बदलाची सुरुवात स्वत:च्या परिसरापासून

18 Apr 2017 17:25:00

 नागरी समस्या सोडविणे हे एकटयादुकटयाचे काम नक्कीच नाही. संघटित शक्तीने अशा समस्यांवर मार्ग काढणे शक्य होते. वरळी ते लोअर परळपर्यंतच्या परिसरातील नागरिकांची 'वरळी रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन' ही अशाच संघटित शक्तीचे उदाहरण आहे. खरे तर ही एएलएम (ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट) आहे. एएलएम ही नागरिकांची संघटना नागरी समस्या सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने प्रयत्न करते. या भागातील 10 ते 12 निवासी सोसायटयांचे सदस्य या एएलएममध्ये सहभागी आहेत. गेल्या चार वर्षांपासून तिचे काम सुरू आहे आणि दोन वर्षांपासून ही एएलएम अधिक सक्रिय झाली आहे.


नागरिकशास्त्राच्या शालेय पुस्तकात शिकलेल्या ज्या गोष्टी आपल्या स्मरणात असतात, त्यापैकी महत्त्वाची म्हणजे शासनाच्या आणि प्रशासनाच्या जबाबदाऱ्या. त्यामुळे आपल्या विविध नागरी समस्यांसाठी केवळ सरकारला किंवा प्रशासनाला दोष देण्याची सवय आपल्या अंगवळणी पडली आहे. अर्थात त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडणे गरजेचेच आहे. मात्र याच नागरिकशास्त्राने सुजाण नागरिकाच्या जबाबदाऱ्यांची आणि कर्तव्यांची जाणीव आपल्याला करून दिली आहे, त्यांचा मात्र आपल्याला अनेकदा विसर पडतो. नागरिक म्हणून आपल्या नागरी समस्यांची किमान जाण तरी आपल्याला असायला हवी. ती असेल तर त्या निर्माण होण्यामागची काय कारणे आहेत, त्याला आपण तर कुठे कारणीभूत नाही ना, ती समस्या सोडविण्यासाठी कोणकोणते उपाय करता येतील, त्यात कोणाकोणाचे सहकार्य घेता येईल, शासन दरबारी ती कशी मांडता येईल आदी विचार आणि मग त्यावर आचारही सुरू होईल. दुसरे म्हणजे नागरी समस्या सोडविणे हे एकटयादुकटयाचे काम नक्कीच नाही. संघटित शक्तीने अशा समस्यांवर मार्ग काढणे शक्य होते. वरळी ते लोअर परळपर्यंतच्या परिसरातील नागरिकांची 'वरळी रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन' ही अशाच संघटित शक्तीचे उदाहरण आहे. खरे तर ही एएलएम (ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट) आहे. एएलएम ही नागरिकांची संघटना नागरी समस्या सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने प्रयत्न करते. या भागातील 10 ते 12 निवासी सोसायटयांचे सदस्य या एएलएममध्ये सहभागी आहेत. गेल्या चार वर्षांपासून तिचे काम सुरू आहे आणि दोन वर्षांपासून ही एएलएम अधिक सक्रिय झाली आहे.

गिरणगावचा भाग असलेल्या वरळी-लोअर परळ या परिसराचा चेहरामोहरा गेल्या दशकभरात कमालीचा बदलला आहे. या भागाची लोकसंख्याही वाढली आहे. एकीकडे उंचच उंच टॉवर्स आणि दुसरीकडे अजूनही आपला सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या चाळी. सध्या महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र म्हणून या परिसराकडे पाहिले जात आहे. बंद गिरण्यांच्या जागी आता मोठमोठी व्यावसायिक संकुले उभी राहिली आहेत. तेथे येणाऱ्या नोकरदारांनी दादर, लोअर परळ, महालक्ष्मी, करीरोड आदी स्थानकात उतरणाऱ्या गर्दीत भर घातली आहे. टॅक्सी, बसेस, खासगी वाहनांबरोबरच ओला, उबेर यांनाही या भागात मागणी वाढली आहे. या सगळया बदलाच्या पार्श्वभूमीवर येथील पायाभूत सुविधांमध्ये मात्र फार सुधारणा झाल्याचे दिसत नाही. गाडयांची रहदारी वाढली, तरी रस्त्यांची रुंदी वाढली नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही इथली महत्त्वाची समस्या बनली आहे. त्याशिवाय नादुरुस्त फूटपाथ, अस्वच्छता, अनधिकृत फेरीवाले अशा समस्यांमुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. या समस्या प्रशासनासमोर मांडण्याचे काम एएलएमचे सदस्य सातत्याने करीत असतात.

