पुरोहित सुटले, पण हू किल्ड 'खरेखुरे'?

24 Aug 2017 16:06:00

 

गुप्तचर म्हणून पुरोहितांना भारतीय सेनादल, म्हणजे पर्यायाने भारत सरकार सर्व उद्योग करायला सांगत होते आणि त्यातून माहिती हाती आली ती राज्यकर्त्यांवर उलटणार असल्यानेच पुरोहित यांचा बळी घेणयाचा प्रयास झालेला आहे. तशीच करकरे यांची कहाणी असू शकते. ते बोलले तर हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करणाऱ्या अनेकांच्या भानगडी चव्हाटयावर येण्याचा धोका होता. म्हणून करकरेंच्या नावाने सतत गळा काढणाऱ्यांनीच त्यांना मारलेले असू शकते. म्हणून पुरोहित सुटल्यावर आता एक प्रश्न गंभीरपणे विचारणे भाग आहे - करकरेंना कोणी मारले?

 सोमवार, 21 ऑॅगस्ट 2017 रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्यांना व माध्यमांना मालेगावच्या बाँबस्फोटाची आठवण झाली. कारण मागली नऊ वर्षे हे प्रकरण गाजते आहे. तसे बघितले तर स्फोट होऊन त्यापेक्षा अधिक काळ गेलेला आहे. त्यात आधी इथल्या दहशतवाद विरोधी पथकाने अनेक मुस्लीम तरुणांची धरपकड केली होती आणि पुरावेही गोळा केलेले होते. पण जानेवारी 2008मध्ये त्या पथकाच्या प्रमुखांची मुळात बदली करण्यात आली. रघुवंशी नावाचे अधिकारी जाऊन तिथे हेमंत करकरे यांना नेमण्यात आले. तोपर्यंत कोणी या विषयात मुस्लीम आरोपींच्या अटकेविषयी बोलत नव्हता. रितसर काम चालू होते आणि महाराष्ट्रातही राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. त्यामुळे धरपकड झाली ती मुस्लिमांवर अन्यायकारक असल्याचा आरोप निदान या दोन्ही पक्षांना करता येणार नाही. पण दीड वर्ष उलटल्यावर अकस्मात जाणता नेता शरद पवार यांना त्यात अन्याय होत असल्याची चिंता वाटली आणि त्यांनी पक्षाच्या एका चिंतन बैठकीत आपली चिंता व्यक्त केली. तिथून मालेगाव स्फोटाने भलतेच वळण घेतले. दर वेळी घातपात झाल्यावर एकाच धर्माचे लोक कशाला पकडले जातात? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला आणि त्यातून करकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला या प्रकरणाचे नवे धागेदोरे सापडू लागले. काही महिन्यांत करकरे यांनी एकूण तपासाची दिशाच बदलून टाकली आणि मालेगाव स्फोटात हिंदू दहशतवादी लोकांचा हात असल्याचा शोध लावला गेला. आता आरोप केला म्हटल्यावर आरोपीही शोधणे भाग होते. त्यातून मग धरपकड सुरू झाली आणि त्यात भारतीय सेनादलातील अधिकाऱ्यापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या नेते-कार्यकर्त्यांना करकरे ताब्यात घेत गेले. ही सगळी कार्यशैलीच शंकास्पद होती. किंबहुना तो एका मोठया कारस्थानाचा एक घटक होता.

