एचआयव्हीग्रस्तांसाठी 'आस्था' जागवणारी संस्था

28 Nov 2018 12:08:00

1 डिसेंबरला जागतिक एड्स दिनानिमित्त जगभर वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळया ठिकाणी फ्लॅश मॉब होतील. होर्डिंग्ज लागतील. सोशल मीडियावर चर्चा होईल. ठिकठिकाणी मोफत एचआयव्ही चाचणीचे बूथ ठेवले जातील. पण आजही एचआयव्हीपासून आपला देश, समाज मुक्त झालेला नाही. एचआयव्ही संक्रमणाचा सगळयात मोठा धोका असलेला वर्ग आज आपल्या समाजात असूनही समाजापेक्षा वेगळे आयुष्य जगतोय. 'आस्था परिवार' ही या वर्गासाठी काम करणारी संस्था. जागतिक एड्स दिनानिमित्त या संस्थेच्या कामाविषयी आणि एचआयव्हीच्या सद्यःस्थितीविषयी माहिती देणारा लेख.

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत.  तरी सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी  
https://www.facebook.com/VivekSaptahik/ पेज likeकरावे....

भारतात 1986मध्ये एचआयव्हीचा पहिला बाधित सापडला आणि हळूहळू या संख्येत वाढ होत गेली. एचआयव्ही, एड्स या शब्दांचीही लोकांना दहशत वाटू लागली आणि आजही ती कायम आहे. त्यामागे महत्त्वाची दोन कारणे आहेत. एक म्हणजे या आजाराचे गंभीर स्वरूप आणि दुसरे अधिक महत्त्वाचे म्हणजे एचआयव्हीग्रस्त रुग्णाला समाजाकडून मिळणारी बहिष्कृत वागणूक. महाराष्ट्र राज्य तर एचआयव्हीच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिले. मात्र गेल्या दोन दशकात या विषयाबद्दल शासन, आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था, देशातील सामाजिक संस्था सगळयांनीच जनजागृतीची आणि आरोग्य सेवा पुरवण्याची मोहीम राबवली. त्याचा परिणाम म्हणजे एचआयव्हीच्या बाबतीत लोक सावध झाले. त्यामागची कारणे सर्वज्ञात झाल्यामुळे काय काळजी घ्यायची हे लोकांना कळू लागले. दबक्या आवाजात होणाऱ्या चर्चेऐवजी मोठया व्यासपीठांवरून या विषयीचा संवाद होऊ लागला. एचआयव्ही संक्रमणाचे प्रमाण कमी झाले, तरी महाराष्ट्र आजही त्यात पुढे आहे. एचआयव्ही संक्रमण होण्याचे सगळयात महत्त्वाचे कारण शरीरसंबंधांशी जोडलेले असल्याने वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना या आजाराचा धोका सर्वाधिक असतो, हे लक्षात घेऊन एचआयव्ही विषयात काम करणाऱ्या काही सामाजिक संस्था प्रत्यक्ष फील्डवर - म्हणजेच वेश्यावस्तीत उतरल्या आणि त्यांनी या भागालाच आपले कार्यक्षेत्र बनवले. त्यांपैकी एक म्हणजे आस्था परिवार. 'कम्युनिटी-लेड' स्वरूपात या संस्थेचे काम चालते. म्हणजेच ज्या समाजासाठी काम करायचे, त्यातूनच नेतृत्व उभे करायचे आणि त्यांच्या माध्यमातून काम करायचे. थोडक्यात सांगायचे, तर ही सेक्स वर्कर्सनी सेक्स वर्कर्सची सेक्स वर्कर्ससाठी चालवलेली संस्था आहे.

