न्यूनगंड

20 Nov 2018 15:11:00

 

स्वतःबद्दल, स्वत:च्या प्रतिमेबद्दल न्यूनगंड बाळगणं आणि त्यामुळे इतरांसमोर स्वत:ला प्रेझेंट करताना संकोच वाटणं हे काही मुलांमध्ये दिसून येतं आणि अर्थातच स्वत:ला चांगल्या पध्दतीने प्रेझेंट न करता आल्यामुळे आत्मविश्वास आपोआप कमी होतो. आणि मग ते मूल हळूहळू नैराश्यभावनेकडे जाऊ लागतं. मुलांच्या बुध्दीच्या विकासाबरोबर त्यांच्या भावनांचा विकास होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मुलांमध्ये self awareness आणि self esteem विकसित केल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल आणि न्यूनगंडाची भावना नक्कीच निर्माण होणार नाही.

परवा मी आणि डॉक्टर ट्रीटमेंटसाठी येणाऱ्या काही केसेसविषयी चर्चा करत होतो. बोलता बोलता विषय झाला की सध्या आपल्याकडे कुमारवयीन आणि किशोरवयीन मुलांच्या केसेस झपाटयाने वाढल्या आहेत. दर दोन दिवसांत एकतरी नवीन रुग्ण या वयोगटातील असतो आणि या सगळया केसेसमध्ये जसा राग हा कॉमन फॅक्टर आहे, तसंच काही प्रमाणात नैराश्य आणि न्यूनगंडसुध्दा खूप कॉमन दिसून येतंय.

मागच्या आठवडयात एक पालक त्यांच्या मुलीला घेऊन माझ्याकडे आले. मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. मी त्यांना माझ्याकडे घेऊन यायचं कारण विचारलं, तेव्हा तिच्या एकेक तक्रारी ते सांगू लागले. ''तिचा आत्मविश्वास खूप कमी झाला आहे. अभ्यास करते, चांगले मार्कही मिळतात, पण तरीही उगाचच भीती वाटत असते. शाळेत कोणाशी भांडण झालं, कोणी काही बोललं की त्याचा दोन दोन दिवस विचार करत बसते. माझ्याबद्दल आता सगळे काय विचार करत असतील, माझं इम्प्रेशन काय झालं असेल याचा विचार सतत मनात करत असते. मी चांगली दिसत नाही, माझे केस चांगले नाहीत, मी चांगलं बोलू शकत नाही असं म्हणत असते. एखादी गोष्ट करायला जमली नाही की स्वत:ला दोष देते. मला काहीच जमत नाही, काही जमणार नाही असं म्हणून रडत राहते. या सगळयामुळे बऱ्याचदा चिडचिड करते. ती म्हणेल तेव्हा आम्ही तिच्याकडे लक्ष दिलं नाही, तर रागावते. नीट जेवत नाही. झोप येत नाही. कधीकधी अभ्यासच करायचा नाही, शाळेत जावंसं वाटत नाही असं म्हणते. स्वत:ला कमी लेखणं, आपण इतरांपेक्षा कमी आहोत असं वाटणं या सगळया विचारांमुळे तिचं अभ्यासातसुध्दा लक्ष लागत नाही.''

स्वतःबद्दल, स्वत:च्या प्रतिमेबद्दल न्यूनगंड बाळगणं आणि त्यामुळे इतरांसमोर स्वत:ला प्रेझेंट करताना संकोच वाटणं हे काही मुलांमध्ये दिसून येतं आणि अर्थातच स्वत:ला चांगल्या पध्दतीने प्रेझेंट न करता आल्यामुळे आत्मविश्वास आपोआप कमी होतो. आणि मग ते मूल हळूहळू नैराश्यभावनेकडे जाऊ लागतं.

