पारशी समाज घटतोय!

विवेक मराठी    17-Aug-2017
Total Views |


 पारशी समाज गेली कित्येक दशके जलदगतीने कमी होत आहे. या समाजाची लोकसंख्या आता इतकी कमी होत आहे की आणखी काही वर्षांनी 'पेस्तनकाका' फक्त पुलंच्या पुस्तकातच सापडेल का? अशी भीती निर्माण झाली आहे. गेली कित्येक दशके अनेक लोकसंख्या तज्ज्ञ पारशी समाजाच्या या समस्येचा अभ्यास करीत आहेत. या समस्येचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पारशी लोक उशीरा लग् करतात किंवा लग्नच करीत नाहीत. 

भारताइतकी धार्मिक, सांस्कृतिक विविधता क्वचितच कोणत्या देशाने अनुभवली असेल. येथील प्रत्येक धर्माने, पंथाने, समाजाने आपले वेगळेपण जपले. साधारण 10 व्या शतकात इराणमधील रहिवासी असलेले पारसी ऊर्फ झरथुष्ट्र धर्माचे लोक तेथील अरबी आक्रमकांच्या अत्याचारांना वैतागून भारतामध्ये आले. भारतातील गुजरात प्रांतातील काही भागांत विसावले. तेथील राजाला ते शरण गेले आणि राजानेही त्यांना आपल्या प्रजेमध्ये सामावून घेतले. दुधात साखर मिसळावी तसे हे लोक येथील संस्कृतीशी समरस झाले. या लोकांनी तेथील स्थानिक भाषा, पेहराव यांचा स्वीकार केला. ब्रिटिशांनी मुंबई वसवल्यावर दूरदृष्टी ठेवून पारशी समाजाने मोठया प्रमाणात मुंबापुरीत बस्तान बसवले. परप्रांतातून भारतात स्थायिक झालेले पारशी हे काही एकमेव नव्हते. त्यांपैकी अनेकांनी देशाला उपद्रव देण्याचा प्रयत्नही केला. पारशी समाजाने मात्र नेहमीच देशाच्या भरभराटीत हातभार लावला.

पारशी समाज घटतोय!

पारशी माणूस म्हणजे आर्थिकदृष्टया सधन. म्हटलं तर अगदी हुशार आणि तितकाच तिरसटही. शरीराने किरकोळ, पोक काढून चालणारा, एखादे व्यंग, काहीच नाही तर कमजोर दृष्टी. इंग्रजाळलेले राहणीमान, पारशी उच्चारशैलीतील गुजराती भाषा अशा व्यक्तिमत्त्वामुळे आणि आपल्या विशिष्ट पेहेरावामुळे पारशी म्हणून लगेच ओळख पटणारा. पु.ल. देशपांडेंच्या 'व्यक्ती आणि वल्ली' मधील 'पेस्तनकाका' आठवतोय का? हा पेस्तनकाका म्हणजे या समस्त पारशी बावांचा प्रतिनिधीच. 

एखाद्याशी लढायचं झालं तर हाणामारीवर न येता पारशी माणूस कायदेशीर मार्गाचाच वापर करणार. पारशी माणूस वैयक्तिक आयुष्यात अगदी व्यवहारी असेल तरी सामाजिक कार्य करताना मात्र हात सढळ ठेवणार. देशाच्या विकासात योगदान देताना संख्येने अत्यल्प असलेला पारशी समाज नेहमीच दोन पावले पुढे राहिला. पण वैयक्तिक आयुष्यात मात्र प्रत्येक पारशी आपले खासगीपण अतिशय जपणारा असतो.  या अग्निपूजक पारशांच्या काही धार्मिक आणि सांस्कृतिक विधींमध्ये भारतातील अन्य संस्कृतींचे प्रतिबिंब दिसते. तर काही विधी अगदीच गूढ वाटावेत असेही आढळतात. त्यांच्या अग्यारीत अन्य धर्मियांना प्रवेश नसतो, मग ते अग्नीसह पंचमहाभूतांची पूजा करणारे हिंदू असले तरी. त्यामुळेच या समाजाविषयी अन्य लोकांच्या मनात एकाच वेळी आदर आणि परकेपणाची भावनाही असते.

