ल.म. कडू यांच्या 'खारीच्या वाटा' या पुस्तकाला यावर्षीचा साहित्य अकादमीचा बालसाहित्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ल.म. कडू हे मराठी चित्रकार, प्रकाशक व बालसाहित्यिक आहेत. त्यांचे 'झाड' हे लहान मुलांसाठीचे द्वैभाषिक पुस्तक प्रकाशित झाले आहे. 'जॉर्ज कार्व्हर' यांचे चरित्रही वाचकांच्या पसंतीस पडले आहे. त्याचबरोबर 'खारीच्या वाटा' याच पुस्तकाला सन 2014 साली महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार मिळाला होता.
... अशातच मी टोपीचं दुमडलेलं तोंड मोकळं केलं. तेवढया उजेडात पिलाचे इवलेसे डोळे लुकलुकताना दिसले. काजव्यासारखे. विचार आला, हिचं नाव 'लुकलुकी' ठेवूया. आईनं 'लकाकी' सुचवलं. पण त्यापेक्षा 'लुकी' म्हटलं तर? माझा मलाच आनंद झाला. मनातल्या मनात बारसं करून मोकळा झालो. 'लुकी' नाव पक्कं झालं....
'खारीच्या वाटा'. ल.म. कडू यांच्या या पुस्तकाला यावर्षीचा साहित्य अकादमीचा बालसाहित्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एक छोटा चौथीतला शाळकरी मुलगा खारीचं पिल्लू पाळतो त्याची ही गोष्ट आहे. एक साधं, छोटं कथानक. कादंबरी जेमतेम दीडशे पानांची. वाक्यांची सुटी सुटी रचना असल्याने पानं इतकी भरली. नसता जेमतेम शंभरच भरतील. पण ज्या साधेपणानं, ज्या निरागसतेनं, ज्या उत्कटतेनं यात गावाचं लहान, मुलांच्या विश्वाचं, निसर्गाचं वर्णन आलंय त्याला तोड नाही.
मोरानं जसा पावसाळयात आपला पिसारा उलगडत न्यावा, इतका हा नाजूक विषय ल.म. कडू यांनी वाचकांसमोर उलगडत नेला आहे. मोराचा आणि पावसाळयाचा संदर्भ आठवण्याचं एक कारण म्हणजे या पुस्तकातच तसा संदर्भ आहे. हा छोटा मुलगा आणि त्याचा मित्र दिनू गायरानात गुराखी जनावरं चरायला जातात तिकडे रोज खेळायला जात असतात. त्यांना एक मोठी दगडी उंच शिळा आढळते. त्यांना असं वाटतं की आपण यावर मोराचे चित्र कोरले पाहिजे. त्याप्रमाणे ते कामाला सुरुवात करतात. दोघं मित्र समोरासमोर बसलेले दोन मोर दगडात कोरतात आणि असं नियोजन करतात की हे सगळं काम आषाढाच्या पहिल्या दिवसापर्यंत पूर्ण व्हावं... आणि तसं ते पूर्ण होतंही.
काय पण प्रतिभा आहे..! इकडे कालिदासाच्या मेघदूतात आषाढाच्या पहिल्या दिवशी दिसलेल्या ढगामुळे यक्षाला बायकोची आठवण होते असं वर्णन आहे. आणि इथे या कादंबरीत लेखक आषाढाच्या पहिल्या दिवसापर्यंत मोराचे शिल्प पूर्ण होण्याचा प्रसंग रंगवतो. जेणेकरून पुढच्या नियमित कोसळणाऱ्या पावसात जणू हे मोर नाचणारच आहेत. हे मोर त्या दोन लहान मुलांच्या मनात नाचू लागले हे निश्चित. कडू यांच्या प्रतिभेची आणि त्यांच्या चित्रकार असण्याची साक्ष अजून पुढच्या एका वर्णनात पटते. या मोराच्या शिल्पात खाली रिकामी जागा राहिलेली असते. तिथे त्यांनी पाळलेल्या 'लुकी' खारीचं शिल्प ते रेखाटतात. आणि पुढे ल.म.कडू यांनी असं लिहिलं आहे,
...दोन दिवसांत कोरीव काम पूर्ण झालं. चंदननं 'लुकी' असं नावही कोरलं. 'ल' चा उकार मोठा करून त्याला शेपटीसारखा झुबकाही काढला....
