कहाणी एका शाकाहारी गावाची

16 Aug 2017 18:52:00

 

महाराष्ट्रातील अनेक गावांना संपन्न असा इतिहास, भूगोल आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली वैशिष्टयपूर्ण परंपरा अशी अनेक गावे जपत आहेत. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात अशा परंपरा जपणाऱ्या गावांचा हेवा वाटतो. आज आपण परंपरेने शाकाहारी राहिलेल्या गावाची ओळख करून घेणार आहोत. धाराशिव जिल्ह्यात जोतिबाची वाडी हे गाव आहे. साधारण सतराशे लोकसंख्या असलेले हे गाव तब्बल दोनशे वर्षांपासून शाकाहारी आहे. आजही या गावातील रहिवासी मांसाहार करत नाहीत. वाचून आश्चर्य वाटले असेल, तरी हे सत्य आहे.

 धाराशिव जिल्ह्याची ऐतिहासिक व आध्यात्मिक अशी स्वतंत्र अशी ओळख आहे. तुळजापूर येथील आई तुळजाभवानीचे मंदिर, नळदुर्ग व परंडा येथील ऐतिहासिक किल्ला, येडशीतील निसर्गरम्य श्री रामलिंग देवस्थान, कुंथलगिरीतील जैन मंदिर, तेर, धाराशिव लेणी आदी ठिकाणांना पर्यटक सतत भेटी देत असतात. गेल्या दोन दशकांपासून हा जिल्हा कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाशी झुंज देताना दिसतोय. दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या या विषयांतल्या या जिल्ह्याच्या बातम्या माध्यमांत नेहमी वाचायला मिळतात.

जोतिबाची वाडी

जोतिबाची वाडी हे गाव धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथून 16 किलोमीटर अंतरावर वसले आहे. आत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. साधारण सतराशे लोकसंख्या. गावात जोतिबाचे जागृत मंदिर आहे. 95 टक्के समाज मराठा आहे. मातंग व गोसावी समाजाची चार घरे आहेत. गावात आठवीपर्यंत शाळा आहे. गावातील साठ तरुण भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. गावकऱ्यांची उपजीविका शेतीवर आहे. निसर्गाची साथ मिळत नसली, तरी इथला शेतकरी समाधानी आहे. दररोज मंदिरात होत असलेल्या भजनात गावकरी सहभागी असतात. गावातले तंटयाचे/मतभेदाचे विषय गावातच मिटविले जातात. आजपर्यंत कुणीही तक्रार नोंदविण्यासाठी  पोलीस ठाण्यात गेले नाही. सर्व जण एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. गावात देशी दारूचे व बिअरचे दुकान नाही. मटनाचे दुकानही कोसावर कुठे लावण्यात आले नाही. त्यामुळे हे गाव आजही गुण्यागोंविदाने नांदत असताना दिसते. या गावात जुन्या पध्दतीचा दगडी आड आहे. आडात बाराही महिने मुबलक प्रमाणात पाणी आहे. गावकरी याच आडाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. दुष्काळात या आडाचे कधीही पाणी आटले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना उन्हाळयात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली नाही.

जागृत मंदिर व शाकाहाराची आख्यायिका

जोतिबाची वाडी हे गाव दोन कारणांसाठी प्रसिध्द पावले आहे. पहिले कारण म्हणजे येथील बालाघाट डोंगररांगांच्या कुशीत वसलेले श्री जोतिबाचे जागृत मंदिर व दुसरे या मंदिरामुळे गावकऱ्यांची शाकाहारी राहण्याची परंपरा. मांसाहार करणे आरोग्यासाठी चांगले नाही या विचाराने गावकरी शाकाहारी राहिलेले नाहीत, तर गावाला असलेल्या धार्मिक व आध्यात्मिक अधिष्ठानामुळे ते मांसाहार करत नाहीत. त्यामागे एक कहाणी आहे. ही कहाणी आजच्या काळाशी सुसंगत वाटत नसली, तरी त्यातून मिळणारा बोध हा परंपरा व नवतेला जोडणारा सेतू आहे.

