जगण्याची लढाई

16 Jan 2018 15:28:00


कधीकधी आपल्या आसपास काही तरी घडते. त्या घटनेचे आपण केवळ साक्षीदार असलो, तरी मनाच्या गाभाऱ्यात काहीतरी दरवळत राहते. आपले आयुष्य सुगंधित होते. जगण्याच्या पसाऱ्यात हा सुगंध कधी आधार देतो, तर कधी दीपस्तंभ होऊन प्रेरणा देतो. अशाच काही सुगंधी घटनांविषयी आणि व्यक्तींविषयी बोलणारे हे पाक्षिक सदर निमित्तमात्र..

   परवा ललिताचा फोन होता. ''तुम्हाला भेटायला येते. तुमच्याकडे यमगरवाडीचे फोटो आहेत ना? मला हवेत. यमगरवाडीला पंचवीस वर्षे होत आहेत. मी एक माहितीपट बनवते आहे. तुम्ही मदत करा.'' ललिता यमगरवाडीत शिकली. इंजीनिअर झाली. शाळा संपली, पण यमगरवाडीच्या माळाशी जोडलेली नाळ तुटली नाही. दुपारी ललिता आली. सोबत विजय आणि रेखासुध्दा होते. विजय नवी मुंबईतील कार्यकर्ता आणि रेखा तर गेली दहा वर्षे माझ्या परिचयाची. ''अरे, तू एकटीच येणार होती ना? हे लोक कुठे भेटले तुला?'' सर्व जण वाशीला एका कार्यक्रमात जाऊन माझ्याकडे आले होते. मी माझ्याकडचा यमगरवाडी फोल्डर ओपन केला आणि फोटो दाखवू लागलो. ''थांबा, थांबा, हा माझा फोटो आहे. मला तो हवा.''  रेखा बोलली. तेव्हा ती मनाने खूप मागे गेली होती... दहा-बारा वर्षे तर नक्कीच.

आई-वडिलाचे छत्र हरवून बसलेली रेखा आपले दोन भाऊ  आणि एक बहीण यांच्यासह प्रकल्पात आली. पारधी समाजातील ही चार लेकरे किनवटला अनाथाचे जिणे जगत आहेत हे प्रकल्पातील कार्यकर्त्यांना कळले आणि त्यांना प्रकल्पात आणले. प्रकल्प रेखाचे घर झाले आणि रेखा आपल्या तीन भावंडांची आई. प्रकल्पात राहून रेखा शिकली आणि तिने आपल्या भावंडांचे संगोपनही केले. प्रकल्प घर आणि प्रकल्पातील कार्यकर्ते रेखाचे गणगोत झाले. आपदांना आणि विवंचनांना झुंजवत रेखा जगण्याची लढाई लढली. स्वत: शिकताना आपल्या भावंडांना शिकवत राहिली. शालेय शिक्षणाबरोबरच जिल्हा, विभाग स्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात भाग घेऊन विजेती ठरली. राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत सहभाग नोंदवत तिने तिसरा क्रमांक मिळवला. अशी यशस्वी वाटचाल करणारी रेखा कायम आपले आईपण जपत राहिली.

 

 यमगरवाडीत दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर रेखा मुंबईत आली. कांजूरच्या वात्सल्यमध्ये राहून तिने परिचारिका प्रशिक्षण पूर्ण केले. त्याचबरोबर कॉलेजला न जाता अकरावी-बारावीची परीक्षा यशस्वीपणे दिली. रेखा आता एका पंचतारांकित रुग्णालयात नोकरी करते. रेखा फोटो पाहताना आपल्या भूतकाळात हरवून गेली होती. या साऱ्या प्रवासाबद्दल तिच्या मनात अनेक आठवणी रुंजी घालत असतात. आपण काय होतो? आणि आता काय आहोत? या दोन प्रश्नांमधील अवकाश आपल्या मनात कायम ताजेतवाने राहील यासाठी रेखा प्रयत्न करत असते. कारण याच अवकाशाने तिला जगाची आणि स्वत:ची ओळख पटवून दिली होती. रेखा घडली, जीवनाचा संघर्ष तिने यशस्वीपणे जिंकला आणि तीच आता इतरांसाठी आदर्श झाली आहे. संघर्ष करताना विपदेशी दोन हात करताना रेखाने दोषाचे खापर कुणाच्या माथी फोडले नाही. ''माझे भोग मी भोगले'' असे म्हणताना मदतीच्या हाताची आणि मायेच्या ओलाव्याची तिने कायम जाणीव ठेवली. स्वत: विकसित होताना आपल्या भावंडांनाही तिने तोच मार्ग दाखवला. डिसेंबर महिन्यात नगर येथे झालेल्या समरसता साहित्य संमेलनात वक्ता म्हणून रेखा सहभागी झाली. 'आम्ही असे घडलो' या परिसंवादात रेखा बोलली, तेव्हा समोरचे श्रोते सुन्न झाले होते. परिसंवादाचे अध्यक्ष संजय सोनवणीही गलबलून गेले होते. रेखाने आपली जीवनकहाणी मांडली, तिला नकारात्मकतेचा स्पर्श नव्हता. अनंत संकटांशी झुंजूनसुध्दा ही पोरगी निर्मळ राहिली होती. भोगलेल्या यातनांचे भांडवल न करता ती सकारात्मक नजरेने जगाकडे पाहत होती, त्याचेच प्रतिबिंब तिच्या भाषणात उमटत होते. जगायचे कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर तिला अनुभवातून सापडले होते आणि याच उत्तराचा दीपस्तंभ करून रेखा आपले जीवन जगत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

सामाजिक जीवनात वावरताना छोटया छोटया घटनांमुळे खचून जाणारे, जीवन संपवणारे अनेक जण मी पाहिले आहेत. पण परिस्थितीवर स्वार होऊन तिला आपल्यासारखे करणाऱ्यांमध्ये रेखा अग्रेसर आहे. रेखाने आपले भाषण संपवताना सांगितले की, ''मी घडले तसे माझ्या भांवडांना घडवेन, माझ्या प्रकल्पासाठी आणि समाजासाठी काम करेन.'' रेखाचा हा संकल्प नक्कीच यशस्वी होईल, कारण तिच्याकडे आहे प्रचंड ऊर्जा आणि सकारात्मक भाव. या दोन्हींच्या मदतीने रेखा पुढे चालत राहील आणि आपल्या व्यवहाराचा दीपस्तंभ इतरांसाठी निर्माण करेल.

 रवींद्र गोळे

9594961860

 

Powered By Sangraha 9.0