गणेशोत्सव ना टिळकांचा, ना रंगारींचा.. उरला फक्त बुंगारींचा !

11 Sep 2017 14:44:00

 

1990पर्यंत सार्वजनिक गणेश उत्सवाचे स्वरूप वेगळे होते. प्रचंड मोठे गणपती, त्यांच्यासमोर दिमाखदार मांडव, रोशणाई, खर्चीक आकर्षक देखावे असला प्रकार नव्हता. या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जायचे. याच्या उलट आताचे गणेश उत्सव पाहता अशा काही कायमस्वरूपी संस्था, सभागृहे, उपक्रम चालताना दिसतात का? म्हणूनच वैतागून म्हणावेसे वाटते की हा गणेश उत्सव ना टिळकांचा, ना रंगारींचा.. हा उरला फक्त बुंगारींचा!!

सार्वजनिक गणेश उत्सव कुणी सुरू केला? टिळकांनी की भाऊ  रंगारींनी? असा एक क्षुल्लक वाद उकरून काढण्यात आला. तांत्रिकदृष्टया तो भाऊ  रंगारींनी सुरू केला हे जरी मान्य केले, तरी त्याचा प्रचार आणि प्रसार टिळकांमुळेच झाला, यात चर्चा/वाद करण्याचे काही कारणच नाही.

ज्ञानेश्वरांपेक्षा नामदेव वयाने मोठे होते. ज्ञानेश्वरांचे गुरू असलेले निवृत्तीनाथ तर त्यांचे थोरले बंधूच होते. ज्ञानेश्वरांच्याही आधी  मुकुंदराजांनी 'विवेकसिंधू' ग्रंथ लिहिला. असे असले, तरी सर्वांनी  वारकरी संप्रदायाचे आद्यत्व आणि मोठेपण ज्ञानेश्वरांनाच बहाल  केलेले आढळते. त्यामुळे गणेश उत्सवाचे श्रेय जास्त टिळकांनाच  जाते. पण आज सार्वजनिक गणेश उत्सवाला जे स्वरूप आले आहे, ते पाहता टिळक म्हणाले असते - ''आमचे चुकलेच.''

हा  महोत्सव पूर्णत: राजकीय नेत्यांनी कब्जात घेतला आहे. 1990पर्यंत सार्वजनिक गणेश उत्सवाचे स्वरूप वेगळे होते. प्रचंड  मोठे गणपती, त्यांच्यासमोर दिमाखदार मांडव, रोशणाई, खर्चीक आकर्षक देखावे असला प्रकार नव्हता. या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जायचे. शालेय पातळीवर विविध स्पर्धा व्हायच्या. व्याख्याने, गाण्याचे कायक्रम असायचे. बऱ्याच ठिकाणी या निमित्ताने नाटके व्हायची. एरव्ही ज्या गावात नाटक पाहायला मिळायचे नाही, त्या गावात गणपतीच्या काळात होणारे नाटक ही पर्वणी असायची. काही मोठे गायक नेमके याच काळात सर्वसामान्य रसिकांना ऐकायला मिळायचे. गल्लीच्या पातळीवरील कलाकारांना आपली कला दाखवायला संधी याच व्यासपीठांवर मिळायची.

1990नंतर दोन गोष्टीत बदल झाला. काँग्रेसची एकाधिकारशाही संपून विविध पक्षांना छोटे-मोठे सत्तेचे तुकडे अनुभवायला मिळू लागले. परिणामी विविध स्तरांतील विविध गटांतील लोकांची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. त्यांना सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्वव्यापी स्वरूप खुणावायला लागले.

1990नंतर जागतिक पातळीवर व्यापार खुला होण्याबरोबरच भारतात आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक वाढवायला सुरुवात केली. या मोठया कंपन्या जाहिरात म्हणून गणेश उत्सवांना प्रायोजकत्व द्यायला तयार व्हायला लागल्या. परिणामी कालपर्यंत सर्वसामान्यांच्या जेमतेम वर्गणीवर चालणाऱ्या गणेश मंडळांना जास्तीचा पैसा मिळायला लागला.

