दोन स्पर्धक, दोन दृष्टीकोन

11 Aug 2017 17:48:00


*** राजीव रंजन चतुर्वेदी****

समकालीन परिस्थितीचा विचार करता आगामी काळात निर्माण होणाऱ्या जागतिक व्यवस्थेला आकार देण्यात भारत आणि चीन या राष्ट्रांचे योगदान महत्त्वपूर्ण असेल, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळे भारत आणि चीन ही राष्ट्रे संपूर्ण आशिया आणि जगाची दशा व दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील ही गोष्ट अत्यंत स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्न निर्माण होतो की, या दोन्ही वाढत्या शक्तींचे परस्परांशी संबध कसे राहतील? हे देश नैसर्गिकरित्या परस्परांचे प्रतिस्पर्धीच आहेत की यांच्यात परस्पर सहकार्याची काही शक्यता आहे?

 ग एका मोठया स्थित्यंतरातून जात आहे. एकीकडे जग जवळ येत आहे, दररोज नवनवीन शोध लागत आहेत, कृत्रिम बुध्दिमत्तेविषयी बोलले जात आहे, पारंपरिक आणि आधुनिक प्रयोगांच्या मदतीने गूढातील गूढ रहस्य शोधले जात आहे, संपर्काच्या नवनव्या साधनांनी सगळयांना एका माळेत गुंफले आहे, आणि दुसऱ्या बाजूला जागतिक आर्थिक मंदी आणि अन्य आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्या तोंड पसरून उभ्या आहेत. या परिस्थितीत विशेषत: विकसित देशांमध्ये अनिश्चिततेचे आणि निराशाजनक वातावरण आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये जागतिकीकरणाच्या आणि परस्परावलंबित्वाच्या विरोधात सूर उमटत आहेत आणि विकसित समाज एका नव्या उलथापालथीला सामोरा जात आहे.

विकसित देशांतील या उलाढालीच्या आणि निर्माण होत असलेल्या साशंकतेच्या वातावरणात ही धारणादेखील जोर धरत आहे की एकविसावे शतक हे आशियाई देशांचे शतक असणार आहे. भारत आणि चीन यांच्या एकाच वेळी सुरू असलेल्या प्रगतीने आणि त्यांच्या वाढत्या आर्थिक उंचीने सगळयांनाच या राष्ट्रांकडे अाकर्षित केले आहे. बहुकेंद्री ध्रुवीकरण, वाढता राष्ट्रवाद, वादग्रस्त सीमा आणि नव्याने स्थापन केल्या जाणाऱ्या संस्था या सगळयांमध्ये पुन्हा एकदा आशिया खंड जगातील अर्थव्यवस्था आणि राजकारण यांचा गुरुत्वमध्य बनला आहे. समकालीन परिस्थितीचा विचार करता आगामी काळात निर्माण होणाऱ्या जागतिक व्यवस्थेला आकार देण्यात भारत आणि चीन या राष्ट्रांचे योगदान महत्त्वपूर्ण असेल, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळे भारत आणि चीन ही राष्ट्रे संपूर्ण आशियाची आणि जगाची दशा व दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील ही गोष्ट अत्यंत स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्न निर्माण होतो की, या दोन्ही वाढत्या शक्तींचे परस्परांशी संबध कसे राहतील? हे देश नैसर्गिकरित्या परस्परांचे प्रतिस्पर्धीच आहेत की यांच्यात परस्पर सहकार्याची काही शक्यता आहे? जिथे विकसित देश जागतिकीकरणाच्या दुष्परिणामांमुळे साशंक आहेत, तिथे भारत आणि चीन जागतिकीकरणाचे, व्यापाराचे आणि आर्थिक प्रगतीचे सर्वात मोठे समर्थक बनले आहेत. हे दोन्ही देश सहअस्तित्वाचा आणि सामंजस्याचा मार्ग अवलंबतील की परस्परांबरोबर स्पर्धा करण्यावर भर देतील, यावर येणारा काळ कसा असेल ते ठरणार आहे. या राष्ट्रांची अर्थव्यवस्था आणि सर्वसमावेशक विकासाची दिशा कशी असेल यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील.

