बेडेकरांचा आनंदसोहळा

02 Jan 2018 16:55:00

 

या वर्षीच्या मार्गशीर्ष महोत्सवाला विशेष महत्त्व होते. दुग्धशर्करा योग म्हटले तरी वावगे ठरणार नाही, कारणेही तशीच. उद्योगाची शंभरी, कंपनी प्रा. लिमिटेड झाली त्याची पंचाहत्तरी, वसंतराव बेडेकरांची पंचाहत्तरी, वसंतराव बेडेकर आणि सौ. रोहिणी यांच्या लग्नाला 51 वर्षे पूर्ण झाली, शिवाय वसंतरावांची सून डॉ. सौ. अपर्णा अजित बेडेकर हिच्या समर्थ रामदास स्वामींच्या साहित्यावरील संशोधनात्मक प्रबंधाला मुंबई विद्यापीठाची 'विद्यावाचस्पती' (PH.D) ही पदवी मिळाली. याच निमित्ताने या वर्षी वसंतरावांची एेंद्र शांत आणि उभयता पती-पत्नीची संयुक्त, स्वकृत रौप्यतुला करण्यात आली. एका अर्थाने यावर्षी बेडेकरांचा आनंद सोहळा.

 लोणचे जितके जास्त मुरते, तेवढी त्याची चव अधिक लागते. 'लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले' असे एकमेव नाव म्हणजे बेडेकर मसालेवाले. 1910 साली किराणा मालाच्या एका दुकानापासून त्यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली. वसंतराव बेडेकरांचे आजोबा विश्वनाथ परशुराम बेडेकर म्हणजे व्ही.पी. बेडेकर यांनी या उद्योग समूहाच्या वटवृक्षाचे बीज रोवले. व्ही.पी. बेडेकर यांच्याबरोबर त्यांचे सुपुत्र वासुदेव बेडेकर यांनी दुकानात हातभार लावण्यास सुरुवात केली. पण भविष्यवेधी असलेल्या वासुदेवरावांना या दुकानाच्या व्यवसायात भविष्याची वाट सापडत नसल्याने त्यांनी 1917 साली उत्पादन क्षेत्रात - म्हणजे स्वतः मसाले बनवून ते विकण्यास सुरुवात केली. पण या गोष्टीवरून वडील आणि मुलगा यांच्यात मतभेद होऊ लागले आणि व्ही.पी. बेडेकर यांनी 1920 साली वासुदेव बेडेकरांच्या हाती कारभार सोपवून गावी जाण्याचा निर्णय घेतला.

तो काळ फार बिकट होता. समाजात कर्मठपणा होता. खरे तर पुराण सांगणे हा बेडेकरांचा मूळ व्यवसाय होय, परंतु चरितार्थ चालवण्यासाठी त्यांनी दुकान थाटले. मात्र मसाले, लोणची, अन्य पदार्थ बनवून विकणे म्हणजे समाजाच्या विरुध्द चालणे असा समज त्या वेळी रूढ होता. नातेवाईक, ओळखीचे लोक, गाववाले यांनी बेडेकरांना जवळजवळ वाळीत टाकले होते. त्याही परिस्थितीत वासुदेवरावांची मेहनत, जिद्द, सचोटी, दूरदृष्टी याच्या बळावर उद्योग वाढवला, टिकवला आणि विस्तारलाही. त्याचीच फळे आज आम्ही चाखत आहोत असे उद्योग समूहाचे विद्यमान प्रमुख वसंतराव यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले. काळाची पावले ओळखूनच 1943 साली वासुदेवरावांनी बेडेकर उद्योगाचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रूपांतर केले.

पूर्वजांच्या पुण्याईमुळे आणि वडिलांची मेहनत व आशीर्वादामुळेच आज बेडेकर उद्योग समूहाचे नाव जगप्रसिध्द आहे, असे वसंतराव बेडेकर अभिमानाने सांगत होते. प्रिझर्व्हेटिव्ह न वापरता लोणची-मसाले टिकवणे, पदार्थ बनवताना दर्जाची आणि स्वच्छतेची काळजी एखाद्या सुगृहिणी/सुगरणीसारखी घेणे हे बेडेकरांचे वैशिष्टय. गुणवत्ता आणि चव यावर लोक डोळे मिटून विश्वास तर ठेवतातच, शिवाय अत्याधुनिक पॅकिंग, आकर्षक जाहिरात हे शंभर वर्षे आपले स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यामागचे रहस्य. स्वतः वसंतराव बेडेकरांनी 'बेडेकर मसालेवाले, लोणच्यात मुरलेले अन् मसाल्यात गाजलेले' अशी जाहिरात करून बेडेकरांचे नाव गाजत ठेवले आहे.

