कुछ बात है की हस्ती...

18 Apr 2017 12:21:00

डार्विनच्या सिध्दान्ताप्रमाणे नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता व जुळवून घेत असताना जे जनुकीय बदल होतात, त्यांच्यातील सातत्य टिकवून ठेण्याची क्षमता यावर एखादी जाती जीवनसंघर्षात टिकून राहते की अस्तंगत होते, हे अवलंबून असते. त्यामुळे हजारो वर्षांच्या परंपरेत हिंदू संस्कृतीतला जिवंतपणा टिकला असेल, तर तिच्यात काळानुसार बदलण्याची व हा बदल होत असताना जनुकीय आराखडा बदलण्याचे जे सातत्य लागते, ते टिकविण्याची क्षमता आहे हे सिध्द होते. जर या परंपरेतील जनुकीय सातत्याचा वारसा संघाला मिळाला असेल, तर त्या जनुकीय वारशाचे स्वरूप काय? गेल्या दोनशे वर्षांच्या प्रबोधन काळात सामाजिक परिवर्तनाचे अनेक प्रयोग झाले. त्यात संघालाच हे यश का मिळाले? असे विविध प्रश्न निर्माण होतात. त्यातूनच झालेला हा बदल एक-दोन निवडणुकांपुरता आहे की 'पॅरॅडिम शिफ्ट' आहे, हे स्पष्ट होईल.

दि. 7 एप्रिलच्या टाइम्स ऑॅफ इंडियाच्या अंकात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची मुलाखत प्रसिध्द झाली आहे. ''विद्यार्थ्यांना नर्सरीपासून इंग्लिशमधून शिक्षण द्यायला सुरुवात करू'' या त्यांच्या वक्तव्याने अनेक पुरोगामी विद्वानांवर बेशुध्द पडण्याची वेळ आली. नर्सरीपासून इंग्लिशमध्ये शिक्षण द्यावे की नाही यावर वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु भगवी वस्त्रे घालणारी, 'हिंदुत्वाचा हिंसक व प्रतिगामी चेहरा असणारी व्यक्ती' इंग्लिश माध्यमातून आधुनिक शिक्षण देण्याचा आग्रह धरते हा विसंवाद त्यांना पचविणे अवघड आहे. टाइम्सच्या वार्ताहराने या विषयावर त्यांच्याकडे अधिक स्पष्टीकरण मागितले, तेव्हा ते म्हणाले, ''पारंपरिक मूल्यांचा अभिमान असणे व आधुनिक जगात जगण्यासाठी सक्षम बनणे यात समन्वय साधला पाहिजे.'' स्वातंत्र्योत्तर काळात भारतात जो वैचारिक प्रवास झाला आहे आणि त्यातून आज जे वैचारिक वातावरण तयार झाले आहे, त्यात हा मुद्दा समजून घेणे अवघड बनले आहे.

