गदिमांची कथापद्मपत्रे

14 Nov 2018 14:33:00

गुणगंधांनी परिपूर्ण, अलौकिक दैवी सुगंध असणारी काव्यरचना ही गदिमांची महाराष्ट्राच्या मनात खोल रुजलेली ओळख. काव्याची एखादी ओळ, गीताची एखादी लकेर जरी कानावर पडली, तरी हे काव्य माणगंगेच्या मातीतलं आहे, हे त्याचा गंधच सांगतो. अन या काव्यपद्मांच्या तळाशी पसरल्या आहेत जीवनव्यवहाराच्या चिखलातून त्यांनी समोर आणलेल्या कमळपत्रांसारख्या टवटवीत तजेलदार अन अलिप्त कथा.

'द्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या

या जीवनात काव्ये काव्यात जीवने या...'

असं लिहिणाऱ्या गदिमांच्या साहित्याचं सरोवर दुरून पाहिलं, तर त्यांच्या असंख्य सुंदर काव्यपद्मांची नुसती दाटी दिसते!

गुणगंधांनी परिपूर्ण, अलौकिक दैवी सुगंध असणारी काव्यरचना ही गदिमांची महाराष्ट्राच्या मनात खोल रुजलेली ओळख.

काव्याची एखादी ओळ, गीताची एखादी लकेर जरी कानावर  पडली, तरी हे काव्य माणगंगेच्या मातीतलं आहे, हे त्याचा गंधच सांगतो. पहिल्या पावसाच्या मृद्गंधासारखी या गंधाची ओळख मराठी मनाला आहे. अन या काव्यपद्मांच्या तळाशी पसरल्या आहेत जीवनव्यवहाराच्या चिखलातून त्यांनी समोर आणलेल्या कमळपत्रांसारख्या टवटवीत तजेलदार अन अलिप्त कथा.

रामायण-महाभारतासारखी महाकाव्यं वा कालिदासादी महाकवींची अक्षरसंपदा अन अर्वाचीन मराठी संत-पंत-तंत परंपरांपासून ते बायाबापडयांच्या मुखातल्या ओव्या, यासारख्यांचा एक मधुर गंध गदिमांच्या सर्वच साहित्यातून दरवळतो; कारण लोककलाकार-कीर्तनकार यांचं गोष्टीवेल्हाळ कथन, ऐकलेली पुराणं, व्याख्यानं-आख्यानं, त्यातून मुरलेला चांगुलपणा, जागी झालेली कोवळी जिज्ञासा पुरवणारे वडील यातून कणाकणाने त्यांच्या दैवदत्त प्रतिभेचं पोषण झालं होतं. आईविषयीची कृतज्ञता इतकी की 'माझी कविता ही आईच्या ओव्यांची दुहिता. तिच्याच गंगेतली कळशी घेऊन मी मराठी शारदेचे पद प्रक्षाळतो आहे' हा त्यांचा भाव होता!

पण सरस्वतीने आपला हा लाडका पुत्र भूतलावर पाठवताना त्यासाठी परिसर, माणसं, अनुभव याचीही निवड अगदी चोखंदळपणे केली असावी. जन्मस्थानचा प्रदेश कसा, तर 'माणदेश म्हणजे रणरणते ऊन, अमर्याद धूळ, उदासवाणे माळ, राखी कातळ, काळे चिमखडे, बाभळीची काटेरी झाडे नि तरवडाची बटबटीत फुले हा निसर्ग! सुगंध यायचा केवळ चैत्रात, तोही कडुनिंबाच्या मोहोराचा. वाहते पाणी फक्त पावसाळयात दिसायचे तेही गढूळ कॉफी रंगाचे. त्यामुळे पडकी घरे, उघडी माणसे, धुळीचे रस्ते हे सारे मला माझे वाटते, हवेसे वाटते.'

पुढे औंध संस्थानात शिकायला असताना सुटीला वडिलांच्या बदलीच्या गावी किन्हईला गदिमांचं राहणं झालं. किन्हई गाव म्हणजे सुटीतली बिनभिंतीची शाळाच जणू! औंधच्या पंतसरकारांचं काही काळ वास्तव्य असल्यामुळे स्वतंत्र टुमदार 'लायब्ररी बंगला' असणारं अन गावातल्या उदबत्तीच्या कारखान्यांमुळे सुगंधी निश्वास सोडत असलेलं छोटंसं गाव किन्हई.

तिथली संध्याकाळ म्हणजे...

'थंडगार वाऱ्याच्या झुळुका, निवळ निळया आकाशात परतणाऱ्या पाखरांची भिरी, वडाच्या मायेवरील चिमण्यांचा गोड गोंधळ, चहू दिशांनी येणारा आल्हाददायक सुगंध, गायीगुरांच्या हंबरण्याचे आवाज, एकवीरेश्वराच्या देवळातील घंटांचे मंजुळ नाद आणि कुठून तरी ऐकू येत असलेली एका विलक्षण पध्दतीने गद्यप्राय शैलीने गायली जाणारी मोरोपंत कवींची केकावली...' अशी रम्य! वडिलांच्या संस्थानातील नोकरीमुळे काही काळ त्यांना तिथल्या राजवाडयात वास्तव्य करायला मिळालं. एकदा आजारपणामुळे झालेल्या दीर्घ वास्तव्यातला त्यांचा दिनक्रम वाचून हेवा वाटतो!

'सकाळी लवकर उठावे, राजवाडयाच्या स्नानगृहातील दगडी चौरंगावर बसून राजा गोपीचंदासारखे मनमुराद सुखस्नान करावे, नदीचा प्रवाह ओलांडून पैलाड जावे, एखाद्या कोकरागत उडया मारत 'साखरगडनिवासिनी'ची टेकडी चढावी. त्या टेकडीवरील डोंगरी फुले गात गात गोळा करावी. ती देवीच्या मूर्तीवर वाहावी.  रमतगमत उतरताना राम गणेशांच्या, बालकवींच्या कविता तोंडपाठ म्हणाव्यात. घरी आल्यावर मनसोक्त न्याहारी करावी आणि दिवाणखान्यात जाऊन वरच्या दिवाणखान्यात हंडया-झुंबरे-गाद्या-गिरद्या अशा राजेशाही बैठकीवर लोळत तिथल्या कसरीने रसास्वाद घेतलेल्या असंख्य पुस्तकांच्या वाचनास प्रारंभ करावा!'

