'स्नेहवन'च्या वाटेत आर्थिक काटे

21 Jul 2017 12:50:00


आख्खा जन्म सरतो, पण स्वत:चा शोध काही लागत नाही. त्यासाठी काही ध्येयवेडी माणसे स्वत:मध्ये डोकावतात. ते ध्येय साध्य करण्यासाठी झपाटून जातात. दिवस-रात्र, तहान-भूक विसरून एकटेच त्या खडतर प्रवासाला निघतात. अशा चाकोरीबाहेर जाऊन स्वत:चा शोध घेणाऱ्या ध्येयवेडया अशोक देशमाने या तरुणाच्या भोसरी येथील स्नेहवन प्रकल्पाच्या वाटेत आर्थिक काटे उभे राहत आहेत. आयटी क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आशेचा किरण दाखवणाऱ्या अशोक देशमाने या तरुणाची कथा प्रेरणादायी आहे. तो आता दुष्काळग्रस्त भागातील 25 मुलांचा आधारवाड बनला असला, तरी या मुलांचे संगोपन करण्यासाठी त्याला मोठी कसरत करावी लागत आहे. अशोकच्या कामास बळ देण्यासाठी प्रत्येकांचा मदतीचा हात लागणे आवश्यक आहे.

रभणी जिल्ह्यातील मंगरूळ (तालुका मानवत) या आडवळणाच्या, दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावातल्या एका शेतकरी दांपत्याचा अशोक हा मुलगा. कोरडवाहू शेतीवरच कुटुंबाची उपजीविका. घरात वारकरी परंपरा, घरची परिस्थिती जेमतेम असल्याने अशोकला शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागला. घरची परिस्थिती बदलायची असेल तर आपण खूप शिकले पाहिजे, अशी त्याने खूणगाठ बांधली. मंगरूळमध्ये सातवीपर्यंत शिकल्यानंतर तो परभणीत आला. आठवीत असताना त्याला कविता करण्याची गोडी लागली. दहावीमध्ये चांगले गुण मिळाल्याने परभणीतील ज्ञानोपासक महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला. बारावीच्या वर्षातही त्याला सुट्टीच्या दिवशी काम करावे लागले. ट्रकच्या टपावर झोपून त्याला रात्र काढावी लागली. मिळेल ते काम करून त्याने शिक्षण घेतले. मित्राचे जुने कपडे घालायला मिळत असत. आर्थिक अडचणीमुळे त्याला सहा सहा महिने गावाकडे जाता येत नसे. गावाकडे सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे त्याचे मन बैचेन व्हायचे. परभणीत एम.एस्सी.पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने हैदराबाद येथून बी.सी.एस. पूर्ण केले. त्यानंतर तो पुण्यात हडपसर इथे एका मोठया आयटी कंपनीत नोकरीस लागला. कंपनीतील त्याचे तरुण मित्र ऐशआरामात जगत होते. पण अशोकचे मन मात्र सतत अस्वस्थ असायचे. वर्तमानपत्रातून मराठवाडयातल्या दुष्काळाच्या बातम्या यायच्या. त्या बातम्या वाचून अशोकमधला संवेदनशील कवी जागा व्हायचा. अशोकने दुष्काळावर अनेक गंभीर कविता केल्या आहेत. 2014-15 साली मराठवाडयात पडलेल्या भीषण दुष्काळाने तो खूपच अस्वस्थ झाला. ना कुठे पाणी, ना कुठे पीक, इथल्या माणसांसाठी जगण्यासाठी ना मोठा स्रोत होता.

 तो एकदा दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे गेला असता तेथील एका शेतकऱ्याने दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या कानावर पडली. तो त्या बातमीने मनातून हादरून गेला. त्याचे गाव, गावकरी, शेजारीपाजारी दुष्काळाच्या भीषण संकटाशी मुकाबला करत असल्याचे पाहून त्याचे मन बेचैेन झाले. अनेक कुटुंबे शहराकडे स्थलांतरित होत होती. जिथे जगण्यासाठी काहीच स्रोत नाही, तिथे राहून काय करायचे? अशी माणसांची मानसिकता बनत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. गावोगावच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमालीची घटत होती. अर्धवट शिक्षण सोडून मुलेही आपल्या आई-वडिलांसोबत शहराकडे धाव घेत होती. हे सर्व दृश्य पाहून अशोकमधला माणूस हळूहळू जागा होऊ लागला. आपण शिक्षण घेतल्यामुळे माझे कुटुंब सुखी आहे, पण माझ्या गावातील, माझ्या भागातील असंख्य आशेची किरणे अस्मानी संकटात होरपळत असल्याची जाणीव जागी होऊन अशोक पुण्याला आला. कंपनीच्या कामात त्याचे मन लागत नव्हते. अशोकसमोर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्याचा आदर्श होता. तो आपल्या पगाराचा एक दशांश भाग समाजकार्यासाठी देत असे. त्याच्या मनात रुजलेल्या या बीजातून 'स्नेहवन'ची निर्मिती झाली. एके दिवशी त्याने समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. आयटी कंपनीतील नोकरी सोडून मराठवाडयातल्या स्थलांतरित मुलांसाठी पूर्णवेळ काम करणार असल्याचे सांगितले. डॉ. प्रकाश आमटे यांनी नोकरी सोडून घाईघाईने कोणत्याही निर्णय न घेण्याचा धीराचा सल्ला दिला. दुष्काळग्रस्त मुलांसाठी काम करण्यासाठीचे स्वप्न त्याला सतत खुणावू लागले. अशोकने डिसेंबर 2015 साली 'स्नेहवन' नावाची संस्था रजिस्टर केली. जागा शोधली. या कामास अनिल कोठे या कवीमित्राची मोठी मदत मिळाली. कोठे यांनी आपले रिकामे घर दिले.

