भारतीय मुस्लिमांमधील वाढता फुटीरतावाद

16 Mar 2017 12:35:00

एकंदरच सलाफी-वहाबी विचारसरणी ही धार्मिक कट्टरतावादाकडे झुकणारी आहे. सुन्नी सलाफी धर्मवादी उपपंथाचा उगम सौदी अरेबियात झाला असून त्याला वहाबी उपपंथ असेही म्हणतात. सध्याची सौदी राजघराण्याची कट्टरतावादी राजवट याच पंथाची असून त्यांनी जगभरात तिचा प्रचार-प्रसार करण्यासाठी गेली काही दशके पेट्रोडॉलर्सची उधळण सुरू ठेवली आहे. त्याचा परिणाम म्हणून स्थानिक पातळीवर इसिसचे समर्थक निर्माण झाले आहेत. सलाफी-वहाबी विचारसरणीप्रमाणे मुस्लिमांनी

पै. महंमदांच्या काळातील समाज तसाच्या तसा निर्माण करण्यास कटिबध्द असले पाहिजे. त्यात अरबी वागणूक, अरबी संस्कृती व पेहराव आणि जिहादसाठी प्रयत्नशीलता असे विषय शिकविले जातात, मनावर ठसविले जातात.

डिसेंबर 2016च्या शेवटच्या आठवडयात गोव्यातील टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आली होती, की गोव्यातील जमाते इस्लामी या संस्थेने मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी त्यांचा वारसा सांगणारे प्रदर्शन वेरणा येथे आयोजित केले आहे. त्या प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद पाहता त्याची मुदत एका दिवसाने वाढविली आहे. माझे कुतूहल चाळवले. मी आणि माझा एक मित्र दोघे मिळून ते प्रदर्शन पाहायला गेलो. त्या ठिकाणी दुरूनच ध्वनिवर्धकावरून समजले की प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सुरू होता. प्रश्न विचारणारे विद्यार्थी इंग्लिशमधून प्रश्न विचारत होते, उत्तरेही इंग्लिशमधून होती. हा खास 'गोवा माहौल'. मी आत शिरण्यापूर्वी ओळखपत्र घेताना पत्रकार-लेखक अशी माझी ओळख करून दिली. लगेच मला साहाय्य करण्यासाठी एक-दोन कार्यकर्ते सरसावले. मी त्यांना सांगितले की त्यांची मदत लागल्यास मी नक्की सांगेन, पण तरीही ते आजूबाजूस घोटाळत राहिले. प्रदर्शनात इस्लामची निरनिराळया प्रकारची धार्मिक माहिती देणारे गाळे होते. विद्यार्थीच प्रदर्शनार्थ ठेवलेल्या वस्तूंची माहिती देत होते. असे विद्यार्थी सर्वच प्रदर्शनात पाठ करवून घेतलेले बोलत असतात. त्याबद्दल त्याचे कौतुक करणे अपेक्षित असते. तसे मी काहींचे कौतुक केले.

एका ठिकाणी, नष्ट झालेल्या संस्कृतींची माहिती होती. त्या सर्व संस्कृती अज्ञात काळातील (जहिलीया) होत्या, त्यामुळे नष्ट झाल्या. आता इस्लाम उत्तर युगात ईश्वरी ज्ञानाचा प्रकाश पडल्याने तसे होणार नाही. ती विद्यार्थिनी अकरावी-बारावीतील असावी. मी तिला विचारले की, इस्लामपूर्व हजारो वर्षांपासून हिंदू संस्कृती आजही टिकून आहे. याबद्दल विचार करून काही सांगू शकशील का? ती विचारात पडली. लगेच एक कार्यकर्ता ''तुम्हाला काही विचारायचे आहे का?'' असे विचारत आला. त्यालासुध्दा मी तोच प्रश्न विचारला व सांगितले, याचे उत्तर तू स्वत:च शोध. दुसऱ्या ठिकाणी इस्लामप्रणीत व्याजमुक्त बँकिंगची माहिती देणाऱ्या मुलाला तशी व्यवस्था दुसऱ्या कोणत्या देशात आहे, याची माहिती नव्हती. प्रदर्शनातील त्या गाळयावर 'रीबा' व्याजासंबंधित माहिती दिली होती. तसेच व्याजमुक्त बँकिंगची माहिती संदर्भासहित दिली जात होती. ती पाहून मी त्याला माहिती दिली की असे सर्वात जास्त व्यवहार सौदी अरेबियात फक्त 20% उलाढालीपर्यंत होतात, इंडोनेशिया-मलेशियात 10-12% तर इजिप्तमध्ये 1.5-2% होतात. इस्लामच्या प्रारंभकाळातच सांगितली गेलेली ही व्याजमुक्त व्यापारप्रणाली खुद्द इस्लामी देशांमध्येच का अंमलात आणली गेली नाही, यावर तू विचार करणार आहेस का? असे मी त्याला विचारले. तो विद्यार्थी बोलला नाही.