किन्हईचे वर्णन किंवा 'बामणाचा पत्रा' या त्यांच्या गावाकडच्या लेखनाच्या आवडत्या ठिकाणचे वर्णन वाचताना त्यांच्या कवितेच्या ओळी आठवतात -

'या येथे मजला सात जन्म लाभावे

हे निर्मळ जीवन पुन्हा पुन्हा भोगावे'

भिंतीवर लावलेल्या एखाद्या सुंदर चित्राचा आनंद त्यांची कविता देते, तर कथा वा ललित लेख आपल्याला त्या चित्रातल्या दृश्यात बोट धरून फिरवून आणतात!

गदिमांचं बालपण, किशोरवय, तरुणपण सगळंच आयुष्याच्या विविधरंगी अनुभवांनी भरगच्च आहे. सगळेच अनुभव काही सुखद, मानवातील देवत्वाचं वा अगदी मनुष्यत्वाचंही दर्शन घडवणारे नव्हतेच. अगदी तळचं, गावाशेतावरचं, गावकुसाबाहेरचंही जग अन त्यातले माणसांचे हजारो नमुने अगदी जवळून त्यांना न्याहाळता आले.

समाजात एकीकडे दिसणारं दैन्य, दुसरीकडे भरभरून वाहणारी सुबत्ता, शहरी-ग्रामीण-चित्रपटाचं मायावी, अन खेडयातलं साधंसुधं जगणं, त्यातले अनेक लोक, साधे आनंद आणि बेगडी दु:खं... हे सारं केवळ गीतांत मावणारं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या लेखणीला सारेच साहित्यप्रकार खुणावू लागले. नाटक, कथा, चित्रपटकथा, आत्मकथनं, प्रवासवर्णनं सर्व माध्यमांत या लेखणीने मन:पूत संचार केला. या साऱ्या कहाण्यांच्या गाभ्यात असलेलं निखळ दु:ख वा आनंद, श्रध्दा अशा सर्व भावना त्यांच्या गोळीबंद गीतांत उतरल्या. त्यांचं तपशीलवार चित्रण कथांमधून साकारलं. 

त्यांनी लिहिलेल्या चित्रपटांच्या पटकथाही अतोनात गाजल्या. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, सुवासिनी असे अनेक गाजलेले मराठी तर दो ऑंखे बारह हाथ, गूँज उठी शहनाई अशा अनेक हिंदी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी जिवंत केल्या आहेत. पण याच्याही मुळाशी होतं त्यांचं कथालेखन. भोवतालच्या माणसांच्या जत्रेत आपल्या निरागस कुतूहलाने भिरभिरणारा त्यांच्यातला लेखक, माणसं, त्यांचे स्वभाव, परिस्थिती व त्यावरचे त्यांचे उतारे बारकाव्यांनिशी टिपत होता.

'काळ बदलतोय. विज्ञान अफाट प्रगती करत आहे. नीतिमूल्ये कुजत चालली आहेत.' असं त्यांनी लिहिलं तरीही श्रध्दा, मूल्यं, सत्प्रवृत्ती यावर त्यांचा मूलत: विश्वास आहे.

जिथे ती दिसत नाही, तिथेही तिचा तिरस्कार न करता ते त्यामागील कारण शोधतात. बहुधा ते परिस्थिती विवशतेत सापडतं. अन्यथा मग नियती, नशीब याच्या पदरात ते त्या दुर्वर्तनाचं माप टाकतात, पण माणूसपणाला समजून घ्यायचा प्रयत्न करतात. माणसाचा हव्यास, उथळपणा, दबलेली - फणा काढणारी लैंगिकता याला समजून घेतात.

 

'साहेबाच्या अनिर्बंध स्त्रीस्वातंत्र्याबद्दल मला अगदी घृणा आहे' असं म्हणणारे गदिमा, असंच अनिर्बंध वर्तन करणाऱ्या 'वेग' या दीर्घकथेच्या नायिकेला समजून घेतात. चित्रपटसृष्टीत करावी लागणारी तडजोड, आपलं स्थान सांभाळण्याची धडपड, या साऱ्या वातावरणाची धुंदी, लोकप्रियतेचं आकर्षण, यासाठी नवनव्या पुरुषांना भुलवणं हे वाचताना शोभाविषयी हळूहळू तिरस्कार वाटू लागतो; पण हे सारं ती करते आहे तिच्या बाळासाठी, हे वाचताना तिच्यातल्या आईसाठी आपला जीव हळहळतो.

'शोभापुढे तिच्या बाळाचे संपूर्ण आयुष्य आहे. त्याला सुखाने मोठा झालेला पहाणे हे तिचे स्वप्न आहे. ते गाठण्यासाठी तिला वेग हवा आहे. तिला उसंत नको आहे, विचार नको आहे. तिला फक्त वेग हवा आहे, वेग हवा आहे!'

गदिमांच्या कथांना निर्लेप म्हणावंसं वाटतं ते यासाठी. माणसं व परिस्थिती कशी असायला हवी, असे आदर्श न मांडता जशी आहेत तशी ते आपल्यासमोर ठेवतात. नेम्या, नागूदेव, शाहीर अशा विलक्षण व्यक्तिचित्रांनी आपण चकित होतो. आपल्याला समस्यांचे अनेक पदर दिसू लागतात. सुखदु:खांच्या उभ्या-आडव्या विणीचं दर्शन होतं. मग ती माणसं जवळची वाटतात. कथांतून केवळ माणसं नव्हे, त्यांच्या दु:खाची जात कळते. आपल्या जाणिवा, समज, आकलन, कितीतरी विस्तारतं.

