ऑनलाइन ब्रँडमेकर्स

07 Mar 2017 15:07:00

आधी एखादी वस्तू विकण्यासाठी दुसऱ्या गावांमध्ये जावं लागायचं, एक व्यवसाय सेटअप करण्यासाठी भरपूर वेळ, मोठं भांडवल आणि बरंच काही आवश्यक असायचं. पण आता मात्र चित्र बदललं आहे. आज ई कॉमर्सचं आणि ऑॅनलाइन बिझनेसचं प्रमाण वाढलं आहे, आणि यामुळे निर्माण झाली आहे ऑॅनलाइन व्यवसाय करणाऱ्यांची स्वत:ची एक ओळख. या ऑॅनलाइन व्यवसाय जगात महिलांचं प्रमाण खूप जास्त आहे. आद्या ओरिजिनल्सच्या सायली मराठे, मेहरोबा या कपडयांच्या ब्रँडच्या काळे भगिनी आणि द आर्ट ऍण्ड क्राफ्टच्या अक्षया बोरकर अशा यशस्वी उद्योगिनींपैकीच आहेत. साप्ताहिक विवेकच्या महिला दिन विशेषांकाच्या निमित्ताने या उद्योगिनींच्या प्रवासाचा हा आढावा.

गाचं चित्र पटापट बदलताना दिसत आहे. इंटरनेट आलं आणि माणसाच्या अनेक समस्या सुटल्या. आधी एखादी वस्तू विकण्यासाठी दुसऱ्या गावांमध्ये जावं लागायचं, एक व्यवसाय सेटअप करण्यासाठी भरपूर वेळ, मोठं भांडवल आणि बरंच काही आवश्यक असायचं. पण आता मात्र चित्र बदललं आहे. आज ई कॉमर्सचं आणि ऑॅनलाइन बिझनेसचं प्रमाण वाढलं आहे, आणि यामुळे निर्माण झाली आहे ऑॅनलाइन व्यवसाय करणाऱ्यांची स्वत:ची एक ओळख. कमालीची बाब म्हणजे या ऑॅनलाइन व्यवसाय जगात महिलांचं प्रमाण खूप जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बँक बीएनपी पारिबासतर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या एक संशोधनानुसार 2015पर्यंत भारताच्या ई कॉमर्स क्षेत्रात महिलांचा सहभाग 49% होता. गेल्या दोन वर्षांत यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. ऑॅनलाइन व्यवसायात टिकण्यासाठी त्या व्यक्तीने धडाडीचं असणे फार गरजेचं आहे, म्हणूनच सर्व महिला खऱ्या अर्थाने ऑॅनलाइन जगातील उद्योग वीरांगना आहेत.

इंटरनेटमुळे अनेक क्रांतिकारक बदल घडले आहेत, यात तिळमात्र शंका नाही. पण याचा सगळयात जास्त फायदा झाला आहे तो तुमच्या-आमच्यासारख्या अनेक महिलांना, मुलींना. आता जग बदललं आहे, त्यामुळे मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये कुठलाही फरक केला जात नाही. मुलगीही नोकरी आणि व्यवसाय तितक्याच हिंमतीने चालवू शकते, जसा एक मुलगा चालवेल; तर आज परदेशी नोकरी आणि शिक्षणानिमित्त मुलांनाही घर सांभाळायला शिकणं आवश्यक झालं आहे. एमबीएसारख्या शिक्षण पध्दतीमुळे आता सर्व प्रकारची माहिती आणि ज्ञान आपल्या हाताशी आहे. मुली आणि महिला याचा योग्य उपयोग करून घेत आहेत. ऑॅनलाइन व्यवसाय म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. यासाठी लागते जिद्द, मेहनत आणि तंत्रज्ञानाची जोड. अनेक महिलांनी आज ऑॅनलाइन व्यवसायात आपलं नाव मोठं केलं आहे. त्यांनी त्यांच्यात असलेल्या कलागुणांचा योग्य पध्दतीने वापर केला, स्वत:चा व्यवसाय मोठा केला, तसंच अनेकांना यामुळे रोजगारही दिला. अशी अनेक महिलांची उदाहरणं आहेत.