सर्वसाधारणपणे आधी एखादी सामाजिक संस्था नोंदणीकृत होते. मग तिच्या शाखा, उपशाखा तयार होऊन तिचे कार्यक्षेत्र विस्तारते. आस्था परिवारच्या बाबतीत मात्र ही प्रक्रिया एकदम उलटी होती. या कामाची सुरुवात 2004 साली एका प्रकल्प स्वरूपात झाली होती. त्या वेळी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारतात एचआयव्हीबाधितांसाठी काम करण्यासाठी काही निधी पाठवला होता. 'हाय रिस्क' गटात मोडणाऱ्या एचआयव्हीबाधितांसाठी म्हणजेच सेक्स वर्कर्स, ड्रग्जचे व्यसन असणारे, तृतीयपंथी आणि एलजीबीटी वर्गातील लोक यांच्यासाठी मुंबई-ठाण्यात हा प्रकल्प सुरू झाला. या सगळयांना 'की पॉप्युलेशन' असे संबोधले जाऊ लागले. कारण या वर्गाकडे एचआयव्ही संक्रमण रोखण्याची चावी आहे. त्यामुळे त्याच वर्गावर लक्ष केंद्रित करून कामाला सुरुवात झाली. मुंबईत जेव्हा हे काम सुरू झाले, तेव्हा तीन-चार जणांचीच टीम होती. त्यापैकी एक म्हणजे आस्था परिवारच्या आताच्या व्यवस्थापक सीमा हुसैन-सय्यद या होत्या. ही टीम 'की पॉप्युलेशन'च्या लोकांना नियमित भेटून एचआयव्हीबाबत जनजागृती करत असे. एचआयव्ही कशामुळे होतो, एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, एचआयव्ही चाचण्या याबाबत माहिती द्यायची. तसेच चाचण्या झाल्यानंतर जर कोणी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले, तर त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवायचे.

2008पर्यंत की पॉप्युलेशनचे विभागवार गट बनवण्यास सुरुवात झाली. त्यांना 'आस्था गट' असे नाव दिले. की पॉप्युलेशनमधील कोणत्याही प्रकारची व्यक्ती - मग ती वेश्यावस्तीत काम करणारी महिला असो किंवा बारमध्ये काम करणारी किंवा रस्त्यावर उभी राहून गिऱ्हाइकाची वाट बघणारी असो किंवा घरूनच वेश्याव्यवसाय करणारी महिला असो, तृतीयपंथी असो - त्यांचा या गटात समावेश होतो. हे गट दर महिन्याला भेटतात. त्यांच्या समस्यांविषयी, गरजांविषयी या गटांमध्ये चर्चा होते.


 मदतीचे अनेक हात

मुंबई डिस्टि्रक्ट एड्स कंट्रोल सोसायटी आणि महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी या शासकीय संस्थांकडून तसेच एफएचआय 360सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून आस्था परिवाराला अर्थसाहाय्य मिळते. काही महाविद्यालयांतून, संस्थांतून प्रशिक्षक, कार्यकर्ते मिळतात. सीएसआरअंतर्गत यूपीआय फाउंडेशनच्या माध्यमातूनही महिलांच्या कौशल्य विकासासाठी मदत मिळते. देणगीरूपातही अनेक जण मदत करतात. संस्था ऍमेझॉनशी सीएसआर उपक्रमांतर्गत संलग् आहे, ज्याअंतर्गत ऍमेझॉनचे ग्राहक ऍमेझॉन विशलिस्टद्वारे मुलांसाठी पुस्तके, शैक्षणिक साहित्य, खेळ किंवा अन्य गोष्टी तसेच महिलांसाठी स्वच्छतेची साधने, भांडी, चादरी किंवा जीवनावश्यक वस्तू आस्था परिवारच्या नावाने दान करू शकतात. आस्था परिवार या वस्तू त्या भागातील गरजूंपर्यंत पोहोचवते. दिवाळीदरम्यान अनेक दात्यांनी मिठाई वाटण्यासाठी पैसे दिले होते. असे अनेक लोक आहेत, जे पडद्याआड राहून या लोकांना मदत करू इच्छितात.