गावातली माणसं पारावर निवांत जमतात. त्यांच्या हातातल्या चंच्यांची तोंडं मोकळी सोडतात, तशा एकेक कथा त्यातून बाहेर येतात. गदिमांच्या कथा अशा पारावर बसून सांगितल्यासारख्या सहज आहेत. माणसागणिक बदलणारी भाषाशैली, शब्दांची ग्राम्य रूपं, म्हणी अन तपशीलवार पण नेमकं वर्णन, यामुळे आपणच तिथे आहोत असं वाटतं. वाचताना कथा दिसते, ऐकू येते! त्यामुळेच पुलं म्हणत की गदिमांच्या पटकथेच्या लिखाणाच्या ओळींवरून थेट कॅमेरा फिरवला तरी चित्रपट तयार होईल!

नित्यकर्मं, सणवार, प्रथा-परंपरा पाळणारं गाव, जातीची उतरंड सहजपणे सांभाळणारं, पण प्रसंगी सारं विसरणारं गाव व त्यातल्या घडामोडी गदिमा जशाच्या तशा उभ्या करतात. त्यावर बरेवाईट शिक्के मारत नाहीत. नैतिक-अनैतिकतेचा न्यायनिवाडा करत नाहीत. माणसांचे पोषाख, बोलणं, उच्चार, लकबी यांचे बारकावे ते अचूक उभे करतात. महाराष्ट्रातली खेडी या विविधतेने किती समृध्द आहेत हे लक्षात येतं.

खेडयातल्या कथा म्हणजे काहीतरी अवास्तव-आदर्श-स्वप्नाळू असं चित्रण ते करत नाहीत. भाबडा-निरागस-सहज प्रेमभाव, त्याबरोबरच बनेल इरसालपणा, बिलंदरपणा, एकमेकांशी असलेलं साटंलोटं याचं यथार्थ चित्रण कथांमध्ये दिसतं. आधुनिक होत चाललेल्या खेडयांत पातळ होत चाललेली माणुसकी, मूल्यं, त्यांना अस्वस्थ करतात, पण होत असलेले चांगले बदलही ते टिपतात. नव्याच्या स्वीकारामुळे ते कालबाह्य होत नाहीत.

गदिमांचे कथासंग्रह वाचताना जाणवते ती त्यांच्यातल्या पटकथालेखकाची पकड. काही कथांचं बीजच खूप सशक्त, काहीतरी नाटय असलेलं, भावनांची तीव्र आंदोलनं असलेलं असतं. पण अगदी साधासा प्रसंग, घटना जिची सामान्य माणूस दखलही घेणार नाही, त्यातही त्यांच्या प्रतिभेला एखादी कथा दिसतेच. या कथेच्या केंद्रस्थानी दर वेळी माणूसच असेल असं नाही!

'पुष्कळा' या कथेत अशीच एक गंमत आहे. काहीबाही कामं करत फिरणारी एक स्त्री लेखक दुरून पाहत असतो. तिच्या नीटसपणामुळं ती लक्षात राहते व तिच्याबद्दल आणखी माहिती कळावी असं त्याला वाटू लागतं. हे निव्वळ 'कुतूहल' आहे. या 'कुतूहला'ला स्वत:चं निराळं व्यक्तिमत्व आहे, इच्छा आहेत. जणू हा गुणच देहरूप ल्याला आहे. ही अपरिचित, देखणी स्त्री गोरीपान, अंगाने जरा आडवी आहे.

'पण तो स्थूलपणा बेडौल नाही. मोराने पिसारा उभारावा तसा तिच्या देखणेपणाने पिसारा उभा केला आहे असे वाटते. तिचे नाक थोडे ठुसके आहे. त्याला अहंकाराचा आकार आहे... एवढा अवजड बांधा घेऊनही ती डौलदारपणे चालते.

वेरूळच्या लेण्यात कोरलेले उडते गंधर्व आहेत.

ती शिळाशिल्पे पाखराची पिसे तरंगावीत तशी अधांतरी पोहताना दिसतात. तिचे चालणे तसे आहे. ...तिचे दिसणे, लेणे, नेसणे, हसणे सारे काही भरपूर आहे. तिचे नाव मी ठेवले आहे पुष्कळा.'

या पुष्कळाबद्दल पुष्कळ काही कळावं, अशी उत्सुकतेची अपार तहान, इकडून तिकडून माहिती गोळा करायचा नाद, त्यांच्यातल्या 'कुतूहला'ला लागतो. मग ते कुतूहल 'चोच उघडून बसतं' तिच्याबरोबर दिसणारा कोण असेल या प्रश्नाभोवती ते घिरटया घालू लागतं. एकेका माहितीचा थेंब त्याच्या चोचीत पडताच ते अजून धारा बरसाव्यात म्हणून 'चित्कार' करतं.

'थेंबांची धार झाली तरी त्याला समाधान नाही. त्याला सर्वांग भिजवणारी माहितीची बरसात हवी होती. त्यात त्याला भिजतच रहायचे होते!'

चौकशी करत करत 'कुतूहल' फार पुढे जातं. मुकादम बनून कामगार बायकांना धाकात ठेवणाऱ्या, नवरा असताना यारासोबत फिरणाऱ्या पुष्कळेबद्दल जेव्हा ती कामात इमानदार, विश्वासू, जाणकार, अन मूल होत नाही म्हणून नवऱ्याला दुसरा घरोबा करून देऊन तोही सांभाळणारी असल्याचं कळतं, तेव्हा मात्र..

'पाऊस खूप पडला. कुतूहलाचे पाखरू तृप्त मनाने काळजात जाऊन विसावले!'

ही कथा वाचताना हे कुतूहलाचं निर्मळ पाखरूच याचा नायक आहे असं वाटतं. गदिमांच्या मनातही असं तहानलेलं कुतूहलाचं पाखरू सतत चोच वासून बसलेलं असतं.

त्यातूनच इतक्या विविध प्रकारच्या कथा निर्माण होतात!