स्वत:जवळ असलेल्या भागभांडवलावर बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, संभाजीनगर या जिल्ह्यांमधल्या गावागावात जाऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊ लागला. त्यासाठी त्याला पालकांची मनधरणी करावी लागली. पहिल्याच प्रयत्नात अठरा विद्यार्थी सापडले. मुले सुरुवातील राहण्यास राजी होत नव्हती, परंतु अशोकने त्यांचे मनपरिवर्तन केले. प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने अशोकच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अनेक महनीय व्यक्तींकडून स्नेहवनाच्या कामास शुभेच्छा मिळत होत्या. मुलाची समाजसेवा पाहून आई-वडील स्नेहवनात राहू लागले. वडील मुलांना भजन-कीर्तन शिकवू लागले. मुलांना स्नेहवनाची गोडी लागू लागली. मुले भोसरी येथील एका मराठी शाळेत शिकू लागली. शालेय साहित्य, कपडे, जेवण, राहणे असे संगोपन स्नेहवनाच्या माध्यमातून होत असल्याचे पाहून अनेक पालक भेट देऊ लागले. आई जवळपास तीस जणांचा तीन वेळा स्वयंपाक करून ठेवत असे. आता एकूण पंचवीस मुले स्नेहवनाची निवासी झाली आहेत.

नोकरी सांभाळून मुलांना पूर्ण वेळ देता येणे अशोकला शक्य नव्हते. नोकरी सांभाळून मुलांसाठी वेळ देताना त्याची ओढाताण होऊ लागली. त्याच्या वरिष्ठांनी त्याला रात्रपाळी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अशोक दिवसाकाठी जेमतेम दोन तासांची झोप घेऊन दिवसाचा वेळ मुलांना, तर रात्री आपल्या नोकरीसाठी देऊ लागला. त्याने अशी तारेवरची कसरत आठ ते नऊ महिने केली. ऑगस्ट 2016मध्ये त्याने नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्याने पूर्णवेळ कामासाठी वाहून घेतले. कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी तो पायाला भिंगरी लावून फिरू लागला.

अशोकचे शिक्षण, नोकरी, संवेदनशीलता पाहून त्याला लगनसासाठी बरीच स्थळे येऊ लागली होती, पण अशोकने मात्र स्नेहवनच्या कार्याला वाहून घेतले होते. आई-वडिलांच्या आग्रहाखातर तो लग्नासाठी तयार झाला, पण हुंडा न घेण्याच्या अटीवर. कारण अशोक हुंडा घेण्याच्या प्रथेविरुध्द होता. त्यामुळे त्याने परभणी जिल्ह्यातल्या एक  शेतकऱ्याच्या मुलीशी 21 नोव्हेंबर 2016 रोजी साधेपणाने विवाह केला. लग्न झाल्याच्या तिसऱ्या दिवशी तो गावाहून स्नेहवनात आला. पत्नी अर्चनाही अशोकच्या कामात मदत करू लागली. लग्न झाल्यापासून ती एकदाही माहेरी गेली नाही. साधनाताई आमटे यांचे 'समिधा' हे पुस्तक वाचून तिच्यात परिवर्तन झाले आहे, असे ती म्हणते, सध्या मुलांची संख्या अठरावरून पंचवीसवर पोहोचली आहे. मुलांच्या तीन वेळच्या जेवणाची आणि अभ्यासाची जबाबदारी अर्चना सांभाळते. अशोकही मुलांकडून अभ्यास करून घेतो. गाणी, चित्रकला, तबला-हार्मोनियमनचे धडे देण्यासाठी प्रयत्न करत असतो. मुलांत आत्मविश्वास वाढावा म्हणून सूर्यनमस्कार, योग, कराटे शिकवण्यात येते. रोज संध्याकाळी मोकळया मैदानात गोलकार बसवून रिंगण नामक खेळ घेते. या खेळामुळे मुलांना चारचौघांत कसे बोलायचे हे शिकवले जाते. कविता, संभाषण, वादविवाद होत असल्यामुळे मुलांमधला भित्रेपणा जाऊन आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आठवीच्या कविता तिसरीच्या मुलाला पाठ आहेत. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागली आहे. मुले संगणकावर मराठी टायपिंग शिकू लागली आहेत. त्यासाठी लेखिका लीनाताई मेहेंदळे यांचे सहकार्य मिळत आहे. एकत्र जीवन, एकत्र जेवण या कल्पनेतून मुलांना अशोक व स्नेहवन आपले घर वाटू लागले आहे.