पवन वर्मा हे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे अधिकृत सल्लागार होते व जनता दलाचे राज्यसभेतील विद्यमान खासदार आहेत. गेले काही महिने टाइम्स ऑॅफ इंडियाच्या आपल्या स्तंभामधून भारतातील तथाकथित पुरोगामी, उदारमतवादी, प्रसारमाध्यमप्रिय विचारवंतांसमोर एक महत्त्वाचा मुद्दा मांडत असतात. 'भारतात सेक्युलॅरिझमचा अर्थ हिंदू विरोध' असा झाला आहे. हिंदूंच्या परंपरेतील अभिमानाच्या व गौरवपूर्ण क्षणांचे वर्णन केले की त्याला लगेच या गटामध्ये हिंदू जातीयवादी ठरविले जाते. योगायोगाने, योगी आदित्यनाथ यांची मुलाखत येण्याच्या आदल्याच दिवशी टाइम्सच्या संपादकीय पानावर त्यांचा एक लेख प्रकाशित झाला आहे. त्या लेखात ते म्हणतात, ''इतिहासात काही अपघात घडत असतात. बाबरी मशीद पडण्याच्या बरोबर चव्वेचाळीस वर्षांच्या आधी, 6 डिसेंबर 1948 रोजी भारताच्या घटनासभेत, भारतीय लोकसत्ताक आणि सेक्युलॅरिझम यांचे संबंध कसे असावेत यावर चर्चा सुरू होती. भारत हे धर्माधिष्ठित राज्य बनू नये, पण त्याचबरोबर सेक्युलॅरिझम म्हणजे धर्माला तुच्छतापूर्ण वागणूक देणे किंवा सार्वजनिक जीवनातील त्याचे महत्त्व कमी करणे नव्हे, यावर सर्वसाधारण एकमत होते. या चर्चेत भाग घेताना ओरिसातील एक नेते लोकनाथ मिश्रा (जे नंतर आसामचे राज्यपाल बनले) यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी बजावले की, ''सेक्युलर स्टेट ही या देशाच्या सनातन परंपरेला वळसा घालणारी फसवी संकल्पना (slippery phrase) आहे. ....हजार वर्षांच्या दास्यानंतर या देशातील सनातन श्रध्दांना व परंपरांना केंद्रस्थान नसले, तरी उचित व न्याय्य स्थान देणे आवश्यक आहे.'' त्या वेळी या मुद्दयाकडे दुर्लक्ष केले गेले.

सांस्कृतिक परंपरांचे महत्त्व

समाजाचे वर्तमानकालीन व भविष्यकालीन प्रश्न सोडविण्यात परंपरांचा अडथळा असतो की त्यांचा उपयोग होतो? समाजात दीर्घकालीन व टिकाऊ परिवर्तन करायचे असेल, तर आपणाला अभिप्रेत असलेल्या परंपरांच्या कालानुरूप पुनरुज्जीवनातूनच ते करता येते. पियर द कुबरतँ या फ्रेंच लष्करी अधिकाऱ्याने फ्रेंच तरुणांतील रंगेलपणा व पोषाखीपणा कमी करून राष्ट्रीय वृत्ती बिंबविण्यासाठी क्रीडा संस्कृतीचा उपयोग करण्याचे ठरविले. त्यासाठी एक समिती नेमून इंग्लंड, अमेरिकेसह अनेक देशांतील क्रीडा संस्कृतींचा अभ्यास केला. क्रीडा संस्कृतीतून राष्ट्रीय वृत्तीची मूल्ये बिंबवायची असतील तर काय केले पाहिजे, या विचारातून ते प्राचीन ग्रीक संस्कृतीतील ऑॅलिम्पिक्सकडे वळले. ते स्वाभाविक होते. कारण रोमन साम्राज्यानंतर युरोपमध्ये जे अंधारयुग आले होते, त्यातून बाहेर पडण्यासाठी युरोपियन विचारवंतांनी प्रगल्भ ग्रीक वैचारिक परंपरेचे पुनरुज्जीवन केले होते. तोच आधुनिक युरोपियन प्रबोधन पर्वाचा आधार होता. प्राचीन ग्रीक समाजाने सांस्कृतिक मूल्ये रुजविण्यासाठी क्रीडा संस्कृतीला महत्त्व दिले होते. तिथे ऑॅलिम्पिक स्पर्धा होण्यापूर्वी काही महिने व्रतस्थ राहून नियमितपणे तयारी केल्याचा दाखला घेतल्यावरच या सामन्यात भाग घेता येई. त्यासाठी 'सचोटीने भाग घेऊ व खेळास कमीपणा आणणारे वर्तन करणार नाही,' अशी शपथ घ्यावी लागे. विजेत्यांची मिरवणूक काढली जाई व राष्ट्रवीर म्हणून त्यांचा सन्मान होई. स्पर्धात्मक पण सुसंस्कृत क्रीडा संस्कृती हा प्रगत ग्रीक संस्कृतीचा अंगभूत भाग होता.