'मुंगी आणि राव' या कथेत आहे चिमासाहेब नावाचा राजघराण्यातील एक उद्दाम मुलगा. बज्या नावाच्या एका नाजूक देखण्या मुलाला तो बायल्या म्हणून हिणवतो. त्याला जिणं नको व्हावं इतकं त्याचं मानसिक खच्चीकरण करतो. त्याच्यातला पुरुष खरंच कणाकणाने संपत जातो. शेवटी तो स्वत:ला संपवतो. हाच चिमासाहेब शेवटी एका इस्पितळात बेवारस मरतो. लेखकाला त्याचा मित्र सांगतो की 'त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले.  त्याची बायको त्याच्या डोळयादेखत कुणाचाही हात धरून जाई. तिने याच्या पुरुषत्वाची थट्टा केली. त्याने तो खचला. व्यसनाधीन झाला. हे मरण नाही, हा खून आहे.'

नियतीने उगवलेला सूड पाहून समाधान वाटतं. असं खरंच घडत असेल का, असंही वाटतं. पण असं घडतं, म्हणूनच तर त्याची कथा होते!

'भूक' ही कथा एका जातिवंत अन्नदात्याचं आगळं दु:ख सांगते. ज्ञानू हा काळया आईच्या हिरवळ नेसलेल्या मांडीवर वाढलेला पिढीजात शेतकरी. आता आधुनिक पध्दतीने शेती करणाऱ्या मुलांच्या ताब्यात व्यवहार देऊन आपण पोथ्यापुराणं, पारायणं यात रमलेला.

बाहेर दुष्काळ पडला अन आपल्या कणग्या भरलेल्या असल्या, तर दामाजीपंतांसारखा तो दाणागोटा भुकेल्यांच्या तोंडी भरवण्याऐवजी मुलं तो 'आत्ताच चांगला भाव यील' म्हणून विकायचा ठरवतात. वेळीच हे धन बाजारात उभं केलं नाही, तर ते सरकारला फुकासापारी देऊन टाकावं लागेल ही भीती पोरांना आहे. त्यांना वेळ नाही, म्हणून ते बापालाच गाडी जोडून बाजारात पाठवतात. तिथे त्याला पाच पोत्यांचे चांगले पाश्शे म्हणजे एका पोत्याला शंभरभर रुपये मिळणार असतात! त्या कल्पनेनेच तो कासावीस होतो. इतका दर घेणं त्याला पटत नाही. पोरांची पैशाची ही भूक त्याला समजत नाही. वाटेत जाताना तो पोटाच्या भुकेने मागेमागे येणारे लोक पाहतो. त्यांच्या डोळयातली भूक त्याला कासावीस करते. त्यांच्या तोंडून त्याला दुष्काळात पाला खाणाऱ्या, जीव देणाऱ्या माणसांच्या कथा कळतात. मुलांच्या भयाने तो दाणा वाटून टाकण्याच्या कल्पनेला दूर ठेवतो.

प्रत्यक्ष बाजारात तर हमरीतुमरी, झोंबाझोंबी सुरू होते.  इतक्या गर्दीत म्हातारा घुसमटतो.

एकीकडे त्याचा आत्मा त्याच्या कानात 'हे वाटून टाक' असं ओरडत असतो, तर माणसांची झुंबड दांडगाईवर येते.

आता कुणीतरी याची पोती हिसकून नेणार, अन म्हातारा घरी येऊन पोरांच्या शिव्या खाणार, अशा सरळमार्गाने आपला तर्क धावत असतो.. पण त्या गर्दीत एक इसम येऊन म्हाताऱ्याच्या हातात नोटा कोंबतो. बळेच आपली मूठ उघडून त्याने शंभराच्या पंधरा नोटा कोंबल्यात एवढं त्याला कळतं. त्या नोटा पाहून डोळे विस्फारून तो गाडीतच कलंडतो. अचानक आभाळ भरून कोसळू लागतं. पडत्या पावसात अपरात्री बैलगाडी घरी परतते. ज्ञानू म्हाताऱ्याच्या भिजलेल्या कोपरीत शंभराच्या दहा नोटा निघतात. बाकीचे रुपये कुणी लुटले की ते भुकेले वाटसरू त्याला परत भेटले, हे गदिमा सांगत नाहीत. पण लोकांच्या तोंडात जाण्याऐवजी कैकपटीचं मोल घेऊन खिशात आलेल्या दाण्याच्या मोलाच्या ओझ्याखाली बळी गेलेला जातिवंत शेतकरी आपल्याला अस्वस्थ करतो!

कथांइतकीच त्यांची व्यक्तिचित्रं अत्यंत जिवंत, लोभसवाणी आहेत. औंधच्या महाराजांचं त्यांचं व्यक्तिचित्रण अतिशय सुंदर आहे. आपण एक खराखरा राजा पाहिला, जवळून अनुभवला याचा अभिमान त्यात आहे. एखाद्या हिंदू सम्राटाला शोभेलशी चालचलणूक असलेला, स्वत:ला मिळणारा नमस्कार 'जय देव' म्हणत तसाच्या तसा देवाला वाहून टाकणारा, संस्थानच्या मुलांनी तब्बेतीने, गुणाने उत्तम असावं याची तळमळ असणारा, मुलांनी उद्योजक व्हावं लेखक-कवी-अभिनेतेही व्हावं यासाठी प्रोत्साहन देणारा राजा. याचं व्यक्तित्व जितकं थोर, तितकंच गदिमांनी केलेलं तपशीलवार वर्णन, त्याच्या स्वभावाचे टिपलेले बारकावे वाचनीय आहेत. बालवयात घडलेल्या या प्रत्यक्ष सहवासाने त्यांना खूप समृध्द केलं.