स्नेहवनात प्रसाद कांबळे हा सहा वर्षांचा चुणचुणीत मुलगा आहे. तो परभणीचा, त्याला चार बहिणी आहेत. वडील नाहीत, आईवरच घरचा संसार चालतो. त्याला कलेक्टर व्हायचे आहे, असे म्हणतो. अशोकने या निरागस बालकांच्या डोळयात स्वप्ने पेरली आहेत. जालना येथील राम राठोड व लखन राठोड हे दोन सख्खे भाऊ पाचवीत शिकत आहेत. वर्गातली ही हुशार जोडी आहे. आई-वडील सतत स्थलांतर करत असल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर कुऱ्हाड कोसळली होती. बीडचा सुदाम गारदी व लक्ष्मण गारदी हे ऊसतोड कामगाराची मुले. हे दोघेही चौथीत शिकत आहेत. परभणीचा राम मगर हा उत्तम गायन करतो, तर ओम्कार राऊत हा स्वादिष्ट खिचडी बनवण्यात पटाईत आहे. स्नेहवनातल्या प्रत्येक मुलात एक संवेदनशील कथा दडलेली आहे. या प्रत्येक मुलांत विशिष्ट गुण दडलेले आहेत. कुणाला डॉक्टर व्हायचे आहे, तर कुणाला भारतीय जवान, तर कुणाला पोलीस व्हायचे आहे. स्थलांतर झालेल्या मुलांमध्ये परिवर्तनाची दिशा अशोक देशमाने या 27 वर्षीय तरुणाने पेरली आहे.

 अशोकने पाच वर्षे केलेल्या नोकरीतून साठवलेले पैसे स्नेहवनच्या कामी येत असले, तरी आता अपुरे पडत आहेत. निवासी विद्यार्थ्यांचा दरमहा तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च येत आहे. असा महिनाकाठी साठ हजारांचा खर्च आहे. स्नेहवनजवळच असलेल्या नंदी समाजातील मुलींचे शैक्षणिक खर्चही अशोकने उचलले आहेत. विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे स्नेहवनची जागा अपुरी पडत आहे. मुलांना खेळण्यासाठी खासगी जागेचा वापर करावा लागत आहे. जेवणाचा खर्च, मुलांचे आरोग्य, शैक्षणिक खर्च व बाकीचे आर्थिक गणित सोडवताना अशोकला मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. महिन्याकाठी मदत करेल असे कुणी नाही, त्यासाठी त्याला एकटयालाच संघर्ष करावा लागत आहे.


जी जागा मिळाली आहे, ती अपुरी पडते आहे. स्नेहवनच्या कामात सातत्य राहावे, यासाठी अशोक व अर्चना या दांपत्याने आपल्या गरजा कमी केल्या आहेत. दुसऱ्याने दिलेले कपडे ते परिधान करतात. अशोकने तर जीन्स घालायचे सोडून दिले आहे. या दोघांनी आपल्या सुखाचे पिरॅमिड स्नेहवनात शोधले आहे. हे दोघेही अत्यंत साधे जीवन जगण्याचा प्रयत्न करताहेत. अशोकच्या या कामामुळे त्याच्या मातापित्यांनी पंढरीची वारी सोडून दिली आहे. स्नेहवन हीच आमची पंढरी आहे अशी त्यांची धारणा बनली आहे. समाजातला चांगुलपणा हरवत चालला आहे. हा चांगुलपणा जपण्याचे कार्य काही मोजके लोक करत आहेत, त्यात अशोकच्या कामाचा समावेश होतो. दुष्काळग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर चैतन्य आणण्यासाठी तो दिवस-रात्र, तहान-भूक विसरून काम करत असला, तरी स्नेहवनातील मुलांच्या पंखांना बळ देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींचा मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे. 9970452767

 

बँक तपशील

l खात्याचे नाव - स्नेहवन

l बँकेचे नाव - स्टेट बँक ऑफ इंडिया

l बँक शाखेचे नाव - पिंपरी शहर

l एमआयसीआर - 411002019

l खाते क्र. - 35517151681,

l शाखा कोड - 05923

l आयएफएससी कोड - एसबीआयएन0005923

 

Powered By Sangraha 9.0