आद्या ओरिजिनल्स : एक नवीन सुरुवात

आद्या ओरिजिनल्स हा ज्वेलरी ब्रँड आता भारतात भरपूर प्रसिध्द झाला आहे, तसेच भारताबाहेरही आद्याचे अनेक ग्राहक आहेत. सायली मराठे या तरुण मुलीने आद्या हा ब्रँड तीन वर्षांपूर्वी सुरू केला. आद्या म्हणजे ओरिजिनल, आद्या म्हणजे सुरुवात. चांदीच्या आणि ऑॅक्सिडाइज्ड प्रकारातील आभूषणांसाठी हा ब्रँड खूप प्रसिध्द आहे. मूळच्या इंजीनिअर, 9 वर्षं विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी करून मोठा अनुभव मिळवणाऱ्या सायली या आता एकमोठया उद्योजिका झाल्या आहेत. आद्याच्या प्रवासाबद्दल बोलताना त्या सांगतात, ''छंद म्हणून सुरू करण्यात आलेल्या कृतीचं रूपांतर आज व्यवसायात झालं आहे. आधी मी केवळ माझ्या आनंदासाठी ज्वेलरी बनवायचे. मैत्रिणींना भेट म्हणून देणं, नातेवाइकांना भेट देणं असं सुरू होतं. मात्र मित्रमैत्रिणींच्या म्हणण्यामुळे मी पहिल्यांदा फेसबुकवर माझ्या कलाकृतींचे फोटोज टाकले. तसंच एक प्रदर्शनही भरवलं. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. फेसबुकवर हळूहळू स्वत:चं पेज बनवलं. अनेक लोकांपर्यंत माझी कला पोहोचली. मात्र नोकरी सांभाळून हे करणं शक्य होत नव्हतं, त्यामुळे मी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. आणि आज माझा हा व्यवसाय तीन वर्षांचा झाला आहे. 2014मध्ये पहिल्यांदा आद्याची वेबसाइट सुरू करण्यात आली. यालाही भरघोस प्रतिसाद मिळाला, आणि आता आम्ही कस्टमाइज्ड ज्वेलरी, पर्सनल हेल्प असं सगळंही करतो. आद्यामध्ये सुमारे सगळीच आभूषणं इनहाउस - म्हणजेच आम्ही स्वत: बनवलेली असतात. आद्याच्या फेसबुक पेजचे जवळजवळ तीन लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवरही नऊ हजाराहून अधिक लोक आज आद्याला फॉलो करतात. आमचे जुने ग्राहक आमच्या सोबत आहेत, तर नवीन ग्राहकांमध्येही वाढ झाली आहे. आज आद्याचा परिवार भरपूर मोठा झाला आहे'' असंही तिने सांगितलं.

या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी, मुलींसाठी सायली यांनी संदेश दिला की ''ऑॅनलाइन क्षेत्र हे सतत बदलणारं क्षेत्र आहे. इथे रोज काहीतरी नवीन येतं. मात्र आपण आपल्या ग्राहकांच्या नियमित संपर्कात राहिलो, तर मात्र आपण इथे नक्कीच टिकू शकतो. त्यामुळे ग्राहकांना पूर्णपणे जाणून घ्या. आपल्या कामात सुसंगतता नक्कीच आवश्यक आहे तसंच धोका पत्करणं म्हणजेच रिस्क घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अभ्यास करून रिस्क घ्या, मात्र नक्की रिस्क घ्या.''

