नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळया क्षेत्रांत योगदान देणाऱ्या काही अपरिचित महिलांची, तसेच महिलांसाठी होणाऱ्या कार्याची ओळख करून देणारे विशेष लेख या अंकात देत आहोत.
'मैत्रिणींनो स्वत:ची ओळख निर्माण करा, स्वावलंबी व्हा,' हे ब्रीदवाक्य जपत ग्रामीण महिलांमध्ये आत्मभान जागृत करणारे नेरळमधील कोतवाल वाडी ट्रस्टचेच 'कर्मयोगी हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्र'. आर्थिक परिस्थितीशी झुंजणाऱ्या, अर्धवट शिक्षणामुळे आत्मविश्वास हरपलेल्या या महिलांसाठी शिवणकला आणि रुग्ण साहाय्यक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे कार्य या केंद्राद्वारे चालते. या सगळया कार्याचा आधारस्तंभ म्हणजे संस्थेच्या अध्यक्ष संध्याताई देवस्थळे.
मुंबई-पुण्यानजीकचा कर्जत तालुका तसा निसर्गसंपन्न, तरी आजही येथील अनके गावे, आदिवासी पाडे दुर्गम आहेत. शिक्षण आणि आरोग्य हे येथील महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते 50-60 वर्षांपूर्वी अधिक गंभीर होते. त्या काळात नेरळ गावच्या एका स्वातंत्र्यसैनिकाने त्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येथील आदिवासी बांधवांसाठी सेवा कार्य सुरू केले. या स्वातंत्र्यसैनिकाचे नाव हरिभाऊ भडसावळे उर्फ काका भडसावळे. त्यांनी 1947मध्ये हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमा पाटील यांच्या स्मरणार्थ कोतवाल वाडी ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून स्थानिक ग्रामीण आणि आदिवासी बांधवांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. येथील मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरू केले. महिलांचा विकास होणे ही काळाची गरज आहे, ही हरिभाऊंची भावना होती. त्यांच्या या विचारांचे महत्त्व ओळखून आज त्यांची कन्या संध्या देवस्थळे त्यांचा हा वारसा पुढे नेत आहेत. कोतवाल वाडी ट्रस्टचे 'कर्मयोगी हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्र' केवळ नेरळच्याच नव्हे, तर संपूर्ण कर्जत तालुक्याच्या महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने कार्य करत आहे. महिलांनी महिलांसाठी चालवलेले केंद्र असेच या केंद्राचे वर्णन करता येईल. संध्याताई या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. या भागातील अल्पशिक्षित तरुणींसाठी, महिलांसाठी रुग्णसेवेसारख्या सेवाभावी क्षेत्रात अर्थार्जनाचे दरवाजे खुले करून त्यांनी खरे तर दुहेरी सामाजिक कार्य हाती घेतले आहे.
संध्याताई यांचे शिक्षण एम.एस्सी.पर्यंत. हाफकिन इन्स्टिटयूटमधील नोकरीचा अनुभव गाठीशी. वडिलांसारख्याच हरहुन्नरी आणि सामाजिक कार्याची आवड असलेल्या संध्याताईंचे वय पन्नाशीच्या पुढे. घरात तशी आर्थिक सुबत्ता. तरीही त्या धडाडीने सामाजिक कार्यात उतरल्या. आपल्या परिसरातील आरोग्याचे, रोजगाराचे, महिलांचे प्रश्न त्यांनी जवळून अनुभवले. महिला विकास केंद्राच्या माध्यमातून त्यांनी हे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले. या भागात अद्यापही मुलींना शिकवण्याची मानसिकता नाही. अनेक मुली काही कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडतात. त्यामुळे अर्थार्जन करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वासच गमावून बसतात. केवळ शिक्षण नाही, म्हणून आपण स्वत:च्या पायावर उभे राहू शकत नाही हा न्यूनगंड मनातून काढून टाकणे हाच या केंद्राचा उद्देश होता.
