हिंदू समाज, त्याचे तत्त्वज्ञान, त्याची संस्कृती, त्याची अस्मिता, ओळख विसाव्या व एकविसाव्या शतकातही कालबाह्य झालेली नसून त्यातील आव्हानांना तोंड देण्यास ती समर्थ आहे हा विश्वास संघाने हिंदू समाजात निर्माण केला, हे संघाचे ऐतिहासिक कार्य आहे. संघ निर्माण करीत असताना त्या वेळचे भारताच्या स्वातंत्र्याचे उद्दिष्ट वगळता डॉक्टरांनी कोणतेही एक विशिष्ट ध्येय संघाच्या डोळयासमोर ठेवले नाही. हिंदू समाज जसजसा संघटित होत जाईल, तसतशी समोर येणाऱ्या सर्व प्रश्नांची हाताळणी करण्याची क्षमता त्याच्या अंगी आपोआप येत जाईल, या गृहीतावर संघाची स्थापना झाली.
सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांवर 'शिवाजी ऍंड हिज टाइम्स' असा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या अखेरीस शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कामगिरीचे महत्त्व सांगताना ते म्हणतात,
'हिंदू समाजात केवळ जमादार किंवा चिटणीसच उत्पन्न होत नाहीत, तर त्यात राज्य करू शकण्याची व राजा होण्याची क्षमता असलेले लोकही निर्माण होऊ शकतात, हे त्यांनी सिध्द केले. अलाहाबादमधील अक्षय वटवृक्ष जहांगीर बादशहाने मुळासकट कापून टाकला आणि त्यातील खोडावर उकळत्या लोखंडाचा लालभडक रस ओतला. त्या वटवृक्षाला आपण कायमचे मारून टाकले याचे कौतुकही करून घेतले. पण आश्चर्य! अवघ्या वर्षभरात तो लोखंडी अडसर बाजूला सारून तो वृक्ष पुन्हा पल्लवित होऊ लागला!
हिंदू समाजाचा वृक्ष अजूनही मृतवत झाला नसून शेकडो वर्षांच्या राजकीय गुलामगिरीनंतरही आणि प्रशासकीय अधिकार आणि कायदे बनविण्यापासून वंचित राहूनही त्याला पुन्हा नवी पालवी व शाखोपशाखा फुटू शकतात, पुन्हा आकाशात तो झेपावू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले.'
अलाहाबादमधील अक्षय वटवृक्ष जोवर अस्तित्वात आहे, तोवर हिंदू समाजाचे अस्तित्व राहणार आहे या श्रध्देवर आघात करण्याकरिता जहांगीराने जसा अक्षय वटवृक्ष कापून त्यावर लोखंडाचा लाल रस ओतला, तसेच स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये हिंदू समाजाचा स्वाभिमान, अस्मिता यावर इतके आघात केले गेले की हिदूंची संख्या राहिली असली, तरी एक समाज म्हणून त्याचे अस्तित्व जवळजवळ संपत आले होते. म्हणून टाइम्सचे माजी संपादक गिरिलाल जैन यांनी 'हिंदू फिनोमिना' या पुस्तकाच्या प्रारंभीच म्हटले की जर श्रीरामजन्मभूमी चळवळीला हे यश मिळाले नसते, तर हे पुस्तक लिहिण्यास ते प्रवृत्त झाले नसते. त्यांच्या मते मुस्लीम प्रभावापासून मुक्त होण्याचा हिंदू समाजाचा प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आला असून भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आपल्या पुस्तकात त्यांनी हिंदू समाजाच्या पुनरुत्थानाचा व्यापक आढावाही घेतला आहे. आज घडणाऱ्या घटनांचा अन्वयार्थ लावायचा असेल, त्या पुस्तकाचे पुन्हा एकदा वाचन करणे अनिवार्य आहे.