इस्लाममध्ये महिलांच्या बरोबरीच्या अधिकाराची माहिती देणाऱ्या एका गाळयावर एक तरुणी होती. मी चौकशी केली असता ती स्वत: शिक्षिका असल्याचे समजले. मी तिला सांगितले की, इस्लाममध्ये स्त्रीला पुरुषाच्या तुलनेत फक्त अर्धा अधिकार आहे. तीला पैतृक संपत्तीतील अर्धाच वाटा मिळतो, तिची साक्ष अर्धी मानली जाते; एवढेच काय, मूल झाल्यानंतर देण्यात येणाऱ्या बळींमध्ये कुर्बानीमध्ये मुलांसाठी दोन बकरे तर मुलीसाठी एकच बकरा द्यावा असे हदीस ग्रंथात आहे. यात स्त्रियांना समान अधिकार कुठे येतो? असे मी तिला विचारले. तिने स्वीकारले की अशी हदीस - पै महंमदांची आठवण आहे. इस्लाममध्ये स्त्रियांना स्वर्ग कधीच मिळणार नाही, कारण अनेक बाबतीत पुरुषांपेक्षा त्या कमी लेखल्या गेल्या आहेत. मी तिला दुसरा प्रश्न केला की, तिला ही हदीस माहीत आहे काय? तिला ती माहीत होती. तिचे स्पष्टीकरण होते की स्त्रिया वायफळ गप्पा (बातून) करतात आणि वेळ वाया घालवतात. हा आमचा संवाद सुरू राहिला, हे पाहून 2-3 विद्यार्थिनी व माझ्या मागे असलेले 1-2 कार्यकर्ते जणू मला उत्तर देण्यासाठी सरसावले. तेवढयात एका कार्यकर्त्याने मला थंड पेय देण्याच्या निमित्ताने बाहेर काढले. मीसुध्दा समजलो की असे प्रश्न ऐकण्याची व त्यांची उत्तरे देण्याची त्याची मनःस्थिती नाही. मला या सर्व गाळयांमधून अरबी संस्कृती, अरबी पेहराव, अरबी विज्ञान प्रगती इ.चेच प्रदर्शन दिसले. भारतीय मुळाचे, भारतीय परंपरेचे निदर्शक एकही चिन्ह नव्हते.

आयात केलेले आदर्श

एका वेगळया मोठया हॉलमध्ये महापुरुषांची, आदर्शांची चित्रे आणि ठळक अक्षरातील माहितीपट लावले होते. त्यात अरबस्थानातील आणि मध्यपूर्वेतील प्रसिध्द व्यक्तींची माहिती आणि छायाचित्रे होती. त्याचबरोबर मुहंमद बिन कासीम हसन अलबन्ना, अबुल आला मौदुदी यांचा समावेश होता. मुहंमद बिन कासीम हा भारतावरील आक्रमक, तो भारताला मुस्लीम बनविण्याचा आदेश - 'गझवा-ए-हिंद' - घेऊन आला होता. त्याने केलेले अत्याचार, धर्मांतरे, दाहीर कन्यांचे अपहरण इ. गोष्टी आपल्याला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. तो आदर्श पुरुषांच्या नामावलीत गणला गेला. हसन अल बन्ना हा इजिप्तमधील अरब. त्याने सईद कुत्ब याच्याबरोबर 'मुस्लीम ब्रदरहूड' या नावाची अतिरेकी संस्था स्थापन केली. 'काफीरघृणेचे' (Kafirophobiaचे) तत्त्वज्ञान तयार केले. त्याच्या माहितीपटात त्याने स्थापन केलेल्या 'मुस्लीम ब्रदरहूड' या संघटननेची नेमकी माहिती दिलेली नव्हती. मौ. अबुल आला मौदुदी हे तसे मराठवाडयातील, पण कट्टर मुस्लीम. इस्लामचे विद्वान म्हणून अबुल कलाम आझाद यांच्या पाठोपाठ मुस्लीम जगतात त्यांचा गवगवा होता. म.अ. जीनांचा सेक्युलर असू शकणारा पाकिस्तान कट्टरतेकडे झुकण्यास अबुल आला मौदुदी स्वत: आणि जमात ए इस्लामी पाकिस्तान ही त्याची संस्था कारणीभूत होती. खास मध्ययुगीन विचारसरणीचे कट्टरपंथी मौदुदी भारतीय मुसलमानांमध्ये आजसुध्दा लोकप्रिय आहेत. गोव्याचा इस्लामिक वारसा म्हणून एका पडक्या मशिदीचे चित्र आणि पणजीचा आदिलशहाचा राजवाडा यांची चित्रे एका टोकाला होती. ते पाहून समजले की हे मुस्लीम सुन्नी समाजातील नव्या पिढीचे अरबीकरण करण्याचे शिस्तबध्द प्रयत्न आहेत. त्यात भारतीय मुस्लिमांचा वारसा ठरू शकतील अशा भारतीयांचा समावेश नव्हता.