व्यवसाय म्हटले की चढ-उतार येणारच. या चढ-उतारांची चवही बेडेकर उद्योग समूहाला चाखावी लागली. व्यवसायाच्या उलाढाली, नैसर्गिक संकट, कौटुंबिक आघात या सर्वच गोष्टींचा सामना करत बेडेकर उद्योग समूह अजूनही वटवृक्षासारखा भक्कम उभा आहे. या सर्व संकटातून उभे राहण्याची शक्ती देवानेच आपल्याला दिली आहे या भावेनेने ते देवाचे ऋणी राहणे आणि त्याची सेवा करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे मानतात. गेली शंभर वर्षे एखाद्या उद्योग समूहाला स्थैर्य आणि जगप्रसिध्द असूनही बेडेकरांची माणुसकी किंचितही कमी झालेली दिसत नाही. कायम ते समाजाशी एकरूप असतात. सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम ते करीत असतात. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे 'मार्गशीर्ष महोत्सव'.

कौटुंबिक, व्यवसायिक संकटातून आपल्याला खंबीरपणे उभे राहण्याची शक्ती देवानेच दिली आहे, म्हणून वसंतरावांनी यज्ञ करण्याचे ठरवले. यज्ञ त्यांच्या घरी केला जात असे. त्यांचे घर तिसऱ्या मजल्यावर. त्यामुळे ज्यांना तिसरा मजला चढणे शक्य होत नसे, त्यांना इच्छा असूनही यज्ञाला येता येत नसे. म्हणून वसंतरावांनी 'सामुदायिक यज्ञ' आणि तोही पटांगणात करण्याचे ठरवले आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यातही त्यांना अनेक अडचणी आल्या. शेवटी रत्नागिरीचे जोगळेकर गुरुजी यांनी साग्रसंगीत सामुदायिक यज्ञ करून देण्याचे मान्य केले आणि 2004 साली 'मार्गशीर्ष महोत्सव' सुरू झाला.

मार्गशीर्ष महोत्सवाला दर वर्षी लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. यज्ञात सहभागी होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे बंधन किंवा भेदभाव नसतो. ज्यांना शक्य आहे अशा सर्वांना या यज्ञात सहभागी होता येते. एखाद्या व्यक्तीला जर बैठक घालून यज्ञात सहभागी होता येत नसेल, तर अशा व्यक्तीला खुर्ची दिली जाते आणि यज्ञात सामील करून घेण्यात येते. म्हटले तर ही अगदी छोटीशी गोष्ट, परंतु सहभाग आणि समाजाशी समरस होणे म्हणजे काय हे या कृतीतून स्पष्ट दिसते. यज्ञात सहभागी होणाऱ्यांना यज्ञाच्या आहुतीसाठी काळे तीळ आणि भटजींची दक्षिणा देण्यास सांगितले जाते, जेणेकरून यज्ञ केल्याचे पुण्य म्हणा किंवा समाधान त्या व्यक्तीला स्वतःला अनुभवायला मिळते. आजकाल या वृत्तीचादेखील नाश होताना दिसत आहे. 'मी'पणाच्या डोलाऱ्यात 'आम्ही' ही भावनाच लोप पावताना दिसत आहे. पण बेडेकरांनी कृतीने ही भावना जपत आपण समाजाचे देणे लागतो हे सिध्द केले आहे.

'मार्गशीर्ष महोत्सव' हा सात दिवस चालणारा कार्यक्रम. हा कार्यक्रम याच महिन्यात करावा याचे दोन उद्देश वसंतराव बेडेकरांसमोर होते. पहिले कारण म्हणजे मार्गशीर्ष महिना हिंदू पंचांगानुसार पवित्र आहे आणि दुसरे कारण म्हणजे मुंबईच्या हवामानाचा विचार करता या महिन्यातील वातावरण चांगले असते. सकाळी यज्ञ आणि सायंकाळी प्रवचन, व्याखान असे या महोत्सवाचे साधारण स्वरूप असते. आतापर्यंत राम, कृष्ण, शंकर, इत्यादी सामूहिक यज्ञ पार पडले आहेत. यामध्ये प्रवचनकार राम शेवाळकर, पंढरपूरचे वा.ना. उत्पात आदींनी हजेरी लावली आहे. तसेच गेली नऊ वर्षे स्वामी गोविंददेव गिरी यांच्या प्रवचनाचा लाभ उपस्थितांना मिळत आहे. मनोरंजनपर कार्यक्रमात राहुल देशपांडे, विसुभाऊ बापट, दीपाली केळकर, शारदा बेडेकर यांचे कार्यक्रम झाले आहेत.