साधारण 2009पासून या कामाला सुरुवात झाली. या केंद्रात दोन प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. एक म्हणजे शिवणकला आणि दुसरे रुग्ण साहाय्यक प्रशिक्षण. अगदी पाचवी उत्तीर्ण असलेली महिलाही शिवणकलेचे प्रशिक्षण घेऊ शकते. किमान आठवी उत्तीर्ण असलेल्या महिला रुग्ण सेवा साहाय्यक वर्गासाठी प्रवेश घेऊ शकतात. विशेष म्हणजे त्यासाठी अनुक्रमे 300 रुपये व 500 रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले जाते. रुग्णसेविका प्रशिक्षणाच्या वर्षाला चार बॅचेस होतात. एका बॅचमध्ये साधारण 30 मुली असतात. सध्या 24वी बॅच सुरू आहे. या कामासाठी लार्सन ऍंड टूब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आर्थिक सहकार्य करते. ही संस्था प्रत्येक मुलीला प्रशिक्षणासाठी येणारा 8 ते 10 हजारांचा खर्च उचलते.
आजच्या काळात रुग्णसेवा या क्षेत्राला अनेक अर्थांनी महत्त्व आले आहे. रुग्णालयांमध्ये त्यांची आवश्यकता तर असतेच, त्याचबरोबर आज नवरा-बायको दोघेही नोकरी करणारे असल्याने घरातील वृध्द, रुग्ण यांची सेवा करण्यासाठीही अशा साहाय्यकांची गरज असते. या क्षेत्रात उपलब्ध असलेली मोठी संधी लक्षात घेऊनच हे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. या वर्गासाठी एक विशिष्ट अभ्यासक्रम ठरवलेला असतो, ज्यात आवश्यकतेनुसार बदलही होतात. अभ्यासक्रम संपल्यावर प्रमाणपत्राबरोबरच त्यांना एक मेडिकल किटही दिलेले असते. त्याच्या मदतीने या मुली वेळ पडल्यास आपल्या घरातील किंवा आजूबाजूच्या लोकांवरही प्रथमोपचार करू शकतात. उदा. खेडयापाडयात कोणाला जुलाब होत असतील, डिहायड्रेशन होत असेल तर डॉक्टरकडे पोहोचेपर्यंत रुग्ण अत्यवस्थ होतो. अशा वेळी त्याला ओआरएस कसे द्यायचे, तात्पुरते औषध कसे द्यायचे हे त्यांना शिकवले जाते. त्यांना डिजिटल थर्मामीटर दिला जातो. जखम झाल्यावर प्रथमोपचार कसे करायचे, बेडसोअर्सचे रुग्ण असतील तर त्यांना स्वच्छ कसे करायचे, ड्रेसिंग कसे करायचे हे त्यांना शिकवले जाते. त्यासाठीचे साहित्य किटमध्ये दिले जाते.
संध्याताई सांगतात, ''या भागातच माझा जन्म झाला, माझे बालपण गेले. बाळंतपणामुळे अनेक महिलांचे मृत्यू झाल्याचे मी माझ्या लहानपणी पाहिले आहे. कुऱ्हाड लागून किंवा गंभीर जखम होऊन डॉक्टरकडे जाईपर्यंत मोठया प्रमाणात रक्तस्राव होऊन रुग्ण दगावल्याचे पाहिले आहे. साप चावल्यानंतर तो विषारी नसला तरी केवळ घाबरल्याने किंवा योग्य वेळात प्रथमोपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागण्याची उदाहरणे पाहिली होती. डिहायड्रेशनमुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाणही मोठे होते. आमच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी वाडया-पाडयातून ज्या महिला येतात, त्यांच्या प्रशिक्षणाचा उपयोग त्यांच्या भागातील लोकांनाही होतो. त्या आपल्या भागातील बाळंतिणीला मदत करतात. रक्तस्राव कसा थांबवायचा, विषारी साप-बिनविषारी साप यांचे दंश कसे ओळखायचे, त्या वेळी कोणते प्रथमोपचार करायचे, रुग्णाला धीर कसा द्यायचा याबाबत त्यांना प्रशिक्षणात शिकवलेले असल्याने ते त्याप्रमाणे लोकांना मदत करतात.''