जगातील सर्वात मोठया आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारत आणि चीन या देशांच्या अर्थव्यवस्थेत एक समस्या आहे. या देशांचा आर्थिक दर सगळयात जास्त असूनही या देशांमध्ये सर्वाधिक गरीब लोक आहेत, जे या उच्च विकास दराच्या लाभांपासून वंचित आहेत. त्यातच प्रादेशिक विषमता वेगवेगळया प्रकारची आव्हाने निर्माण करत आहेत. जे दोन देश सर्वसमावेशक विकासाच्या आव्हानांशी झुंजत आहेत, तेच देश आज आर्थिक महाशक्ती म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत आहेत, हा विरोधाभास आहे. मागील दोन-तीन दशकांमध्ये आशियाई देशांनी अभूतपूर्व प्रगती केली आहे आणि त्यांच्या अनपेक्षित विकासाला आणि समृध्दीला सुरक्षित आणि कायम राखण्यासाठी भारत आणि चीनमधील मैत्रिपूर्ण संबंधांची भूमिका सकारात्मक राहील.

मात्र जसजशी चीनच्या आर्थिक आणि सामरिक क्षमतेत वाढ होत आहे, तसतसा तो अधिक वर्चस्ववादी होत आहे. त्याच्या नेतृत्वाखालील विविध संस्थांची स्थापना आणि अनेक महत्त्वाकांक्षी योजनांसाठीचा पुढाकार चीनच्या वाढत्या सामर्थ्याचे निदर्शक आहेत. दुसरीकडे वेगाने वाढणाऱ्या आर्थिक दराबरोबरच भारत आकर्षक परदेशी गुंतवणुकीचे स्थान म्हणून पुढे येत आहे. भारताची विशाल बाजारपेठ, कमी उत्पादन खर्च आणि येथील युवा शक्ती देशाला आकर्षणाचे केंद्र बनवत आहे. किंबहुना एक सशक्त नेतृत्व आणि विकासाभिमुख धोरणे यांमुळे जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हतादेखील वाढली आहे. भारताला विशिष्ट ओळखदेण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार व्यावहारिक आणि साहसी धोरणे आखत आहे आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी राजकीय बांधिलकीही दाखवत आहे. राष्ट्रहिताला प्राधान्य देताना मोदी सरकारचे लक्ष तीन गोष्टींवर केंद्रित आहे - एक म्हणजे भारतीय भूभाग, लोकसंख्या आणि आर्थिक हित यांचे बाह्य आणि आंतरिक धोक्यांपासून रक्षण, दुसरी गोष्ट आर्थिक समृध्दी व सर्वसमावेशक विकासाचे निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी आवश्यक असलेले देशाबाहेरील सहकार्य आणि तिसरी म्हणजे भारताच्या राष्ट्रीय हिताशी आपली सुसंगती राखण्यासाठी आणि त्याच्या विकासाच्या योगदानासाठी, निष्पक्ष आणि न्याय्य भागीदारी राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंच आणि जागतिक शासनाच्या स्वरूपात एक सक्रिय भूमिका. ही उद्दिष्टे गाठण्यासाठी भारत सरकार अनेक प्रयत्न करीत आहे.


 या पार्श्वभूमीवर चीन आणि भारत प्रभावी नेतृत्वासह आपापल्या देशाची समृध्दी आणि विकास यांना गती देण्यासाठी जे प्रयत्न करीत आहेत, त्यांना कोणत्याही एका चौकटीत बसवणे कठीण आहे. दोन्ही देशांच्या लोकसंख्या विशाल असून त्यांच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी संसाधनेही मोठया प्रमाणात लागतात आणि दोघांपैकी कोणताही देश या बाबतीत स्वावलंबी नाही. देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि ती कायम ठेवण्यासाठी अन्य देशांशी संबंध मजबूत करणे आणि अनुकूल परिस्थिती निर्माण करणे या गोष्टींचा दोन्ही देशांच्या अजेंडयामध्ये समावेश आहे. वेगाने बदलणाऱ्या या जागतिक वातावरणात भारत आणि चीनच्या हालचालींवर प्रकाश टाकल्यास त्यांच्यामध्ये प्रतिस्पर्धी आणि मैत्री असे दोन्ही घटक स्पष्ट दिसतात.

