जातींची साहित्य संमेलने साहित्याला तारक की मारक?

01 Feb 2017 17:45:00

 जातीय संमेलने जातीपारची झाली तर ती हवीच आहेत. आदिवासी धनगर साहित्य संमेलनाने त्याची सुरुवात केली आहे व आता अनेक जाती याच पध्दतीने जातीपार जाणारी साहित्य संमेलने भरवत स्वशोधासोबतच अन्यांच्याही अस्तित्वाशी नाळ जोडणार आहेत. पण केवळ जातीची व जातीसाठीच होणारी संमेलने मात्र अत्यंत समाजविघातक असतील, हेही लक्षात घेतले पाहिजे. आणि कोणावरही वेगळे सहित्य संमेलन भरवायची वेळ येऊ नये असे वाटत असेल, तर आपल्या अ.भा. साहित्य संमेलनांना आजवर चालत आलेले संकुचित मार्ग त्यागावे लागतील.

राठी साहित्य संस्कृतीचे बनलेले एक अविच्छिन्न लक्षण म्हणजे त्यातील जातीयवाद! हा जातीयवाद लेखकांच्या विविध कंपूंत जसा आहे, तसाच तो समीक्षकांमध्येही आहे. किंबहुना कोणत्याही साहित्यिकाची साहित्य समीक्षा करताना अथवा करायला लावताना त्यामागे जातीय संदर्भ नाहीत असे क्वचितच घडते. अनेक उत्तमोत्तम साहित्यिक जातीय पाठबळ नसल्याने अथवा कोणा कंपूंत सामील न झाल्याने हयातीतच साहित्यबहिष्कृत झाले आहेत, हे आपण मराठी साहित्याचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल. साहित्यिकच मुळात बव्हंशी जातीय प्रेरणांनी ग्रासित असल्याने त्याचे प्रतिबिंब साहित्य संमेलनांवरही पडणे स्वाभाविक आहे. अखिल भारतीय साहित्य मराठी साहित्य संमेलनावर 'हे संमेलन ब्राह्मणी आहे...' असा आरोप पूर्वीपासून होत आला आहे. म्हणजे अध्यक्ष जरी कोणत्याही जातीचा असला, (खरे तर ठरावीकच जातींचे) तरी एकुणातच संमेलनावर ज्या विषयांचा व चर्चकांचा प्रभाव राहत आला आहे, त्यामुळे या आरोपाला पुष्टीच मिळत आली आहे. अगदी संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीतही उमेदवाराची 'जात' हाही एक घटक छुपेपणाने कार्यरत असतो, हे आता गुपित राहिलेले नाही. साहित्य हा जर मतदानाचा निखळ निकष नसेल, तर त्या अध्यक्षांचेही आम्हाला काय करायचेय? अशी कोणती साहित्यिक क्रांती ते घडवणार आहेत?

किंबहुना ब्राह्मणी, मराठा, ओबीसी व दलित अशी मराठी साहित्याची जातीय विभागणी झालेली आहे. मराठा समाजही त्यांचे साहित्य संमेलन स्वतंत्र आयोजित करतो. ओबीसींचेही आता, दुबळे असले तरी, स्वतंत्र साहित्य संमेलन भरू लागले आहे. ओबीसींतील काही जातीही साहित्य संमेलन घेत आल्या आहेत. फारशा चर्चेत राहिले नसले, तरी आगरी समाजाचे साहित्य संमेलन गेली 15-16 वषर्े भरत आले आहे. मुस्लीम, गुराखी व आदिवासींचीही साहित्य संमेलने होतात. विद्रोही साहित्य संमेलने नेहमीच प्रकाशात असतात ती त्यातील विद्रोही जाणिवांमुळे. पण विद्रोही नेमका कोण हे ठरवायचे तंत्र पुन्हा जातीयच असते! अ.भा. साहित्य संमेलनांत (आजवरच्या अध्यक्षांचा इतिहास पाहा) केवळ सहानुभूती वा आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी अध्यक्षपदी अधूनमधून दलित वा मुस्लीम लेखकाची निवड घडवून आणत असतात. पण निरुपद्रवी घटक असल्याने ओबीसींना अत्यंत क्वचित असे स्थान मिळाले आहे. आता या सर्व प्रकारात साहित्यिक योग्यता हा निकष असतोच असे नाही. दोन-चार, कोणाही वाचकाला न आठवणारी पुस्तके लिहिणारे अनेक महाभाग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनलेले आहेत. फक्त मते जमा करण्याचे कौशल्य असले की पुरे!

