शरदाचे चांदणे - मधुवनी!

विवेक मराठी    22-Oct-2018
Total Views |

सहा ऋतूंतला सर्वात संपन्न ऋतू म्हणजे शरद ऋतू. आश्विन-कार्तिक महिन्यात येणारा! धनधान्याचा सुकाळ करणारा. नवरात्र, दिवाळी, कोजागिरी अशा आनंदमय सणांनी वातावरणात आनंदांचे साम्राज्य निर्माण करणारा हा ऋतू... कालिदासाच्या संपन्न प्रतिभेतून, सजग निरीक्षणातून, मनोज्ञ कल्पनाशक्तीतून तो कसा काव्यबध्द होतो, हे ऋतुसंहारच्या तिसऱ्या सर्गात आपल्याला पाहता येते.

'शरदाचे चांदणे, मधुवनी फुलला निशिगंध!

नाचतो गोपीजनवृंद, वाजवी पावा गोविंद॥'

 हा ऋतूंतला सर्वात संपन्न ऋतू म्हणजे शरद ऋतू. आश्विन-कार्तिक महिन्यात येणारा! धनधान्याचा सुकाळ करणारा.

पावसाने आता माघार घेतलेली आहे. शेतीची सर्व कष्टप्रद कामे आता संपली आहेत. सुगीचा काळ आला आहे. तयार पीक हातात घेण्याचा हा काळ आहे. धनधान्य, नवे पीक घरात आले आहे. गाईगुरे ओला चारा खाऊन धष्टपुष्ट झालेली आहेत. दूधदुभत्याचा सुकाळ आहे. वातावरण रम्य आहे. आकाश निरभ्र आहे. थंडीची थोडीशी चाहूल लागली आहे.

'ते शारदियेचे चंद्रकळेमाजि अमृतकण कोवळे' अशी एक संतुष्ट कोवळीक आसमंतावर दाटून राहिलेली आहे. नवरात्र, दिवाळी, कोजागिरी अशा आनंदमय सणांनी वातावरणात आनंदाचे साम्राज्य निर्माण करणारा हा ऋतू... या शारदीय ऋतूची राणी 'दीपावली' साद घालते आहे.

आजसुध्दा शरद ऋतूचे हे दिवस आपल्याला उल्हासित करतात! मग कालिदासाच्या संपन्न प्रतिभेतून, सजग निरीक्षणातून, मनोज्ञ कल्पनाशक्तीतून तो कसा काव्यबध्द होतो, हे ऋतुसंहारच्या तिसऱ्या सर्गात आपल्याला पाहता येते. शरदाच्या स्वागताचा पहिलाच श्लोक पाहा -

काशांशुका विकयपद्यमनोज्ञ वक्ता।

सोन्मादहंससख नुपूरनाद रम्या।

आपक्वशालिरुचिरा तनुगात्र यष्टी:।

प्राप्ता शरन्नववधूरिप रूपरम्या॥

'काशपुष्पे हीच वस्त्रे असलेला, विकसित कमले ही सुंदर मुखे असलेला, मत्त हंसांच्या कलस्वरूपी नादाप्रमाणे रमणीय असणारा, पक्व भाताप्रमाणे शेलाटी तनू असणारा, नववधूप्रमाणे असणारा रमणीय शरद ऋतू आला आहे.'

'उपमा कालिदासस्य' हे वचन सर्वश्रुतच आहे. निसर्गातील अपूर्व दृश्यांची सुंदर देखण्या स्त्रीरूपाशी साधर्म्य शोधत केलेली श्लोकरचना बहारदार होते, याचा ठायी ठायी प्रत्यय याही सर्गात येतो.

शरद ऋतूत पृथ्वी काशफुलांनी, रात्री चंद्रकिरणांनी, नद्या हंसांनी, सरोवरे श्वेतकमलांनी, उपवने मालतीपुष्पांनी शुभ्र केली आहेत.