असा हा पारशी समाज गेली कित्येक दशके जलदगतीने कमी होत आहे. या समाजाची लोकसंख्या आता इतकी कमी होत आहे की आणखी काही वर्षांनी 'पेस्तनकाका' फक्त पुलंच्या पुस्तकातच सापडेल का? अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच देशाच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी एकीकडे कठोर कायदे आणि कडक उपाययोजना केली जात असताना दुसरीकडे पारशी समाजाला मात्र मुलांना जन्म देण्याचे प्रमाण वाढविण्यासाठीच आवाहन करावे लागत आहे. भारतीय कायद्याने दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्या पालकांबाबत कडक धोरण राबवले आहे. अशा व्यक्तीला सरकारी नोकऱ्यांमधील अनेक संधी नाकारल्या जातात. त्याला निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकारही मिळत नाही. याउलट अल्पसंख्याक पारशी समाजाला अशा कायद्यातून सवलत द्यायला हवी असे न्यायव्यवस्थेलाही वाटत आहे. नुकतेच एका पारशी दाम्पत्यांच्या घटस्फोटाच्या खटल्याच्या निमित्ताने मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत विधान केले होते. पारशी समाजाची लोकसंख्या ज्या लक्षणीय वेगाने घटत आहे त्यास आळा घालण्याच्या उद्देशाने पारशी लोकांना दोनपेक्षा अधिक मुलांबाबतच्या कायद्यातून सवलत देण्याचा विचार करायला हवा असे न्यायालयाने म्हटले होते. 

लोकसंख्यावृध्दीसाठी बॉम्बे पारसी पंचायतचे प्रयत्न

बॉम्बे पारसी पंचायततर्फे पारशी दांपत्याच्या दुसऱ्या मुलासाठी प्रति महिना 3000 रुपये तर तिसऱ्या मुलासाठी प्रति महिना 5000 रुपये  ते मूल 18 वर्षांचे होईपर्यंत प्रोत्साहन म्हणून दिले जाते. बॉम्बे पारसी पंचायत (बीपीपी) ही भारतातील पारशी इराणी समाजाची सर्वोच्च समिती आहे. 1672 साली ब्रिटीश सरकारच्या अखत्यारित या संघटनेची स्थापना झाली. पारशी समाजातील विविध घटकांना ही संस्था साहाय्य करते. समाजातील आर्थिकदृष्टया मागास वर्गाला आर्थिक साहाय्य करते. राहण्यासाठी घरे उपलब्ध करून देते, अत्यल्प दरात कर्ज देते. तरुणांना नोकऱ्या मिळवून देते. आरोग्य, शिक्षण यांसारख्या सुविधा पुरविते. मालमत्ताविषयक प्रकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पारशी कौटुंबिक खटल्यांबाबत बॉम्बे पारसी पंचायतचे काही विशेष नियम आहेत. विशेषत: पारशी समाजातील घटस्फोटाच्या प्रकरणात बीपीपीची विशेष ज्युरी समिती काम पाहते.

पारशी समाजाची लोकसंख्या वाढावी यासाठीही बीपीपी आपल्या परीने अनेक प्रयत्न करीत असते. आर्थिक साहाय्य करण्याबरोबरच फर्टीलिटी सेंटर चालवून त्यात पारशी दांपत्यांना आयएफव्हीची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देणे, तरुण विवाहेच्छुकांसाठी विवाह मंडळ चालवणे असे अनेक उपक्रम ही समिती राबवते. या प्रयत्नांचा कितपत परिणाम होतो याबाबत मात्र प्रश्नचिन्हच आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या समस्येचे मूळ पारशी माणसाच्या स्वभावातच आहे हे अनेक अभ्यासातून सिध्द झाले आहे.

चिंताग्रस्त करणारी आकडेवारी

भारतीय लोकसंख्येनुसार पारशी समाजाची लोकसंख्या 1881 साली 85,397 इतकी होती. 1941 पर्यंत तरी पारशी समाजाच्या लोकसंख्येत थोडया प्रमाणात का होईना वाढ होती. ही लोकसंख्या 1941 मध्ये 1,14,890 इतकी होती. 1951 पासून मात्र प्रत्येक लोकसंख्या मोजणीत पारशी समाजात घटच झाल्याचे दिसून येते. 1991 च्या जनगणनेत पारशी समाजाची लोकसंख्या 76,382 इतकी घटली. 2001 च्या जनगणनेनुसार तर पारशी समाजाची लोकसंख्या 69,601 इतकी कमी झालेली दिसते. ही एकूण आकडेवारीच पारशी समाजाच्या भविष्याबाबत चिंताग्रस्त करणारी आहे. संपूर्ण जगभरातही पारशी समाजाची लोकसंख्या 1,12,367 ते 1,21,367 या दरम्यानच राहिली आहे.