रसिकता, मिस्कीलपणा, मूल्यांचा आग्रह, अहंकारविरहित स्वच्छ-साधं-उदार मन, साध्या माणसांविषयी आस्था, त्यांच्या दुखण्यांसाठीचा कळवळा असे राजाचे अनेक गुण गदिमांच्या व्यक्तित्वात झिरपलेले जाणवतात. राजाच्या शेवटच्या भेटीवेळी राजाच्या कानावर गदिमांचं कर्तुक जातं. राजा म्हणतो, ''आता काही मी राजा राहिलो नाही. पण बाप आहे. अशी मुलं भेटली की बरं वाटतं.''

गदिमा लिहितात, 'औंधचा राजा गेला. मनूच्या परंपरेतील शेवटचा पुरुष गेला. राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळालेल्या 'दो ऑंखे बारह हाथ' या चित्रपटाची कथा मला औंधच्या राजाने केलेल्या अद्भुत प्रयोगावरूनच सुचली होती. तिथल्या खुनी कैद्यांनी मला सांगितले होते 'बेडया काढताना राजाने आम्हाला जगदंबेसमोर नेऊन शपथा घेववल्या होत्या.' माझ्या उद्योगाला राजाचे असे साहाय्य त्याच्या हयातीनंतर झाले.'

'एक दीपोत्सवी संध्याकाळ' हा कविमित्र बोरकर यांच्या भेटीचं वर्णन असलेला लेख वाचताना त्या भाग्यवेळेच्या सोनेरी प्रकाशात आपणही न्हाऊन निघतो. लक्ष्मीपूजनानिमित्त उजळलेल्या मंगल सायंकाळी अचानक बोरकर पंचवटीत येतात.

'साठी उलटलेले, तीन साहित्य संमेलनांना अध्यक्ष म्हणून नियोजित झालेले बोरकर लक्ष्मीच्या स्वागतासाठी रेखलेल्या पिवळया पदचिन्हांवरून आत आले, तेव्हा त्यांचा जणू आपोआपच सत्कार झाला. मुलांनी उडवलेल्या भुईनळयाचे रंगीबेरंगी झाड त्यांच्या मागे उभे राहिले. कैवल्याचे झाड असेच दिसत असेल, नाही का? मागे उजडवाडाची झाडे, पुढे ज्योतींच्या फुलमाळा.''

कवीकडे कवी आला. गप्पांना काय तोटा?

''मी हिंदी शिकलेलो नाही, पण आताशा आपसूकच हिंदी ओळी आकाशातून येऊन माझ्या खांद्यावर बरसत आहेत'' असं सांगून बोरकर त्यांच्या कापऱ्या गोड आवाजात हिंदी कविता गाऊ लागले.

'मी डोळे विस्फारून ऐकत होतो. कानांना नशा चढली होती. मेंदू थक्क झाला होता. मला विचारायचे होते की या ओळी काळजात अंकुरल्या, तेव्हा तुमची मन:स्थिती काय होती? पण प्रश्न विचारायला वेळ कुठे होता? परमात्म्याघरचा पारवा त्वचेच्या रानातील एका एकान्त ढोलीत घुमत होता... वीणेच्या तारांनाच बोलाचे अंकुर फुटत होते. माझ्या कर्णनेत्रांपुढे अक्षरवेल लवलवत होती. ..बोरकरांची ही कविता कबिराच्या दोह्यांमागे निसुग होऊन निघाली होती. तिच्या पोटी साऱ्या विश्वाची कणव दाटून आली होती. दाद तरी कशाकशाला देऊ, असे मला झाले. त्यांच्या मनातल्या साजिवंत अश्वत्थाची सळसळ मी पहात होतो. सात कविता लागोपाठ ऐकवून बोरकर थांबले. मी सुखिया झालो होतो. तृप्त झालो होतो. साहित्यलक्ष्मी पिवळया पावलांनी आली.  ही सात मोत्यांची भीकबाळी माझे कान आयुष्यभर मिरवीत रहातील...'

'कलावंतांचे आनंद पर्यटन' वाचताना तर आपलंही मन निर्व्याज आनंदाने उडया मारू लागतं!

भालजी पेंढारकर, संध्या, लालजी देसाई आदी मंडळींनी एकत्र केलेली ही दक्षिणेची आनंदयात्रा. अगदी निर्हेतुक व त्यामुळे निखळ आनंद देणारी. या यात्रेच्या अनुभवांचं गदिमा शैलीतलं रेखाटन वाचताना तिथल्या परिसरातल्या निसर्गाबरोबरच परंपरा, माणसं स्वभाव याचं दर्शन होतंच, आणि या बुजुर्ग कलावंतांनी केलेली धमाल व त्याचं खुसखुशीत वर्णन वाचताना हे सारे लोक असे मुलांसारखे बागडत आहेत हे डोळयासमोर येऊन आपणही खुदुखुदु हसू लागतो.

माणूस एका कलेने जोडलेला आहे, भारताची घडण सांस्कृतिकदृष्टया एकटाकीच आहे, याचं दर्शन या पर्यटनात त्यांना होतं. भाताची शेतं त्यांना 'पूजेसाठी ताम्हनात उतरलेल्या सुवर्णमूर्तीसारखी' दिसतात, तर तळाशी रुंद व वरती निमुळती होत गेलेली मंदिराची चित्रांकित वास्तू त्यांना 'हिंदू तत्त्वज्ञानासारखी भक्कम' वाटते. कला व अध्यात्म यांचा संगम असलेली दाक्षिणात्य देवळं त्यांना आकर्षक वाटतातच, तिथल्या वातावरणातील भारलेपणाने नास्तिकही आस्तिक होईल, असं ते म्हणतात.

'उदाधुपाचा सुगंध, आरत्यांतील ज्योतींचा मंद प्रकाश व ब्राह्मण म्हणत असलेल्या गीर्वाण शिवस्तुतीमुळे गाभाऱ्यातील सुवर्णकलाकृतीला खरेच देवपण आले.'

कन्याकुमारीचे तीन समुद्र, त्यांचा नाद याचं वर्णन म्हणजे केवळ निसर्गचित्रण नव्हे.