संस्थेच्या या पुढच्या प्रवासाविषयी सीमादीदी सांगतात, ''2008पर्यंत या गटांची क्षमता वाढली होती. आम्ही त्यांचे एकत्रीकरण करून सीबीओ बनवले. सीबीओ म्हणजे कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन. यात एकाच प्रकारचे काम करणाऱ्या गटांना घेऊन संस्था बनवली जाते. उदा. ग्रँट रोडमध्ये 50 छोटे आस्था गट तयार झाले. त्यांचा एक सीबीओ तयार केला गेला. असे 12 सक्रिय सीबीओ आज मुंबई-ठाणे भागात कार्यरत आहेत. या सीबीओवर देखरेख ठेवण्यासाठी 'आस्था परिवार' ही छत्र संस्था स्थापन करण्यात आली. आमच्या या उलटया रचनेमुळे सगळया समस्यांची माहिती खालच्या स्तरातून वर संस्थेपर्यंत पोहोचते आणि संस्था त्यावर काय उपाय करता येईल यावर विचार करून ते गटापर्यंत पोहोचवते. चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून 2009मध्ये संस्थेची नोंदणी केली. त्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर आम्ही एफसीआरए हे प्रमाणपत्र घेऊन देणगी घेण्यास सुरुवात केली. 40 हजारांहून अधिक सदस्यांसाठी आम्ही काम करत आहोत. आता पुण्यातही प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. मात्र सीबीओ नाहीत.

सीबीओंचे काम सांविधानिक पध्दतीने केले जाते. गटांमध्ये निवडणुका होतात, त्यात जिंकलेले सदस्य त्यांचे शासकीय मंडळ तयार करतात. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव अशी पदे असतात. या सर्व पदांवर वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, एलजीबीटी समाज या सर्वांचे प्रतिनिधित्व असते. या महिलांचे शिक्षण नसते. समज नसते. मग त्यांच्या मदतीला आस्था परिवाराची सचिवालय टीम असते. आम्ही सर्व कार्यकर्ते या सचिवालयाचे सदस्य आहोत. सीबीओजमधील ज्या महिला सक्रिय असतात, त्या पिअर एज्युकेटर किंवा समन्वयक म्हणूनही काम करतात.''

नैतिक-अनैतिकतेच्या चौकटींमुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांसाठी किंवा एचआयव्हीग्रस्तांसाठी आजही कोणी काम करण्यास इच्छुक नसतात. मात्र आस्था परिवाराने हा विचार दुय्यम ठरवला. या महिला कोणत्या कारणांमुळे, कोणत्या परिस्थितीत या व्यवसायात येतात हे लक्षात घेतले, तर या चौकटी किती निराधार आहेत ते लक्षात येते. घरची गरिबी, व्यसनी नवरा, घरात कोणी कमावणारे नाही अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेकींना या व्यवसायाचा स्वीकार करावा लागतो. काही जणी तस्करी करून जबरदस्तीने या व्यवसायात आणल्या जातात. काहींना नवऱ्याने किंवा जवळच्याच नातेवाइकाने फसवून हे काम करायला भाग पाडलेले असते. वेश्याव्यवसाय करणारी म्हणून दुय्यम वागणूक दिली जातेच. त्यातही जर कोणी एचआयव्हीबाधित असेल, तर अधिकच वाईट वागणूक मिळते. अलीकडे मात्र परिस्थिती थोडी बदलली असल्याचे निरीक्षण सीमादीदी नोंदवतात. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी, महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था यांसारख्या सरकारी संस्था या विषयावर काम करत आहेत. त्यामुळे बँकांमध्ये, रुग्णालयांमध्ये किंवा सरकारी आस्थापनांमध्ये एचआयव्हीग्रस्तांना मिळणाऱ्या वागणुकीत फरक जाणवू लागला असल्याचे त्या सांगतात.