हिंदू समाज, त्याचे तत्त्वज्ञान, त्याची संस्कृती, त्याची अस्मिता, ओळख विसाव्या व एकविसाव्या शतकातही कालबाह्य झालेली नसून त्यातील आव्हानांना तोंड देण्यास ती समर्थ आहे हा विश्वास संघाने हिंदू समाजात निर्माण केला, हे संघाचे ऐतिहासिक कार्य आहे. संघ निर्माण करीत असताना त्या वेळचे भारताच्या स्वातंत्र्याचे उद्दिष्ट वगळता डॉक्टरांनी कोणतेही एक विशिष्ट ध्येय संघाच्या डोळयासमोर ठेवले नाही. हिंदू समाज जसजसा संघटित होत जाईल, तसतशी समोर येणाऱ्या सर्व प्रश्नांची हाताळणी करण्याची क्षमता त्याच्या अंगी आपोआप येत जाईल, या गृहीतावर संघाची स्थापना झाली. त्यावर 'संघ तरुणांचे लोणचे घालतो' यापासून अनेक प्रकारे टीका झाली. परंतु या टीकेकडे लक्ष न देता संघ वाढत राहिला. वाढत्या संघाच्या शक्तीबरोबर या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळत गेली. श्रीरामजन्मभूमी चळवळीने भारतीय राजकारणाचे व समाजकारणाचे स्वरूप बदलून गेले. गिरिलाल जैन यांनी केलेल्या विश्लेषणाप्रमाणे 'एका बाजूने काँग्रेसप्रणीत विचारधारा आणि त्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या संस्था कालबाह्य होत जात असताना हिंदू प्रेरणेतून निर्माण झालेली वैचारिक व संस्थात्मक चळवळ तिची जागा घेणार, हे स्पष्ट झाले आहे. अशी प्रक्रिया कधी एका सरळ रेषेत घडत नाही. ती अनेक वळणे घेत असली, तरी तिची दिशा कायम असते.'
संघाच्या क्रांतीचे स्वरूप
संघाच्या स्थापनेपासून आजवर संघाचा जो प्रवास झालेला आहे व त्या प्रवासात संघाला अनेक आंतरिक व बाह्य प्रश्नांना तोंड द्यावे लागले, तो प्रवास केवळ चित्तवेधकच नाही, तर अनेक नव्या सामाजिक संकल्पनांना जन्म देणारा आहे. संघाने एक दीर्घकालीन धोरणात्मक बाब म्हणून सामाजिक परिवर्तनासाठी संघर्षात्मक भूमिका घेतली नाही. मात्र सकारात्मक भूमिका घेत असताना जिथे अपरिहार्यपणे संघर्ष करावा लागला, तेथेही तो धैर्याने केला. असे असतानाही आपल्या अस्तित्वासाठी व वाढीसाठी संघाने जो दीर्घकाळ संघर्ष केला, तेवढा व तसा संघर्ष इतिहासातील काही मोजक्याच चळवळींना करावा लागला असेल. हिंदू समाजामध्ये नवचेतना निर्माण करण्याव्यतिरिक्त संघापाशी दुसरा कोणताच कार्यक्रम नाही. अशा स्वरूपाच्या अमूर्त संकल्पनेवर सर्व समाजव्यापी संघटन उभे करण्याकरिता त्या समाजाला त्याची आवश्यकता पटविणे हे खूप आव्हानात्मक आहे. समाजाच्या विशिष्ट प्रश्नावर लक्ष केंद्रित करून चळवळ उभी करणे सोपे असते. कारण तो प्रश्न समाजाला बोचत असतो आणि त्याची कारणे समाजाला पटवून सांगणेही सोपे असते. पण जिथे कार्यकर्त्यांना अगदी मोक्षासारख्या पारमार्थिक लाभाचीही हमी न देता, सर्व आयुष्य देण्याची प्रेरणा निर्माण करणे व पिढयानपिढया टिकवून ठेवणे सोपे काम नाही. त्याचबरोबर हिंदू समाजातील विविध समाजघटकांना सोबत घेऊन जाण्यासाठी निश्चित दिशा असणारी पण पुरेशी लवचीकता असणारी अनोखी कार्यपध्दती संघाने विकसित केली आहे. त्या आधारावर हिंदू समाजाचे सामूहिक ऐक्य कायम ठेवून त्याची सामूहिक कर्तृत्वशक्ती जागृत करणारी यंत्रणा संघाने यशस्वीपणे उभी केली आहे. या व्यवस्थापन तंत्राचाही शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. हिंदू समाजाची केंद्रीय व्यवस्थापन यंत्रणा लयाला जाऊन अनेक शतके लोपली आहेत. संघाने त्या यंत्रणेचे नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले आहे. संघप्रेरणेतून स्थापन झालेल्या विविध संस्थांच्या रूपाने हिंदू समाजाचा सर्वांगीण विचार करणारे सामूहिक व्यासपीठ तयार झाले आहे.