या वर्षीच्या मार्गशीर्ष महोत्सवाला विशेष महत्त्व होते. दुग्धशर्करा योग म्हटले तरी वावगे ठरणार नाही, कारणेही तशीच. उद्योगाची शंभरी, कंपनी प्रा. लिमिटेड झाली त्याची पंचाहत्तरी, वसंतराव बेडेकरांची पंचाहत्तरी, वसंतराव बेडेकर आणि सौ. रोहिणी यांच्या लग्नाला 51 वर्षे पूर्ण झाली, शिवाय वसंतरावांची सून डॉ. सौ. अपर्णा अजित बेडेकर हिच्या समर्थ रामदास स्वामींच्या साहित्यावरील संशोधनात्मक प्रबंधाला मुंबई विद्यापीठाची 'विद्यावाचस्पती' (Ph.D.) ही पदवी मिळाली. याच निमित्ताने या वर्षी वसंतरावांची एेंद्र शांत आणि उभयता पती-पत्नीची संयुक्त, स्वकृत रौप्यतुला करण्यात आली. 56 वर्षांपूर्वी वसंतरावांच्या वडिलांची आणि आईचीदेखील रौप्यतुला झाली होती. शिवाय यानिमित्ताने या वेळच्या मार्गशीर्ष महोत्सवात सात दिवसांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमाबरोबरच वसंतरावांची पंचाहत्तरी पूर्ण झाली म्हणून त्यांच्याहून वडील असलेल्या 75 लोकांचा सत्कार करण्यात आला. लग्नाला 51 वर्षे पूर्ण झाली म्हणून 51 दांपत्यांचा सत्कार करण्यात आला. ब्रह्मवृृंदाचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दोन वेदमूर्ती आणि एक अग्निहोत्री यांचा पाद्यपूजनासहित सत्कार करण्यात आला.

मार्गशीर्ष महोत्सव हा कार्यक्रम वर्षातून एकदा होतो, तर सामाजिक बांधिलकी म्हणून बेडेकर उद्योग समूहाच्या सौजन्याने 'व्यासपीठ ज्ञान, मनोरंजनाचे' हा कार्यक्रमदेखील वर्षभर राबवला जातो. या उपक्रमांतर्गत महिन्यातून एकदा भाषा, कला, ज्ञान, आरोग्य, संगीत या विषयांवर कार्यक्रम होत असतात. शिवाय समाजऋण फेडण्यासाठी ते अनेक संस्थांना मदत करतात.

बेडेकरांच्या उद्योग समूहात आता चौथ्या पिढीनेही जोरदार मुसंडी मारली आहे. वसंतरावांचे चिरंजीव अजित, अतुल आणि पुतण्या मंदार हे आता व्यवसायाची धुरा कार्यक्षम रितीने सांभाळत आहेत. शंभर वर्षांची परंपरा आणि चव ही चौथी पिढीही हा बेडेकरांचा वारसा पुढे त्याच दिमाखात चालवत आहे. व्यवसाय सुरू केला तेव्हाचा काळ आणि आताचा काळ यात तफावत झाली आहे. त्याचा स्वीकार करूनच उद्योगात उद्यमशीलता, प्रयोगशीलता, वस्तूचा दर्जा याची सांगड घालताना बेडेकर उद्योग समूह काळाच्या पावलावर पाऊल ठेवून आपला ठसा उमटवीत आहे, याचेच उदाहरण म्हणजे 'फ़्रोझन फूड' होय. फ्रोझन फूड ही संकल्पना भारतात काही नवीन नाही. पण जे काही फ्रोझन फूड मिळत होते ते बहुतांश पंजाबी पध्दतीचे होते. बेडेकरांनी ते ओळखून फ्रोझन फूडमध्ये मराठी पध्दतीच्या - सकाळच्या नाश्त्यापासून ते दिवाळीच्या फराळापर्यंत मजल गाठली आहे. गेल्या वर्षी तर सुगरणीची परीक्षा घेतो तो पदार्थ म्हणजे 'उकडीचे मोदक', त्यानेही बाजारात आपले स्थान निर्माण केले. या फ्रोझन फूडची मागणी घरा-घरात नाही, तर अगदी हॉटेल्समध्येही आहे. भविष्यात हा फ्रोझन फूडच्या व्यवसायाचा विस्तार वाढावा हे बेडेकरांचे लक्ष्य आहे.

काळाबरोबर बदलेल तो शहाणा. बेडेकरांनी काळाबरोबर व्यवसाय वृध्दिंगत केला. कायम दूरदृष्टी ठेवून व्यवसायाचा विस्तार केला. पध्दती बदलल्या, पण चव तीच राहिली. शंभरी गाठली तरी चवीत तसूभरही बदल झाला नाही. माणुसकीची कास धरली, संतांची शिकवण आचरली, पूर्वजांचे स्मरण ठेवले, तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाशी समरस झाले. उद्योग समूहाने शतकमहोत्सव साजरा केला. या वर्षी तर कुटुंबाच्या आणि व्यवसायाच्या आनंदसोहळयाचा क्षण. बेडेकरांच्या कुटुंबीयांना आणि उद्योग समूहाला असेच आनंद सोहळे लाभो आणि त्यांच्या स्वादिष्ट पदार्थांची चव पिढयान्पिढया कायम राहो!

9594961859

 

Powered By Sangraha 9.0