जेव्हा पियर द कुबरतँ यांनी क्रीडा संस्कृतीतून सामाजिक मूल्यांची जोपासना करण्याचे ठरविले, तेव्हा ऑॅलिम्पिकची परंपरा पुनरुज्जीवित करायचे ठरविले. त्यामुळे त्यांनी अर्वाचीन कालातील पहिल्या ऑॅलिम्पिक स्पर्धा 1896 साली अथेन्स येथेच आयोजित केल्या. पण ग्रीक देश तोच असूनही व तेथे राहणारा ग्रीक समाजही आपल्या प्राचीन पूर्वजांचा वारस असूनही, त्या परंपरेशी त्याचा कोणताही संबंध राहिलेला नव्हता. एकेकाळी जगाला मार्गदर्शन करणाऱ्या प्रगल्भ ग्रीक संस्कृतीचा वारसदार असणारा हा देश, आज युरोपसमोरची समस्या बनला आहे. आज ऑॅलिम्पिक सामने जागतिक क्रीडा संस्कृतीचा भाग बनल्या आहेत. पण त्याचा आधुनिक ग्रीक देशाशी कोणताच संबंध उरलेला नाही. याउलट स्वातंत्र्योत्तर काळातील आधुनिक भारतात योग विज्ञान हे उपेक्षेचे शास्त्र बनले होते. त्याचा पुरस्कार करणे हा वैचारिक अप्रतिष्ठितपणा मानला जात होता. पण एकविसाव्या शतकातील ताणावर योगोपचार प्रभावी ठरू शकतात, हे लक्षात आल्यावर त्याचा जगभर स्वीकार झाला आहे. भारतामध्ये ती संस्कृती, परंपरा जिवंत राहिल्याने आज भारतातील योग विज्ञानाला विश्वासार्ह मानले जाते. जसे जगातील विविध देशांचे विविध उत्पादनांचे व सेवांचे विश्वासार्ह ब्रँड आहेत, तसेच भारत हा योगक्षेत्रातला विश्वासार्ह ब्रँड मानला जातो.

ग्रीस, इजिप्त, रोम, इराण आदी देश एकेकाळच्या संपन्न संस्कृतीचे वारसदार आहेत, पण तो त्यांचा वारसा आज जिवंत राहिलेला नाही. भारतामध्ये मात्र हजारो वर्षांचा परंपरेचा वारसा अजूनही जिवंत आहे. आपल्या समोरील वर्तमानकालीन व भविष्यकालीन प्रश्नांना विचार करताना या वारशाचे काय करायचे हा महत्त्वपूर्ण विचारांचा मुद्दा आहे. लोकनाथ मिश्रा यांनी भाकित केल्याप्रमाणे हजार वर्षांच्या दास्यानंतर या देशातील सनातन संस्कृती आपला न्याय्य व उचित हक्काचा वाटा मागत आहे. संघपरिवार हे त्याचे फक्त माध्यम आहे. संघाला ज्यांना विरोध करायचा असेल, त्यांनाही प्रभावी विरोधासाठी तरी परंपरेमागील ऐतिहासिक शक्तींचा शोध घ्यावा लागेल. तरच या विशाल, ऐतिहासिक परिवर्तनामागची खोली व व्यापकता याचा अंदाज येईल. परंतु त्यासाठी संस्कृती म्हणजे काय? तिचा जिवंतपणा कशात असतो? याचा विचार केला पाहिजे.