संघ हे परस्पर विश्वासावर आधारलेले स्वायत्त संघटन आहे. असा विश्वास निर्माण होण्याकरिता संघटनेमध्ये मूल्यात्मक वातावरण तयार करावे लागते. मूल्यात्मकता केवळ भाषणे देऊन निर्माण होत नाही, तर तशी जीवनमूल्ये प्रत्यक्ष जगणाऱ्या व्यक्ती जेव्हा प्रेरणा देतात, तेव्हाच त्यांचा संस्कार होतो. देशभरामध्ये अशी हजारो व्यक्तिमत्त्वे तयार झाली, तेव्हाच संघाचे कार्य देशभरात पसरले. लो. टिळकांनी 'गीतारहस्य'द्वारे गीतेचा खरा अर्थ निष्काम कर्मयोगाच्या उपदेशात आहे असे प्रतिपादन केले होते. संघाने त्यात थोडा बदल करून राष्ट्रार्थ कर्मयोगाच्या आचरणाची प्रेरणा दिली. प्रत्येक व्यक्ती ही स्वत:ची विशेषता घेऊन जन्माला येत असते व त्या विशेषतेनुसार व त्यासाठी जगण्यातच खरा आनंद असतो. हिंदू संस्कृतीमध्ये सामाजिक विषमतेसारखे अनेक दोष असले, तरी त्याचबरोबर एकरूपतेसाठी विविधतेचा बळी न देताही यशस्वी सहजीवन जगता येऊ शकते याचा आदर्श वस्तुपाठ या संस्कृतीने जगासमोर ठेवला आहे. आजवर जगाला एकत्र करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न झाले, ते एकरूपता निर्माण करणारे होते. ख्रिश्चन, इस्लाम यांनी धार्मिक आधारावर अशी एकरूपता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कम्युनिझमने हुकूमशाही राजवट आणून ती आणण्याचा प्रयत्न केला. जागतिकीकरणातून बाजारपेठीय अर्थव्यवस्था आणून ती करण्याचा प्रयत्न झाला. पण या प्रत्येक प्रयत्नाला तेवढीच तीव्र प्रतिक्रियाही निर्माण झाली. जोवर व्यक्ती, संस्था, समाज यांचे संबंध केवळ कायद्याच्या किंवा नियमांच्या आधारे राहतील, तोवर परस्पर विश्वासाची भावना निर्माण होणे अवघड आहे. संघर्ष प्रथम मनामध्ये निर्माण होतात, मग त्याचे प्रतिबिंब व्यवहारात पडते. फ्रेंच तत्त्वज्ञ रुसो याने त्या वेळच्या नागरी समाजव्यवस्थेवर टीका करीत असताना त्यातील तीन दोषांचा उल्लेख केला होता. ते आजही जसेच्या तसे लागू पडतात. या समाजव्यवस्थेत प्रत्येक जण दुसऱ्याचा सहकारी नसतो, तर प्रतिस्पर्धी असतो, हा पहिला दोष. त्यामुळे दुसऱ्याबद्दल आत्मीय भाव निर्माण होण्याऐवजी परात्मभाव निर्माण होतो व तो एवढया टोकाला जातो की माणूस स्वत:लाच परका बनून जातो. दुसरा दोष म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपली खरी ओळख देण्याऐवजी आपली प्रतिमा जगावर ठसविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आपले वास्तव आणि निर्माण केलेली प्रतिमा यांच्या संघर्षात ती व्यक्ती मनाने उद्ध्वस्त होते. तिसरा दोष म्हणजे या समाजरचनेत सामूहिक हित व व्यक्तिगत हित यामध्ये संघर्ष निर्माण होतो. या संघर्षामध्ये व्यक्ती मनाने दुभंगून जाते. आपल्याभोवती अशा अनेक व्यक्तींचा अनुभव आपण घेत असतो. या पार्श्वभूमीवर संघाने प्रथम मानसिक क्रांती घडविली व त्यातून जे कार्यकर्ते निर्माण झाले, त्यांनी समाजाच्या विविध क्षेत्रात कामे उभी केली.
