सप्तसिंधू संस्कृती

16 Oct 2018 16:37:00

प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. आजचे तीर्थस्थळ आहे पाकिस्तान व भारतात पसरलेली सरस्वती-सिंधू संस्कृती.

फाळणीनंतर भारत-पाकमध्ये मालमत्तेची वाटणी झाली. इंग्रजांच्या मध्यस्थीने सर्व सरकारी मालमत्ता 4:1 या प्रमाणात, तर उत्खननात मिळालेल्या वस्तू 1:1 या प्रमाणात वाटायचे ठरले. या वाटणीचे किस्से ऐकण्यासारखे आहेत.

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

 लाहोरच्या एका पोलीस ठाण्यातील वस्तूंची विभागणी किती काटेकोरपणे केली गेली, तर अशी - फेटे, लाठया, खर्ुच्या, बिगुल, पुस्तके, चिल्लर सगळे 1:1 असे वाटले. कसलेही डोके न लावता केलेल्या विभागणीत - एका Dictionaryची 'A'पासून 'K'पर्यंतची पाने पाकिस्तानला आणि 'L'पासून 'Z'पर्यंतची पाने भारताला दिली गेली! 

दुसरीकडे, मोहेंजो दाडो व हडप्पा इथे सापडलेले seals, मडकी, भांडी, खेळणी, दागिने, सगळे अर्धे-अधर्े वाटले. काही काही सोन्याच्या, तांब्याच्या मण्यांच्या माळा तोडून त्यातले मणी अर्धे अर्धे वाटले!

पंचतंत्रातल्या गोष्टीसारखे - दोन बोक्यांच्या भांडणाला माकडाचा न्याय!

फाळणीत मोहेंजो दाडो, हडप्पा, तक्षशिला, छानु दाडो ही उत्खनन केलेली, आपला समृध्द वारसा सांगणारी सगळी गावे पाकिस्तानकडे गेली. भारतीय पुरातत्त्व विभागाला हे शल्य स्वस्थ बसू देईना. स्वतंत्र भारतात, पुरातत्त्व विभागाने सिंधू संस्कृतीच्या गावांचा शोध तातडीने सुरू केला. जिद्दीने चाललेल्या कामाला लवकरच फळ मिळाले - 1950पर्यंत 70 गावांचा शोध लागला! फाळणीच्या जखमेवर एक हलकी फुंकर!

पाकिस्ताननेदेखील चुरशीने सिंधू खोऱ्यातील गावे शोधली. नवीन नवीन स्थळे सापडत जाता लक्षात आले की - सरस्वती नदीचे कोरडे पात्र समजले जाणाऱ्या घग्गर व हकाराच्या पात्रांवर या संस्कृतीची सर्वाधिक स्थळे आहेत. त्यामुळे जी सिंधू संस्कृती म्हणून ओळखली जात होती, ती सरस्वती-सिंधू संस्कृती म्हणून ओळखली जावी, अशी मागणी होऊ लागली. तर म.के. ढवळीकरांच्या मते, सात नद्यांच्या काठांनी वसलेली असल्याने 'सप्तसिंधू संस्कृती' हे नाव अधिक योग्य आहे. वेदांमध्येसुध्दा या प्रांताचे प्राचीन नाव 'सप्तसिंधू' होते, असे कळते.

सप्तसिंधू संस्कृतीची साधारण 400 स्थळे पाकिस्तानमध्ये, तर 1100 भारतात आहेत. त्यापैकी 600+ स्थळे सरस्वती नदीच्या खोऱ्यात आहेत. निम्म्याहून कमी स्थळांचे उत्खनन केले गेले आहे. आणि या संस्कृतीची लिपी अजून सर्वमान्यरीत्या वाचता आली नाहीये. मातीच्या मुद्रांवर वर लिहिलेला मजकूर आणि तिथल्या लोकांची भाषा अजूनही कळली नाहीये. हे अडथळे ओलांडून या संस्कृतीची ओळख करून घ्यावी लागते ती तेथील नगररचनेतून आणि तिथे सापडलेल्या वस्तूंमधून.