चित्रपटांमध्ये 1991नंतर कॉर्पोरेट पातळीवर भांडवल यायला लागले. याचा परिणाम म्हणजे करमणूक उद्योग हा लॉटरी-मटक्यासारखा नशिबाचा खेळ न राहता हक्काची गुंतवणूक आणि हक्काचे उत्पन्न असा उद्योग म्हणून वाढत गेला. याचा परिणाम असा झाला की कलाकारांना स्थिर उत्पन्न सुरू झाले. मग या कलाकारांचे भाव प्रचंड वाढत गेले. असे कलाकार गणेश उत्सवात बोलवायचे म्हणजे खर्च मोठया प्रमाणात करणे सुरू झाले. असे कलाकार आले की गर्दी गोळा होते, हे पाहून प्रायोजकही हात सैल सोडवायला लागले.

गर्दी गोळा होते म्हणून राजकीय नेत्यांचा रस वाढत गेला. त्यांची पकड घट्ट होत गेली.

बघता बघता समाजप्रबोधनाचा स्वातंत्र्यपूर्व काळातील उद्देश मागे पडला. स्वातंत्र्योत्तर काळातील माफक करमणूक, स्थानिक कलाकारांना संधी, मान्यवर कलाकारांची कला ऐकण्याची-पाहण्याची संधी हे सगळे मागे पडले. आता गणेश उत्सव मोठा 'इव्हेंट' बनत गेला.

'लालबागचा राजा' गणपतीचे प्रस्थ तर इतके वाढले की त्याच्या दर्शनाचा 'व्ही.आय.पी.' पास मिळावा म्हणून आमदार-खासदार-मंत्र्यांपर्यंतची शिफारस लागू लागली. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येऊ लागले. त्यातून इतरही काही विकृती तयार झाल्या. याच काळात पुणे-मुंबईसारख्या शहरांत वेश्याव्यवसाय मोठया प्रमाणात वाढलेला दिसून यायला लागला.

गणेश उत्सवात रस्त्यावर मांडव टाकून रस्ता अडवणे, मोठया आवाजात डीजे लावून धांगडधिंगा घालणे, विसर्जनाची मिरवणूक म्हणजे तर धिंगाण्याला अधिकृत परवानगीच असे स्वरूप सध्या आले आहे. कार्यकर्ते सांभाळायचे तर हे सगळे करावेच लागते, असे राजकीय नेते सररास सांगतात. औरंगाबादला तर खा. चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांमधून गणपतीच्या मूर्तीसमोर कार्यकर्त्यांना पत्ते-जुगार खेळू देण्याचे उघडपणे समर्थन केले आहे.

गणेश उत्सवाचा एक विचित्रच परिणाम टीव्ही मालिकांमधून पाहायला मिळत आहे. उदा., हिंदी चित्रपटात एकेकाळी 'सरसों का साग, मक्केदी रोटी, गाजर का हलवा' म्हणजे राष्ट्रीय पदार्थ असावेत अशी वर्णने असायची. जणू काही भारतातील लोक केवळ इतकेच खातात. तसे आता गणेश उत्सवाच्या काळात प्रत्येक मालिकांमधून गणपतीची पूजा, आरती, मोदक यांचा मारा सुरू झालेला आढळून येतो. जणू मराठी माणूस म्हणजे गणेश उत्सवच केवळ.

नुकतेच जिकडे तिकडे गाजणारे वरुण धवन या हिंदी अभिनेत्याचे गाणे तर कमाल आहे. 'गणपती बाप्पा मोरया, परेशान करे मुझे छोरिया' आता हे काय बोल झाले? नशीब, ऍनिमेशन केलेला गणपती वरुण धवनबरोबर नाचताना दाखवला नाही.

