मना सज्जना (२)- नीतिशास्त्राची मुळाक्षरे म्हणजे मनाचे श्लोक

29 Jan 2018 15:20:00

 समर्थांचा दासबोध हा गुरु-शिष्यरूपी श्रोतृसंवादच आहे. आत्माराम हा समर्थांचा आत्मसंवाद असून मनाचे श्लोक हा समाजसंवाद आहे, तर करुणाष्टके-आरत्या हा भावसंवाद आहे असे म्हणता येईल. संतांच्या मुखातून प्रकट झालेले कोणत्याही प्रकारचे साहित्य असो, त्याला समाजोद्धाराची दृढ प्रेरणा आहे. ‘बुडते हे जन न देखवे डोळा’ ही संतसाहित्याची प्रेरणा व प्रवृत्ती आहे. समर्थांचे समग्र साहित्य या दृष्टीने सरस सकस आणि सतेज आहे. ‘मनाचे श्लोक’ हे त्याचे ठळक उदाहरण असून हे २०५ श्लोक म्हणजे ‘अल्पाक्षर ब्रह्म’ अशा स्वरूपाचे, ‘गागर में सागर’ असे उपदेशात्मक आहेत.

मना सज्जना या संवादमालेतील पहिला लेख आपण १८ जानेवारीला वाचला. त्या लेखात प्रास्ताविक व पार्श्वभूमीपर लेखन होते. आपली ही संवादमाला तात्त्विक खंडण-मंडणात्मक नसून अपरिचितांना सरळ साध्या पद्धतीने दासबोध. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत या संतसाहित्याच्या वैभवशाली अमृतठेव्याकडे आकर्षित करण्याच्या हेतूने आहे. तसेच या निमित्ताने मलाही संतसाहित्याच्या सत्संगाचा पुनरानंद मिळावा, अभ्यासाची उजळणी व्हावी, उपासनेत प्रगती व्हावी असाही उपउद्देश या संवादमालेत अनुस्यूत आहे. समर्थांच्या तप:पूत साहित्याचे हे चिंतन त्यांच्याच कृपेने सिद्धीस जाणार असून मी एक निमित्तमात्र असेन.

जय जय रघुवीर समर्थ|

संत ज्ञानेश्वर माउलींच्या वाङ्मयातील ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ या चार रचना मुख्य आहेत, तद्वतच समर्थ रामदास स्वामींच्या विपुल साहित्यातील ‘दासबोध’, ‘आत्माराम’, ‘मनाचे श्लोक’ आणि ‘करुणाष्टके’ या चार रचना मुख्य मानल्या जातात. ज्ञानेश्वरी हा ज्ञानदेवांचा श्रोतृसंवाद आहे, अमृतानुभव हा आत्मसंवाद आहे, चांगदेव पासष्टी हा मित्रसंवाद आहे, तर हरिपाठ हा जनसंवाद आहे. त्याचप्रमाणे समर्थांचा दासबोध हा गुरु-शिष्यरूपी श्रोतृसंवादच आहे. आत्माराम हा समर्थांचा आत्मसंवाद असून मनाचे श्लोक हा समाजसंवाद आहे, तर करुणाष्टके-आरत्या हा भावसंवाद आहे असे म्हणता येईल. संतांच्या मुखातून प्रकट झालेले कोणत्याही प्रकारचे साहित्य असो, त्याला समाजोद्धाराची दृढ प्रेरणा आहे. ‘बुडते हे जन न देखवे डोळा’ ही संतसाहित्याची प्रेरणा व प्रवृत्ती आहे. समर्थांचे समग्र साहित्य या दृष्टीने सरस सकस आणि सतेज आहे. ‘मनाचे श्लोक’ हे त्याचे ठळक उदाहरण असून हे २०५ श्लोक म्हणजे ‘अल्पाक्षर ब्रह्म’ अशा स्वरूपाचे, ‘गागर में सागर’ असे उपदेशात्मक आहेत.