खरे तर साहित्य संमेलने जातिआधारित भरवली जाणे हे सामाजिक अध:पाताचे मोठे लक्षण आहे. एका परीने इतरत्र शिरकाव होत नाही, म्हणून आपल्याच जातीचे संमेलन भरवा हा प्रकार साहित्य संस्कृतीच्या रसातळाचे विदारक दर्शन घडवतो असे म्हणता येते. पण 'सर्वसमावेशकता' हा आपल्या केंद्रीय अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मूलमंत्रच नसल्याने असे होणे स्वाभाविक बनून जाते. शेवटी प्रत्येक कलावंताला व साहित्यकाराला व्यासपीठ हवे असते. ते नाही. त्यामुळे जातीय संमेलने भरत आली आहेत. पण यातून समाज विखंडित होतो याचे भान कोणता साहित्यिक ठेवताना दिसतो? असे घडणे असामाजिक आहे हे सांगण्याचा प्रयत्न कोणत्या विचारवंताने आजवर केलाय? 'कोणालाही दुखवायचे नाही...' ही काय विचारवंतांची रीत झाली? समाजाच्या हितासाठी अनेकदा खडे बोल सुनवावे लागतात, ऐक्याची दिशा दाखवावी लागते... पण हे कोण करणार?

चिंताजनक बाब अशी की वाचकही पुस्तके निवडताना जातीय विचारांनी प्रेरित असतात. स्वजातीय लेखकाला तो नकळत प्राधान्य देत जातो आणि त्यावरच साहित्य चर्चा घडवून आणतो. त्यामुळे एक वाचक म्हणून आपण अन्य लेखकांच्या अनुभवविश्वाला मुकतो आहोत, याची जाणीव ठेवत नाही.

साहित्य हे समाजाच्या ऐक्यासाठी असते, ते सर्वांचेच व सर्वांसाठीच असते आणि त्यातूनच संपूर्ण समाजाच्या मानसिकता बदलावर परिणाम घडू शकतो, याचेच भान सुटले तर दुसरे काय होणार? पण आपले साहित्यिक मुळात तेवढे प्रगल्भ आहेत काय, यावर विचार करावा लागणार आहे.

मराठी साहित्याचा परीघ अत्यंत मर्यादित राहिलेला आहे. साहित्य सर्व समाजासाठी असते असे म्हटले, तर समाजांचे व्यापक दर्शन साहित्यातून घडावे, आपले जिवंत व प्रांजळ चित्रण झाले आहे व त्या साहित्याशी मानसिकदृष्टया जोडले जावे असे प्रत्येक समाजघटकाला वाटावे हे स्वाभाविक आहे. पण आपल्याकडचे चित्र काय आहे?