संस्कृतीचा जिवंत प्रवाह

प्रत्येक जैविक घटकांप्रमाणे प्रत्येक जिवंत संस्कृतीचे गुणधर्म असतात. अगदी प्राथमिक स्तरावरील जिवंत घटकातही स्वसंरक्षण, आत्माविष्कार व नवनिर्मिती हे घटक असतात. त्यामुळेच निर्जीव पदार्थापासून सजीवांचे वेगळेपण सुरू होते. परंतु प्राणिजीवन जसे अधिकाधिक प्रगत होत जाते, तसे त्यांच्यामध्ये श्रमविभागणी, समाजनिर्मितीचे गुण तयार होतात. अंतिमत: माणसामध्ये या सर्व गुणांसोबत कार्यकारणभावाचाही गुण निर्माण झाला आहे व हा गुणच मानवी प्रभावाचे कारण आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीत स्वसंरक्षण, आत्माविष्कार, नवनिर्मिती, समाजनिर्मिती क्षमता व कार्यकारणभाव शोधण्याची क्षमता हे गुण कमी-अधिक प्रमाणात असतात, तसेच गुण प्रत्येक संस्कृतीतही असावे लागतात. या सर्व गुणसमुच्चयातून प्रत्येक व्यक्तीचे जसे वैशिष्टय तयार होते, तसेच प्रत्येक संस्कृतीचेही स्वतंत्र वैशिष्टय बनते. प्रत्येक व्यक्तीची गुणवैशिष्टये जतन करणारा जसा तिच्या प्रत्येक पेशीमध्ये जनुकीय आराखडा असतो, तसेच त्या संस्कृतीशी जी व्यक्ती जैविक संबंधांनी जोडलेली असते, तिच्याही भावविश्वात तो जनुकीय आराखडा कार्यरत असतो. जसे डार्विनच्या नियमाप्रमाणे वनस्पतींच्या व प्राण्यांच्या विविध जाती जगण्याकरिता स्पर्धा करीत असतात, तसेच विविध संस्कृतींच्या बाबतही घडत असते. केवळ एखादी संस्कृती आकाराने प्रचंड आहे म्हणून ती टिकत नाही. जसे काळाच्या ओघात डायनोसॉरसारखे प्रचंड प्राणी नष्ट झाले, तसेच जगाच्या इतिसातील प्रचंड साम्राज्ये कोसळली. अगदी विसाव्या शतकातील रशियाचे कम्युनिस्ट साम्र्राज्य पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. रशियापाशी असलेल्या प्रचंड अण्वस्त्रांच्या साठयाचा ते साम्राज्य वाचविण्यासाठी कोणताही उपयोग झाला नाही. जर एखाद्या संस्कृतीची टिकून राहण्याची आंतरिक क्षमता संपली असेल, तर आकाराची प्रचंडता किंवा सामरिक सामर्थ्य तिला वाचवू शकत नाही.

डार्विनच्या सिध्दान्ताप्रमाणे नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता व जुळवून घेत असताना जे जनुकीय बदल होतात, त्यांच्यातील सातत्य टिकवून ठेण्याची क्षमता यावर एखादी जाती जीवनसंघर्षात टिकून राहते की अस्तंगत होते, हे अवलंबून असते. त्यामुळे हजारो वर्षांच्या परंपरेत हिंदू संस्कृतीतला जिवंतपणा टिकला असेल, तर तिच्यात काळानुसार बदलण्याची व हा बदल होत असताना जनुकीय आराखडा बदलण्याचे जे सातत्य लागते, ते टिकविण्याची क्षमता आहे हे सिध्द होते. जर या परंपरेतील जनुकीय सातत्याचा वारसा संघाला मिळाला असेल, तर त्या जनुकीय वारशाचे स्वरूप काय? गेल्या दोनशे वर्षांच्या प्रबोधन काळात सामाजिक परिवर्तनाचे अनेक प्रयोग झाले. त्यात संघालाच हे यश का मिळाले? असे विविध प्रश्न निर्माण होतात. त्यातूनच झालेला हा बदल एक-दोन निवडणुकांपुरता आहे की 'पॅरॅडिम शिफ्ट' आहे, हे स्पष्ट होईल. हिंदू समाजाच्या सुमारे पाच हजार वर्षांच्या कालखंडात जी अनेक परिवर्तने झाली, त्यांचा संघ वारसदार आहे काय? याचे उत्तर याच चर्चेतून मिळू शकेल. यासाठी या सर्वाची समाजशास्त्रीय चिकित्सा केली पाहिजे.