काळे भगिनी-नव्या उद्योजिका

खरंय, एकूणच रिस्क घेतल्याशिवाय ऑॅनलाइन व्यवसायात टिकणं अवघड आहे. सायलीप्रमाणेच मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील निकिता काळे आणि अमृता काळे या दोघी बहिणींनी आपली पाच आकडी पगाराची आणि बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. निकिता काळे आणि अमृता काळे या दोघी बहिणी. दोघी चांगले गुण मिळवून इंजीनिअर झाल्या. टेक महेंद्रा आणि टी.सी.एस. यासारख्या मोठया कंपन्यांत छान नोकरी होती. पण दोघींनाही सुरुवातीपासूनच आपले कपडे स्वत: डिझाइन करण्याची आवड होती. फॅशनची आवड आणि मार्केटचा अभ्यास या दोन्ही गोष्टींमुळे जन्म झाला 'मेहरोबा' या फॅशन ब्रँडचा. दोघींनी मिळून 'मेहरोबा' ही ऑॅनलाइन वेबसाइट सुरू केली. स्वत: डिझाइन केलेले सुंदर आणि रिझनेबल कपडे लोकांपर्यंत पोहोचावे हे त्यांचं स्वप्न होतं. एकदम नोकरी सोडून ऑॅनलाइन व्यवसायात उतरणं आणि तेही इतक्या कमी वयात कसं शक्य झालं? असं विचारल्यावर दोघींनी सांगितलं की, ''कॉर्पोरेट क्षेत्रातला अनुभव आणि फॅशनची आवड यामुळे कठीण काम सोपं झालं. बाबांचा व्यवसाय लहानपणापासून बघत असल्यामुळे आत्मविश्वास मिळाला.'' मेहरोबाबद्दल बोलताना अमृता यांनी सांगितलं, ''मेहरोबा म्हणजे स्वत:च्या मुलाला यशस्वी होताना बघण्यासारखं आहे. आज मेहरोबाचे ग्राहक पूर्ण भारतात आणि काही परदेशातही आहेत. फ्लिपकार्ट, शॉपक्लूज यासारख्या मोठया ई-कॉमर्स वेबसाइट्सवरही आज मेहरोबा उपलब्ध आहे, यासारखा आनंद दुसरा कुठलाही नाही. ऑॅनलाइन व्यवसाय करणं कठीण आहे, कारण यासाठी लागते सततची मेहनत. आपले ग्राहक आनंदी राहावेत यासाठी त्यांना सतत काहीतरी नवीन देणं, त्यांच्या सर्व गरजांकडे लक्ष देणं महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा तुम्ही ऑॅनलाइन व्यासपीठावर असता, तेव्हा ते अवघड जातं; कारण जसा व्यवसाय वाढतो, तुमच्या ग्राहकांची संख्या हजारांवर जाते, त्यामुळे सतत न थकता मेहनत करणं आणि नवीन काही तरी देण्याकडे नवीन उद्योजिकांनी लक्ष केंद्रित करावं'' असं निकिता यांनी सांगितलं.

केवळ वस्तू विकणंच नाही, तर रोजगार निर्मितीसुध्दा

ऑॅनलाइन व्यवसायात येण्यासाठी आवश्यक आहे ते आपल्या व्यवसायाबद्दल पूर्ण ज्ञान, तसंच स्पष्ट दृष्टी, त्यासोबतच साथ लागते तंत्रज्ञानाची. आपल्या ग्राहकांना काय हवं आहे, ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल? त्यासाठी कोणाशी बोलायला लागेल? इंटरनेटच्या जगात ऑॅनलाइन माध्यमांवर विश्वासार्हता कशी टिकवून ठेवायची? हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. त्यासाठी व्यवसाय सुरू करण्याआधी मार्केट रिसर्च, ग्राहकांच्या आवडीनिवडींविषयी विशेष माहिती, असं सगळं माहीत असणं आवश्यक आहे.