आजवर भारतातील मुस्लीम औरंगजेबला 'पाक बादशहा', 'वली' तारणहार समजत असत. तो मात्र मूळचा मंगोल होता. आजच्या अरबीकरणाच्या लाटेत त्याचा वारसा जमाते इस्लामला नाकारायचा आहे. टिपू सुलतानचा फार डिंडिम वाजविला जातो, ज्याने क्षेपणास्त्र तंत्राचा प्रथम उपयोग केल्याचे मोठया गर्वाने मुसलमान आणि सेक्युरल लोक सांगतात. त्या टिपू सुलतानला या प्रदर्शनात स्थान नव्हते. ज्या अबुल कलाम आझादांनी म. गांधी व इतर काँग्रेसी नेत्यांबरोबर स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला होता, त्यांना तर भारतीय मुस्लिमांनी केव्हाच वाळीत टाकले आहे. भारताचे मिसाइल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची तीच गोष्ट आहे. या व्यक्ती भारतीय सुन्नी मुस्लिमांना आदर्श वाटत नाहीत. मी ते पाहून आयोजकांची भेट घेण्यासाठी विचारणा केली, तेव्हा आसीफ नावाचे एक गृहस्थ मला भेटायला आले. ते मला पूर्वीसुध्दा भेटले होते व नंतरसुध्दा भेटले. त्यांना मी स्पष्ट शब्दात सांगितले की, इथे जे इस्लामी वारशाचे प्रदर्शन केले आहे, तो 'अरबीकरणाचा' प्रयत्न आहे. येथे वर दिलेल्या औरंगजेब ते अब्दुल कलाम यांच्याबरोबरच कृष्णभक्त रसखान, मराठी संतकवी शेख महंमद बाबा इत्यादींची माहिती का नाही? आजकाल मराठी मुसलमान सांगण्यास उत्सुक असतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात व सेनाधिकाऱ्यांमध्ये खूप मुस्लीम होते. त्यांच्यापैकी एकाचीही माहिती देण्याची त्यांना आवश्यकता का भासली नाही? माहितीसाठी मी त्यांना डॉ. रा.चिं. ढेरे यांनी लिहिलेल्या 'मुसलमान मराठी संतकवी' हे वाचून त्यातील संतांची माहिती प्रदर्शनात ठेवण्याची सूचना केली. शिवाजी महाराजांच्या सेनाधिकाऱ्यांची माहिती ठेवण्याची सूचना केली. यादरम्यान त्यांनी चालत चालत मला मुख्य मंडपापासून दूर असलेल्या झाडाच्या सावलीत नेले. इतरांनी माझे बोलणे ऐकू नये असा स्पष्ट उद्देश होता. हे अरबीकरण मुस्लीम समाजालाच हितावह नाही, असे सांगून मी तिथून निघालो.

भेकड इंग्लिश पत्रकारिता

ही दिनांक 31 डिसेंबरची गोष्ट. मी एका प्रतिष्ठित इंग्लिश वृत्तपत्रातील बातमी वाचून त्या प्रदर्शनाला गेलो होतो. आल्यानंतर तेथे घडलेल्या वृत्तान्ताची माहिती देणारा लेख इंग्लिशमधून लिहून तो पणजीतील त्याच इंग्लिश वृत्तपत्राला 'Heritage of Indian Muslim' या शीर्षकाखाली पाठविला. त्याने तो प्रसिध्द केला नाही. फार उशीर होऊ नये म्हणून दुसऱ्या इंग्लिश वृत्तपत्राला पाठविला. त्या दोघांनीही तो लेख प्रसिध्द करण्याचे धाष्टर्य दाखविले नाही. मराठीतील 'भारतीय मुस्लिमांचा वारसा' हा लेख एका स्थानिक दैनिकाने दि. 8 जानेवारी रोजी छापला. त्यावर 'आमची संस्था समाजाच्या कल्याणासाठीच वावरत आहे' असे स्पष्टीकरणे देण्यात आले. मी त्यानंतर एकदा सहज एका वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या जवळ गेलो असता माझ्या लेखाची चौकशी केली. वृत्तसंपादकाने ई-मेलवरील लेख चाळला आणि सांगितले की ''मुस्लिमांच्या विरोधातील लिखाण आम्ही छापत नाही. कारण मागे एकदा असे चुकून झाले असता आमच्या कार्यालयावर मोर्चा आला होता. तेव्हापासून मुस्लिमांच्या बाबतीत काहीही न छापण्याचे आमचे संपादकीय धोरण आहे.'' असे संपादक हिंदू धर्म, परंपरा, रितीरिवाज यांच्याबाबतीत मात्र खुशाल काहीही प्रसिध्द करतात. वर सेक्युलॅरिस्ट, पुरोगामी आणि इतर बिरुदे घेऊन मिरवितात. त्यानंतर दिल्लीच्या ऑर्गनायझरने दि. 15 जानेवारीच्या अंकात हा लेख छापला.