 
सीमा हुसैन-सय्यद व्यवस्थापक - आस्था परिवार
022-65260281/65260282 
wwww.aasthaparivaar.org

 सुरुवातीला या महिलांसाठी काम करताना सर्वात मोठे अाव्हान होते ते त्यांचा विश्वास संपादन करण्याचे. सीमादीदी सांगतात, ''सुरुवातीला आम्ही जेव्हा खेतवाडी, कामाठीपुरा येथील वेश्यावस्तीत जाऊन तेथील मालकिणीला किंवा घरवालीला आम्ही त्यांच्याकडच्या महिलांना भेटायचे असल्याचे सांगायचो, तेव्हा आधी तर त्यांना वाटायचे की ही कोणी पोलिसांची माणसे असावीत, हे लोक आपले काम बंद करवण्यासाठी आले आहेत. त्यामुळे आम्हाला सुरुवातीला त्यांचीच समजूत घालावी लागायची. आम्ही त्यांचे काम बंद करण्यासाठी आलो नसून त्यांच्याकडच्या मुलींना आरोग्याविषयी, एचआयव्ही संक्रमणाविषयी माहिती देण्यासाठी आलो आहोत. वेगवेगळया प्रकारे आम्हाला हे काम करावे लागायचे. अशा जनजागृतीचे काम जबरदस्तीने करता येत नाही, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यात सकारात्मक बदल घडवावा लागतो. या सर्व मुली, महिला वेगवेगळया राज्यांतून आलेल्या, वेगवेगळया भाषा बोलणाऱ्या असतात. आपण जे काम करतोय त्यासाठी समाजाकडून होणारी अवहेलना स्वाभाविकच असल्याची त्यांची समजूत असते. आम्हाला त्यांच्या मनात स्वत:विषयीचा आदर (self esteem) निर्माण करायचा होता. आमच्या बोलण्यामुळे त्या महिलांना जाणवले की, हे लोक आमच्या हिताचा विचार करत आहेत.'' 

आस्था परिवाराला एचआयव्ही विषयातील कामाबरोबरच जे अन्य विषय या समाजासाठी हाताळावे लागतात, त्यांपैकी हा एक महत्त्वाचा... त्यांच्यात स्व-आदर, स्वभान जागृत करणे. खरे तर अन्य विषय त्या अनुषंगाने आलेलेच.

उदा. या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न. या महिलांना पाळीतील स्वच्छता असो, अन्य रोगराई असो किंवा सर्व्हाइकल कॅन्सरसारखा मोठा आजार, या विषयीची माहिती दिली जाते. की पॉप्युलेशनमध्ये गुप्तरोगाबाबतही जागृती करावी लागते. कारण सतत गुप्तरोग होत असल्यास एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता असते.

त्याचप्रमाणे कायदेविषयक जागृतीही केली जाते. वेश्याव्यवसाय हा काही आपल्या देशात पूर्णपणे कायदेशीर नाही किंवा बेकायदेशीरही म्हणता येणार नाही. पण या देशाच्या नागरिक म्हणून त्यांचे जे काही अधिकार आहेत, ते त्यांना मिळाले पाहिजेत यासाठी संस्था या महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देते आणि ते मागण्याचे बळही देते. आता या महिलांना माहीत झाले आहे की पोलिसात एनसी, एफआयआर कशी दाखल करायची, आपल्यावर जबरदस्ती झाली तर त्याविरोधात कसा आवाज उठवायचा. संध्याकाळनंतर त्यांना पोलीस अटक करू शकत नाहीत किंवा अटक करताना पोलिसांसोबत एक महिला पोलीस कर्मचारी असली पाहिजे. या जागृतीमुळे त्यांच्यावर होणारा हिंसाचार कमी झाला आहे किंवा त्याविरोधात त्या आवाज उठवायला त्या शिकल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक संरक्षण आणि सुरक्षेसाठीही संस्था काम करते. त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड आदी महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी कार्यकर्ते मदत करतात. अनेक सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो.