गेली कित्येक दशके अनेक लोकसंख्या तज्ज्ञ पारशी समाजाच्या या समस्येचा अभ्यास करीत आहेत. दुर्दैवाने बहुतेक पारशी ही वस्तुस्थिती नाकारताना दिसतात. या चर्चेला उत्तर म्हणून लोकसंख्या घटण्याच्या दाव्यात फार दम नसल्याचा आभास निर्माण करणारे ई-मेल, एसएमएस समाजातील लोकांना फॉरवर्ड केले जातात. उदा.

“Parsi might die out but Zorastrianism will live on.”,

“Parsi community is dying? Who’s dying? I am here and so are you.”

“what does the size of population matter? Its Quality versus Quantity afterall.” 

ज्यांना या समस्येची जाणीव झाली आहे ते त्यांच्या परीने त्याची वेगवेगळी कारणे देतात. कोणी म्हणतं की परदेशात स्थलांतर केल्यामुळे लोकसंख्या कमी झालीय असा आभास होतोय तर काहींच्या मते आंतरजातीय विवाह हे लोकसंख्या घटण्यामागचे मुख्य कारण आहे.

खरे कारण - लग्नाबाबत पारशांची अनास्था

हार्वर्ड विद्यापीठातून इतिहास विषयात पीएचडी करीत असलेला 29 वर्षीय पारशी तरुण दिनयार पटेल याने पारशी लोकसंख्येबाबत अनेक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण अहवाल, शोधनिबंध पडताळून पाहिले. त्यातून एक वस्तुस्थिती त्याच्या लक्षात आली. ती म्हणजे पारशी लोकसंख्या घटण्याला अन्य कोणी नव्हे तर खुद्द पारशी माणूसच जबाबदार आहे. या समस्येचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पारशी लोक उशीरा लग् करतात किंवा लग्नच करीत नाहीत. ही वस्तुस्थिती समस्त पारशीजनांना कळावी म्हणून हा तरुण या विषयावर शक्य तेथे भाषणे देतो, नियतकालिकांतून लेख लिहितो. बॉम्बे पारसी पंचायतनेही पटेल यांच्या या निष्कर्षाची गांभीर्याने दखल घेतली आहे. गेल्याच वर्षी मुंबईतही नेहरू सायन्स सेंटरच्या सभागृहात त्यांनी या विषयावर एक व्याख्यान दिले होते.

त्या व्याख्यानात पटेल यांनी म्हटले होते की, ''बहुतेक पारशींच्या मते आंतरजातीय विवाह पारशी समाजाची लोकसंख्या घसरण्यास कारणीभूत आहे. मुंबई किंवा भारतातील अन्य भागात कायद्यानुसार जर पारशी पुरुष आणि पारशेतर महिलेचा विवाह झाला तर त्यांची मुले झोरास्ट्रीयन किंवा पारशी म्हणून वाढतात. पण जर पारशी महिला आणि पारशेतर पुरुषाचा विवाह झाला तर मात्र त्यांच्या मुलांना पारशी किंवा झोरास्ट्रीयन मानले जात नाही. त्यामुळे पारशांमधील आंतरजातीय विवाहांचे वाढते प्रमाण लोकसंख्या कमी होण्यास कारणीभूत आहे असे मानता येईल. पण हे सर्वात महत्त्वाचे कारण नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

असेही म्हटले जाते की गेल्या काही दशकांत पारशांनी  भारतातून पाश्चिमात्य देशांमध्ये स्थलांतर केल्यामुळे भारतातील आमची संख्या कमी झाली आहे. लोकसंख्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी मात्र स्थलांतर हे पारशी लोकसंख्या घटण्याचे प्रमुख कारण असल्याचे फेटाळले आहे. आणि याबाबत उपलब्ध पुराव्यांचा विचार केला तरी पारशी समाजाच्या एकूण संख्येत फार मोठी वाढ  दिसत नाही. म्हणजेच आंतरजातीय विवाह किंवा स्थलांतर ही दोन्हीही पारशी लोकसंख्या घसरण्यामागची मुख्य कारणे नाहीत. लोकसंख्या तज्ज्ञांच्या मते बहुतेक पारशी खूपच उशीरा लग्न करतात किंवा अजिबातच लग्न करत नाहीत. त्याचा परिणाम जन्मदरावर होत आहे.''