भारतीय समाज जातिआधारित - म्हणजेच परंपरागत व्यवसायाधारित - राहिला आहे. आज व्यवसाय बदलले असले, तरी जुन्या जाती आजही अटळ शापाप्रमाणे भाळी चिकटून आहेत. एक जुना कल्पित चातुरर््वण्य गेला असला, तरी समाजाची चार गटांतील वाटणी आजही गेलेली नाही. किंबहुना हा नवा चातुरर््वण्य घटनाप्रणीतच आहे असे म्हणता येईल. साहित्य व विचार हे या वाटणीतील सीमारेषा धूसर करतील अशी अपेक्षा बाळगता येत नाही, कारण साहित्यिकही आपली जात अथवा आपलेच मर्यादित अनुभवविश्व यात मश्गुल आहेत. कोळयांवर जागतिक दर्जाच्या कादंबऱ्या पाश्चात्त्य साहित्यात आहेत. अर्नेस्ट हेमिंग्वेच्या कादंबरीने तर नोबेल मिळवले. हेमिंग्वे कोळी नव्हता. आमच्या कोळयांचे जीवनही तितकेच आव्हानात्मक असताना आमच्या लेखकांना ते जीवन आपल्या साहित्यकृतीचे विषय बनवावेत व नवतत्त्वज्ञानाचीही उभारणी करावी हे सुचलेले नाही. धनगरांचेही तसेच. बनगरवाडीचा एखादा अपवाद वगळला तर वाडयांवर राहणाऱ्या, दऱ्याखोऱ्यात मेंढरे घेऊन फिरणाऱ्या धनगरांच्याही जीवनात रोमांचक असे काही आहे असे किती लेखकांना वाटले? ओबीसी म्हणजे पुरातन काळापासूनचा निर्माणकर्ता समाज. अर्थव्यवस्थेचा व संस्कृतीचाही प्रमुख आधारस्तंभ. अगदी आजही. पण या समाजातील नायक घेत त्यांच्या विश्वाचे - मग ते भलेही उद्ध्वस्ततेचे असेल वा संघर्षातूनच्या यशांचे - अपवादात्मक दर्शन आपल्या कादंबऱ्यांत पाहायला मिळते. शेतकऱ्यांचे जीवन भांडवल म्हणून वापरत शहरी वर्तुळांत अनेक लेखक गाजले असले, तरी त्या साहित्यात कितपत प्रामाणिकपणा आहे? खरे तर जागतिकीकरणानंतरचा शेतकरी व त्याच्या जगण्याचे बदललेले संदर्भ व संघर्ष आपल्या साहित्यात अभावानेच दिसतात. तीच बाब आदिवासींची आणि भटक्या-विमुक्तांची.

आंबेडकरी साहित्यप्रवाह स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकला असला, जागतिक पातळीवर दखलपात्र बनला असला, तरी अदलिताने दलितांवर लिहिलेल्या साहित्यकृती दलित समाज कितपत स्वीकारतो, हा एक प्रश्नच आहे. विजय तेंडुलकरांच्या 'कन्यादान' नाटकाबाबत अस वाद सोशल मीडियावर होत असतो. माझ्या '...आणि पानिपत'चेही असेच घडले. दलित साहित्य दलितानेच लिहिले पाहिजे, अन्यथा ते स्वीकारार्ह नाही अशी जर आपली मानसिकता असेल, तर साहित्याचा परीघ रुंदावायला कशी मदत होईल? किंबहुना नायक-खलनायकांची आडनावे ठरवायलाही लेखकांना विचार करावा लागत असेल, तर हे काही साहित्यविश्वासाठी सुखद नाही. कारण कोणता समाज अंगावर येईल याचा आज नेम राहिलेला नाही. दुसरीकडे संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना राम गणेश गडकरींचा पुतळा गटार झालेल्या नदीत फेकून देऊ शकतात, त्या समाजात सर्जनाचे मुक्तद्वार कसे मिळेल? खरे तर इतिहास संशोधनही यामुळे ठरावीक जातिकेंद्रितच राहिले आहे, तर मग अन्य जातींनीही तोच कित्ता गिरवला तर दोष कोणाचा? मराठा नसलेले किती इतिहासकार भविष्यात मराठयांच्या इतिहासाला हात लावतील? हे प्रश्न शरमेने खाली मान घालायला लावणारे आहेत व यावर आम्हाला गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.

जातीनिहाय संमेलने होतात ती दोन कारणांनी, हे आपल्या लक्षात आले असेल. पहिले कारण म्हणजे आमच्या समाजाचे कोठेच चित्रण होत नसेल, आमच्या समाजातील लेखकांना व्यासपीठच मिळणार नसेल, होतकरू लेखकांना कोणी जातिनिरपेक्ष प्रोत्साहन देणार नसेल, तर आम्हीच आमची वेगळी चूल का मांडू नये? हा प्रश्न विविध जाती-जमाती घटकांत उफाळला व जात अथवा जातीवर्गनिहाय संमेलने भरवली, तर कोठे चुकले? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. दुसरे कारण असे की विशिष्ट जात (अथवा धर्म) आमच्यावर आम्ही सोडून कोणीही लिहिले, तर ते आम्ही मान्यच करणार नाही अशी भूमिका घेत स्वतंत्र अस्तित्व जपत असतील, तरीही जातीची (अथवा धर्माची... वरकरणी नाव काहीही दिलेले असो) संमेलने भरणेही तितकेच स्वाभाविक आहे. अशा संमेलनांना दोष देताना आपले कोठे चुकले आहे याचा विचार अखिल भारतीय म्हणवणाऱ्या साहित्य संमेलनाने केला पाहिजे. उदाहरणार्थ, याच संमेलनात बोलीभाषांतील कविता सादर करायची परवानगी मिळावी, यासाठी सर्वेश तरे व त्यांच्या मित्रपरिवाराला संघर्षच करावा लागला, तेव्हा कोठे आगरी, मालवणी, वऱ्हाडी, अहिराणी आदी बोलीभाषांतील कवितांच्या कट्टयाला अनुमती मिळाली. असे अनेक संदर्भ मराठी साहित्याच्या कथित मुख्य प्रवाहाच्या काळजात स्पर्शतही नाहीत. खरे तर संमेलन आयोजकांना खूप आधी ही बुध्दी सुचायला हवी होती.