या महिलांना आर्थिकदृष्टया साक्षर करणे हे आणखी एक महत्त्वाचे काम. या महिला जे काही कमावतात, ते आपल्या कुटुंबासाठी गावाकडे पाठवून देतात. त्यामुळे जेव्हा त्या आजारी पडतात, तेव्हा त्यांच्याकडे स्वत:च्या उपचारासाठीही पैसे नसतात आणि कुटुंबीयही त्यांची जबाबदारी घेत नाहीत.

''आम्ही महिलांना बँक अकाउंट्स सुरू करून दिले. स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया यांनी त्यासाठी खूप मदत केली. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत या महिलांना त्यांनी झिरो बॅलन्स खाते सुरू करून दिले. त्यामुळे त्यांना बचतीची सवय लागली. आता या महिला काही पैसे घरी पाठवतात, तर काही बँकेत ठेवतात. हे साठवलेले पैसे कुठेतरी गुंतवतात, त्यातून स्थावर मालमत्ता खरेदी करतात. एकूणच आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी ते या पैशांचा उपयोग करतात.

सगळयाच महिलांना या कामात राहायचे नाही. नाइलाजाने त्या हे काम करत आहेत. ज्यांना त्यातून बाहेर पडायचे असेल त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या महिलांचे पुनर्वसन एका रात्रीत शक्य नाही. त्यांच्यासाठी आम्ही आस्था एंटरप्राइझ सुरू केले आहे. त्या माध्यमातून या महिला दिवे, चॉकलेट, कंदील, राख्या यांसारखी हंगामी उत्पादने बनवतात आणि विकतात. काहींना मॉलमध्ये, सिक्युरिटीमध्ये, काहींना घरकामासाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. भिवंडीतील सीबीओची एक अध्यक्षा चारचाकी गाडी चालवायला शिकली आणि त्याद्वारे अर्थार्जन करण्याची तिची इच्छा आहे.'' सीमादीदी सांगतात. 

आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीवर संस्था काम करते, ते म्हणजे या वस्त्यांमधील मुले. संस्थेला आणि त्या महिलांनाही असे वाटते की त्यांच्या मुलांनी या कामात येऊ नये. गरिबीमुळे, शिक्षण नसल्याने आपल्याला हे काम करावे लागत असले, तरी मुलांचे भविष्य चांगले असावे, त्यांना शिक्षण मिळावे यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. यातील अनेक मुलांकडे जन्माचा दाखला किंवा त्या प्रकारची महत्त्वाची कागदपत्रे नसतात. त्यामुळे त्यांना शाळेत प्रवेश मिळत नाही किंवा त्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. आस्था परिवाराने देणगीदारांच्या मदतीने एक उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत दर वर्षी 60 मुलांना स्कॉलरशिप दिली जाते. संपूर्णपणे देणगीदारांकडून मिळणाऱ्या पैशांद्वारे हा उपक्रम राबवला जातो.

 

आस्था परिवाराच्या सदस्यांनी बनवलेले कंदील

 

तृतीयपंथी आणि एलजीबीटी या वर्गांचे प्रश्न पुन्हा वेगळे आहेत. त्यांनाही अनेक प्रकारे अवहेलना सहन करावी लागते. त्यांना समाजात स्वीकारले जात नाही, त्यांच्यावर बलात्कार होतात, अनेक कारणांसाठी पोलीस त्यांना पकडून नेतात, काही तृतीयपंथी वेश्याव्यवसायही करतात, समलैंगिक संबंधातूनही एचआयव्ही संक्रमणाचा धोका असतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी आणि सामाजिक सुरक्षेसाठीही संस्था प्रयत्न करते. त्यांचेही सीबीओ आहेत. त्याविषयी सीमादीदी सांगतात, ''अलीकडे तृतीयपंथीयांच्या मानवी हक्कांसाठी अनेक जण पुढे येत आहेत. त्यांना थर्ड जेंडर म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यांच्यासाठी वेल्फेअर बोर्ड तयार करण्यात आला असून महाराष्ट्रातही त्याचे काम चालते. त्यांना मतदानाचा अधिकारही मिळू लागला आहे. गौरी सावंत, लक्ष्मी त्रिपाठी यांसारख्या तृतीयपंथीयांनी शिक्षणाच्या बळावर खूप प्रगती केली आहे. मात्र त्यांचे कुटुंबीय त्यांना स्वीकारत नसल्याने ते या तृतीयपंथी समाजाच्या उन्नतीसाठी काम करत आहेत. बदलत्या काळानुसार आता या लोकांसाठी समाजात असलेला स्टिग्मा आणि भेदभाव कमी होताना दिसतोय. 377 या कायद्यातील बदलानंतर त्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. मात्र आजही त्यांना विवाहाचा अधिकार, मुले दत्तक घेण्याचा अधिकार, मालमत्ता अधिकार असे अनेक मूलभूत अधिकार अजून मिळायचे आहेत. यासाठी हमसफर ट्रस्ट, तसेच गौरव म्हणून आमचा एक सीबीओ प्रतिनिधी जनजागृतीचे काम करत आहेत.''