या एएलएमचे सक्रिय सदस्य आणि येथील मॅरेथॉन एरा सोसायटीचे रहिवासी असलेले भाविकशहा सांगतात, ''या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी आम्ही नागरिकच पुढाकार घेत आहोत. आमच्या प्रयत्नात पालिका सहकार्य करते. आम्ही या विभागाचे प्रश्न प्रशासनासमोर मांडतो. काही ठिकाणी रस्त्यांवर दिवेच नाहीत किंवा ज्या अंतराने ते असायला हवेत त्या अंतराने ते नसतात. कधीकधी चुकीच्या जागी दिवे असल्याने त्यांचा काहीच उपयोग होत नाही. हे सर्व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची गरज असते. आम्ही तेच केले आणि समस्या सोडविली. त्याशिवाय येथील वाहतुकीची समस्या जटिल आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे अवघे दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठीही अनेकदा अर्धा-अर्धा तास जातो. ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही पालिकेचे अधिकारी, वाहतूक विभाग यांच्याशी चर्चा केली. आम्हाला सगळेच बदलता येणार नाही, पण या परिसरात जी अव्यवस्था आहे, त्यात शिस्त आणायची आहे. एक ताजे उदाहरण द्यायचे, तर ई मोझेस रोडवर मुंबई मेट्रोचे काम सुरू आहे. त्याचे काम दिवस-रात्र सुरू असते. त्याच्या आवाजाने त्या परिसरातील रहिवाशांना त्रास होतो. त्यामुळे आम्ही मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांना भेटून त्याबाबत चर्चा केली. न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10नंतर काम सुरू ठेवण्यास मनाई आहे. त्यामुळे नियमाचा भंग न करता आणि येथील रहिवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन काम करावे, अशी आम्ही मागणी केली.''

अनेकदा समस्या खूप क्षुल्लक दिसतात, पण त्यामुळे होणाऱ्या त्रासांकडे दुर्लक्ष करता येत नाही. फूटपाथ उखडलेले असण्यासारखा साधा प्रश्नच घ्या ना. लोकांना त्याची इतकी सवय होते की मग ते त्या उखडलेल्या फूटपाथांकडे दुर्लक्ष करून सरळ रस्त्यांवरून चालायला लागतात. म्हणजे फूटपाथ दुरुस्त करून घेण्याबाबत प्रयत्न तर नाहीच, उलट रस्त्यांवरून चालून वाहतुकीत अडथळा निर्माण करायचा. वरळी रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशनने मात्र सध्या या फूटपाथांच्या प्रश्नावरच लक्ष केंद्रित केले आहे. भाविकसांगतात, ''अनेक ठिकाणी फूटपाथवरील पेव्हर ब्लॉक उखडलेले असतात, तर काही वेळा फूटपाथचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे ते वाकडेतिकडे असतात. काही दिवसांपूर्वी एका जागेवर खूप कचरा पडला होता. त्यामुळे बाजूचा फूटपाथही अस्वच्छ झाला होता. त्यामुळे लोकांना तेथून चालायला जमत नव्हते. आम्ही ती जागा, फूटपाथ साफ करून घेतला. त्यामागे असलेली भिंत सुंदर चित्रांनी रंगविली. या सुशोभीकरणात जवळच्या चाळीमधील रहिवाशांनीही सहभाग घेतला. त्यानंतर या परिसरात खूप सकारात्मक बदल दिसू लागला. त्या भागातील लोक हे सगळे पाहण्यासाठी जमा झाले. त्यांनी त्याचे कौतुक केले. आम्ही त्यांना सांगितले की, आता तुम्ही ही भिंत खराब होणार नाही याची काळजी घ्या. जी गोष्ट आपण सुंदर केली आहे, ती खराब होणार नाही याची काळजी आपण नक्कीच घेतो ना!''