खरे तर दोन्ही देशांमध्ये अनेक संस्थात्मक विषमता आहेत आणि त्यांचे प्राधान्यक्रमही वेगवेगळे आहेत, परंतु, बहुतेक मुद्दे असे आहेत ज्यामुळे दोन्ही देश प्रभावित आहेत आणि जागतिक व्यासपीठावरील त्यांच्या धोरणात समन्वयाची आणि सहकार्याची भूमिका दिसते. त्याची अनेक ज्वलंत उदाहरणे आहेत. जलवायू प्रदूषणातून निर्माण होणारे धोके सर्वांनाच माहीत आहेत आणि पॅरिस अधिवेशनात दोन्ही देशांनी भागीदारीचे आणि बांधिलकीचे दर्शन घडवले. जागतिक स्तरावर आर्थिक आणि वित्तीय संस्थांमध्ये संयुक्तिक भागीदारी आणि प्रतिनिधित्व, जागतिक व्यापारी संघटनांमध्ये धोरणांचा समन्वय आणि नव्या प्रादेशिक तसेच बहुराष्ट्रीय संस्थांची स्थापना आणि त्यातील सहभाग या सर्व गोष्टी या देशांची सहकार्याची भूमिका अधोरेखित करतात. एशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक, शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन, प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी), सामंजस्य चर्चा आदी भारत-चीन दरम्यानच्या वाढत्या सहयोगाचे द्योतक आहेत. दोन्ही देशांमधील व्यापारात आणि गुंतवणुकीतही वाढ होत आहे. प्रसारमाध्यमांच्या झगमगाटात फारच कमी जणांना माहीत असेल की, महिंद्रा, टाटा, एनआयआयटी आदी भारतीय कंपन्या चीनमध्ये यशाची नवी शिखरे गाठत आहेत. अशाच प्रकारे हुआवेई, शांघाय इलेक्टि्रक, व्हिवो, ऑप्पो आणि लिनोवो यासारख्या चिनी कंपन्या भारतात चांगली उलाढाल करीत आहेत. व्यापार आणि गुंतवणूक वाढत असतानाही, पाहायला गेले तर भारत आणि चीन यांच्या परस्परसंबंधांच्या वर्णनातील मुख्य तत्त्वांपैकी एक म्हणजे 'विश्वासाची कमतरता' असल्याचे आढळते. तीन दशकांच्या आर्थिक आणि सैन्य आधुनिकीकरणाचा परिणाम म्हणून चीनच्या आर्थिक स्थितीने आणि लष्कराच्या वाढत्या प्रभावाने नवी उंची गाठली आहे. त्यामुळे चीनची केवळ आर्थिक सक्रियता वाढली आहे असे नाही, तर सार्वभौमत्त्वाच्या मुद्दयावर वर्चस्वाची आणि विरोधाची प्रवृत्तीही प्रबळ होत आहे. या वाढत्या शक्तीबरोबरच चीनचा शांतिपूर्ण उदय होत असल्याची चर्चा बिनबुडाची ठरत आहे.

शेजारी राष्ट्रांच्या वादग्रस्त सीमांवर अतिक्रमण आणि आक्रमकता, दहशतवादाबाबत चीनची ढिलाईची भूमिका आणि अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये (उदा., सुरक्षा परिषद, अण्वस्त्र पुरवठादार गट आदी) भारताच्या सदस्यत्वात हस्तक्षेप करणे इत्यादींमुळे दोन्ही देशांदरम्यान वाद वाढताना दिसत आहेत. भूभागावरून होणाऱ्या राजकारणाबरोबरच अन्य अनेक मुद्दयांवर भारत आणि चीन दरम्यान प्रतिस्पर्धा सुरू आहे. नैसर्गिक संसाधनांची आवश्यकता असो किंवा नव्या बाजारपेठेचा शोध, ऊर्जेचे नवे स्रोत असोत की विकासाच्या मुद्दयांवर सहकार्य, पायाभूत सुविधांचा विकास असो अथवा शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध, दोन्ही देशांच्या दृष्टीकोनात आणि उद्देशांमध्ये फरक आहे. विस्तारभयामुळे या सर्वच मुद्दयांवर विचार करणे शक्य नाही. कनेक्टिव्हिटीचा मुद्दा दोन्ही देशांमधील स्पर्धा खूप ठळकपणे दर्शवतो.