या संस्कृतीची वैशिष्टये होती - आखणी करून बांधलेली नगरे, नगरांना तटबंदी, काटकोनातील रस्ते, दोन किंवा तीन मजली घरे, घराघरात संडासाची सोय, सांडपाण्याचा भुयारी मार्गाने निचरा करण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाणीपुरवठयासाठी वेगळी भुयारी व्यवस्था, पाणी साठवण्यासाठी मोठे हौद, विहिरी, दूर देशांशी व्यापार, समुद्रमार्गाने व्यापार, जहाज बांधणी व दुरुस्ती करण्याची सोय, हस्तिदंताच्या वस्तू, मौल्यवान मण्यांचे दागिने तयार करणारे कारखाने, खेळणी, नक्षीदार मातीची भांडी इत्यादी.

विशेष उल्लेखनीय आहेत - कालीबंगान, बनावली, लोथल या ठिकाणी मिळालेली अग्निकुंड. त्या कुंडांमध्ये प्राण्यांच्या अस्थींचे अवशेषही मिळाले आहेत. त्यावरून सप्तसिंधूचे लोक पशुबळी देऊन यज्ञ करीत असावेत, हे कळते.

पाकिस्तानमधील मोहेंजो दाडो येथे एक भव्य पुष्करिणी मिळाली, जिला Great Bath असे म्हटले जाते. संपूर्ण विटांनी बांधलेल्या या चौकोनी पुष्करिणीत उतरण्यासाठी दोन बाजूंना पायऱ्या आहेत. कुंडातील पाणी जमिनीत झिरपून जाऊ नये, याकरिता त्यावर गिलावा दिला आहे. पुष्करिणीच्या एका बाजूला लहान खोल्या, तर एका बाजूला ओवारी होती. काही धार्मिक कर्मकांडात स्नानाकरिता ही पुष्करिणी वापरत असावेत असे वाटते. 

त्याशिवाय पशुपतीचे अंकन असलेली मुद्रा. योगमुद्रेत ध्यानस्थ बसलेला देव, त्याच्या डोक्यावर शृंग आणि त्याच्या आजूबाजूला पशू आहेत. हा देव शंकराशी मिळताजुळता आहे. शंकर हा आदियोगी आहे, तो डोक्यावर शृंगासारखी चंद्राची कला धारण करतो आणि तो पशुपतीसुध्दा आहे.

अनेक मातीच्या मातृदेवता मिळाल्या आहेत. काही देवतांच्या कानाजवळ दोन पणत्या आहेत. त्यावर जमलेली काजळी सांगते की या देवीजवळ दिवा लावायची प्रथा होती. ॠग्वेदातून कळते की, या सप्तनद्यांच्या प्रदेशात नदीला माता समजत होते. त्यातून सप्तमातृकांच्या पूजेला सुरुवात झाली असावी. येथील एका मुद्रेवर वर सप्तमातृकांचे अंकन केलेले दिसते. सप्तमातृकांची पूजा प्राचीन काळापासून चालू आहे. सप्तमातृकांचे शिल्प अनेक मंदिरांतून दिसते. त्यांचा पाण्याशी असलेला संबंध आजही 'साती असरा'शी किंवा 'सात अप्सारांशी' जोडलेला दिसतो.

योगाच्या मुद्रेतील मातीच्या कैक बाहुल्या मिळाल्या आहेत. यावरून येथील लोक योग जाणत होते, योगासने करत होते हे कळते. नंतरच्या काळात सप्तसिंधू परिसरात पतंजलीने योगसूत्रे लिहिली, असे मानले जाते.

याशिवाय आपल्या अगदी ओळखीतल्या वस्तू इथे सापडल्या आहेत, उदा., लगोरीच्या चकत्या, बुध्दिबळासारख्या सोंगटया व पट, पंचतंत्रातील गोष्टींची चित्रे, भांगात सिंदूर लावलेल्या मातीच्या पुतळया, राजस्थानी बायकांप्रमाणे खांद्यापर्यंत बांगडया घातलेली पुतळी, डाव्या खांद्यावरून उपरणे अथवा पदर घेण्याची पध्दत, आताची 16 शेर/16 आणेसारखी 16च्या पटीत असलेली वजनाची मापे, बैलगाडयांची रचना, सिंधू नदीतील सपाट होडया, मध्यभागी चौक असलेली घरांची रचना, उभे राहून तांब्याने पाणी घेऊन अंघोळ करायची पध्दत... अशा एक नाही, तर अनेक गोष्टी सप्तसिंधू संस्कृतीपासून चालत आल्या आहेत.

आजही, आंघोळ करताना सात नद्यांचे नाव घेण्याची पध्दत रूढ आहे, हा सप्तसिंधूचाच वारसा आहे!

गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती।

नर्मदे सिन्धु कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरु॥

Powered By Sangraha 9.0