समर्थांनी थेट ‘मनाला’च का उपदेश केला? याचा विचार करण्यापूर्वी आपण ‘मनाचे श्लोक’ प्रकट कसे झाले याची प्रचलित कथा प्रथम पाहू. समर्थ रामदास टाकळी येथे १२ वर्षांचे तपाचरण व १२ वर्षांची राष्ट्रभ्रमंती करून १६४५ साली कृष्णा नदीच्या खोर्‍यात चाफळ-महाबळेश्वर, सातारा परिसरात आल्यानंतर १६४८ साली अंगापूरच्या डोहात स्नान करताना त्यांना प्रभू रामचंद्रांची व एका देवीची सुंदर मूर्ती सापडली. यापूर्वी त्यांनी मसूर येथे हनुमंताची स्थापना करून रामनवमी उत्सव सुरू केलेलाच होता. आता त्यांना राममूर्ती प्रसाद म्हणून सापडताच हा एक शुभसंकेत मानून समर्थांनी ‘चाफळ’ येथे या राममूर्तीची स्थापना केली. (संदर्भ : समर्थ सेवा मंडळ : दासबोध पान ६) आणि तेथे रामनवमीचा उत्सवही सुरू केला. डोहात सापडलेली देवीची मूर्ती त्यांनी सज्जनगडावर स्थापन केली. हीच ती गडावरची अंग्लाई देवी होय!

 

चाफळ येथे श्रीराममूर्तीची समारंभपूर्वक स्थापना करून रामनवमी उत्सव सुरू होताच, जाणते राजे छ. शिवाजी महाराजांच्या कानी त्याची वार्ता गेली आणि या उत्सवाला राजदरबारी खात्यातून अन्न-धान्यरूपात मदत मिळू लागली. त्यामुळे उत्सवाचे स्वरूप अधिकाधिक व्यापक होत गेले. एके वर्षी दरबारी व्यवस्थेतील अव्यवस्थेमुळे चाफळच्या रामनवमी उत्सवास मिळणारी दरबारी मदत वेळेवर पोहोचली नाही. आता एवढा मोठा उत्सव कसा पार पडणार? म्हणून सारे भक्त व शिष्य चिंताग्रस्त झाले. समर्थांना ही गोष्ट कळताच त्यांनी त्यावर उपाय शोधून काढला व शिष्यांना चिंतामुक्त केले ते कायमचेच. ‘श्रीरामाचा उत्सव आहे, रामाचे भक्त तो साजरा करतात. त्याला राजाश्रयावर अवलंबून राहण्याचे कारणच नाही. जो दुसर्‍यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला।’ ‘आपण जनताजनार्दनाच्या सहभागानेच हा उत्सव साजरा करू’ अशा आशयाचा उपदेश समर्थांनी शिष्यांना केला. त्या रात्री समर्थांनी आपले पट्टशिष्य कल्याण यांना लेखनसाहित्य घेऊन पाचारण केले आणि एक एक श्लोक समर्थ सांगत गेले. कल्याण सेवक लिहीत गेले. पहाट उजाडली, तेव्हा २०५ श्लोक झाले होते. हे २०५ श्लोक म्हणजेच ‘मनाचे श्लोक’ होय! हे श्लोक म्हणजे समर्थांच्या चिंतनाचे नवनीत आहे.