'जल आणि आकाश या आदितत्त्वात त्रिसमुद्राच्या रूपाने बाकीची तीन आदितत्त्वे सामावून गेली आहेत. कसला तरी साद उमटतो आहे. तो साद अक्षरांत बांधता येण्यासारखा नाही. विश्वाच्या निर्मितीपासून आत्तापर्यंत फुलत रहाणारा तो एक अतक्र्य पण सनातन असा नाद आहे' असं म्हणून ते लिहितात, 'कन्याकुमारीला गेलो तेव्हा मला वाटले की आज मी मातृचरण पाहिले!'

त्यांची देवावर, देशावर अभंग श्रध्दा आहे. श्रध्दाभाव प्रकट करणाऱ्या हात जोडणं, नाणं टाकणं अशा लहानमोठया कृतींवरही आहे. पंढरपूरवर श्रध्दा आहे ती देवस्थान म्हणून आहे, तितकीच मराठी काव्याचं आद्यपीठ म्हणूनही आहे. भारतीय आध्यात्मिक तत्त्वचिंतनाचा पाया त्यांच्या विचारांना आहे.

मृत्यूविषयीचं त्यांचं चिंतन 'तांबडी आजी'सारख्या कथांतून वा 'अरे दिवा लावा कोणी तरी', 'हॅलो मि. डेथ' अशा लेखांतून समोर येतं.

मानवी आयुष्यांच्या कथा लिहिणारा तो अज्ञात हात त्यांना प्रत्यक्ष आयुष्यातही जाणवत असे. त्यामुळेच त्यांची विधिलिखितावर श्रध्दा असावी.

''अरे दिवा लावा कुणीतरी..'' हे वडिलांनी मृत्यूपूर्वी उच्चारलेलं शेवटचं वाक्य. गदिमा तिथेच होते. काही क्षणांतच वडील गेले.

वडिलांचा मांडीवर झालेला मृत्यू, सैरभैर झालेलं मन व विचार.. त्यातच अंधारात दगड मारल्याने हातून अजाणता एक कुत्रं मरतं. घरचं सांभाळलेलं कुत्रं आपल्याच हातून मेलं, त्या वेदनेबरोबरच साधुतुल्य वडिलांना आजारात इतक्या यातना का? याचा विचार मनात घोळतो. 'ईश्वराने वडिलांना उठवले, मी त्या मुक्या जिवाला, हे असे का होते?' असे विचार मनात फेर धरू लागतात. गदिमा लिहितात,

'दु:खाची सरमिसळ झाली. विचारांना रस्ता उरला नाही. लहान मुलांनी पाटीवर मारलेल्या रेघोटयांसारखे त्यांचे रस्ते गिचमिड झाले.

मृत्यूही असाच अजाण असतो का, माणसाचा अंत त्याच्या हातून असाच अजाणता होत असेल का, अदृष्ट मृत्यू माणसाची निर्हेतुक हत्या करतो का, याच विचाराची वेडीवाकडी आवर्तने घुमत राहिली. उन्हात तेच कुत्रे आलेसे वाटले. विचारले तर ते त्याचे पिलू. मी अगदी गप्प झालो. डोक्यातला कोलाहल मात्र हलके हलके विरळ झाला. नव्या दिवसाची उन्हे आत सरकू लागली..'

इतक्या व्यक्तिगत दु:खातही त्यांचं अलिप्त कुतूहल जागं असतं. स्वत:च्या आजारपणातही मग त्यांना एक सशक्त कथाबीज दिसू लागतं.

'हॅलो मि. डेथ' म्हणत ठार काळया, अंधाऱ्या, निराकार रूपात पण साक्षात दिसलेल्या काळाशी ते हस्तांदोलन करतात. तो थंडगार  स्पर्श त्यांना प्रत्यक्ष जाणवतो. असे अतींद्रिय अनुभव अनेकदा त्यांना येतात.

गदिमांनी कथेचे अनेक बाज हाताळलेत. त्यात धीट, मोकळा शृंगार आहे. अनावर लालसा आहे, तसं मुकं प्रेमही आहे.

संवेदनशील माणसाला समोर येणाऱ्या माणसाच्या नजरेतही त्याचं दु:ख, त्याचा स्वभाव दिसत असावा. कधी कुणाच्या मनाच्या तारा जुळल्याच तर 'शब्देविण संवादु' रंगत जातो आणि हे कुणा सामान्य माणसाच्या बाबतीतही घडू शकतं. त्या अव्यक्त प्रेमाचं मोल कुण्या कलावंताच्या आविष्काराइतकंच असतं. पण अशा कहाण्या बहुधा त्या खुळयाभाबडया जिवांबरोबरच अदृश्य होतात.

अशीच एक मुकी कहाणी. मुंबईच्या चाळीत राहणारा गोपीनाथ व गावाकडून आलेली निरागस बाळबोध किशी. कधीही संवाद नाही. पत्रं नाहीत. निव्वळ नजरबंदीचा खेळ.

आसुसलेल्या, भारलेल्या नजरांनीच एकमेकांशी अबोल संवाद. मनात स्वप्नांच्या फुलबागा. पण दैव तेही नेत्रसुख हिरावून घेतं. दोघं तगमगतात...

'नजरेची काडीकाडी जमवून त्या प्रेमी पाखरांनी बांधलेले घरटे एकदम नाहीसे झाले. त्यांचे डोळे आंधळया चिमण्यांसारखे पांगुळगतीने इकडेतिकडे उडू लागले...'

एक दिवशी मुंबईतली सर्वात सुंदर सकाळ उगवते. रेल्वेत कामाला असलेला गोपीनाथ तिकीटचेकरच्या वेषात चाळीला समांतर असलेल्या रुळांवर येऊन थांबतो. नजरेच्या खेळाला नवी जागा मिळते. किशी खिडकीत असतेच..

'पाखरांना नवी जागा मिळाली. नव्याने नजरेच्या काडया भराभर जमल्या. होता होता घरकुल पुरे झाले. दोन पाखरे आत विसावली.