आतापर्यंत लोकसंख्येचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडून पारशी समाजात प्रजनन क्षमता खूपच कमी असल्याचा समज निर्माण झाला होता. पण पटेल यांनी आपल्या विवेचनात हा समज निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. कारण लग्न उशीरा झाली की उतरत्या वयात प्रजनन क्षमता कमी होत असल्याने मुले होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे एखाद-दुसरे मूल झाले तरी नशीबच.  तज्ज्ञांच्या अभ्यासाचा दाखला देताना पटेल यांनी सांगितले की, ''1961 मध्ये बॉम्बे पारसी पंचायतने सरकारला पारशी लोकसंख्येचा विशेष अभ्यास करवून घ्यावा अशी विनंती केली. त्याप्रमाणे आगामी जनगणनेत पारशी लोकसंख्येचा विशेष अभ्यास करण्यात आला. त्यानुसार पन्नाशीपूर्वी लग्न करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण 31.2 टक्के आहे तर स्त्रियांचे प्रमाण 26.8 आहे. आता 1991 मध्ये झालेल्या अभ्यासातही हे प्रमाण 1961 इतकेच असल्याचे दिसून आले आहे. इंटरनॅशनल इन्स्टिटयूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज मधील अभ्यासकांनी सादर केलेल्या शोधनिबंधानुसार भारतातील प्रत्येकी 5 पारशी पुरुषांपैकी एक तर 10 पारशी महिलांपैकी एक वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत अविवाहित असतात. पारशी समाजाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते पारशी लोकांनी जरी लग् केले तरी ते उशीरा करतात आणि उशीरा वयात मूल होत नसल्याने बायोलॉजिकल इनफर्टिलिटीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळेच आज पारशी फर्टिलिटी क्लिनिक्सची आवश्यकता वाढली आहे.''

पारशी समाजाचे स्वभाव वैशिष्टय खासगीपणा, वैयक्तिक स्वातंत्र्य जपण्याचे. दुसऱ्याची ढवळाढवळ अजिबात खपवून घेतली जाणार नाही, अगदी आईवडिलांचीसुध्दा. स्वत:चे वैयक्तिक स्वातंत्र्य जपण्याच्या नादात दुसऱ्याशी जुळवून घेण्याचे, कौटुंबिक जबाबदारी स्वीकारण्याचे भान मात्र नसते. त्यामुळे मग लग्नच न करण्याकडे कल वाढतो. जरी केले तरी ते टिकवण्याबाबतही तीच बेफिकीरी आणि स्वभावदोष आडवा येतो. त्यामुळे घटस्फोटांचे प्रमाणही या समाजात मोठे आहे. 'पेस्तनजी' (1988) या विजया मेहता दिग्दर्शित चित्रपटात पारशी समाजाच्या या स्वभाववैशिष्टयांची आणि त्यांच्या दुष्परिणामांची जवळून ओळख होते.

घटत चाललेल्या लोकसंख्येच्या जोडीला पारशी समाजाला आज आणखीही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या सगळया समस्या एकमेकांशी निगडीत आहेत. एकीकडे जन्मदर कमी झालाय तर दुसरीकडे मृत्यूदर वाढलाय. 2001 च्या जनगणनेनुसार पारशी समाजात 1000 जनसंख्येमागे 6 ते 8 असा  जन्मदर होता. (सर्वसाधारण 24.8/1000). तर मृत्यूदर प्रत्येक 1000 लोकांमागे 16 ते 18 असा होता. (सर्वसाधारण 9/1000). पारशी समाजात तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. 2001 च्या जनगणनेनुसार भारतातील पारशी समाजातील 60 वर्षांवरील लोकसंख्या 30.9 टक्के आहे तर 0 ते 14 वयोगटातील बालकांचे प्रमाण 12.3 टक्के आहे. म्हणजेच एकूण परावलंबी गटाचे प्रमाण 43.2 टक्के इतके आहे. बहुतेक ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात एकाकीपणे जगावे लागते.