 काय विरोधाभास आहे पाहा. महाराष्ट्रभर गणपतीच्या नावाने दहा दिवस रस्त्यावर सांस्कृतिक गोंधळ घातला जातोय, लाखो-करोडो रुपयांची वर्गणी/खंडणी गोळा होते आहे. आणि नेमके याच्या काही दिवसच आधी सुमीत राघवनसारख्या अभिनेत्याने नाटयगृहांची अवस्था कशी वाईट झाली याची चित्रफीत काढून सर्वत्र फिरवली होती. म्हणजे रस्त्यावर सांस्कृतिक गोंधळासाठी आम्ही दौलतजादा उधळत आहोत आणि आमची रंगमंदिरे मात्र निधीअभावी मोडक्या तुटक्या अवस्थेत हलाखीचे जिणे जगत आहेत.

आता लगेच नवरात्रात सर्वत्र दांडिया/गरबा असाच रस्त्यावर खेळला जाईल. त्यासाठी मोठया प्रमाणात पैसे खर्च होतील. नोटबंदीचे सगळे दडपण आता संपले आहे. तेव्हा नवीन कोऱ्या करकरीत नोटा बाहेर येतील. 200ची नवीन नोटही आता बाजारात येते आहे.

नवरात्र संपल्यावर आपल्या लक्षात येईल की नाटयगृहांची अवस्था तशीच बिकट आहे. नगरपालिका, महानगरपालिका, राज्य सरकारचे सांस्कृतिक खाते यांच्या नावाने माणसे बोटे मोडताना दिसतील. पण ते हे कबूल करणार नाहीत की गणेश उत्सवात किंवा नवरात्रात जी उधळपट्टी झाली, ती यांच्याच खिशातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष झाली होती. हाच सगळा पैसा सलग 2 वर्षे महाराष्ट्रभरच्या रसिकांनी नाटयगृहांच्या दुरुस्तीसाठी द्यायचा असे ठरवले, तर ती सांस्कृतिक क्षेत्रात भरीव अशी कामगिरी ठरू शकेल.

महाराष्ट्रभरच्या कलाकारांसाठी ही नाटयगृहे अतिशय महत्त्वाची आहेत. गणपतीचे व नवरात्रीचे 20 दिवसच नाही, तर वर्षभर सांस्कृतिक उपक्रम इथे चालविता येऊ शकतात. रस्त्यावर तात्पुरता मंच उभारणे, ध्वनी-प्रकाश व्यवस्था यांची सोय करणे, खर्ुच्या मांडणे यापेक्षा कायमस्वरूपी अशी व्यवस्था कलेच्या विकासासाठी नेहमीच पोषक असते.

टिळकांच्या काळातला गणेश उत्सव विविध संस्थांना जन्म देणारा ठरला. पुण्यातच काय, महाराष्ट्रभर विविध संस्था या निमित्ताने उभ्या राहिल्या. मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो, ते परभणी गाव आणि संपूर्ण मराठवाडा 1948पर्यंत निजामी (निजामशाही नाही) राजवटीत होते. या गावच्या कार्यकर्त्यांनी इ.स. 1900मध्ये लातूर येथे लोकमान्य टिळकांची भेट घेतली. त्यांना टिळकांनी राजकीय व सामाजिक कार्य करण्यासाठी गणेश उत्सवाच्या काळात वाचनालयाची स्थापना करण्याचा सल्ला दिला. 1901मध्ये 'गणेश वाचनालय' याच नावाने हे वाचनालय तेव्हा स्थापन झाले. आज 117 वर्षांचे हे ग्रंथालय शहराचे सांस्कृतिक भूषण म्हणून कार्यरत आहे. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.

याच्या उलट आताचे गणेश उत्सव पाहता अशा काही कायमस्वरूपी संस्था, सभागृहे, उपक्रम चालताना दिसतात का? म्हणूनच वैतागून म्हणावेसे वाटते की हा गणेश उत्सव ना टिळकांचा, ना रंगारींचा.. हा उरला फक्त बुंगारींचा!!

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

9422878575    

 

Powered By Sangraha 9.0