दिशा आणि वळणे
वास्तविक पहाता संघाशी वैचारिक विरोध असला, तरी गेल्या नव्वद वर्षांत उपेक्षा व विरोध सहन करून संघाचा विकास कसा झाला, याचे तटस्थपणे निष्कर्ष काढणे ही सामाजिक निरीक्षकांची जबाबदारी होती. संघाच्या कामाची पध्दत पारंपरिक हिंदू चौकटीत बसणारी नाही. त्यामुळे अशा पारंपरिक मार्गाचे जे नैसर्गिक लाभ मिळतात, ते संघाला मिळाले नाहीत. केवळ श्रीरामजन्मभूमीच्या लढयातच शिलापूजन यासारख्या पारंपरिक मार्गाचा आंदोलनात मोठया प्रमाणावर उपयोग केला. राष्ट्रीय प्रश्नावर जागृती हाच संघाच्या व संघसंबंधित संस्थांच्या प्रचाराचा गाभा राहिलेला आहे. दोषावर टीका करण्याऐवजी समाजातील गुणनिर्मितीवर भर देण्याचा मार्ग संघाने स्वीकारला. आज संघाचे स्वरूप या सामाजिक गुणनिर्मितीच्या आंदोलनासारखे झाले आहे. कोणत्याही एका विशिष्ट प्रश्नावर भर देण्याऐवजी हिंदू समाजाचे सर्वंकष परिवर्तन हीच संघाची कार्यसूची राहिली आहे. कोणत्याही कारणाने एखाद्या संस्थेने या कार्यसूचीऐवजी वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचे परिणामही भोगावे लागले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेनंतर गांधीवादी समाजवादाचा स्वीकार करून सत्ता लवकर मिळेल असे भाजपाला वाटले. पण त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. श्रीरामजन्मभूमीच्या लढयानंतर तोच एकमेव मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे असे विश्व हिंदू परिषदेला वाटू लागले, त्याचेही तसेच परिणाम झाले. वाजपेयी सरकारच्या काळातील स्वदेशी जागरण मंचाचा विषय असो की गोव्यातील भाषा सुरक्षा मंचाचा विषय असो, सामूहिक एकतेऐवजी जेव्हा जेव्हा काही व्यक्तींनी वा संस्थांनी विशिष्ट मुद्दयांवर अधिक भर देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचे विपरीत परिणाम झाले आहेत. फक्त इतर संस्था व संघ यात फरक एवढाच आहे की आलेल्या अनुभवानुसार तत्त्व न सोडता धोरणांत बदल करण्याची लवचीकता संघाच्या नेतृत्वाने दाखविली. सकारात्मक भूमिकेतून संघाची लक्षावधी कामे सुरू असताना काही अपवादात्मक घटनांना गरजेपेक्षा अधिक प्रसिध्दी देऊन प्रसारमाध्यमातून संघाची जी प्रतिमा उभी केली जाते, त्यामुळे संघविरोधकांना समाधान मिळत असले, तरी त्याचा संघाच्या कामावर किंवा आता लोकांवरही फारसा परिणाम होत नाही.
संघाने ज्या विचारांवर संघटना उभी केली, तिची कक्षा व्यक्तिगत प्रेरणेपासून वैश्विक विचारापर्यंत आहे. जेव्हा प्रत्येक राष्ट्र हे सकारात्मक विचारांवर उभे राहील, तेव्हाच प्रत्येक देशाचे वेगळेपण टिकवूनही त्यांच्यात सामंजस्याची भावना तयार होईल. जग बदलण्याचा विचार केवळ आपल्यापाशीच आहे व जगाने त्याचा स्वीकार केल्याशिवाय जगापाशी दुसरा तरणोपाय नाही असा संघाचा दावा नसून व्यवहारिक भेदांच्या पलीकडे सर्वांना सामावून घेणारे एक तत्त्व आहे याची अनुभूती जेव्हा येत जाईल, तेव्हा व्यावहारिक भेद राहूनही ते सोडविण्यासाठी सामंजस्याचे वातावरण तयार होईल, असा विश्वास त्यामागे आहे.
विचारवंतांमध्ये संघसंबंधी गैरसमज असण्याचे आणखीही एक कारण आहे. अनुभूती व कृतिशीलता हा आजवरच्या संघाच्या कामाचा मुख्य आधार असल्याने आज जी वैचारिक परिभाषा बोलली जाते, त्या परिभाषेत संघाच्या कामाची माहिती करून देण्याचे प्रयत्न जेवढया गांभीर्याने झाले पाहिजेत, तेवढे झाले नाहीत. आज भारतात सेक्युलॅरिझम, इहवाद ही बदनाम झालेली संकल्पना आहे. तिचा खरा अर्थ जाणून घेण्याऐवजी तिला हिंदुत्वविरोधी म्हणून चर्चिले गेले. चर्च विरुध्द स्टेट एवढयापुरता त्या संकल्पनेचा अर्थ मर्यादित नाही. ती जीवनाकडे पाहण्याची एक दृष्टी आहे. त्या संकल्पनेमुळे पश्चिम युरोपातील देश सामर्थ्यवान झाले. त्या संकल्पनेत त्रुटी आहेत, पण ती संकल्पना म्हणजे मानवी बुध्दीने घेतलेली मोठी सांस्कृतिक झेप आहे. तिचा आवाका समजून घेतल्यानंरच तिच्या मर्यादांवर हिंदू तत्त्वज्ञानाच्या आधारे मात करता येईल का? यावर विचार करणे शक्य होईल. हे सर्व घडेल त्याचवेळी हिंदू समाजाच्या पुनरुत्थानाची प्रक्रिया पूर्ण झाली असे म्हणता येईल.
kdilip54@gmail.com