करकरे यांनी कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंग अशा दोघांसह अनेकांना अटक केली आणि माध्यमांसमोर कुठल्याही पुराव्याशिवाय बेताल विधाने सुरू केली. मालेगाव येथील स्फोट याच हिंदुत्ववादी लोकांनी घडवल्याचा आरोप चुकीचा असणे वा मोठे कारस्थान काय कुठले? तर याच दरम्यान देशभर कुठल्याही राष्ट्रप्रेमी, राष्ट्रभक्त किंवा शत्रू विरोधात खंबीरपणे उभ्या ठाकणाऱ्या लोकांच्या विरोधातली एक मोहीम सुरू झाली होती. पुरोहित यांची अटक हा त्यातला एक छोटाचा भाग आहे. कुठलेही राष्ट्र ज्या तत्त्वावर किंवा श्रध्देवर उभे राहते, तोच पाया खणून काढला वा पोखरला तर त्याला जमीनदोस्त करायला फारसे कष्ट पडत नाहीत. भारत नावाच्या खंडप्राय देशाला आणि त्याच्या कोटयवधी जनतेला कुठल्याही हत्याराशिवाय संपवायचे असेल, तर त्याचा पायाच उखडून टाकायचा, हे शत्रूचे कारस्थान असू शकते. यूपीए नावावर काँग्रेसच्या किंवा सोनिया गांधींच्या हाती देशाची सत्ता केंद्रित झाल्यापासूनच्या शेकडो घटना, निर्णय वा कारवाया बघितल्या, तर तशी शंका घेण्यास वाव आहे. आपण जेव्हा पुरोहितांची अटक वा त्यांचा झालेला छळ बघतो, तेव्हा गुजरातमध्ये मारल्या गेलेल्या इशरत जहानच्या चकमकीसाठी तिथल्या अर्धा डझन ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नेस्तनाबूत करण्याच्या मोहिमेला विसरून चालणार नाही. इशरतसोबत सोहराबुद्दीन ह्या माफिया गुन्हेगाराच्या चकमकीसाठी गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आणले गेलेले बालंट विसरून भागणार नाही. अगदी केंद्रीय गुप्तचर अधिकारी राजेंद्रकुमार यांचा व गृहखात्यातील अधिकाऱ्यांचा झालेला छळ नजरेआड करून चालणार नाही. यातली प्रत्येक कृती पाकिस्तानला वा देशाच्या शत्रूंना पूरक व देशहिताला बाधक ठरत गेली, हा निव्वळ योगायोग नसतो. त्यामागे काही कारस्थान असते. ज्यांनी पीटर राइटचे 'स्पायकॅचर' (Spycatcher) हे पुस्तक वाचले असेल,  त्यांनाच मी काय म्हणतोय याचा अंदाज येऊ शकेल.

कर्नल, मेजर किंवा ब्रिगेडियर, जनरल असे शब्द आपण नेहमी ऐकत असतो. त्यातला सैनिक वा अधिकारी आपल्या डोळयासमोर येतो. पण कर्नल पुरोहित हा हातात बंदुक घेऊन वा आणखी कुठले भेदक हत्यार घेऊन लढणारा सैनिक नव्हता, हे त्यामुळे लक्षात येत नाही. हा लष्करातला अधिकारी असला, तरी तो कुठल्या सीमेवर किंवा युध्दात लढणाऱ्या सैनिकी तुकडीतला सेनानी नव्हता. पुरोहितांचे काम हे गुप्तचर विभागातले होते. अशी माणसे अतिशय जिवावर बेतणारी जबाबदारी उचलत असतात आणि चेहरे, वेष बदलून वावरत असतात. त्यांची कमालीची राष्ट्रनिष्ठा व कौशल्य तपासूनच त्यांना या विभागात आणले जात असते. त्यामुळे कर्नल हा शब्द आल्यावर या माणसाची नेमकी गुणवत्ता किंवा महत्ता लक्षात येऊ शकत नाही. त्यासाठी पीटर राइट समजून घ्यावा लागतो. पहिल्या महायुध्दानंतर राइटला ब्रिटिश सेनादलाच्या गुप्तचर विभागात समावून घेण्यात आलेले होते. ब्रिटिश गुप्तचर खात्यात एमआय 5 व 6 असे दोन विभाग आहेत. त्यांची कामे भिन्न आहेत. यातला एक विभाग आपल्या देशासाठी हेरगिरी करीत असतो आणि दुसरा विभाग त्या हेरांमध्ये कोणी परदेशी दलाल किंवा गद्दार असेल, तर त्यांना शोधून काढण्याचे काम करीत असतो. पीटर राइट एमआय 5मध्ये कार्यरत होता आणि आपल्याच देशाच्या हेरांवर व हस्तकांवर पाळत ठेवण्याचे काम करीत होता. तिथे अनेक अधिकाऱ्यांची व हेरांची प्रकरणे त्याच्याकडे यायची आणि तेव्हा सोवियत रशिया व पाश्चात्त्य देश यांच्यात राजकीय स्पर्धा होती. त्यामुळेच ब्रिटिश सत्तेला सोवियत धोका होता आणि रशियाला कोण फुटलेला आहे, याचा शोध घेणे हे राइटचे मुख्य काम होते. त्याचा शोध घेताना त्यांच्या हाती इतके मोठे घबाड लागले की देशप्रेमााला जपण्यासाठी या व्यक्तीला आपलाच देश सोडून पळ काढावा लागला होता.