कोल्हापूरच्या जोतिबाचे ठाणे म्हणून जोतिबाची वाडी येथील जागृत जोतिबा मंदिर देवस्थान ओळखले जाते. हे देवस्थान लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या देवास मांसाहार चालत नाही. दसऱ्याला, चैत्र पौर्णिमेला व श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी गावात मोठा उत्सव भरतो. चैत्र पौर्णिमेला सर्वात मोठी यात्रा भरते. यात्रेचे माहात्म्य कायम राखण्यासाठी धार्मिक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येते. यात्रेला अहमदनगर, धाराशिव, बीडसह राज्यातील लाखो भाविक येतात. श्री जोतिबास पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. देवास मांसाहार चालत नाही, म्हणून गावकरीही मांसाहार करत नाहीत. गावात अजूनही एकाही चुलीवर, गॅसवर व स्टोव्हवर मटन शिजलेले नाही. शाकाहारी राहण्याची ही परंपरा किती वर्षांपासून चालू आहे, याविषयी ज्येष्ठ नागरिक आबासाहेब पवार व शिक्षक शिवाजी गराटे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ''आम्ही वडिलांना व आजोबांना विचारले असता, जोतिबाचे जागृत मंदिर असल्यामुळे गावात कोणी आतापर्यंत कुणी कोंबडे व बकरे कापले नाही. जोतिबावर असलेली श्रध्दा ही आजपर्यंत चालत आली आहे.''

जोतिबाची वाडी निजाम राजवटीतले गाव. या परिसरातील गावांत रझाकाराच्या सैनिकांनी मोठा छळ केला. मात्र जोतिबाचे जागृत देवस्थान असल्यामुळे रझाकाराने या गावाला कधीही त्रास दिला नाही, अशी गावकऱ्यांची श्रध्दा आहे व त्या श्रध्देपोटी गावकरी पिढयान्पिढया शाकाहारी राहिले आहेत. शाकाहाराची ही परंपरा दोनशे वर्षांपासून सुरू आहे, पण त्याचा कोणी गवगवा करत नाहीत.

परगावी जाऊन मांसाहार

संपूर्ण गाव शाकाहारी आहे. काही जण माळकरी आहेत. जे काही लोक आहेत, त्यापैकी मांसाहार करणारे दोन टक्के निघतील. त्यांना मटन खाण्याची इच्छा झाल्यास ते परगावी नातेवाइकांकडे किंवा शहरातील हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार करतात. असे लोक आंघोळ करूनच गावात प्रवेश करतात. पुणे-मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक झालेले गावातील लोकही गावी आल्यावर मांसाहार करत नाहीत.


श्रावणमासातील तिसऱ्या रविवारी यात्रेचे स्वरूप

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या जोतिबाच्या वाडीत श्री जोतिबाचे जागृत मंदिर असल्याने चैत्र पौर्णिमा यात्रेनंतर सर्वात मोठा उत्सव श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी भरला जातो. या दवशी पंचक्रोशीसह हजारो भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी गर्दी केलीहोती . श्रावण महिन्यात जोतिबाच्या वाडीलाच यात्रेचे स्वरूप आलेले असते. अर्धा कोटीच्या लोकवर्गणीतून जोतिबा मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला आहे. मंदिर परिसर, मंदिराचे शिखर, सभामंडप आदी विकास कामे करण्यात आली आहेत.

पंचक्रोशीत जोतिबाची वाडीचा लौकिक

जोतिबाची वाडी हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने जरी लहान असले, तरी हे गाव शुध्द शाकाहारी गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. गावात व्यसनाचे प्रमाण फक्त 2 टक्के आहे. शिक्षणामुळे नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आबासाहेब पवार या तरुणाच्या मार्गदर्शनाखाली तब्बल साठ तरुण भारतीय सैन्यदलात भरती झाले आहेत. या छोटयाशा गावातून एवढया मोठया संख्येने भारतीय सैन्यदलात भरती होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन आजूबाजूच्या तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. पवार गेल्या वीस वर्षांपासून गावात दर वर्षी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवत आहे. या निमित्ताने स्पर्धेकरिता धाराशिव, संभाजीनगर, बीड, लातूर, सोलापूर, पुणे, बारामती या परिसरातील खेळाडू या छोटयाशा गावात येतात. या स्पर्धेमुळे अनेक गुणवंत खेळाडूंना वाव मिळाला आहे.

काळाच्या ओघात जोतिबाची वाडीच्या ग्रामस्थांनी शाकाहारी राहण्याचे वेगळेपण आजही जपलेच आहे, शिवाय पुढच्या पिढीला योग्य दिशा देण्याचेही कार्य ते करत आहेत. जोतिबाची वाडीचे कार्य अनुकरणीय आहे.

99970452767

 

Powered By Sangraha 9.0