या २०५ मनाच्या श्लोकांच्या मग सर्व शिष्यांनी प्रतीलिपी तयार केल्या आणि ते श्लोक पाठ केले. समर्थांच्या आदेशानुसार मग सारे शिष्य प्रभातसमयी वेगवेगळ्या गावांत, खेड्यांत, वाड्या-रस्त्यांवर गेले आणि प्रत्येक घराच्या अंगणात दारापुढे उभे राहून उच्च स्वरात एकेक श्लोक म्हणून भिक्षा मागू लागले. दोन-चार दिवसांत रामनवमी उत्सवास पुरेल एवढी भिक्षा जमा झाली आणि रामनवमीचा उत्सव स्वसामर्थ्यावर – जनसहभागाने पार पडल्याचा शब्दातीत आनंद समर्थ शिष्यपरिवारास झाला. ऐन उत्सवाच्या दिवशी पुढे दरबारी मदतही आली, पण आता त्याची गरज उरली नव्हती. समाजाने स्वतःचे कार्य स्वतःच्याच प्रयत्नांनी पार पाडले पाहिजे, त्यासाठी राजावर, शासनावर अवलंबून राहू नये, हा मोठा कृतिशील धडा समर्थांनी या प्रसंगात सकलजनांना दिला. हा एकूण प्रसंग-कथाभाग म्हणजे ‘सामर्थ्य आहे चळवळीचे। जो करील तयाचे। परी तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥’ या श्लोकाचेच मूर्त दर्शन आहे. काही अभ्यासकांच्या मते ही केवळ दंतकथा आहे. असो. पण एका प्रासंगिक, तात्कालिक घटनेतून समाजाला कालातीत असा अमृतप्रसाद मनाचे श्लोक रूपाने मिळाला. समर्थांच्या अलौकिक सामर्थ्याचीच ही कृपाअक्षरे असून नीतिशास्त्राची मुळाक्षरेच आहेत. 

‘मला वाटते अंतरी त्वां वसावे। तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावे॥’ असे एक नमन प्रसिद्ध आहे, त्यात थोडा बदल करून ‘तुझ्या मनाच्या श्लोकात्वां बोधवावे।’ असे आपण म्हणू या आणि मनाच्या श्लोकांकडे वळू या.

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।

नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा॥

या श्लोकाने मनाच्या श्लोकांचा श्रीगणेशा होतो. या प्रथम श्लोकात समर्थांनी बुद्धिदेवता, विघ्नहर्त्या गजाननाला ‘गणाधीश’ म्हणून वंदन केलेले आहे. समर्थांचा हा गणाधीश सर्व गुणांचा ईश असून निर्गुण आहे. गणेशाबरोबर समर्थ शारदेचे - म्हणजे विद्यादेवता सरस्वतीचेही नमन करतात. कोणत्याही कार्याचा आरंभ गणेशपूजनाने करण्याची आपली भारतीय प्राचीन परंपरा आहे. समर्थ या परंपरेचे वहन करतात. संत ज्ञानदेवांनीही आपल्या ज्ञानेश्वरीची सुरुवात गणेशाच्या व सरस्वतीच्या मंगलचरणाने केलेली आहे. ‘ओम नमोजी आद्या’ म्हणत ज्ञानदेवांनी वाङ्मय गणेशाला रूपकात्मक वंदन केलेले आहे. तसेच आता अभिनव वाग्विलासिनी म्हणत नेमक्या शब्दात एका ओवीत सरस्वतीलाही नमन केलेले आहे. जिज्ञासू वाचकांनी ती वंदने मुळातून वाचावीत व आनंद घ्यावा. गणेश आणि शारदा यांना वंदन करून समर्थ राघवांच्या अनंत पंथावर मार्गक्रमण करण्यास सांगतात. राघव हा समर्थांचा आत्माराम आहे. या मंगलाचरणाच्या ओवीने प्रारंभ करून समर्थ पुढील ओवीपासून प्रत्यक्ष उपदेश करतात. समर्थांच्या उपदेशाची पहिली ओवी पुढीलप्रमाणे आहे – ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे। जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे। जनी वंद्य ते सर्व भावे करावे॥’ समर्थांचा हा सारा उपदेश मनाला आहे आणि प्रारंभीच ते मनाला ‘मना सज्जना’ म्हणतात. का? त्याचा विचार पुढील लेखात करू.

जय जय रघुवीर समर्थ।

 ९८८१९०९७७५,

ई-मेल - vidyadhartathe@gmail.com

Powered By Sangraha 9.0