या समाजाची दुसरी एक महत्त्वाची समस्या म्हणजे आरोग्याविषयीची. समाजाबाहेर लग्न न करण्याबाबत पारशी समाज आग्रही आहे. पारशी समाजाबाहेर लग्न करणाऱ्यांच्या मुलांना पारशी संस्थांकडून कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. मूठभर आकाराच्या या समाजातच लग्न करायचे तर अनेकदा रक्ताच्या नात्यात लग्न करण्याची वेळ येते. त्यामुळेच गुणसूत्रांद्वारे किंवा रक्ताद्वारे संक्रमित होणाऱ्या अनेक आजारांचे प्रमाण पारशी समाजात जास्त आहे. अपस्मार, सेरिब्रल पाल्सी, फेब्राईल सिझर (लहान मुलांमध्ये), हालचालीतील असमर्थता अशा मज्जासंस्थेशी संबंधित विकारांपैकी एखादा तरी विकार प्रत्येक पारशी माणसात आढळतो. पार्किन्सन्सचे रुग्णही पारशी समाजात मोठया प्रमाणात आहेत. साठीच्या पुढे होणारा हा विकार पारशी समाजात 40 पेक्षाही कमी वयोगटातही दिसून येतो. मधुमेह, रक्ताचा व अन्य कर्करोग यांची शक्यताही पारशी माणसात मोठया प्रमाणात असते. तसेच उशीरा वयात मुले झाल्यास हार्मोन्समधील बिघाडांमुळे विकलांगतेचा धोकाही संभवतो. त्यामुळे पारशी समाजाची लोकसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करताना या समस्येचाही विचार करावा लागेल.

पारशी समाजातील तरुणाला आपल्या घटत्या लोकसंख्येची जाणीवच नाही असे नाही. पण स्वभावाला औषध काय? त्यामुळेच त्याकडे काणाडोळा केला जात आहे. आमचा समाज आणखी काही वर्षांनी अस्तित्वात असेल की नाही अशी शंका बॉम्बे पारसी पंचायतचे अध्यक्ष दिनशॉ मेहता यांनी व्यक्त केली, तेव्हा त्यांना सांगावेसे वाटले की पारशी समाजातील अनेक लोकांनी या देशासाठी चांगले कार्य केले आहे. त्यामुळे हा समाज कधीच नष्ट होऊ नये असे या देशातील प्रत्येक नागरिकाला नक्कीच वाटत असेल. पण त्यासाठी प्रयत्न करणे हे फक्त पारशी समाजाच्याच हातात आहे.

 पारशी माणसाचा स्वभाव पारशी समाजाच्या मूळाशी

- दिनशॉ मेहता (अध्यक्ष, बॉम्बे पारसी पंचायत)

पारशी समाजात उशीरा लग्न करण्याची किंवा लग्नच न करण्यामागची कारणे काय आहेत?

पारशी माणूस हा स्वत:चे खासगी आयुष्य जपणारा असतो. दुसऱ्या धर्मांमध्ये किंवा समाजामध्ये मुले 20-22 वर्षांची झाली की आईवडिल त्यांच्यासाठी जोडीदार शोधायला लागतात. आमच्याकडे मात्र आई-वडिल याबाबतीत मुलांच्या फार मागे लागू शकत नाहीत. लग्न जुळले तरी ते उशीरा वयात जुळते. लग्न न करण्याकडेही अनेक तरुणांचा कल असतो. खासगीपण जपण्याच्या स्वभावामुळे आपल्या आयुष्यात त्यांना कोणाचीच ढवळाढवळ आवडत नाही. त्यामुळे लग्न म्हणजे त्यांना बंधनच वाटते. याच कारणामुळे पारशी समाजातील घटस्फोटांचे प्रमाणही मोठे आहे.

दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देऊ नये यासाठी भारतीय कायद्याने काही नियम लागू केले आहेत. पारशी समाजाला मात्र या नियमातून सवलत द्यावी असा विचार  होऊ लागला आहे. बीपीपीकडूनही त्यासाठी आर्थिक साहाय्य केले जाते. त्याचा कितपत सकारात्मक परिणाम होत आहे?