समाजशास्त्रीय चिकित्सा

आपल्या सामाजिक स्थितीबद्दल अस्वस्थ होऊन त्यासाठी काही ना काही करण्यासाठी कार्यरत होणारे अनेक जण असतात. परंतु त्यांच्या कार्याचा परिणाम व विस्तार त्यांनी परिवर्तनासाठी केलेल्या विचारांच्या खोलीवर व व्यापकतेवर अवलंबून असतात. यात बहुसंख्य निराश झालेले असतात. काही जणांच्या कामाचा परीघ एखादे गाव, जिल्हा, प्रांत यापर्यंत मर्यादित असतो. काही जण त्यांच्या जीवनकालात प्रभाव टाकतात. पण युगपुरुष म्हणून त्यांनाच मान्यता मिळते, ज्यांचे कार्य विद्यमान तसेच अनेक भावी पिढयांवरही परिणाम करणारे असते. समाजाच्या भविष्यावर परिणाम करणारे असे जे युगपुरुष असतात, त्यांच्या कार्याचे व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करण्याकरिता त्यांच्या कामाविषयी योग्य व विश्वासार्ह माहिती व प्रतिभा लागते. जे माक्र्सवादी आहेत त्यांच्याबद्दल हा प्रश्न कमी उद्भवतो. कारण समाजपरिवर्तनाचा बौध्दिक आराखडा माक्र्सने बनवून ठेवला आहे. त्यात विविध नेत्यांनी परिस्थितीनुसार बदल कसा केला एवढा अभ्यास पुरेसा होतो. पण स्वातंत्र्यपूर्व काळात येथील सांस्कृतिक आधारावर परिवर्तन करणारे अनेक नेते व चळवळी होत्या, त्यांनी तत्कालीन परिस्थितीचा कसा विचार केला? त्यांचे विश्लेषण व उद्दिष्टे कोणती होती? त्याकरिता त्यांनी कोणती कार्यपध्दती स्वीकारली? त्याचे परिणाम काय झाले? त्यातील तात्कालिक किती होते व दीर्घकाल कोणते टिकले? काळानुसार त्यात कोणते व कसे परिवर्तन झाले? अशा अनेक मुद्दयांवर विवेचन करावे लागेल. या लेखात संघसंस्थापक डॉ. हेडगेवार व संघ यांच्यापुरता तो करू.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. हेडगेवारांच्या चिंतन प्रक्रियेची परिणती आहे. संघनिर्मितीची चिंतन प्रक्रिया कशी झाली, हा इतिहास डॉक्टरांनी आपल्या शब्दात एका लेखाद्वारे प्रकट केला आहे. 'विवेक'च्या 'संघ गंगोत्री' या ग्रंथात तो लेख पुनःप्रकाशित केला आहे. या लेखातील महत्त्वाचा भाग पुढीलप्रमाणे -


'कल्पना हीच की ऐतिहासिक काळातसुध्दा अखिल भारतीय स्वरूपाचे संघटनेचे जे प्रयत्न झाले नाहीत, ते आता व्हावेत. त्याचप्रमाणे आपल्या हातून इतिहासकालीन व वर्तमानकालीन घडलेल्या चुका पुन्हा होऊ न देण्याचा मनाशी निश्चित विचार करून व शत्रूमध्ये वसत असलेल्या गुणांचेही अनुकरण करून, अखिल भारतीय संघटनेचा प्रयत्न करावा या दृष्टीने स्वयंसेवक संघ काढला. शत्रूमध्ये वसत असलेल्या गुणांचे अनुकरण करण्यात मला बिलकुल कमीपणा वाटत नाही.'

'हिंदुस्थानच्या संरक्षणार्थ जो संघ निर्माण करायचा, त्यात मुसलमान, ख्रिश्चन, इंग्रज आदी परदेशीय व परधर्मी लोक असले काय किंवा नसले काय, तरी आपल्या हिंदू समाजाला असा संघ निर्माण करणे क्रमप्राप्तच होते.'

'त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा व राजकारणाचा काही संबंध आहे का? असा प्रश्न विचारताच त्याला उत्तर हेच देता येईल की, संघ त्यात भाग घेत नसला तरी ही संघटना राजकारणाचा, समाजकरणाचा व धर्मकारणाचा अभ्यास मात्र अवश्य करेल.'