साहित्य हे संस्कृतीचेच एक रूप आहे. महाराष्ट्रात प्रदेशनिहाय संस्कृती जशा आहेत, तशाच जात-जमातनिहायही आहेत. या संस्कृतींना कवेत घेत, त्यांचा सन्मान करत नवीन आदर्श संस्कृतीची उंची गाठायला लागेल, तरच मराठी साहित्याला भवितव्य आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ओबीसी याबाबत आता जागे होऊ लागले असून त्यांना आपला 'स्व' न्याहाळण्यासाठी, रिलेट करण्यासाठी साहित्य हवे आहे. पण ते साहित्य आज तरी मराठीत नाही. भटके आणि विमुक्तांची गोष्ट वेगळी नाही. साहित्यात आपण व आपल्यात साहित्यिक असावेत असे वाटणे कसे चूक म्हणता येईल? पण आता जातीसंमेलनांचे रूप केवळ जातीय न होता जातिगटाधारित व त्याही बाहेर जाणारे कसे होईल, याचेही प्रयत्न अलीकडे होत आहेत.

नुकतेच 7-8 जानेवारीला सोलापूरला पहिलेच आदिवासी धनगर साहित्य संमेलन झाले. तेथील उत्साह व श्रोत्यांचा प्रतिसाद अवर्णनीय होता. सहित्यिक व विचारांची भूक सर्वांत आहे याचे चित्र दिसले. श्रोत्यांना रिलेट होतील असेच विषय असले, तर त्यांची कमतरता नाही नि वाचकांचीही कमतरता नाही हेही या निमित्ताने स्पष्ट झाले! या संमेलनात जाती, वर्ग यांचा विचार न करता घेता येईल तेवढया विविध जातींच्या वक्त्यांना सामावून घेतले गेले होते. या संमेलनाचा अध्यक्ष बिगर-धनगर... म्हणजे मी होतो. खरे म्हणजे उघडया आभाळाखाली मुक्त स्वातंत्र्य जगत आलेल्या, इतिहासही घडवलेल्या धनगरांनी ही जी जात-निरपेक्ष विराट भूमिका घेतली, ती अगदी अखिल भारतीय साहित्य संमेलनालाही आदर्श ठरावी अशीच आहे. यासाठी निश्चितच या संमेलनाचे आयोजक अभिमन्यू टकले, अमोल पांढरे, जयसिंगतात्या शेंडगे व अखिल मराठी धनगर समाज अभिनंदनास पात्र आहेत यात शंका नाही. भविष्यात जातींनी भरवलेली संमेलने असली, तरी त्यात फक्त स्वजातीचेच वक्ते-साहित्यिक नसतील, या दिशेने आम्ही काम करत आहोत. यामुळे समाज एकत्र येण्यास व नवीन विचार समजून घेत जीवनात बदल घडण्यात मदत होईल. शिवाय आत्मभानाचा सध्याचा बिकट बनलेला प्रश्नही सुटेल अशी आशा आहे. नवप्रतिभेचे साहित्यकार घडण्यास मदत होईल, कारण त्यांना हक्काचे व्यासपीठ असेल. भिकाऱ्याप्रमाणे रांगेत उभे राहावे लागणार नाही अथवा कोणा तथाकथित ज्येष्ठांचे लांगूलचालन करावे लागणार नाही.