रुग्ण साहाय्यक प्रशिक्षण वर्गासाठी भारती शिंगोळे आणि अपर्णा कर्वे या प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. शिवणकला वर्गासाठी अंजू पारधी, रोहिणी झुगरे, अंजना तिखंडे या प्रशिक्षक आहेत. भारती शिंगोळे या सुरुवातीपासूनच संस्थेशी जोडलेल्या होत्या. त्यांनी नंतर नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले आणि त्यात चांगले यश मिळवले. ज्युपिटरसारख्या मोठया रुग्णालयात काही काळ अनुभव घेतल्यानंतर त्या संस्थेत प्रशिक्षण देण्याचे काम करू लागल्या. प्रात्यक्षिके शिकवताना मुलींना त्यांच्या अनुभवाचा फायदा देता येतो. अपर्णा कर्वे या प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. त्यामुळे प्रशिक्षणार्थीआणि प्रशिक्षक असे दोन्ही अनुभव त्यांनी संस्थेतच घेतले आहेत. स्वत: शिस्तप्रिय असल्यामुळे अपर्णाताई प्रशिक्षणार्थींना नियोजनाचे धडे देतात. त्यांनी या प्रशिक्षण वर्गादरम्यान येणारे अनेक अनुभव सांगितले.
अपर्णाताई सांगतात, ''आम्ही प्रशिक्षण वर्गात अशा सेवाभावी रुग्णसेविका तयार करतो. एक महिना केंद्रात शिकवतो आणि दोन महिने प्रॅक्टिकलसाठी वेगवेगळया सरकारी रुग्णालयांमध्ये पाठवले जाते. प्रशिक्षणासाठी मुली खूप लांबून लांबून येतात. 80 टक्के प्लेसमेंट दिली जाते. दर वर्षी 250 ते 300 विद्यार्थिनींना नोकरी दिली जाते. म्हणजे संस्थेने आतापर्यंत 1800-2000 महिलांना स्वावलंबी केले. प्लेसमेंट देताना मुलींचे राहण्याचे ठिकाण, त्यांची प्रवासाची सोय, घरच्या अडचणी, मिळणारा पगार या सगळया गोष्टींचा विचार करतो. अनेक ठिकाणी घरी असलेल्या वृध्दांसाठी किंवारुग्णांसाठी साहाय्यक म्हणून काम करतात.
रुग्णालयांमध्येही रुग्ण साहाय्यकांची मोठया प्रमाणात गरज असते. त्यानुसार रुग्णालयांकडून विचारणा होते, किंवा कधीकधी आम्ही स्वत:ही रुग्णालयांकडे पाठपुरावा करतो. आमच्याकडे खोपोलीच्या खूप मुली प्रशिक्षणासाठी यायच्या. त्या अतिशय तळागाळातील आहेत. त्या प्रवासासाठी रोज इतके पैसे खर्च करू शकत नव्हत्या. मग आम्ही खोपोलीतील सरकारी रुग्णालयांमध्ये चौकशी केली. त्यांनी आम्हाला नगरपरिषदेकडून परवानगी आणायला सांगितली. तिथे पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला 1 नोव्हेंबरपासून मुलींना तिथे पाठवण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
कर्जतच्या डॉ. नाझिरकरांकडून आम्हाला खूप सहकार्य मिळते. त्यांच्या मदतीने कर्जतच्या सरकारी रुग्णालयात परवानगी मिळाली. त्यांच्याच पत्रामुळे कशेळी, कडाम आणि चौक येथील रुग्णालयातही परवानगी मिळाली. ही सगळी धडपड आम्ही करत असताना संध्याताई आमच्या मागे ठाम उभ्या असतात.''
आज महिला केंद्र कर्जत तालुक्यातील तसेच डोंबिवलीपर्यंतच्या अनेक शासकीय आणि खासगी रुग्णालयांशी जोडलेले आहे. डॉ. शेवाळे, डॉ. साळुंखे आणि अन्य काही डॉक्टर या कामात आपले योगदान देतात. संध्याताईंची मुलगी अवनी स्वत: डॉक्टर असून त्या Cardiopulmonary resuscitation हा विषय शिकवतात. अभ्यासक्रमाची प्रात्यक्षिकांची परीक्षा डॉक्टरच घेतात आणि ते तिची कामगिरी योग्य वाटली तरच प्रमाणपत्रावर सही करतात.