ब्रिटनसाठी हेरगिरी वा काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांमध्ये रशियाची दलाली करणारे सहभागी होते. अशापैकी कोणाविषयी संशय आला, मग त्याच्यावर पाळत ठेवायचे काम राइट करत होता. अशा संशयिताची माहिती जमा करत आणली, मग अकस्मात त्याच्याकडून हा विषय काढून घेतला गेला आणि दुसऱ्याच अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे काम त्याच्यावर सोपवले गेले. ते काम करत असताना अचानक बातमी आली, की अगोदर तपास केलेला गद्दार पळून रशियाला गेला. नंतर तसेच तीन-चार बाबतीत झाले. राइट नेमका त्यांच्या गद्दारीचा तपास करीत होता आणि काही निष्कर्ष काढण्यापर्यंत त्याचा तपास आला, की मग त्या व्यक्तीचे प्रकरण राइट याच्याकडून काढून घेतले जायचे. एके दिवशी संबंधित व्यक्ती ब्रिटनहून पळून रशियात गेलेली असायची. तेव्हा राइटला वेगळाच संशय आला आणि त्याने परस्पर एक शोध घेण्याचे काम सुरू केले. कुणालाही कसला संशय येणार नाही, अशा रितीने राइट एका बडया व्यक्तीचा तपास करू लागला आणि माहिती गोळा करू लागला. जसजशी माहिती जमत गेली, तसतशी राईटची खात्री पटली की ब्रिटिश गुप्तचर खातेच रशियामधून चालविले जात आहे. सुरक्षेच्या या सर्वात महत्त्वाच्या यंत्रणेलाच रशियन हस्तकांनी गिळंकृत केलेले आहे. त्याविषयी खात्री पटण्यासारखे पुरावे जमल्यावर राईट थेट पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांना गुपचुप जाऊन भेटला आणि त्यांच्यासमोर सर्व पुरावे ठेवले. ते अभ्यासले तर सहज लक्षात येते की एमआय 5 या ब्रिटिश हेरखात्याचा प्रमुखच सोवियत हस्तक होता. त्या माहितीने विल्सनही गडबडून गेले आणि त्यांनी राइटला ते रहस्य गोपनीय ठेवायचा सल्ला दिला. राइट इतक्या कनिष्ठ पातळीवरचा अधिकारी होता की त्याविषयी गवगवा करण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. तो निमूट असे पुरावे आणि तपशील कुणाच्याही नकळत गोळा करून घरी नेऊन लपवून ठेवत राहिला.

यथावकाश, म्हणजे 1970-80च्या दशकात आपली सरकारी सेवा संपवून राइट निवृत्त झाला. त्यानंतर त्याने देश सोडून ऑॅस्ट्रेलियात आश्रय घेतला. तिथे बसून त्याने आपण जमवलेल्या सर्व माहितीची संगतवार मांडणी करून ते पुस्तकरूपाने गं्रथित केले. तेच 'स्पायकॅचर' म्हणून जगभर गाजलेले पुस्तक आहे. त्याचा आशय इतकाच आहे की अवघा ब्रिटन त्या काळात सोवियत हेरांच्या इशाऱ्यावर चालवला जात होता. त्यात ब्रिटिश हितसंबंधांपेक्षा सोवियत हित जपले जात होते आणि संपूर्ण ब्रिटिश सत्ता सोविएत हेरांच्या तालावर नाचवली जात होती. देशाचा घात करणारे उजळ माथ्याने मिरवत होते आणि देशप्रेमी असलेल्यांची रितसर गळचेपी चाललेली होती. खुद्द राइट त्यापैकी एक देशप्रेमी होता आणि हाती असलेली माहिती उघड केल्यास आपला जीवही धोक्यात असल्याची त्याला खात्री होती. म्हणूनच पंतप्रधान विल्सन यांच्या सल्ल्यानुसार त्याने तेव्हा गप्प बसणे पसंत केले. अन्यथा त्याचाही परस्पर कोणी काटा काढला असता, ते त्यालाही उमजले नसते. कर्नल हादेखील असा भारतीय सेनादल व सरकारच्या रचनेतील एक किरकोळ अधिकारी असतो. पुरोहित कर्नलपदावर होते, म्हणजेच भारतीय सेनादलातील त्यांचा अधिकार किती मर्यादित आहे त्याची आपल्याला कल्पना यावी. पण या माणसाने आपल्या लष्करी गुप्तचर विभागातील कामगिरीत मिळवलेली माहिती भयंकर आहे. किंबहुना असणार आहे. त्याने गोळा केलेली माहिती दाऊद, नक्षलवादी, जिहादी, दहशतवादी, त्यांचे भारतातील विविध उच्चपदस्थांशी व राजकारण्यांशी असलेले संबंध, खोटया नोटा व चलन अशा संबंधातली असून, असा माणूस यूपीएच्या काळात अनेक बडया लोकांना धोका वाटला असेल तर नवल नाही. पुरोहित हे अशाच कामगिरीवर होते आणि त्यांनी समाजात उजळ माथ्याने वावरणाऱ्या अनेकांचे मुखवटे बुरखे फाडणारी माहिती गोळा केलेली होती.

