ऍंड्रॉइडच्या गमती

02 Jan 2018 13:18:00

आपल्या यूजर फ्रेंडली फीचर्समुळे ऍंड्रॉइडने आज बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज जवळपास 88 % मोबाइल फोन वापरकर्ते ऍंड्रॉइडचा वापर करतात. ऍंड्रॉइड म्हणजे नक्की काय, हे उलगडून सांगणारा हा लेख.

आपले रोजचे जगणे ज्याच्याशिवाय अवघड झालेले आहे, तो म्हणजे आपला मोबाइल फोन. त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना करणे खरेच खूप अवघड होऊन बसले आहे. यात आज स्मार्ट फोनचे युग!ऍंड्रॉइड प्रणालीने यात विलक्षण क्रांती घडविली आहे. त्यामुळे स्मार्ट फोन सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकला आहे.

 अशा या ऍंड्रॉइडच्या अनेक गमतीजमती आहेत, ज्याबद्दल अनेकांना खूप कमी माहिती असते. उदा., ऍंड्रॉइडच्या लोगोच्या मागे नेमके काय गमक आहे? ऍंड्रॉइड आणि रोबो यांचा काही संबंध आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखात आपल्याला मिळतील. त्याचबरोबर ज्या ऍंड्रॉइडने आपल्या जीवन पध्दतीत आमूलाग्र बदल केले आहेत, त्याच्याविषयी या गोष्टी वाचून नक्कीच तुम्हाला अचंबित व्हायला होईल.

 ऍंड्रॉइड गूगलचे संशोधन?

आज गूगल आणि ऍंड्रॉइड हे समानार्थी शब्द बनले आहेत. अनेक वेळा आपण ऐकत असतो की, ऍंड्रॉइड तंत्रज्ञान गूगलद्वारे विकसित केले गेले आहे. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की हे चुकीचे आहे. 2003 साली चार तरुणांनी मिळून 'ऍंड्रॉइड' ही ऑॅपरेटिंग सिस्टिम विकसित केली. तिचे महत्त्व ओळखून 2005 साली गूगलने 50 दशलक्ष डॉलर्सना ही ऍंड्रॉइड प्रणाली विकत घेतली.

नावाचे आणि लोगोचे गमक

 ऍंडी रुबिन, रिच मिनर, निक सिअर्स आणि ख्रिस व्हाईट या चार तरुणांनी ऍंड्रॉइड विकसित केली. त्यातील ऍंडी रुबिनच्या नावाला अनुसरून याचे नाव ऍंड्रॉइड असे देण्यात आले. अनेकदा असा प्रश्न पडतो की, ऍंड्रॉइड आणि रोबो यांचा संबंध काय? खरे तर ऍंडी रुबिन आणि त्याची टीम रोबोटिक्समध्ये काम करणारी टीम होती. त्याचबरोबर ऍंड्रॉइड या शब्दाचा अर्थ 'पुरुष रोबो' असा होतो, त्यामुळे या प्रणालीला रोबोचा लोगो दिला गेला. नासाद्वारे एक रोबो अंतराळात सोडला गेला आहे, जो ऍंड्रॉइड प्रणालीच्या आधारावर कार्यरत आहे.

 ऍंड्रॉइड व्हर्जन्स

ऍंड्रॉइड व्हर्जन्सबद्दल जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केले असेल, तर या सर्वांची नावे ही डेझर्टची नावे आहेत. त्याचबरोबर सर्व व्हर्जन्सची नावे इंग्लिश आल्फाबेटिक रचनेत आहेत. उदा. जे - जेलीबीन, के - किटकॅट, एल - लॉलीपॉप इत्यादी.

याला अपवाद केवळ पहिले दोन व्हर्जन्स आहेत, ज्यांना कुठल्याही डेझर्टचे अथवा मिठाईचे नाव देण्यात आले नव्हते. 'सी'पासून सुरू होणारी ही आल्फाबेट्स आज 'एन'पर्यंत गेली आहेत. या सर्वांची नावे पुढीलप्रमाणे -

C - कपकेक

D - डोनट

E - इक्लेअर

F - फ्रोयो

G - जिंजरब्रेड

H - हनीकोंब

I - आइसक्रीम सँडविच

J - जेलीबीन

K - किटकॅट

L - लॉलीपॉप

M - मार्शमेलो

N - नॉगट

 पुढील व्हर्जनचे नाव ओरिओ असेल.

सुरुवातीला ऍंड्रॉइड उपकरणांना खूप प्रसिध्दी मिळाली नव्हती. एच.टी.सी. कंपनीने 2008 साली ऍंड्रॉइड फोन बाजारपेठेत आणला. मात्र मायक्रोसॉफ्ट आणि ब्लॅकबेरी यासारखे मोठे उद्योजक स्मार्ट फोन जगतावर आधिपत्य गाजवत होते. अशा काळात ऍंड्रॉइडबद्दल अनेक टीकाकार उभे राहिले होते. मात्र आपल्या यूजर फ्रेंडली फीचर्समुळे ऍंड्रॉइडने आज बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज जवळपास 88 % मोबाइल फोन वापरकर्ते ऍंड्रॉइडचा वापर करतात. 

 9579559645

 

Powered By Sangraha 9.0