कोर्सला प्रवेश घेणाऱ्या मुलींची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. काही परित्यक्ता असतात, तर कोणाचा नवरा व्यसनी असतो. काहींचे दहावी-बारावीपर्यंत शिक्षण झालेले असते आणि करिअरचा मार्ग म्हणून त्या या कोर्सकडे बघतात. काही जणी कोर्सला प्रवेश घेतात, पण तो अर्ध्यावर सोडून देतात. त्यामागे घरच्या अडचणी, कुटुंबाकडून पाठिंबा नसणे अशी कारणे असतात. मग त्या मुलींना, त्यांच्या घरातल्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्या लागतात. त्यांना समजवावे लागते. तरीही त्या नाही आल्या, तर मात्र त्याबाबतची नोंद ठेवावी लागते. कारण या सर्व कामावर एल ऍंड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे पूर्ण लक्ष असते. त्यांचे प्रतिनिधी अचानक कधीही इन्स्पेक्शनसाठी येतात. ते रजिस्टर चेक करतात. त्या वेळी त्यांना सगळया नोंदी परिपूर्ण दिसतात. त्यात सोडून गेलेल्या मुलींचीही योग्य प्रकारे नोंद केलेली असते. तसेच प्लेसमेंटविषयीच्या नोंदीही योग्य प्रकारे असतात. असा अनुभव त्यांनाही क्वचितच येतो. त्यामुळे एकूणच संस्थेच्या कामाचे ते नेहमी कौतुक करतात.
केवळ प्लेसमेंट देण्यापुरतीच संस्थेची जबाबदारी नसते, तर मुलींना दर 15 दिवसांनी फोन करून त्यांच्या कामाची चौकशी केली जाते. त्यांना तेथे काही त्रास तर नाही ना, त्या तेथे सुरक्षित आहेत ना, हे जाणून घेतले जाते. तसे काही असेल तर त्या काम करत असलेल्या व्यवस्थापनाशी किंवा कुटुंबाशी बोलून त्याची कल्पना दिली जाते. ज्या मुली प्रशिक्षण पूर्ण करूनही काम करत नाहीत, त्यांच्याशी आणि त्यांच्या घरातल्यांशी बोलून त्यामागची कारणे जाणून घ्यावी लागतात. त्यावर पर्याय सुचवावे लागतात. हे सर्व संस्थेचे कार्यकर्ते चिवटपणे करत असतात.
या प्रशिक्षण वर्गांमध्ये नुसतेच प्रशिक्षण देणे इतकेच काम नसते, तर त्यांच्यात आत्मविश्वासही निर्माण करावा लागतो. तीन महिन्यांत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात खूपच सुधारणा दिसून येत असल्याचे अपर्णाताई सांगतात. शिवाय व्यक्तिमत्त्वातील बदलामुळे आणि आर्थिक सक्षमतेमुळे अनेक तरुणींना लग्ासाठी चांगली स्थळेही येऊ लागली आहेत.
त्या सांगतात, ''नर्सिंगच्या प्रशिक्षणापेक्षा रुग्ण साहाय्यकाचे प्रशिक्षण थोडे वेगळे असते. त्याचा कालावधीही कमी असतो. मात्र आमच्या प्रशिक्षणार्थी जिथेही काम करतात तिथे त्यांच्या कामाचे, सेवाभावी वृत्तीचे आणि मेहनतीचे कौतुक होते. तसेच नर्सेसच्या तुलनेत कमी खर्चात त्या काम करतात. त्यामुळे रुग्णालयांमध्ये त्यांना सहज नोकरी मिळते. जर त्या कोणाच्या घरी रुग्ण साहाय्यक म्हणून जाणार असतील तर आम्ही त्यांना कुटुंबाशी जोडलेले राहण्यास सांगतो. म्हणजे त्या घरातल्यांना कपडयांच्या घडया करणे, घर आवरणे यांसारख्या छोटया छोटया कामात मदत करायला सांगतो. मात्र काही जणांची अपेक्षा असते की त्यांनी धुणी-भांडीसुध्दा करावी. मात्र आम्ही त्यांना त्यांच्या कामाची स्पष्ट कल्पना देतो. तसेच इंजेक्शन, सलाइन, औषधे हे त्यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली द्यायचे असते, याची कल्पना आधीच दिलेली असते. शिवाय त्यांच्या प्रमाणपत्राच्या मागेही त्याबाबतची सूचना लिहिलेली असते.''