पुरोहित यांच्या प्रकरणाकडे वळण्यापूर्वी, ह्या राइटचे पुढे काय झाले, ते आपण समजून घेतले पाहिजे. राइटचे पुस्तक पूर्ण झाले व त्याचे प्रकाशन होत असल्याची वार्ता आल्यावर ब्रिटिश सरकार भेदरून गेलेले होते. अर्थात ते त्याला हात लावू शकत नव्हते. कारण तो दूर ऑॅस्ट्रेलियात जाऊन स्थायिक झाला होता. पण ब्रिटिश सरकारने त्याच्या पुस्तकावर तत्काळ बंदी घातली. इतकेच नाही, तर त्या पुस्तकाविषयी बीबीसी या माध्यमसमूहाने कार्यक्रम सादर केला, तर मार्गारेट थॅचर या पंतप्रधानांच्या आदेशावरून त्या माध्यमाच्या कार्यालयावर धाडी व छापे घालण्यात आले होते. सत्तेतले लोक आपल्या मुखवटयांना जपण्यासाठी किती टोकाला जाऊ शकतात, त्याचे हे उदाहरण आहे. ही फार जुनी नव्हे, तर 1985 सालातली गोष्ट आहे. एकदा राइटची अवस्था समजून घेतली, तर यूपीए सरकारला पुरोहित हा धोका कशाला वाटला व त्याला गोत्यात घालण्याचे भयंकर कारस्थान कशाला शिजले असेल, त्याचा अंदाज येऊ शकतो. पुरोहितना जामीन मिळाल्यानंतर न्यूज एक्स या वाहिनीने त्यांच्याशी थेट संवाद साधला होता. त्यात पुरोहितांनी आपण कोणकोणती माहिती गोळा केली? आपण कुठल्या, कोणत्या घातपाती संघटनेत घुसखोरी केली होती? आपण जमवलेली माहिती व त्याचे अनेक तपशील वेळोवेळी कसे वरिष्ठांना पाठवत होतो, त्याची त्रोटक माहिती दिली आहे. ज्यांना हिंमत असेल त्यांनी कागदोपत्री असलेले हे तपशील तपासून घ्यावे किंवा जाहीर करावे, असेही पुरोहित यांनी त्या संवादात आव्हान दिलेले आहे. पण त्या सूचक मुलाखतीतून एक गोष्ट साफ होते, की पुरोहित हा यूपीए कालखंडातील अनेक वजनदार अधिकाऱ्यांसाठी व राज्यकर्त्यांसाठी गळफास झालेला होता. साहजिकच त्यांचे मुखवटे व प्रतिष्ठा पुरोहितांच्या बोलण्याने पुरती उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झालेला होता. तो कसा संपवायचा?   