ऑॅनलाइन व्यवसाय हा केवळ स्वत:च्या वस्तूंना इंटरनेटच्या माध्यमातून विकणंच नाही, तर इतर अशी कला असलेल्या लोकांना त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठीदेखील केला जातो. असाच एक वेगळा व्यवसाय सुरू केला आहे तरुण उद्योजिका अक्षया बोरकर यांनी. त्यांनी ऑॅस्ट्रेलिया येथे बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. तिथे बरीच वर्षं नोकरीही केली. मात्र स्वत:च्या कलागुणांना वाव देण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, या भावनेतून त्यांनी स्वत:च्या चित्रांचा एक ब्लॉग सुरू केला आणि हळूहळू त्याचं वेबसाइटमध्ये रूपांतर झालं. केवळ आपली कलाकृती करून विकणं हा त्यांचा उद्देश नव्हता, तर अनेक कलाकारांना स्वत:चं असं व्यासपीठ मिळावं, जेणेकरून त्यांची कलाकृती विकण्यासाठी त्यांना ग्राहक शोधावे लागणार नाहीत, प्रदर्शनं भरवून कमिशन द्यावं लागणार नाही. स्वत:चं एक हक्काचं असं व्यासपीठ त्यांना मिळेल. आणि म्हणूनच सुरुवात झाली 'द आर्ट ऍंड क्राफ्ट गॅलरी'ची.

''भारतातील आणि भारताबाहेरील अनेक कलाकारांसाठी हे एक हक्काचं व्यासपीठ आहे. याच्या माध्यमातून अनेक कलाकार ग्राहकांपर्यंत आणि ग्राहक कलाकारांपर्यंत पोहोचले आहेत. तसंच आम्ही आमच्या सदस्यांकडून केवळ एकदाच आयुष्यभरासाठी मेंबरशिप फी म्हणून पाच हजार रुपये आकारतो. त्यानंतर त्यांना कुठलाही खर्च नसतो. या क्षेत्रात नवीन लोकांना ऑॅनलाइन माध्यमातून आपण आपली कलाकृती कशी विकावी हे माहीत नसतं, त्यासाठी आम्ही त्यांना बँ्रडिंग, पॅकेजिंग इ.बद्दल शिकवतो, ग्राहकांशी भेट घालून देतो, परदेशातील आर्ट गॅलरीजसोबत त्यांचा 'टाय अप' करून देतो. तसंच त्यांना येणाऱ्या समस्या सोडवण्यातही मदत करतो'' अशी माहिती अक्षया बोरकर यांनी दिली. बरेचदा या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना असं वाटतं की ऑॅनलाइन असल्यामुळे काम सोपं होणार आहे, पण खरोखरीच तसं नसतं. त्यासाठी तंत्रज्ञानाची माहिती नसल्यास सुरुवातीला न घाबरता लोकांची मदत घ्यावी. आजही समाजात असे अनेक प्रामाणिक लोक आहेत, जे तुम्हाला मदत करतात. त्यामुळे मदत घेण्यासाठी घाबरू नये, असा संदेश त्यांनी नवीन उद्योजिकांना दिला.

असं म्हणतात महिलांमध्ये काही कला उपजतच असतात. मात्र आपल्या या कलागुणांना ओळखून त्याचा योग्य वापर केल्यास ती कलाच तुम्हाला एक मोठी उद्योजिका बनवू शकते, हे या काही तरुण महिलांनी सिध्द केलं आहे. यासाठी जिद्द आणि मेहनत तर आवश्यक आहेच, सोबत आपल्याला नेमकं काय हवं आहे, आपल्याला ग्राहकांना नेमकं काय द्यायचं आहे हे अगदी स्पष्ट माहीत असणंही आवश्यक आहे. सुरुवातीला आपण फेसबुक पेज, इन्स्टाग्राम अशा माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचू शकतो, तेथून व्यवसायाला सुरुवात होऊ शकते. त्यानंतर तंत्रज्ञानाची पूर्ण माहिती नसल्यास, सुरुवातीला आउटसोर्सिंगची सुविधाही असते. एकदा जम बसला की ढेपाळून जाता कामा नये, त्याचं मोठं कारण म्हणजे हे माध्यम ऑॅनलाइन आहे, आणि म्हणूनच येथे दररोज नवीन काहीतरी लागतं. नवीन ग्राहकांना जोडताना जुन्या ग्राहकांना वेबसाइटवर परत कसं आणता येईल याचा विचार करणंही आवश्यक आहे. हे सगळे प्रश्न सोडवल्यानंतर, एक मोठी उद्योजिका होण्यापासून आपल्याला कुणीच रोखू शकत नाही.

9011158509

 

Powered By Sangraha 9.0