एकमेकांच्या उबेत अबोल बसली. पंखांची हालचालही नकोशी झाली. इतकी शांतता आणि समाधी त्यांना लागली. वेळेची जाण राहिली नाही. सादाचे ज्ञान राहिले नाही. खालचे दोन डोळे वर उडाले होते. वरच्या दोन डोळयांनी त्यांना आपल्या उबेत घेतले होते.

एकदम सोसाटयाचा वारा यावा तशी एक लोकलगाडी दणाणत आली. गोपीला ते कळले नाही... गोपीचे मरण डोळयाने पाहिल्यामुळे किशीने अंथरूण धरले यापेक्षा कुणालाच अधिक काही कळले नाही. त्या आजारात किशी गेल्यावर भाऊ म्हणाला, ''त्या खेडयातल्या पाखराला मुंबई मानवली नाही.'' किशी-गोपीनाथची मुकी प्रेमकहाणी मुकीच राहिली. चाळीतल्या भिंतींना सारे माहिती आहे, पण त्यांनाही वाचा नाही.'

ही कथा वाचताना सुन्न झालेल्या मनात आचानक त्याचं गीतरूप रुंजी घालू लागतं.

 'या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती... दर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा...' या ओळी आणि एकूणच हे गीत म्हणजे गदिमांच्या या कथेलाच पुन्हा एकदा वाणी प्राप्त झाली असं वाटतं. मनुष्यस्वभाव व अतक्र्य परिस्थिती यामुळे निर्माण होणारे गुंतागुंतीचे प्रसंग असलेल्या विविधरंगी कथांमध्ये अशी कितीतरी न झालेली गीतं सुप्त असतील. कितीतरी चित्रपटांची बीजं अजूनही कुण्या भालजींचा, कुण्या गुरुदत्तचा हात लागायची वाट पाहत शिलावत् पडून आहेत!  कथासंग्रहांत दडून बसलेली चित्रपटांची सीडबँक जणू...

मरणाचीदेखील किती विविध रूपं गदिमा आपल्याला दाखवतात. माणूस गेल्याचं दु:ख केवळ माणसालाच होतं हा समजही ते अलगद पुसून टाकतात.

'माणूस अखेर माणूस आहे' ही सतत पाझरत असलेल्या एका वडाच्या अश्रूंच्या मागची कथा.

एका भयंकर तापाच्या साथीतून वाचलेले दोन जीव. खचलेला सासरा नि सासरची माणसंही गमावलेली तरणी लेक यमना. सासरा गोसावी नि लेक जोगीण बनूनच राहू लागतात. वाडा ते शेत हेच तिचं फिरणं. सासऱ्याचा धाक असा की कुणी नजरही वर करून पहात नसे.

'बाप आहे तोवर त्याची सेवा करायची या एकाच जाणिवेनं यमना वागत होती. कधीकधी मात्र करडई काढून टाकलेल्या वनात कांडयाकरचुचांचा थवा उतरावा तसा दिवास्वप्नांचा मेळावा तिच्या मनाशी दाटून येई.

अशा वेळी काहीतरी निमित्त काढून ती उचलत्या पावलांनी काटवनात जाई. तो वड तिचा जणू कल्पवृक्ष होता. अर्धा बिघा थंडगार करणारी त्याच्या पानांची पोपटी माया तिचा जीव सुखावून टाके... त्या वडाच्या झाडाखाली कधीच जगायला मिळणार नाही - तसलं आयुष्य ती कल्पनेत जगून घेई. तिथे ती खेळ मांडे. एकटीच हसे रुसे. आबाला हे कळत होते. पण तो दुबळा होता. बाप देऊ शकत नाही ते तिला वड देत होता. दिवसाचे फळ पिकून लाल झाले होते. आभाळाची डहाळी मावळत्या बाजूला जमिनीपर्यंत झुकली होती. पिकल्या दिवसाच्या वासाने वारा धुंदावला होता. स्वत:शीच गुणगुणत रानभर फेऱ्या घालत होता. आभाळाच्या पालवीचे रंग मोजायला सापडू नयेत इतके ते अगणित झाले होते. नेपतीच्या रंगीत रेघोटयात लपलेला विरही कवडा आपले पालुपद पुन:पुन्हा गात होता.


'येगं तू दोघं जेऊं'.. त्याच वेळी यमना आली. जोंधळयाचे रान मागे सारीत करडईच्या रांगातून वडाकडे. तिच्या नेहमीच्या जागी एक तरणाबांड अनोळखी वारकरी विसाव्याला आलेला.

वारकरी म्हणून ती बिनघोर जाते. बोलते.

'तिच्या गोऱ्यापान कपाळावरचा हिरवा ठिपका त्याला जाणवला. शिवाराच्या उभ्या पिकात उगाचच एक जोरदार सळसळ झाली. दिवसाचे फळ आभाळाच्या देठापासून तुटले. वडाची पाने विचित्र सळसळली. त्याचा थोरला बुंधा उगीच हादरला. वारकऱ्याची विरक्ती डळमळली. अनिच्छेने असाहायपणे त्या काळया वावरात काळीकुट्ट घटना घडली. विरक्तीचा अध:पात झाला. सतित्व विटाळले गेले.

यमना घरी परतून बापाच्या गळयात पडून रडली. हकीकत ऐकून सुन्न झालेल्या म्हातारा निश्चल झाला. पण मग वात्सल्याला विवेकाचा शब्द सुचला. घडलं ते अपरिहार्य होतं. जिवाला लावून घेऊ नको. हेही दु:ख पचव. माणूस अखेर माणूस आहे. तू मरू नको.

सकाळी उजाडताच गावात आवई उठली. कुण्या वारकऱ्याने वडाला टांगून घेतले. इकडे बापलेक कुठेतरी परागंदा झाले. गाव चकित झाले, पण कुणाचे डोळे त्यांच्याकरता ओलावले नाहीत. त्या भल्या माणसाचे दु:ख एका वडाला झाले. आबांच्या काटवनातला वड त्या दिवसापासून पाझरतोच आहे. रडतो आहे. गाव म्हणते, वारकऱ्याच्या मरणाचे दु:ख त्याच्या बुंध्यातून झरत आहे. ते दोघेही निष्पाप होते. माणसाच्या कुडीत वाढलेल्या त्या आत्म्यांना या अपराधाची झळ लागली की नाही कोण जाणे. निसर्ग मात्र डोळे गाळतो आहे. वड अखंड रडतो आहे.'