हे करणे जर भाग ठरले असेल, तर अ.भा. संमेलनच नव्हे, तर आमचे प्रथितयश म्हणवणारे सर्व साहित्यिक व साहित्यसंस्थांचे चालक याला जबाबदार आहेत. पात्रे म्हणून असो, संस्कृती म्हणून की लेखक म्हणून साहित्यात निरलस मनाने सर्व समाजांना स्थान मिळत नाही, तोवर हे होणे अपरिहार्य आहे. कोणत्याही प्रतिभाशाली लेखकाला आव्हान देईल अशी विलक्षण जीवने व थोर-मोठे मानल्या गेलेल्या ऐतिहासिक पुरुषांच्या इतिहासाएवढाच आव्हानदायक इतिहास त्यांनाही आहे. हा इतिहास गर्व चढवण्यासाठी नाही, तर आत्मभानासाठी आहे हे साहित्यिकांना व इतिहासकारांनाही समजायला हवे. साहित्यातून समाज व त्यांच्या संस्कृती अदृश्य करून कसे चालेल? पण त्या केल्या आहेत. इतिहासकारांना त्यांच्या इतिहासात रस नाही, तथाकथित संस्कृती रक्षकांना एकाच समाजात वैविध्यपूर्ण संस्कृती आहेत हे समजत नाही. प्रत्येक जातीचा इतिहास म्हणजे व्यवसायाचा इतिहास, हे मूलतत्त्व न समजणाऱ्या इतिहासकारांनी या समाजांना जणू काही इतिहासच नाही असे ठरवले आहे. इतिहास फक्त राजेरजवाडयांचा नसतो, हे यांना समजतच नसेल तर दोष कोणाचा? संस्कृती ही काही एखाद-दुसऱ्या गटांची मालमत्ता नव्हे, हे सांगणार आणि समजून घेणार कोण?

जागतिक पातळीवर विचार केला, तर आपले साहित्यविश्व दळिद्री ठरते ते यामुळेच. त्यामुळेच अखिल भारतीय साहित्य संमेलनाने मराठी मनाला आपल्याच जगण्याचा भाग वाटावे अशी उंची गाठली नाही. सर्वांचे साहित्य हे आपलेच साहित्य वाटावे अशी स्थिती नाही. साहित्य व्यवहारही जातीय झालाय, तर जातीबाहेर जाण्यासाठी आदिवासी धनगर साहित्य संमेलनासारखी जाती/जमातींनी भरवलेली संमेलने भरली तर मग बिघडले कोठे? किंबहुना मराठी साहित्यात एक वेगळे अभिसरण घडून येण्यास त्यामुळे मदत होऊ शकेल. नवविचारांची कारंजी फुटू लागली, तर ती आम्हाला हवीच आहेत. अ.भा. साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची आत्मस्तुतीने व भोंगळ गांभीर्याने भरलेली, दिखाऊ तत्त्वजडपणे भरलेली भाषणे व तेच ते परिसंवाद व तेच ते सहभागी वक्ते ऐकण्यात कोणाला किती रस आहे? रसिकांना रस आहे तो साहित्यातील आपले स्थान शोधणे, आपल्या भाव-भावनांना अधिक व्यापक अर्थ देईल असे साहित्य वाचणे व विचार ऐकणे यात.

जातीय संमेलने जातीपारची झाली तर ती हवीच आहेत. आदिवासी धनगर साहित्य संमेलनाने त्याची सुरुवात केली आहे व आता अनेक जाती याच पध्दतीने जातीपार जाणारी साहित्य संमेलने भरवत स्वशोधासोबतच अन्यांच्याही अस्तित्वाशी नाळ जोडणार आहेत. पण केवळ जातीची व जातीसाठीच होणारी संमेलने मात्र अत्यंत समाजविघातक असतील, हेही लक्षात घेतले पाहिजे. आणि कोणावरही वेगळे सहित्य संमेलन भरवायची वेळ येऊ नये असे वाटत असेल, तर आपल्या अ.भा. साहित्य संमेलनांना आजवर चालत आलेले संकुचित मार्ग त्यागावे लागतील. भविष्यात तरी ते पुढाकार घेतात काय, हा अत्यंत कुतूहलाचा प्रश्न आहे.

9860991205

Powered By Sangraha 9.0