या अभ्यासक्रमात सातत्याने बदल करत राहावा लागतो. उदाहरणार्थ, नुकतेच रुग्ण साहाय्यकाच्या अभ्यासक्रमात आहाराशी संबंधित प्रकरणांचा समावेश केला असून त्यात रुग्णांसाठी पेज कशी बनवायची, घावन कसे बनवायचे हे शिकवतो. प्रॅक्टिकल रूममध्ये अनेक प्रात्यक्षिके घेतली जातात.
या अभ्यासक्रमातून अनेक मुलींच्या जगण्याची दिशाच बदलली. आत्मविश्वासाचे पंख तर मिळालेच आणि जिद्दीने उडण्याची उमेद जागी झाली. त्यातून आपले वेगळेपण त्यांनी सिध्द केले. अशा काही यशोगाथांची माहिती देणारा फलक केंद्राच्या भिंतीवर लावला आहे. त्यातील काही उदाहरणे - कळव्याला राहणारी जान्हवी पतयानी दहावी नापास होती. या महिलेने रुग्ण साहाय्यक कोर्ससाठी प्रवेश घेतला, तेव्हा तिची जुळी मुले लहान होती. त्या वेळी तिच्या आईने मुलांना सांभाळल्यामुळे ती हा अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी करू लागली. आज ती ज्या रुग्णालयात काम करते, तेथे प्रमुख नर्स आहे. 17000-18000 रुपये इतका पगार मिळवतेय. या यशामागे अर्थातच तिची जिद्द आणि मेहनतही आहेच.
प्रियंका घरत ही तरुणी तेरावी शिकूनही घरीच होती. घरच्या शेतीतच काम करायची. आपले शिक्षण फुकट जात असल्याची रुखरुख होती. केंद्रात रुग्ण साहाय्यकाचा कोर्स केला आता ती 'होममेकर' म्हणून काम करते आणि आई-वडिलांना घर चालवायला मदत करते. घरच्यांना आता तिच्याविषयी अभिमान वाटू लागला आहे. किरण चौधरी ही तरुणी शहापूरच्या किनवली गावची. शिक्षण बारावी. प्रियंकाप्रमाणे तिही घरच्या पशुपालनाच्या व्यवसायात मदत करायची. रुग्ण साहाय्यकाचा कोर्स केल्यानंतर 3500 रुपये पगारावर एका रुग्णालयात सुरुवात केली. आज एका वृध्दाश्रमात काम करून 17 हजार रुपये महिना कमावतेय.
नवऱ्यापासून वेगळी राहणारी पूर्वा असो किंवा काही तरी करून दाखवण्याच्या जिद्दीने पेटलेली संजीवनी असो, वर्गातील अशा नवीन मुलीही अशा यशोगाथांमधून प्रेरणा घेऊन स्वत:च्या भविष्याचे आशादायक चित्र रंगवत आहेत. या सर्व कामात संध्याताई एखाद्या दीपस्तंभासारखे दिशादर्शन करत आहेत. केंद्रातील मुलींना, कर्मचाऱ्यांना त्या नेहमीच प्रोत्साहन आणि संधी देत असतात. संस्थेच्या सचिव पॅरपेत मावशी व हिशेबनीस नेमिशा शाह या ऑफिसची जबाबदारी सांभाळतात. अन्य पदाधिकारी, सदस्यही केंद्राच्या नियमित कामात लक्ष घालतात.
संध्याताई सांगतात, ''आम्ही संस्थेत वेगळया प्रकारे प्रार्थना म्हणतो. सर्व मुली एकमेकांच्या हातात हात गुंफूनगोल रिंगण बनवून ॐकार करतात. कारण ॐकार हा सर्वसमावेशक असून कोणत्याही धर्माशी बांधील नाही. तसेच 'मैत्रिणींनो स्वत:ची ओळख निर्माण करा, स्वावलंबी व्हा.' हे आमचे ब्रीदवाक्य असून माझे वडील हरिभाऊ भडसावळे यांचे स्वप्न आहे.''
या महिला केंद्राचे हे ब्रीदवाक्य जगातील प्रत्येक स्त्रीमध्ये आत्मभान जागवू शकणारे आहे. हे ब्रीदवाक्य जपत कोतवाल वाडी ट्रस्टचे कर्मयोगी हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्र करत असलेले कार्य म्हणजे स्त्रीशक्तीचा जागरच म्हणावा लागेल.
संध्या देवस्थळे
9822330878