पुरोहित हे लष्करी गुप्तचर विभागात काम करत होते. त्यात काश्मिरी घातपाती, मुजाहिदीन, तोयबा, पाकिस्तानी हस्तक, त्यांच्याकडून लाभ उठवणारे नेते राज्यकर्ते, त्यांना पाठीशी घालणारे लब्धप्रतिष्ठित भारतीय, त्यांच्या हालचाली व कृत्ये यांची माहिती गोळा करण्याचे काम पुरोहित यांच्याकडे होते. त्यांचे वरिष्ठ म्हणून दहा वर्षे काम केलेले हसमुख पटेल यांनी पुरोहितांच्या देशनिष्ठेची ग्वाही दिलेली आहे. पण देशनिष्ठा आणि सत्तानिष्ठा यात फरक असतो. सत्तेत आज कोणी नेता किंवा पक्ष असेल आणि उद्या दुसरा नेता पक्ष असेल. देश ही कायमची स्थायी बाब असते. म्हणूनच पुरोहित कुठल्या राजकीय निष्ठेने काम करत नव्हते वा माहिती गोळा करत नव्हते. ती काँग्रेसला वा भाजपाला हानिकारक वा लाभदायक ठरण्याशी त्यांना कर्तव्य नव्हते, तर देशहिताला उपयुक्त ठरेल अशी माहिती जमा करून वरीष्ठ असतील, त्यांना पोहोचती करण्याचे त्यांनी सातत्य दाखवले होते. म्हणून तर मालेगावचा आरोप झाल्यावर पुरोहित यांना हेमंत करकरे यांनी अटक केली. त्यानंतर त्याविषयी सेनादलाने चौकशी नेमली होती आणि त्यात बहुतांश सहकाऱ्यांनी व वरिष्ठांनी पुरोहितांच्या कामाविषयी निर्विवाद चांगले मत व्यक्त केलेले आहे. जवळपास सर्व साक्षीदारांनी त्यांचे कौतुक केलेले आहे. पण हे चौकशीचे कागदपत्र कोर्टापर्यंत पोहोचण्यात सात वर्षे गेलेली आहेत. 2009 सालातल्या या चौकशीचा अहवाल आपल्याला मिळावा, म्हणून पुरोहितांची पत्नी जंग जंग पछाडत होती. पण ते तिला मिळू देण्यात आले नाहीत. यूपीए तब्बल पाच वर्षे सत्तेत असताना अपर्णा पुरोहित यांच्या तशा अर्जाला धूळ खात पडावे लागले. अखेरीस देशात सत्तांतर झाले आणि काही महिन्यांत तत्कालीन संरक्षणमंत्री पर्रिकर यांच्या आदेशानुसार या अहवालाची प्रत अपर्णाच्या हाती पडली. त्याच आधारे आता पुरोहित यांना जामीन मिळू शकला आहे.

या देशात कसाबला नरसंहार करताना जगाने बघितले आहे. तरी त्यालाही न्याय मिळवण्यासाठी भारत सरकारने सर्व प्रकारची मदत केलेली होती. पण तेच भारत सरकार आपल्याच एका अधिकाऱ्याला न्याय नाकारण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावताना दिसलेले आहे. पुरोहितना सेनादलाच्या चौकशीचा अहवाल नाकारण्यात आला. कारण ते बाहेर आल्यास अनेकांच्या भानगडी चव्हाटयावर येण्याची भीती होती. ज्यांनी त्यांना विनाकारण देशाप्रेमाची व कर्तव्यनिष्ठेसाठी गजाआड टाकलेले होते, त्यांना हा माणूस धोका वाटत असल्याचा आणखी काय पुरावा पाहिजे? जी कागदपत्रे पर्रिकर देऊ  शकले, ती आधीच्या यूपीए संरक्षणमंत्र्यांनी कशाला रोखून धरली होती? त्याचे कारण उघड आहे - सत्य दडपायचे होते आणि सत्तेत बसलेलेच देशबुडवे होते. पुरोहित बोलू लागले व स्वत:च्या बचावासाठी सत्यकथन कोर्टातच करू लागले, तर अनेकांचे मुखवटे फाटणार होते. मुद्दा असा, की राइटला त्याची कल्पना आलेली होती. पुरोहित यांना आपल्याच वरिष्ठांकडून दगाफटका होईल याची सुतराम कल्पना नव्हती. जे अहवाल व माहिती पुरोहित वरिष्ठांना पाठवत होते, ती माहिती राज्यकर्त्यांना व संबंधितांना मिळाली आणि त्यांनीच या माणसाचा आवाज कायमच्या दडपून टाकण्याचा निर्णय घेतला असणार. त्यातून मग पुढल्या घडामोडी घडत गेलेल्या आहेत. त्यात कारस्थान आहे, तसेच राजकारण आहे. एका बाजूला इस्लामी दहशतीला आश्रय द्यायचा आणि दुसरीकडे त्याचे खापर हिंदू संघटनांवर फोडायचे. जिहादी हिंसेला खतपाणी घालून भारतीय लष्कर व गुप्तचर खात्याचे खच्चीकरण करायचे, असा डाव कोणीही शत्रूचा हस्तकच करू शकतो. भारत सरकार या दहा वर्षांत जणू पाकिस्तानसाठी निर्णय घेत होते आणि शत्रूच्या हाती कोलीत देत भारताला खच्ची करत होते. त्याचा बोभाटा करू शकणारा पुरोहित नावाचा माणूस म्हणूनच यूपीएला भयंकर दहशतवादी वाटल्यास नवल नाही.