संपूर्ण कादंबरीत लहान मुलांचे विश्व, गावगाडा आणि निसर्ग अशी तीन पातळीवरील वर्णनं आलेली आहेत.
गावातल्या एका लग्नाचं वर्णन करताना सगळा गाव कसा एकमेकात मिसळून गेला आहे हे अगदी साधेपणात नकळतपणे लेखक रंगवून जातो. त्यात कुठेही अभिनिवेश येत नाही. कुठेही शब्दांचा अतिरिक्त फुलोरा नाही.
... लग्न ही काही एका दिवसात उरकायची गोष्ट नसे. आधी हळदी. दुसऱ्या दिवशी लग्न. तिसरा दिवस वरातीचा. चौथ्या दिवशी देवाची 'पांजी'. असा सगळा रमणा. त्यात अख्खा गाव गुंतलेला. 'चूलबंद' निमंत्रण. एकाही घरात चूल पेटत नसे. सारं काही लगीन घरीच. गाव एक कुटुंब होई. बलुतेदार, कातकरी, धनगर त्यातच येत...
चौथीतला हा मुलगा आपल्या शाळेचं, मित्रांचं वर्णनही अगदी सहज बोलता बोलता एखादं चित्र रेखाटावं, रेखाटन काढावं तसं मांडून जातो. खरं तर निसर्ग, गावगाडयातील माणसं ही इतकी एकमेकांत मिसळून गेलेली असतं की त्यांना वेगळं वेगळं काढता येत नाही. लेखक हे सगळं नेमकेपणानं टिपत जातो.
त्याची शाळा भरते आहे तीच मुळी भैरोबाच्या मंदिरात. मंदिराच्या परिसरात भरपूर झाडी. खारी आंबा असा हळूवार खायच्या की त्यांनी खाल्लेला आंबा तसाच झाडाला लटकून असायचा. कधीतरी मोठा वारा आला की तो आंबा पडायचा. त्याचा मंदिराच्या पत्र्यांवर आवाज व्हायचा. पोरांना वाटायचं की हा पाडाचाच आंबा आहे.
ल.म. कडू यांनी जी वर्णनं केली आहेत ती त्यांच्यातल्या प्रतिभावंत चित्रकाराची साक्ष देतात. चित्रापेक्षाही रेखाटनांची जास्त आठवण येते. आता एक वर्णन आहे शाळा भरते, त्या भैरोबाच्या देवळाचं.
...देवाची मूर्ती दगडाची. काळी कुळकुळीत. गुळगुळीत. वर छोटी कमान. मधोमध लटकती पितळी घंटा. भरवती नवसाचे पाळणे, नारळाच्या वाटया, तांबडी निशाणं, बारक्या घंटया असं काही बाही अडकवलेलं. गाभारा अंधूक. देवापुढं दगडी चीप. त्यावर नारळ फुटत. कमानीच्या आत दोन लहानग्या देवळया. त्यात दगडी पणत्या. तेलानं मेणचटलेल्या. वात लावल्यावर उजेड पांगायचा. भैरोबाची मूर्ती स्पष्ट दिसायची. चांदीचे डोळे चमकायचे...