या केसमधील मुलीशी मी जेव्हा बोलत होते, तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की ती प्रत्येक छोटी छोटी गोष्ट करतानासुध्दा 'माझे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक काय विचार करतील, काय म्हणतील' याचा विचार करते. अगदी शाळेत वर्गात उत्तर देतानासुध्दा आधी हे सगळे विचार तिच्या डोक्यात येतात. शाळेत कोणी तिची कधी मस्करी केली, तर 'सगळे फक्त मलाच बोलतात, आता वर्गातील इतर मुलं माझ्याबद्दल काय विचार करतील?' याचा ती दोन दोन दिवस विचार करत राहते. थोडक्यात, इतरांना तिच्याबद्दल काय वाटतं, ते काय म्हणतात यावर तिने तिची स्वत:ची प्रतिमा तयार केली आहे.

आपली स्व-प्रतिमा ठरवताना, एक व्यक्ती म्हणून आपण कसे आहोत हे ठरवताना लहानपणी आपलं झालेलं कौतुक, आपल्याला मिळालेला ओरडा या अशा काही गोष्टी कारणीभूत ठरत असतात. आपण एक पालक म्हणून आणि सुजाण व्यक्ती म्हणून मुलांना अशा काही गोष्टी नकळत शिकवत असतो की ज्याचा परिणाम मूल मोठं होत असताना त्याच्यावर होत असतो. लहानपणी एखादं चांगलं कृत्य केल्यावर मुलाला आई, बाबा, आजी, आजोबा किंवा इतर नातेवाईक व्हेरी ''गुड बॉय/गुड गर्ल'' असं म्हणतात. आणि तसंच एखादं वाईट कृत्य केलं किंवा चुकीच्या पध्दतीने वागलं की ''बॅड बॉय/बॅड गर्ल'' असंही लगेच म्हटलं जातं. मग आपण काय केलं म्हणजे चांगली व्यक्ती होतो आणि काय केलं म्हणजे वाईट व्यक्ती होतो हे मुलाच्या डोक्यात हळूहळू कुठेतरी ठरत जातं आणि मग जशी मुलं मोठी होत जातात, तशी ती त्यांच्या वागणुकीवरून स्वत:ला चांगलं आणि वाईट या दोन कॅटेगरीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतात. आणि मग या घडणाऱ्या वयात त्यांच्या हातून झालेल्या चुकांमुळे मी वाईट आहे, मला काहीच जमत नाही असं म्हणून ते सतत स्वत:ला दोष देत राहतात.

त्याचप्रमाणे भाऊ-बहिणीशी किंवा इतर मुलांशी केलेल्या तुलनेमुळेसुध्दा मुलाच्या मनात स्वत:बद्दल शंका आणि अविश्वास निर्माण होऊ शकतो. या वयातील स्वत:ची ओळख निर्माण करताना इतर कोणाकडून झालेल्या टीकेमुळे संकुचित भावना मनात निर्माण होऊ शकते. बऱ्याचदा मुलांना शिकवताना आपण 'अरे, असं केलंस तर लोक काय म्हणतील?' किंवा 'असं नको करू, नाहीतर हसतील आपल्याला सगळे' असं अगदी नकळत सांगत असतो. पण त्यामुळे मुलाच्या मनात एक गोष्ट पक्की बसू शकते आणि ती म्हणजे आपल्याला सतत कोणीतरी जज करतंय. मी कसा आहे हे मी केलेल्या प्रत्येक गोष्टीवर लोक ठरवणार आहेत. आणि मग पुढे प्रत्येक गोष्ट करताना त्यांच्या मनात हे विचार येऊ शकतात.

आजच एक मुलगी माझ्याकडे आली होती. तिला स्वत:चं शरीर, रंग, केस याचा प्रचंड तिटकारा आहे. रोज आरशात बघितल्यावर तिच्या रूपाला दोष देते आणि या सगळयामुळे ती घराच्या बाहेर पडण्याचं टाळते. शाळा, क्लास, फॅमिली फंक्शन्स कुठेही जायला तिचा नकार असतो.