याच दरम्यान इशरत प्रकरणात गुजरातचे चकमक स्पेशालिस्ट तुरुंगात धाडले गेले. मुंबई महाराष्ट्रातले सचिन वाजे, दया नायक अशा लोकांना निलंबित करण्यात आले. गुप्तचर खात्याचे वरिष्ठ अधिकारी राजेंद्रकुमार यांच्यामागे ससेमिरा लावण्यात आला. सोहराबुध्दीन या माफियाचे उदात्तीकरण करण्यात आले. इशरताला बिहारकी बेटी म्हणून गौरवण्यात आले. काश्मिरात अशाच पध्दतीने पाक हस्तकांची माहिती काढून त्यांचा बिमोड करणारी टीएसडी नामक खास यंत्रणा उभारली, म्हणून तेव्हाचे लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांना बदनाम करण्याच्या मोहिमा उघडण्यात आल्या. सिंग यांनी तर मीरत येथील छावणीतून फौजेला राजधानी दिल्लीत कूच करण्याचे आदेश दिल्याच्या अफवाही पसरवल्या गेल्या. ईशान्येकडे वा काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्यात गुंतलेल्या भारतीय सैनिकांवर बेछूट बलात्काराचे आरोप करण्याचे जोरदार सत्र सुरू झालेले होते. अशाच पार्श्वभूमीवर मुंबईत थेट येऊन पोहोचलेल्या कसाब टोळीने नरसंहार घडवला. त्यांच्या नियोजनात मारेकरी हिंदू दिसावेत अशी पूर्ण सज्जता केल्याची साक्ष डेव्हिड हेडली यानेही दिलेली आहे. म्हणजेच पुरोहितना अटक करून सुरू झालेल्या हिंदू दहशतवादाचा क्लायमॅक्स मुंबई हल्ला हिंदू अतिरेक्यांचा ठरवण्याची पूर्ण तयारी झालेली होती. ती तयारी कुठपर्यंत बारकाव्यानिशी सज्ज असेल? हा मुंबई हल्ला झाल्यावर त्याचे खापर हिंदू दहशतवादावर ठेवणारे पुस्तकही जणू लिहून तयार होते. कसाबचा खटलाही संपला नाही की त्या हत्याकांडाची चौकशीही पूर्ण झालेली नव्हती, इतक्यात काही महिन्यांनी मुश्रिफ या माजी पोलीस अधिकाऱ्याने 'हू किल्ड करकरे?' नावाचे इंग्लिश पुस्तक प्रसिध्द केले. त्यात त्यांनी करकरे यांच्या हत्येचा आरोप भारतीय गुप्तचर खात्यावर करताना, ते खातेही हिंदुत्ववादी असल्याचा आरोप केलेला आहे. हे सर्व कसे पटकथा लिहिल्यासारखे पार पडत गेलेले नाही काय? 