त्यानंतर दि. 8 फेब्रुवारी रोजी मी पणजीतील इस्लामी स्टुडंट मूव्हमेंटच्या पुस्तकालयात गेलो असता असीफ आणि जमालुद्दीन नावाच्या दुसऱ्या गृहस्थांशी भेट झाली. मी आसीफना विचारले की मराठी मुस्लीम शिवाजी महाराजांच्या सेनाधिकाऱ्यांची माहिती सांगतात. त्याबरोबर जमालुद्दीन यांनी सेलफोनवर एक व्हिडिओ दाखविला, त्यात शिवाजी महाराजांच्या एकाही मुस्लीम सरदाराने त्यांच्याशी विद्रोह केला नाही असे चित्रित केले होते. मी ते पाहून दोघांनाही प्रश्न केला की हा भारतीय मुस्लिमांचा तेजस्वी वारसा नाही काय? पण त्याच वेळी नमाजाची वेळ आहे असे सांगून दोघांनीही काढता पाय घेतला.

गोव्याला सलाफी - वहाबी लागण

याच दरम्यान दि. 2 रोजी 'केरळ सलाफी असोशिएशन'च्या दोन सदस्यांना पोलिसांनी कन्नड भाषेतील पत्रके वाटताना ताब्यात घेतले. इल्यास (वय 34) व त्याचा नातेवाईक अब्दुल (वय 23) अशी त्यांची नावे होती. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. पत्रकांमधील मजकुराची माहिती करून घेतली व त्यात इसिसविरोधात मजकूर असल्याचे समजल्यावर त्यांना सोडून देण्यात आले, असे वृत्त दि. 4 रोजी प्रसिध्द झाले. मंगळुरूला दि. 9 जानेवारी रोजी जे सलाफी संमेलन होणार आहे, त्याला आमंत्रण देणारी ही पत्रके होती.

 या ठिकाणी एक नमूद केले पाहिजे की, या तरुणांचा इसिसशी संबंध नसेलही, पण एकंदरच सलाफी-वहाबी विचारसरणी ही धार्मिक कट्टरतावादाकडे झुकणारी आहे. सुन्नी सलाफी धर्मवादी उपपंथाचा उगम सौदी अरेबियात झाला असून त्याला वहाबी उपपंथ असेही म्हणतात. सध्याची सौदी राजघराण्याची कट्टरतावादी राजवट याच पंथाची असून त्यांनी जगभरात तिचा प्रचार-प्रसार करण्यासाठी गेली काही दशके पेट्रोडॉलर्सची उधळण सुरू ठेवली आहे. त्याचा परिणाम म्हणून स्थानिक पातळीवर इसिसचे समर्थक निर्माण झाले आहेत. सलाफी-वहाबी विचारसरणीप्रमाणे मुस्लिमांनी
पै. महंमदांच्या काळातील समाज तसाच्या तसा निर्माण करण्यास कटिबध्द असले पाहिजे. त्यात अरबी वागणूक, अरबी संस्कृती व पेहराव आणि जिहादसाठी प्रयत्नशीलता असे विषय शिकविले जातात, मनावर ठसविले जातात. त्यांनी शिया, सूफी, अहमदिया इ. दुसऱ्या पंथांच्या मुस्लीमांना 'खऱ्या मुस्लिमतेपासून गेलेले काफीर' ठरवून टाकले आहे. अशा कट्टर विचारसरणीला थारा द्यायचा की नाही, हे गोव्यातील मुस्लीम समाजाला ठरवायचे आहे. पण गोव्याला सलाफी-वहाबी लागण झाल्याची ही सुरुवात आहे.

& 9975559155,

drpvpathak@yahoo.co.in

 

Powered By Sangraha 9.0