचन, लेखन, गणित, शुध्दलेखन, व्याकरण ही विविध कौशल्यं शिकताना, आत्मसात करताना काही अडचणी येतात. आपण एखादी गोष्ट शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये त्याचं प्रोसेसिंग होत असतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला मिळालेली माहिती साठवून ठेवणं, ती लक्षात ठेवणं, गरजेच्या वेळी ती आठवणं अशा पध्दतीने आपला मेंदू काम करत असतो. परंतु अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांच्या मेंदूमध्ये हे प्रोसेसिंग योग्य प्रकारे होत नाही. मेंदूमधील भिन्न रचना हे अध्ययन अक्षमतेचं प्रमुख कारण आहे आणि यामुळे या मुलांमध्ये पुढील काही लक्षणं दिसून येतात -

  1. वाचताना अडखळणं. एखादा शब्द, काही वेळा आख्खी ओळ गाळणं.

  2. पुन्हापुन्हा एकच ओळ किंवा शब्द वाचणं.

  3. चुकीचं वाचणं. एखाद्या शब्दाचा उच्चार चुकीचा करणं. उदा. The हा शब्द them किंवा they असा वाचणं.

  4. एकेक अक्षर वाचणं.

  5. लिहिताना स्पेलिंग चुकणं.

  6. काही अक्षरं उलटसुलट लिहिणं.

  7. हस्ताक्षर खराब असणं. ओळ आणि त्यावर अक्षरं लिहिताना असलेलं proportion, दोन शब्दांमध्ये किती जागा सोडायची यात गडबड होणं.

  8. लिखाणाचा कंटाळा करणं, टाळाटाळ करणं.

  9. गणित विषय कठीण जाणं. गणितातील चिन्ह, एखादं गणित सोडवण्याच्या स्टेप्स यामध्ये गोंधळ होणं.

ही आणि अशा प्रकारची अनेक लक्षणं या मुलांमध्ये दिसून येतात. आपल्याला काही येत नाही, मार्क मिळत नाहीत यामुळे या मुलांमध्ये न्यूनगंडाची भावनादेखील निर्माण होऊ शकते.

या मुलांना बऱ्याचदा चांगल्या पध्दतीने विषयाचं आकलन होत असतं. यांना काही प्रोजेक्ट्स, ऍक्टिव्हिटीज करायला दिल्या तर ते चांगल्या पध्दतीने करतात, तोंडी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंदेखील चांगली देतात. परंतु वाचताना, वाचलेलं समजून घेताना, लिहिताना मात्र त्यांच्या मेंदूच्या भिन्न रचनेमुळे त्यांना अडचण येते. ही मुलं आपल्या सरधोपट पध्दतीने शिकू शकत नसली, तरी ती शिकण्यासाठी अक्षम नसतात. त्यांची शिकण्याची पध्दत भिन्न असते इतकंच. त्यामुळेच या मुलांना 'अध्ययन अक्षम' असं न म्हणता 'अध्ययन समस्या असलेली मुलं' असंही म्हटलं जातं. अध्ययन समस्येची पातळी कमी (mild), मध्यम (moderate) आणि तीव्र (severe) असू शकते. त्यांना विशिष्ट पध्दतीने शिकवून अध्ययन समस्येवर काही प्रमाणात मात करून अडचणींचं प्रमाण कमी करता येऊ शकतं. या मुलांमध्ये होणारा बदल हा समस्येच्या पातळीवर अवलंबून असतो.

मुलांमध्ये वरील काही लक्षणं आढळल्यास त्यांना योग्य वेळी मदत मिळण्याची गरज असते. यासाठी शाळेतले शिक्षक, समुपदेशक यांच्याशी संपर्क साधायला हवा. एखाद्या मुलाला learning disability आहे की नाही, हे कळण्यासाठी प्रथम त्याचा बुध्दयंक (IQ) तपासला जातो. त्यानंतर त्याची learning disabilityची चाचणी केली जाते. या काही चाचण्यांच्या माध्यमातून योग्य ते निदान दिलं जातं. या मुलांना परीक्षेच्या वेळी काही सवलती मिळतात - उदा. रीडर, रायटर मिळणं, पेपर लिहिण्यासाठीची वेळ वाढवून मिळणं इत्यादी.

परंतु या मुलांचा बुध्दयंक चांगला असल्याने त्यांना योग्य ते प्रशिक्षण मिळणं अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी रेमेडियल एज्युकेशन (ज्यामध्ये मुलांना अगदी बेसिक वाचन, लेखन, आकलन कौशल्य याबद्दल शिक्षण दिलं जातं, त्यांना वेगवेगळया अभ्यास पध्दती शिकवल्या जातात), ऑॅक्युपेशनल थेरपी, खेळ, संगीत, तसंच समुपदेशन (ज्यामध्ये या मुलांच्या इतर क्षमता ओळखणं, त्या वाढवण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देणं, त्यापैकी कोणत्या क्षेत्रात ही मुलं पुढे जाऊन स्थिरावू शकतात याची माहिती पुरवणं आणि एकूणच आयुष्यात स्थिरस्थावर होईपर्यंत त्यांना लागेल ते मार्गदर्शन पुरवणं याचा समावेश असतो.) या गोष्टींची मदत घेणं उपयोगी ठरतं.

या मुलांच्या समस्यांवर मात करण्यासाठी मूल स्वतः, पालक आणि शिक्षक या तिन्ही पातळयांवर नियमित प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक असतं.

   (लेखिका समुपदेशक आहेत.)

mmuditaa.7@gmail.com

9664352690

 

Powered By Sangraha 9.0