चित्रपटात एखादा निकराचा हाणामारीचा जगण्या-मरण्याशी संबंधित 'क्लायमॅक्स'चा प्रसंग असतो तसा, एक छोटा पण फार प्रत्ययकारी प्रसंग लेखकानं यात रंगवला आहे. एकदा ही खार या छोटया मुलांच्या खांद्यावरून बैलाच्या अंगावर जाऊन पडते. काहीतरी अंगावर बसलं म्हणून तो झटकायला जातो. भिऊन लुकी त्याच्या वशिंडाजवळ येऊन चिकटून बसू लागत, तसतसा तो बैल चवताळत जातो, तो बेभान होतो. तसतशी खार अजूनच त्याला भितीनं चिकटून राहते. बैल अजूनच चवताळतो. उधळतो. आता काय होणार म्हणून सगळे भयचकित होऊन पहात असतात. खारीनं खाली उडी मारावी असं सगळयांना वाटत असतं, पण तसं सांगणार कसं? बैलाच्या शेपटाच्या माऱ्यानं शेवटी ही लुकी खाली पडते. ती निपचित पडते हे पाहून छोटया मुलाच्या काळजाचा ठोका चुकतो. त्याचा मित्र दिनू त्याला समजावतो. शेवटी जेव्हा लुकी थोडी मान हलवते तेव्हाच याच्या जीवात जीव येतो.
कांदबरीभर असे प्रसंग विखुरलेले आहेत. लाकडाच्या रचलेल्या ढिगात साप शिरतो असा समज होतो. त्या जागेतून तो बाहेर काढायचा तर एवढी मोठी लाकडं बाहेर काढावी लागणार. ते तर शक्य नसतं. मग दिनू सुचवतो की लुकीला आपण या ढिगात सोडू. ती अलगद पुढच्या फटीतून बाहेर आली की कळेल धोका नाही. आणि धोका असेल तर ती परत सोडल्या रस्त्यानंच वापस येईल. त्याप्रमाणे लुकीला सोडतात. ती सुखरूप पलीकडच्या बाजूनं बाहेर येते तेव्हा सगळेच निःश्वास सोडतात की आत साप नाही.
असे प्रसंग तर अतिशय विलक्षण असे उतरले आहेत.
कादंबरीचा शेवट अतिशय प्रत्ययकारी केला आहे. धरण होणार म्हणून गाव उठतं. सगळे घरदार सोडून सामान-सुमान बांधून जायला निघतात. हा छोटा मुलगा लुकीला पण आपल्या सोबत घेऊन जाऊ पहात असतो. पण त्याचा पायच गावातून निघत नसतो.
... माझी वाट बघून ट्रकचा रबरी भोंगा 'पोंऽऽ पों ऽऽ' वाजायला लागला. निघायलाच हवं होतं. उठून उभा राहत होतो, इतक्यात लुकी घाईनं डाव्या हातावरून खाली उतरली. एकवार माझ्याकडं पाहिलं आणि मंद चालीनं चिंचेच्या झाडाकडे गेली. बुंध्याजवळ थबकली. पुन्हा वळून पाहिलं आणि त्याच गतीनं चिंचेवर चढली. नाराज झाली की तिची चाल मंद व्हायची. तिला गाव सोडायचा नव्हता. 'सोड' असं कुणी म्हणूही शकत नव्हतं. आईची हाक आली. ट्रककडे गेलो. आईच्या हातात कापण्यांची पुरचुंडी होती. दिनूनं दिलेली. ती घेऊन चिंचेकडे धावलो. आडव्या फांदीनं वर चढलो. दोन फांद्यांच्या बेचक्यात पुरचुंडी नीट ठेवली. 'दिन्यानं तुझ्यासाठी कापण्या दिल्यात. पुरवून पुरवून खा..' असं काहीतरी सांगावंसं वाटत होतं. ती माझ्याकडं बघत होत आणि मी तिच्याकडं.....
जागतिक वाड्ःमयात शोभून दिसावी अशी कलाकृती एका मराठी लेखकाच्या हातून घडली याचा अभिमान आहे आणि तिचा सन्मान आज मोठया महत्त्वाच्या पुरस्कारानं होतो आहे याचा मनापासून आनंद आहे.
- जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद
9422878575