कुठेही अनावश्यक जड शब्द नाहीत. तत्त्वज्ञान सांगण्याचा आव नाही. ग्रामीण माणूस माणसाचं माणूसपण फार सहजतेने स्वीकारतो. साध्या शब्दात मोठा आशय ही त्यांच्या भाषेची श्रीमंती! ती शहरी कृत्रिम लखलखाटाची नाही. प्रतिष्ठा, महत्त्व वाढवण्यासाठी ती खऱ्याखोटया दागिन्यांनी मढत नाही. शुध्द मोकळी हवा, रसरशीत निसर्ग दारात असलेल्या शेतकऱ्याच्या मोकळया मनाची श्रीमंती या भाषेला आहे. कडुनिंबाच्या मोहोराचा मंद गोड वास आहे. हे लेखन वाचताना सहज सैलावून गावच्या मातीवर लोळत असल्यासारखं वाटतं.

'तीळ आणि तांदूळ' आणि 'वाटेवरल्या सावल्या' हे व्यक्तिचित्रणात्मक वा आत्मपर लेखांचे संग्रह वाचताना या माणसाच्या खऱ्या श्रीमंतीचं दर्शन घडतं. गुरुस्थानी असलेल्या आदरणीय विभूती असोत वा समवयस्क मित्र, प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी मिळाल्याची कृतज्ञता त्यांच्या मनात आहे. हे लेखन केवळ आत्मपर नाही वा केवळ व्यक्तिचित्रं नाहीत.  आयुष्याच्या प्रवासात भेटत गेलेली गुणवंत, सहृदय माणसं, त्यांच्या कर्तृत्वाचं मोल व त्यांच्या सहवासामुळे, सहकार्यामुळे स्वत:च्या आयुष्यात पडलेली मौलिक भर याचा कृतज्ञ आलेख यात आहे.

मिरासदार, बोरकर, पु.भा. भावे या आपल्या समकालींनाबद्दल इतके आस्थेने, निखळ कौतुकाने लिहिणं हा दुर्मीळ गुण! स.गो. बर्वे, वसंतराव नाईक, आचार्य अत्रे या व्यक्तिमत्त्वांविषयी व त्यांच्या झालेल्या संस्कारांविषयी, मदतीविषयी ते अपार कृतज्ञतेने लिहितात. त्या व्यक्तीचं वेगळेपणही नेमकं टिपून ते खुलवून आपल्यासमोर मांडतात.

वारकरी कुळात जन्मलेले पण धर्मातल्या अंधश्रध्दांविरुध्द कडाडून बोलणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविषयी 'स्वत:च्या देहावर तुळस ठेवल्याशिवाय देव भेटत नाही' असं ते लिहितात, तर भालजी पेंढारकर 'निवासाच्या वास्तूभोवती काळाची कितीही उंच वारुळे वाढली तरी आयुष्यातील हीण फेकून दिलेला हा पुण्यात्मा देव-देश-धर्म या त्रयीचा निदिध्यासपूर्वक तप करत आसनमांडी घालून बसला आहे' असे त्यांना दिसतात.

'परमेश्वराने साहित्यासारखी कला कर्णाच्या कवचकुंडलांसारखी जन्माबरोबर बहाल केली. अर्जुनाच्या आशेने चित्रपटासारख्या विनाशी माध्यमालाच आपण आपल्या लेखनकलेच्या आहुती देऊन टाकल्या' असं जरी त्यांनी म्हटलं असलं, तरी त्या मायावी चित्रपटसृष्टीतदेखील त्यांनी आपलं भाबडं खेडूतपण जपलं. माणदेशच्या मातीचं अत्तरच त्यांच्या लेखनातून दरवळलं. कृत्रिम सेंटचा उग्र भपकारा कधीच त्यांच्या लेखनात डोकावला नाही!

त्यांनीच एका लेखात म्हटल्याप्रमाणे 'प्रकाशण्यातला आनंद मोठा की त्या प्रकाशामुळे रसिक दिपून जातात, सुखावतात हे पहाण्यातला आनंद मोठा?' गदिमांना हे दोन्ही आनंद लाभले, तरी हा दुसरा आनंद गदिमांच्या आत्मपर लेखनात जाणवतो.

दुसऱ्याच्या आनंदाने सुखावणारा त्यांचा लोभस आनंद माणूस म्हणूनही त्यांना मोठं करतो.

'पळून जाणाऱ्या काळाच्या कानात माझ्या गीतांची भिकबाळी डोलते आहे' असं म्हणणारा कवी, अनुभूतीला शब्दरूपाने जिवंत करणारा लेखक, मायापुरीच्या भांगेत तुळस रोपणारा पटकथाकार, उत्तम नट अशा या चतुरस्र अवलियाने सर्वसामान्यांना शाश्वत आनंदाची अमृतानुभूती देण्यासाठी स्वत: संसारसागरात खोल बुडया मारल्या आणि त्यातून आपल्यासाठी आनंदाचे कंद शोधून आणले. त्यातून फुललेलं साहित्य म्हणजे शाश्वत मोदाची कमळं!

कमळाची कळी जेव्हा पूर्ण उमलते, तेव्हा ती तिच्या अंतरंगातला मकरंद आपल्यापाशी ठेवत नाही. राव-रंक सर्वांनाच या मधा-सुगंधाचं दान मिळतं. शुध्द, सात्त्वि, परिपूर्ण आणि शाश्वत अशा आनंदाचं पारणं गदिमांनी असं काही फेडलं की

जैसी कमलकलिका जालेपणे।

हदयीच्या मकरंदाते राखो नेणे।

दे राया रंका पारणे।

आनंदाचे॥ 

9890928411

Powered By Sangraha 9.0