शरदाचे चांदणे असतेच तसे! तेजस्वी तरीही सुशीतल! काशफुलेही तशीच असतात. नदी-ओढयापाशी माजणारे गवत, त्यावर मऊ रुपेरी, लोकरीसारखी फुले येतात, त्यांना 'काश'फुले म्हणतात.

शरद ऋतूत नद्या तुडुंब भरलेल्या आहेत. त्या मदमस्त युवतीप्रमाणे मंद मंद वाहतात. चंचल, मनोहर शुभ्र मासे जणू नदीरूप युवतीचे कटिबंध आहेत. नदीतटावरील शुभ्र पक्ष्यांच्या माळा हेच हार आहेत आणि 'नद्यो विशालपुलिनान्त नितम्बबिम्बा।' - विस्तृत वालुकामय तटभाव हे त्यांचे पुष्ट नितंब आहेत. उपमा सार्थ होण्यासाठी दोन गोष्टींतील साधर्म्य सहज प्रतीत होऊन ते सुंदर शब्दांत मांडावे लागते.

आता हेच पाहा - वर्षा ऋतूमध्ये ढगातील पाणी संपले आहे. ढग जलरहित झाले आहेत. चांदी, शंख, मृणालाप्रमाणे ते शुभ्र व हलके झाले आहेत. त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने ते शीघ्रपणे जात आहेत. अशा ढगांमुळे आकाश काही ठिकाणी शुभ्र चवऱ्या ढाळल्या जात असलेल्या राजासारखे दिसत आहेत.

खललेल्या काळजाच्या राशींनी सुंदर दिसणारे आकाश बंधुकाच्या - म्हणजे दुपारीच्या फुलांच्या लालीने रक्तवर्ण दिसणारी भूमी आणि पक्व धान्याने आवृत्त भूभाग...

वप्राश्वचारू कमलावृत्त भूमिभागा:।

प्रोत्कण्ठयति न मनो भुवि कस्य यून:॥

असे हे दृश्य कोणा तरुणाचे मन उत्कंठित करणार नाही? अर्थात, याचे उत्तर प्रश्नातच आहे!

मंद वाऱ्याने वृक्षांच्या फांद्या हलत आहेत. त्यातून निघालेल्या गुच्छातील कोमल किसलयांच्या अग्रातील मध मत्त भ्रमर पीत आहेत आणि हे सारे पुष्पवैभव 'कोविदार' वृक्षाचे आहे.

इथे कोविदार वृक्ष म्हणजे नेमके कोणते वृक्ष? हा प्रश्न मलाही पडला आणि शोध घेताना माहिती मिळाली की कोविदार म्हणजे पानझडी प्रदेशातले सहा ते आठ मीटर उंचीपर्यंत वाढणारे हे वृक्ष. उन्हाळयात फुलतात. त्यांना निळसर व गुलाबी अशी दोन रंगांची फुले येतात.

निरभ्र स्वच्छ आकाश हे शरद ऋतूचे खास वैशिष्टय! त्याचे वर्णन करताना कालिदासाची लेखणीही बहारदार होते -

तारागणप्रवरभूषणमुद्वहन्ती।

मेघावरोधपरिमुक्तशशाङ्कवक्त्रा॥

ज्योत्स्नानुकूल ममलं रजनी दधाना।

वृद्विंप्रयात्यनुदिनं प्रमदेव बाला॥

तारांगणाचे सुंदर आभूषण धारण करणारी, मेघांच्या आवरणातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे रूप असणारी, निर्मल स्वच्छ चांदण्याचे वस्त्र परिधान केलेली रात्र प्रमदेप्रमाणे दिवसेंदिवस वाढत जात आहे.

कारंडव पक्ष्यांच्या रांगांनी नदीच्या लाटा विदीर्ण झाल्या आहेत. कादंब, सारस अशा पक्ष्यांनी नद्यांचे काठ शोभून दिसताहेत. हंसाचे कलख - कलकलाट लोकांना आकर्षित करत आहे.

सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम् आपली निसर्गसंपन्न भारत भूमी ती हीच असावी.

कालिदासाच्या काव्यात हा 'नेत्रोत्सव' शब्द येतो.

नेत्रोत्सवो हृदयहारिमरीचि माल:।

प्रहादक: शिशिरसीकरवारिवर्षी॥

नेत्रांना आनंददायक, मनोहर किरणमाला असणारा, शीतल जलतुषारांचा वर्षाव करणारा चंद्र सर्वांना आनंद देणारा असला, तरी विष लावलेल्या बाणांप्रमाणे विरहिणींना घायाळ करीत आहे.

या दिवसांत मंद वाहणाऱ्या वाऱ्याची भुरळ शरद ऋतूच्या वर्णनात प्रामुख्याने येते. हा वारा साळीच्या शेतांना हलवतो, पुष्पभाराने नत झालेल्या वृक्षांना हलवतो, उगवलेल्या कमळांना आंदोलने देतो, नीलकमलांच्या ताटव्यांनी फुललेल्या सरोवरात लाटांच्या सुंदर रांगा निर्माण करतो. अर्थात, या अनुपम दृश्यांनी मने उत्कंठित होतात. निसर्गप्रिय कालिदासाचे नेत्र आणि मन दोन्ही या सुशीतल वाऱ्याने सचेतन होतात.

निसर्गावर मनापासून प्रेम असल्याशिवाय अशी रम्य वर्णने सुचणार नाहीत. बारा, तेरा व चौदा क्रमांकाच्या श्लोकातही सृष्टीची, पक्ष्यांची अगदी सूक्ष्म वर्णने येतात.

आता शरद ऋतूत आकाशातील इंद्रधनुष्य लोपले आहे. विद्युल्लता चमकत नाही, पक्षी पंख हलवत नाहीत, मोर मान उंच करून आकाशाकडे पाहत नाहीत आणि मदनही नृत्य न करणाऱ्या मोरांचा त्याग करून गोड गाणाऱ्या हंसाकडे जातो. अर्जुन, कुटज, कदम्ब, सर्ज आणि नीप या वृक्षांना सोडून (त्यांचे बहर आता संपले आहेत) फुले उमलून शोभिवंत दिसणाऱ्या सप्तच्छदांकडे जातो. सत्तच्छद म्हणजे सातवीण! सर्ज म्हणजे सालवृक्ष. नीप म्हणजे कदंब! रानात वाढणारे हे वृक्ष आजही अरण्ये संपन्न करतात. अर्जुन, कुटज हे भारतात सर्वत्र आढळणारे वृक्ष आहेत. सुगंधी तुरे, मंजिऱ्या या रूपात त्यांची फुले फुलतात. पावसाळी फुले येणारी झाडे वेगळी, हिवाळयात फुलणारे वृक्ष वेगळे. या वर्णनावरून कालिदास वनात फिरत असणार हे नक्कीच.

शेफालिका म्हणजे पारिजात, कलहार म्हणजे पांढरे पाणकमळ, कुमुद यांना वारा डोलावतो आहे. पानांच्या टोकांना चिकटलेले थंड दवबिंदू... त्यांनी छान गारवा निर्माण झाला आहे. मनात उत्कंठा, हुरहुर निर्माण होते आहे.

सुपीक संपन्न अशा साळीच्या - भाताच्या शेतांनी जमीन आच्छादित झाली आहे. गाई-बैलही पोटभर चारा खाऊन तृप्त झाले आहेत. हंस, सारस पक्ष्यांच्या दर्शनाने ग्रामभागातील लोकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.

संपन्नशालिनिययावृतभूतलानि।

स्वस्थस्थित प्रचुरगोकुलशोभितानि ।

हंसै: ससारस कुलै: प्रतिनादितानि ।

सीमान्तराणि जनयानी नृणां प्रमोदम् ॥

अशा शब्दसौष्ठवातून कालिदास शरद ऋतूच्या संपन्न वैभवाचे वर्णन करतात.