फूटपाथ अडवून बसणारे फेरीवाले ही अशीच एक त्रासदायक समस्या. या भागात अधिकृत फेरीवाल्यांबरोबरच अनेक अनधिकृत फेरीवालेही वर्षानुवर्षे आपले ठेले घेऊन बसतात. या समस्येबाबतही संघटना काम करीत आहे.

समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींकडेही पाठपुरावा करावा लागतो. समस्यांची जाण असलेला लोकप्रतिनिधी निवडायची जबाबदारी पुन्हा नागरिकांचीच. मुंबई महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान संघटनेने सर्वपक्षीय उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणले. निवडून आल्यानंतर आपण कोणत्या स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार, ते सोडविण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार याची माहिती लोकांना द्यायची, अशी त्यामागची कल्पना होती. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उमेदवारांनी उत्तरे दिली. इमारतीत राहणारे लोक मतदानासाठी खाली उतरत नाहीत, असे नेहमी बोलले जाते. आम्ही मात्र मतदानाच्या दिवशी घराघरात जाऊन लोकांना मतदानासाठी उद्युक्त केले'' अशा शब्दात भाविकयांनी मतदान काळातला आपला अनुभव सांगितला.

अस्वच्छता ही मुंबईसारख्या महानगरीत नेहमीची समस्या आहे. या परिसरातही ती आहेच. त्यासाठी ही एएलएम सातत्याने स्वच्छता मोहीम राबवीत असते. वरळीचा सागरी किनारा स्वच्छ करण्यासाठीही या परिसरातील नागरिक एकत्र येतात. केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत मिशन'च्या जाहिराती सध्या खूपच लोकप्रिय ठरत आहेत. मनोरंजनाबरोबरच त्याचा लोकांवर उचित परिणामही होत असल्याचे दिसते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून 'कंपोस्ट बनाओ कंपोस्ट अपनाओ'च्या जाहिरातींनी आणखी एका जनजागृतीला सुरुवात केली आहे. या जाहिरातीतून बिग बी अमिताभ सर्वांना स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती करण्याचे आवाहन करताना दिसतात. भाविकशहा राहत असलेल्या मॅरेथॉन एरा सोसायटीतील नागरिकांनी मात्र दोन वर्षांपूर्वीच या समस्येवर मात करण्यासाठी आपली भूमिका ओळखली. सोसायटीच्या आवारात पाच कंपोस्ट युनिट लावण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्व ओला कचरा वापरला जातो. 'शून्य कचरानिर्मिती' हे सूत्र या सोसायटीने आपले ब्रीद बनविले आहे. त्यामुळे सोसायटीकडून पालिकेच्या कचरागाडीत कोणत्याही प्रकारचा कचरा दिला जात नाही.

असे अनेक उपक्रम या परिसरात सातत्याने राबविले जातात. त्यात येथील उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय सर्वांचाच सहभाग असतो. आपण जग बदलायचे स्वप्न बघत असतो, पण बदलाची सुरुवात स्वत:च्या परिसरापासून करावी लागते, हा नागरिकशास्त्राचा धडा येथील रहिवासी घेत आहेत. नागरी समस्या सोडविण्यासाठी तो प्रत्येकानेच घेतला पाहिजे.

9833109416

 

Powered By Sangraha 9.0