महाराष्ट्रातील एचआयव्ही संक्रमणाच्या सद्यःस्थितीविषयी सीमादीदी सांगतात, ''गेल्या काही वर्षांत एचआयव्ही संक्रमणावर मोठया प्रमाणात जनजागृती झाल्यामुळे या आजाराविषयीचे गैरसमज कमी होत आहेत. एचआयव्ही पॉझिटिव्ह होण्याची संख्याही कमी झाली आहे. तसेच जे एचआययव्ही पॉझिटिव्ह आहेत, त्यांचा जीवितकाळही नियमित औषधोपचारामुळे वाढलाय. एखादी व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह झाली म्हणजे तो जीवनाचा अंत नाही. त्यानंतरही आयुष्य असतेच. ते अधिक चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. नवीन रुग्णांची संख्याही कमी आहे. सुरुवातीला एचआयव्हीबाबतची जनजागृती सर्वसामान्य तसेच की पॉप्युलेशन अशा दोन्ही प्रकारच्या समाजात केली जात होती. मात्र की पॉप्युलेशन नेहमीच केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांच्यामध्ये अधिक जनजागृती झाली आणि सर्वसामान्य लोक मात्र त्याकडे दुर्लक्ष करू लागले.


नॉट लाइक मोस्ट यंग गर्ल्स

आस्था परिवारच्या माध्यमातून मुंबईतील टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, विल्सन आणि झेविअर्स या तीन महाविद्यालयांमध्ये कथालेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वेश्याव्यवसायातील, एचआयव्हीग्रस्त महिला, तृतीयपंथी यांच्या सत्यकथांवर आधारित कल्पित कथा लिहिण्याच्या या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या कथांसह निवडक 18 कथांचे पुस्तक 'नॉट लाइक मोस्ट यंग गर्ल्स' प्रकाशित करण्यात आले. या कथांच्या रूपाने या समाजातील महिलांच्या वेदनेचा आरसाच समोर येतो. 250 रुपये किमतीच्या या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणाऱ्या रॉयल्टीचा उपयोग एचआयव्हीग्रस्तांच्या औषधोपचारांसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी केला जातो.

 

एचआयव्हीबाधित आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. कारण गरोदर महिलांची सरकारी किंवा खासगी रुग्णालयात योग्य वेळी एचआयव्ही तपासणी केली जाते. तसेच कोणी एचआयव्हीग्रस्त आढळल्यास नऊ महिन्यांपर्यंत त्या महिलेवर योग्य औषधोपचार करून बाळाला एचआयव्हीची लागण होण्यापासून वाचवले जाते. तसेच बाळ जन्मल्यानंतर त्याच्या आईला बाळाची काळजी कशा प्रकारे घ्यायची याबाबत मार्गदर्शन केले जाते.

रक्तदान आणि रक्त चढवण्याच्या प्रक्रियेत शास्त्रशुध्दरीत्या काळजी घेत जात असल्याने त्याद्वारे एचआयव्ही संसर्ग होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे.