आता शरद ऋतूत हंसांनी स्त्रियांची डौलदार गती जिंकली आहे. विकसित कमळांनी त्यांचे नेत्रकटाक्ष, तर जललहरींनी त्यांच्या भूलीलांना, विभ्रमांना जिंकले आहे. एरवी स्त्रियांच्या सौंदर्याला प्राधान्य देणाऱ्या कालिदासांनी त्यांच्या सौंदर्याहून सृष्टीचे सौंदर्य अधिक मोहक आहे असे म्हटले आहे, हेही विशेषच!

पुष्पभाराने झुकलेली कोवळी पालवी असलेल्या श्यामा वेली, नवमालती, ककेली (शंकासूर) वृक्षांची सुंदर फुले, अनुक्रमे त्यांच्या कमनीय बाहूंचे आणि दातांच्या शुभ्र प्रभायुक्त हास्याचे तेज हरण करीत आहेत. सभोवतालचे सुंदर वातावरण, विविध फुले, मोहक वेली या मानवी सौंदर्याला मागे टाकीत आहेत.

स्त्रिया आपले घनदाट काळे केस नवमालती फुलांनी नटवीत आहेत. सुवर्णमय कुंडलांनी युक्त अशा कानांवर नीलकमले धारण करीत आहेत. स्त्रियांच्या सौंदर्यवर्धनाच्या तेव्हाच्या नैसर्गिक रितीही विशेष आहेत. सुगंधी चंदनरस, पुष्पहार यांनी स्तनमंडले सजवली आहेत. मेखलांनी नितंब भाग, मंजुळ ध्वनी करणाऱ्या नूपुरांनी चरणकमले शोभायमान केली आहेत.

मेघरहित (विगतमेघं) आकाश, चंद्रताऱ्यांनी सुशोभित, खचित (युक्त) निरभ्र आकाश, नीलकांतियुक्त पाण्याने भरलेली सरोवरे अतिशय सुंदर दिसताहेत. 'श्रियमतिशयरूपां व्योम तोयाशयानाम्' असे हे रूप आहे.

निसर्गाची ही कृपा कालिदासाच्या श्लोकाश्लोकातून ठासून भरलेली आहे. तेव्हाचा निसर्गही वैभवसंपन्नच असणार!

शरादि कुसुमसङ्गाद्वायवो वान्ति शीता।

विगतजलदवृन्दा दिग्विभागा मनोज्ञा:॥

विगतकलुषमम्भ: श्यानपङ्का धरित्री।

विमल किरणचन्द्र व्योमताराविचित्रम्॥

फुलांच्या संपर्काने वारे थंड वाहतात. ढग नाहीसे झाल्याने दिशा सुंदर दिसतात. गढूळपणा गेल्याने पाणी निर्मळ, स्वच्छ, निव्वळशंख झाले आहे. चंद्रकिरण व नक्षत्र-तारे सुंदर दिसताहेत.

असे निसर्गाचे वर्णन पुन्हा पुन्हा येते आहे. सूर्योदय... सूर्यास्त हे तर कवींचे प्रिय विषय!

त्यासाठीही कालिदास, प्रिय पती विदेशी गेल्याने हास्य लोप पावलेल्या स्त्रियांची उपमा योजतात. स्त्रीच्या मुखाच्या तेजाप्रमाणे असणारे सूर्यविकासी कमल प्रभातकालच्या सूर्यकिरणांनी जागे केल्याने प्रफुल्लित होते, तर चंद्रबिंब अस्त पावल्याने श्वेतकमल संकुचित होते.

तिकडे दूरदेशी प्रिय पतीची अवस्थाही अशीच झाली आहे. निळया कमळात पत्नीच्या काळया सुंदर डोळयांची शोभा पाहून, मदमस्त हंसाच्या कलखात पत्नीच्या सुवर्णमेखलेची किणकिण ऐकून, बंधुक (शेतातली लहान लाल फुले) फुलांच्या लाल रंगात पत्नीच्या सुंदर अधरांची शोभा पाहून पती भ्रांतचित्त होऊन रडत आहे.