'जर अपल्या हिंदुस्थानच्या कल्याणार्थ कोणत्याही कल्पना या संघटनेच्या मनात आल्या, तर त्या कृतीत उतरविताना आपली संघटना दुर्बळ आहे म्हणून ते काम करू शकत नाही अशी पाळी येऊ नये एवढीच पवित्र, स्वाभिमानी, उज्ज्वल व तेजस्वी भावना हृदयाशी बाळगून ही संघटना जास्तीत जास्त प्रबळ, प्रभावी, रंगविरहित कशी होईल याकडेच लक्ष दिले पाहिजे. आपल्याला या ऐहिक जगात आपल्या हिंदू राष्ट्राकरिता स्वाभिमानाने मर्दासारखे, उजळ माथ्याने जगण्याकरिता जे-जे करावे लागेल, ते-ते सर्व करण्याचे या संस्थेने ठरविले आहे.'

आपणाला संघाच्या द्वारे काय करायचे आहे ते अत्यंत स्पष्ट व नि:संदिग्ध शब्दात डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. ऐतिहासिक चुका दुरुस्त करून ऐहिक जगात सन्मानाने राहण्याकरिता, आवश्यक तेथे शत्रूंच्या गुणांचे अनुसरण करून, कोणा विशिष्ट समाजासाठी नव्हे, तर कोणत्याही वर्तमान वा भविष्यकालीन प्रसंगाला तोंड देण्यासाठी संघ स्थापन झाला आहे. केवळ परंपरेचे पुनरुज्जीवन करून हे कसे करता येईल?

डॉक्टरांनी जी गोष्ट रोखठोक भाषेत सांगितली, तीच अधिक काव्यात्मक भाषेत दीनदयाळजींनी सांगितली.

'आम्ही भूतकाळातून प्रेरणा जरूर घेतो, पण आम्ही त्या काळाशी जखडलेलो नाही. वर्तमानाचे भान आम्ही ठेवतो, परंतु आम्ही स्थितीवादी नाही आणि भविष्याची सुंदर स्वप्ने आम्ही पाहतो, परंतु आम्ही स्वप्नाळू नाही. भूत, वर्तमान आणि भविष्य यांना व्यापून उरलेल्या भारतीय संस्कृतीचे आम्ही जागृत कर्मयोगी असे पूजक आहोत.'

परंपरेतील प्रेरणा, वर्तमानातील आव्हाने व भविष्यातील स्वप्ने यांची सांगड घालत संघाने हे यश कसे मिळविले आणि त्याचे भवितव्य काय असेल, हा खरे तर एकविसाव्या शतकातील समाजशास्त्रीय अभ्यासाचा मोठा विषय आहे.

प्रथम प्रखर राष्ट्रवादी व नंतर पाकिस्तानवादी बनलेले कवी इक्बाल यांनी ते राष्ट्रवादी असताना केलेली 'सारे जहाँ से अच्छा' ही कविता लोकप्रिय आहे. त्यात इथल्या संस्कृतीची वैशिष्टये सांगताना ते म्हणतात,

युनान, मिस्र, रुमा, सब मिट गये जहॉ से ।

अब तक मगर है बाकी, नाम-ओ-निशाँ हमारा ॥

कुछ बात है की हस्ती, मिटती नही हमारी ।

सदियोंसे रहा है दुश्मन, दौर-ए-जमॉ हमारा ॥'

'जगातल्या ग्रीक, इजिप्त, रोम आदी संस्कृती नष्ट झाल्या, पण अजूनही आमचे नामोनिशाण टिकून आहे. आमच्यामध्ये असे काही आहे की अनेक शतके शत्रूंनी घेरले असूनही, आम्हाला नष्ट होऊ देत नाही.'

या संस्कृतीला चिरंजीवपणाचे वरदान देणारा सांस्कृतिक जनुकीय आराखडयाचे स्वरूप कोणते आहे? व त्यापासून जगाला घेण्यासारखे काही आहे काय? हा संशोधनाचा विषय असला पाहिजे.

kdilip54@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0