अजूनही अवैध शारीरिक संबंधातून एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.''

 
आस्था परिवारातील तृतीयपंथी सदस्य

सीमादीदींनी यानंतर जे सांगितले, ते अधिक गंभीर आहे. ''अलीकडे काही अशा गोष्टी लक्षात येऊ लागल्या आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य वर्गात पुन्हा एकदा एचआयव्हीबाबत जनजागृती करण्याची गरज वाटू लागली आहे. सध्या परिस्थिती इतकी बदलली आहे की केवळ पुरुषच कामासाठी परप्रांतात स्थलांतर करतात असे नाही, तर स्त्रियांनाही कामासाठी स्थलांतर करावे लागते. त्यातही एकटया महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. पार्टी कल्चर वाढलेय, त्यात ड्रग्जचा वापर सररास होतो. 15 ते 25 वयोगटातील तरुणांवर खूप काम करावे लागणार आहे. कारण वेश्याव्यवसायाचे स्वरूपच बदलू लागले आहे. आता केवळ वेश्यावस्तीत किंवा बारमध्येच वेश्याव्यवसाय चालतो असे नाही. वेगवेगळया प्रकारच्या डेटिंग साइट्सचे आणि ऍप्सचे पेव फुटले आहे. त्याद्वारे सररास वेश्याव्यवसाय चालत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे तरुण पिढी या जाळयात गुरफटत आहे आणि एचआयव्ही संक्रमणाचा धोकाही याच वर्गात अधिक वाढत आहे.

पूर्वी आम्ही कामाठीपुरा, खेतवाडी, मालाड-मालवणी यांसारख्या भागातील वेश्यावस्तीत जाऊन त्या महिलांना प्रत्यक्ष  भेटत असू. मात्र आता तसे करता येणार नाही. आता आम्हाला अशा लोकांना ऑनलाइन शोधावे लागते. त्यामुळे आम्हालाही आमच्या कामाची पध्दती बदलावी लागत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करत आम्हाला त्यांचा शोध घ्यावा लागतो. तसेच जनजागृती करण्याच्या पध्दतीतही आम्हाला आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच संस्थांना बदल करावे लागत आहेत. त्यासाठीही आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागते. मोबाइलवर मेसेजेस पाठवून, रेडिओ, टीव्ही, व्हॉट्स ऍप ग्रूपच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो. सेक्स एज्युकेशनच्या माध्यमातून, महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या इव्हेंट्सच्या माध्यमातून, फ्लॅशमॉब, वॉल पेंटिंग याद्वारे तरुण वर्गात जनजागृती करू लागलो आहोत. नुसतेच कंटाळवाणे भाषण देऊन आता चालणार नाही, तर लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी काहीतरी वेगळे पर्याय शोधतो. कधी गेम खेळतो, कधी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करतो, कधी वेगवेगळया स्पर्धा घेतो.''

ट्रक चालकांसाठी आरोग्य शिबीर

 आस्था परिवाराचे काम आता विस्तारत आहे. या महिलांना अधिकाधिक सक्षम करणे आणि त्यांना दीर्घकालीन स्थैर्य देणारा कार्यक्रम राबवणे हे संस्थेचे आगामी ध्येय आहे. या लोकांना मुख्य प्रवाहात इतक्या सहज स्वीकारले जाणे कठीण आहे. त्यांना किमान माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे, या देशाचा नागरिक म्हणून त्यांचे अधिकार मिळावेत ही अपेक्षा बाळगून संस्था काम करत आहे. पण समाज म्हणून आपली बहिष्काराची धार बोथट होईल का? आपल्यातच राहून एक वेगळा समाज म्हणून जगणाऱ्या या लोकांना आपण स्वीकारू का? जागतिक एड्स दिनानिमित्त ही जाणीव होणेही या मोहिमेस मोठा हातभार लावेल.

 

 

Powered By Sangraha 9.0