ऋतुचक्राचा मानवी भावभावनांवर होणारा असा परिणाम हा अर्थातच काव्याचा विषय नेहमीच असतो. विशेषत: स्त्री जगतावर होणारा निसर्गाचा परिणाम कालिदास विशेषत्वाने चित्रित करतात.

शरद ऋतूच्या या सर्गाचा शेवट करतानाही ते अशाच रूपकाचा आश्रय घेतात.

सुभगा शारदागमश्री: स्त्रीणां वदनेषु शशाङ्कलक्ष्मी

मणिनुपरेषु, हंसवयनम् अधेरुषु बन्धूक कान्ति च

कामं विहाय अपि प्रयाति॥

हा आपला सौंदर्यसंभार असा स्त्रियांच्या ठायी सोडून शरद ऋतू निघून जातो आणि त्याच्यासाठी सदिच्छा व्यक्त करतानाही 'विकसित कमलाप्रमाणे मुख असलेल्या, नीलवर्ण नेत्र असलेल्या, नवकाश पुष्पाप्रमाणे शुभ्र वस्त्रधारी, श्वेतकमलांची कांती असलेल्या, यौवनयुक्त कामिनीप्रमाणे हा शरद ऋतू तुम्हा लोकांच्या मनाला श्रेष्ठ प्रीती प्रदान करो' अशी प्रार्थनाही समर्पित करून ऋतुसंहारचा तिसरा सर्ग संपतो.

कालिदासाचे ऋतुसंहारमधील तत्कालीन सृष्टीचे, निसर्गाचे, मानवादी, पशुपक्ष्यांचे, सुंदर सुखी, सूक्ष्म वर्णन वाचताना आजचे बदलते ऋतुमान प्रकर्षाने डोळयांसमोर येते. महापूर, गाळाने भरलेली तळी, आटलेल्या नद्या, पिके हाती येतेवेळी धो धो पडणारा अवकाळी पाऊस, कष्टाने पिकवलेली उभी पिके डोळयांदेखत मातीमोल करणारा पाऊस, ती बघताना विदीर्ण होणारी शेतकऱ्यांची मने... त्यांच्या आत्महत्या...

चारा, कडबा खायला न मिळाल्याने खपाटीला गेलेल्या पोटांची जनावरे, कागद-प्लास्टिक पिशव्याही शोधीत फिरणारी केविलवाणी जनावरे अशीच दृश्ये ग्रामीण भागात खूपदा पाहावी लागतात. निर्मळ पाण्याची सरोवरे, तळी, खळाळते प्रवाह ही वर्णने 'ऋतुचक्रातच' वाचावी लागतात.

सृष्टीचे रूप असे का बरे पालटून गेले? कशाचा प्रकोप? अफाट जनसंख्येचा? निसर्गाच्या हानीचा? रासायनिक उत्पादनांचा? अणुऊर्जेच्या प्रकल्पांचा? सारे प्रश्न... आणि प्रश्नच!

आपणच निर्माण केलेले... न सोडवता येणारे! शारदीय चांदणे... अमृततुल्य... दुग्धपान... रम्य वनराजी... विविध फुलांनी बहरलेले वृक्ष... लता, बने, उपवने, पशुपक्ष्यांची संतुष्टता आज हरवली आहे हे खरे!

जनजीवनाची स्वस्थता, सुबत्ता, शांतता कुठल्याच आणि कुणाच्याच प्रार्थनेने आज अनुभवता येत नाही.

असे असले, तरी वर्षा ऋतूची सुजलता, सुफलता... शरद ऋतूची संपन्नता, सुबत्ता, ऋतुसंहारच्या या दोन्ही सर्गांत अभ्यासताना नक्कीच आनंद होतो. तोच सर्वांबरोबर वाटून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न!!

मंदाकिनी गोडसे

9421264008