या सगळयाचं कारण म्हणजे स्व-जागरूकता आणि स्व-आदर यांचा अभाव. सायकॉलॉजिकल भाषेत याला Lack of Self Awareness आणि Poor Self Esteem असं म्हटलं जातं. Self awareness आणि Self esteem यांचा अभाव असल्याने मुलांना पुढे जाऊन अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. आपले विचार, भावना यांच्यामध्ये ताळमेळ नसणं आणि त्यामुळे काय बोलावं, कसं वागावं ते न कळणं, स्वत:मध्ये असलेल्या गुणांपेक्षा बाह्यरूपाला महत्त्व देणं आणि त्यातील दोष सतत शोधत राहणं. लोक माझ्याबद्दल बोलतायत, माझ्याबद्दल विचार करतायत असे संशयी विचार सतत डोक्यात सुरू असणं. आणि या विचारांमुळे पुढे कॉलेज, नोकरी या ठिकाणी अलिप्त राहणं. लोकांनी व्यक्त केलेल्या मतांवरून, टीकेवरून आपण असेच आहोत असं डोक्यात ठेवणं आणि त्यामुळे इतरांबद्दल मनात तिरस्काराची भावना निर्माण होणं. कोणतीही नवीन गोष्ट करताना भीती वाटणं. आत्मविश्वास नसल्याने कोणताही निर्णय ठामपणे घेता न येणं, संवाद साधता न येणं, स्वत:ला कमी लेखणं, दोष देणं, आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही अशी भावना निर्माण होणं आणि पर्यायाने या सगळया गोष्टी योग्य रितीने हाताळता न आल्याने नैराश्य येणं.

मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ नये यासाठी स्व-जागरूकता आणि स्व-आदर असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी पुढील काही गोष्टी आपण त्यांना शिकवू शकतो आणि आपणही शिकू शकतो -

  1. स्वतःबद्दल जागरूक असणं. स्वत:चे विचार, भावना, कृती, एखाद्या गोष्टीबद्दलचा दृष्टीकोन, मतं, मला काय आवडतं, काय नाही आवडत याबद्दल जागरूक असणं.

  2. मुलांच्या कृतीवरून, वागणुकीवरून त्यांना चांगलं/वाईट ठरवण्यापेक्षा त्यांची कृती, वागणूक योग्य होती की अयोग्य हे त्यांना समजावून देणं.
  3. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं. त्यांना वेगवेगळया गोष्टी करून बघायला प्रोत्साहित करणं. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेणं. तुम्ही त्यांच्याबरोबर आहात आणि तुम्ही एकत्र मिळून येणाऱ्या समस्येवर मात करू शकता, हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करणं.

  4. आपल्याला कोणी हसलं, आपल्यावर टीका केली, आपल्याला काही बोललं तरी ती वस्तुस्थिती नसून ते त्या व्यक्तीचं फक्त मत असतं आणि एखाद्या किंवा काही व्यक्तींच्या मतामुळे आपण तसे होत नसतो, हे शिकवणं. त्यांच्या बोलण्याचा त्रास करून घेण्यापेक्षा त्यांचं मत विचारात घेऊन आवश्यक असल्यास स्वत:मध्ये बदल करणं आणि नसल्यास ते मत म्हणून सोडून देणं ही गोष्ट मुलांना शिकवणं.

  5. स्वत:वर प्रेम करायला शिकवणं. आपल्यामध्ये असलेले चांगले गुण आणि कौशल्य ओळखणं, त्यांचा आदर करणं आणि ती आणखी विकसित करण्याचा प्रयत्न करणं. स्वत:च्या बाह्य रूपाला दोष देण्यापेक्षा त्यावर प्रेम करायला शिकवणं.

मुलांच्या बुध्दीच्या विकासाबरोबर त्यांच्या भावनांचा विकास होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मुलांमध्ये self awareness आणि self esteem विकसित केल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल आणि न्यूनगंडाची भावना नक्कीच निर्माण होणार नाही.      

muditaa.7@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0