नुकतेच मुंबई उच्च न्यायालयानेही एका खटल्याच्या निमित्ताने या नियमातून पारशी समाजाला सवलत मिळायला हवी असे म्हटले होते. त्याशिवाय बॉम्बे पारसी पंचायततर्फे आम्ही दुसऱ्या मुलासाठी जन्मापासून दरमहा 3000 रुपये तर तिसऱ्या मुलासाठी दरमहा 5000 रुपये ते मूल अठरा वर्षाचे होईपर्यंत इंसेंटीव्ह म्हणून देतो. 2009 पासून आम्ही हा उपक्रम सुरू केला. देशाच्या कोणत्याही भागातील पारशी जोडप्याला आम्ही ही मदत करतो. शिवाय लग्न करणाऱ्या जोडप्यांना प्राधान्यक्रमानुसार घरे उपलब्ध करून देतो. अशा जोडप्यांसाठी सध्या आम्ही दोन बेडरूमचे फ्लॅटही तयार करीत आहोत. या तरुणांनी लग्न करून, मुलांना जन्म द्यावा आणि पारशी समाजाची लोकसंख्या वाढवावी यासाठीच हे सर्व प्रयत्न आहेत.  फर्टिलिटी क्लिनिकच्या माध्यमातून गेल्या 4-5 वर्षात 40-45 मुलांचा जन्म झाला आहे. मात्र इन्सेंटिव्हच्या योजनेचा परिणाम कितपत झाला हे सांगणे कठीण आहे. 

आंतरजातीय विवाह करणाऱ्या पारशींबाबत बीपीपीची भूमिका कशी आहे?

पारशी समाजाबाहेर लग्न करणाऱ्या तरुण किंवा तरुणींना आम्ही घर वगैरे सुविधा देत नाही. त्या फक्त पूर्णपणे पारशी असलेल्या जोडप्यांसाठी आहेत. त्यांना 3000 किंवा 5000 रुपयांचे इन्सेंटीव्हही देत नाही. जर मुलगा पारशी असेल आणि पारशेतर मुलीशी विवाह केला असेल तर आम्ही त्यांच्या मुलांना पारशी समाजात घेतो. पण जर मुलगी पारशी असेल आणि तिने पारशेतर मुलाशी विवाह केला असेल तर मात्र त्यांच्या मुलांना समाजात घेत नाही.

अल्पसंख्याक म्हणून सरकारकडून कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो?

आम्ही आर्थिकदृष्टया मागासलेले अल्पसंख्याक नाही. त्यामुळे अन्य मागास अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या सुविधा आम्हाला मिळू शकत नाहीत. आमची लोकसंख्या फार कमी असली तरी आर्थिकदृष्टया आम्ही सुस्थितीत आहोत. आमच्या समाजातील लोकांनी मुंबईसाठी आणि देशासाठी जेवढे कार्य केले आहे तेवढे कोणीच केले नसेल. पारशी समाज नेहमी स्वत:च्या पायावर उभा राहिला आणि त्याने कधीच सरकारकडून, प्रशासनाकडून कसली मागणी केली नाही. आता मात्र समाजातील काही घटकांची पातळी उच्च मध्यमवर्गाकडून निम्न मध्यमवर्गाकडे घसरत आहे. त्यामुळे काही अपेक्षा सरकारकडून आहेत. उदा. पारशी लोकांनी स्थापित केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पारशी विद्यार्थ्यांसाठी 2- 4 जागांचे आरक्षण असावे.

ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण पारशी समाजात खूपच जास्त आहे. त्यांची व्यवस्था कशी केली जाते?

पारशी समाजात आज अनेक ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत आहेत. त्यांची काळजी घेणारे जवळचे कोणीच नसते. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही पारेख धर्मशाळा नावाने चार मजली इमारतीत व्यवस्था केली आहे. तेथे त्यांचे राहणे, जेवण सगळं काही विनामूल्य असतं.

हा समाज ज्या वेगाने घटत आहे त्याचा विचार करता भविष्यात हा समाज नष्ट होईल अशी भीती व्यक्त केली जाते. त्याबाबत आपल्याला काय वाटते?

दरवर्षी पारशी समाजात सरासरी 300 जन्म होतात तर 900 मृत्यू होतात. म्हणजेच दरवर्षी आमची लोकसंख्या 600 ने घटते. सध्याची स्थिती पाहता आणखी काही वर्षांनी हा समाज नाहीसा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(सदर लेख २०१२ साली प्रसिद्ध झाला होता.)