भारतीय समाजाच्या अभिमानाची प्रतीके, भारतीय सुरक्षा व्यवस्था, भारतीय गुप्तचर यंत्रणा, पोलीस यंत्रणा, भारतीय राष्ट्रवाद अशा प्रत्येक पायाला खणून काढण्याचे भयंकर षड्यंत्रच या यूपीएच्या कालखंडात राबवले जात होते. त्यासाठी इशरतचे उदात्तीकरण करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना, गुप्तचरांना त्या खोटया गुन्ह्यात गोवणे आणि त्यासाठी थेट गृहमंत्र्यांनी व अन्य राज्यकर्त्यांनी कागदपत्रात खडाखोड करणे, असा सपाटा लावलेला होता. 2014च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रा.स्व. संघाच्या शाखेवर दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा बेताल आरोप काँग्रेस अधिवेशनात केलेला आठवतो? पाकच्या तोयबा संघटनेचा प्रमुख हफीज सईद याने टि्वटरवर शिंदे यांचे तत्काळ अभिनंदन केलेले होते. या सगळया गोष्टी सहजासहजी घडल्या असे कोणाला म्हणायचे आहे काय? यात सर्वात महत्त्वाचा दुवा होते कर्नल पुरोहित! कारण या माणसाने गुप्तचर म्हणून काम करताना अनेक बडया बडया लोकांचे खरे चेहरे हुडकून काढलेले होते, देशाच्या शत्रूशी असलेले त्यांचे धागेदोरे शोधलेले होते. देशाचा विध्वंस करण्याच्या कारस्थानाचीच माहिती ज्याच्यापाशी आहे, तो तशा हितशत्रू गद्दारांना संकट वाटला, तर नवल नाही. अकस्मात पुरोहित यांना हिंदू दहशतवादी ठरवून करकरे यांनी अटक केलेली नव्हती. त्यांना तसे करण्यास भाग पाडलेले होते. ज्या दिवशी कसाबची टोळी मुंबईत आली, त्याचपूर्वी काही तास करकरे महाराष्ट्राचे तेव्हाचे गृहमंत्री आबा पाटील यांना भेटायला गेलेले होते. ते दोघेही आज हयात नसल्याने त्यांच्यात झालेला संवाद रहस्य आहे. पण करकरे आपली जबाबदारी संपवावी, असा आग्रह धरायला गेले होते, असाही प्रवाद आहे. आपल्यावर नको तितका दबाव आणून पापकर्म करून घेतले जात असल्याचा पश्चात्ताप त्याचे कारण असेल काय?

करकरे त्या कसाब टोळीच्या हल्ल्यात मारले गेले. एकटेच नाही, तर दोन अन्य वरिष्ठ अधिकारी सोबत असताना आझाद मैदानानजीक करकरे यांची हत्या झाली. पण त्यांच्या एकटयाच्याच हत्येविषयी माजी पोलीस अधिकारी मुश्रिफ शंका घेतात व विचारतात, 'हू किल्ड करकरे?' त्या शीर्षकाचे पुस्तकही लिहितात. पण अशोक कामटे वा विजय साळसकर या दोन अधिकाऱ्यांच्या तिथेच झालेल्या हत्येविषयी मुश्रिफ मौन धारण करतात. कसाबचा आडोसा घेऊन भारतीय गुप्तचर खात्यानेच करकरेंचा खून पाडला, असा त्या पुस्तकातला मुश्रिफांचा आरोप आहे. पण सगळया गोष्टी वा कोडयाचे तुकडे एकत्र मांडले, तर करकरे यांनाही ठार मारण्याचे कारस्थान पुरोहितना गोत्यात घालणाऱ्यांचेच असण्याची दाट शक्यता दिसते. एका बाजूला करकरे यांना हुतात्मा म्हणून उदात्तीकरण करायचे. पण करकरे उद्या एकूण कारस्थानाचा बोभाटा करतील, म्हणून त्यांचा आवाज कायमचा बंद करण्याचाच त्यात हेतू नाकारता येतो काय? गुप्तचर म्हणून पुरोहितांना भारतीय सेनादल, म्हणजे पर्यायाने भारत सरकार सर्व उद्योग करायला सांगत होते आणि त्यातून माहिती हाती आली ती राज्यकर्त्यांवर उलटणार असल्यानेच पुरोहित यांचा बळी घेणयाचा प्रयास झालेला आहे. तशीच करकरे यांची कहाणी असू शकते. ते बोलले तर हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करणाऱ्या अनेकांच्या भानगडी चव्हाटयावर येण्याचा धोका होता. म्हणून करकरेंच्या नावाने सतत गळा काढणाऱ्यांनीच त्यांना मारलेले असू शकते. अन्यथा हे इतके तीन चतुर कुशल कर्तव्यदक्ष अधिकारी बळीचा बकरा झाल्यासारखे 26/11 हल्ल्यामध्ये हकनाक मारले गेलेच नसते. म्हणून पुरोहित सुटल्यावर आता एक प्रश्न गंभीरपणे विचारणे भाग आहे - करकरेंना कोणी मारले? सत्य मारणारे कोण आहेत? दडपणारे कोण आहेत?हे किती देशव्यापी भयंकर कारस्थान आहे? हू किल्ड खरेखुरे?

bhaupunya@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0