एकीकडे चीनचे प्रमुख नेतृत्व देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित करत आहे आणि एकविसाव्या शतकाची कल्पना आशियाचे शतक म्हणून करत आहे, मात्र करणी आणि कथनी यांच्यामधील विरोधाभास चीनची दुटप्पी धोरण अधोरेखित करते. सिल्क रोड, आर्थिक बेल्ट आणि समुद्री सिल्क रोड (ओबोर) या आपल्या प्रकल्पांच्या माध्यमातून चीन या शतकाच्या एका सर्वात मोठया भू-राजकारणाच्या उपक्रमाला प्रोत्साहन देत आहे. असेही अनेक महिन्यांपासून 'ओबोर' धोरणाने मोठया आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले आहे. ओबोरच्या मुख्य बैठकीत 29 देशांच्या आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. त्यात अनेक घोषणाही करण्यात आल्या होत्या. ओबोरमध्ये सांगितलेले उद्देश तर चांगले होते, मात्र चीनच्या व्यवहारातील करणी आणि कथनी यामधील विरोधाभासामुळे अनेक राष्ट्रे चीनच्या मूळ हेतूबाबत शंका उत्पन्न करत आहेत. या बैठकीत सहभागी न होणारा भारत हा एकमेव महत्त्वाचा देश होता.


भारताने कनेक्टिव्हिटीबाबतचा आपल्या दृष्टीकोनही जगासमोर ठेवला असून या क्षेत्रातील दोन्ही देशांमधील मतभेद स्पष्ट दिसून येतात. कनेक्टिव्हिटीच्या अनेक योजनांवर काम करताना भारत अन्य देशांचे सहकार्य घेत आहे. जपानच्या सहकार्याने आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉरसाठी घेतलेला पुढाकार हे याच दिशेने उचललेले पाऊल आहे. क्षेत्रीय/उपक्षेत्रीय एकीकरण, तसेच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी नवीन दृष्टिकोनाच्या माध्यमातून भारत आपली बांधिलकी दाखवत आहे. उपक्षेत्रीय (सब रीजिनल), पारक्षेत्रीय (ट्रान्स रीजनल) सहकार्य, उदा., बीबीआयएन (बांगला देश-भूतान-भारत-नेपाळ) आणि बिम्सटेक (Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation) यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून मोदी सरकार क्षेत्रीय एकतेला आणि विकासाला गती देत आहे. क्षेत्रीय सहकार्य आणि व्यापक कनेक्टिव्हिटी यासाठीच्या जबाबदाऱ्यांबात भारत अधिक संवेदनशील होत आहे. प्रादेशिक आणि वैश्विक सुरक्षा, तसेच शांतता यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जगातील गंभीर आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत सरकार मोठया प्रमाणावरील आंतरराष्ट्रीय जनसमुदाय आणि मानवता यांच्या हितासाठी असलेल्या विविध मुद्दयांवर नेतृत्वाची भूमिका बजावत आहे. दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका, आंतरराष्ट्रीय योग दिन, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ही भारताच्या सक्रियतेची काही उदाहरणे आहेत.

चीन आपल्या वाढत्या आर्थिक आणि सामरिक शक्तीच्या जोरावर आपल्या प्रभुत्वाखाली नवी व्यवस्था स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच वेळी भारत सामंजस्याने अन्य देशांना आपल्या विकासात सहभागी करण्यास इच्छुक आहे. भारत ही उदयोन्मुख शक्ती असून चीनच्या तुलनेत तिची प्रतिमा मित्रत्वाची आहे. कुशल नेतृत्व आणि योग्य धोरणे यांच्या क्रियान्वयाने आगामी काळात भारत बहुकेंद्रित विश्वाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावेल. चीनच्या वर्चस्ववादी व्यवस्थेच्या स्वप्नपूर्तीसाठी भारत हे कडवे अाव्हान आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील स्पर्धा अधिकच वाढेल.

rrchaturvedy@gmail.com

शब्दांकन : सपना कदम-आचरेकर

 

 

 

Powered By Sangraha 9.0