राजकारणाच्या वाटेवरचं समाजकारणाचं पाऊल

25 Dec 2017 16:06:00

 

वैद्यकीय सेवा हे डॉ. मढवी यांचं अभ्यासाचं आणि अनुभवाचं क्षेत्र असल्याने नागरिकांचं आरोग्य हे त्यांच्या उद्दिष्टांच्या केंद्रस्थानी राहिलं, त्याचबरोबर वृक्षारोपण, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा अनेक उपक्रमांतून ठाण्यातल्या गुणिजनांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिलं. ठाणे शहर स्वच्छ, निरोगी बनवतानाच तेथील राहणीमान अधिक चांगलं बनावं, यासाठी मढवी दांपत्याचे सुरू असलेले प्रयत्न म्हणजे राजकारणाच्या मार्गावरील समाजकारणाचं पाऊल आहे...

स्वत:च्या वैयक्तिक लाभासाठी राजकारणाचा शिडीसारखा वापर करण्याचीच उदाहरणं अधिक दिसतात. अशा परिस्थितीत स्वत:च्या उन्नत, उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्त्वाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करण्याच्या उद्देशाने राजकारणात येणारे तसे दुर्मीळच. भाजपाचे ठाणे जिल्ह्याचे शहर उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी आणि त्यांच्या पत्नी व नगरसेविका प्रतिभा मढवी यांचं उदाहरण या दुर्मीळ गटातलं एक. दोघांनाही सामाजिक जाणिवेचा आणि कार्याचा वडिलोपार्जित वारसा लाभला आणि तो जपण्याचा त्यांनी पूर्णार्थाने प्रयत्न केला.

डॉ. राजेश मढवी हे मूळचे ठाणे जिल्ह्यातीलच कशेळी गावचे. घरचं सुसंस्कृत वातावरण, शिक्षणाविषयीची तळमळ यामुळे मढवी यांच्यावर उत्तम संस्कार घडले. त्यातच आजोबा दिवंगत अर्जुन बाळा मढवी हे सरकारी कंत्राटदार. आपल्या कामामुळे ते ठाण्याचे भूषण ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग पूर्णत्वास आलं. विविध समाजोपयोगी कामांना सढळ हस्ते मदत करण्यासाठी डॉ. राजेश यांचे आजोबा सदैव तत्पर असत. तलावपाळी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळयाखाली देणगीदार म्हणून त्यांचं नाव वाचावयास मिळतं. आजोबांचा हा आदर्श डोळयासमोर असल्याने समाजाचे आपणही काहीतरी ऋण लागतो ही भावना डॉ. मढवी यांच्या मनात दृढ झाली. त्यांनी बेडेकर हायस्कूलमधून शालेय शिक्षण, तर ग्रँड मेडिकल कॉलेजमधून (जे.जे. रुग्णालयातून) वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. एम.बी.बी.एस.नंतर ठाणे लॉ कॉलेजमधून एलएल.बी. आणि मुंबई विद्यापीठातून एलएल.एम. केलं.

ठाणे जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर भिवंडी-निजामपूर महापालिकेतही त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांनी केंद्र सरकारच्या सिने डिस्पेन्सरी लेबर वेल्फेअर डिपार्टमेंटमध्ये, तसंच माथाडी कापड बाजार विभागात वैद्यकीय सेवेचा अनुभव घेतला. वैद्यकीय क्षेत्रासारख्या नोबेल - उदात्त क्षेत्रात काम केल्यानंतर समाजाकडे अधिक सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी त्यांना प्राप्त झाली. आपल्या सामाजिक कार्याच्या कक्षा रुंदावण्याची आवश्यकता त्यांना जाणवू लागली. त्यातून वैद्यकीय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील संस्थांशी ते जोडले गेले. ठाण्यातील पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेच्या ते विश्वस्तपदी आहेत. त्याशिवाय इंडियन रेडक्रॉस सोसायटी (ठाणे), सेंट्रल मैदान स्पोर्टिंग क्लब कमिटी, रोटरी कल्ब ठाणे मिडटाउन, लायन्स क्लब ठाणे नॉर्थ, इंडियन मेडिकल असोसिएशन आदी संस्थांचे ते सदस्य आहेत. भाजपाच्या ठाणे शहर उपाध्यक्षपदाच्या जबाबदारीमुळे सामाजिक उपक्रमांच्या अधिक चांगल्या संधी मढवी यांना दिसू लागल्या आणि त्याचं त्यांनी सोनं केलं.

त्यांच्या पत्नी प्रतिभा मढवी यांचे वडील दिवंगत परशराम टावरे 15 वर्षे भिवंडीचे आमदार होते. प्रतिभा मढवी यांनी त्यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा जपत डॉ. राजेश यांना उत्तम साथ दिली. ठाण्यातील नौपाडा परिसरातील वॉर्ड क्र. 21मधून त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. या दांपत्याने ठाणे परिसरात अनेक चांगले उपक्रम राबवले.

वैद्यकीय सेवा हे डॉ. मढवी यांचं अभ्यासाचं आणि अनुभवाचं क्षेत्र असल्याने नागरिकांचं आरोग्य हे त्यांच्या उद्दिष्टांच्या केंद्रस्थानी राहिलं. आरोग्य तपासणी शिबिर, क्षयरोगाविषयी जनजागृती, नेत्रतपासणी आणि चश्मावाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदान शिबिरं, कर्करोगग्रस्तांसाठी मदतकार्य, किडनी डायलेसिस सेंटर, स्वाईन फ्ल्यू तपासणी आणि उपचार केंद्र सुरू करणं यांसारख्या उपक्रमांतून ते ठाणेकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी काम करू लागले. ठाणे ग्रामीण भागात अनेक गावं वनवासीबहुल असून तेथे आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी वनवासी भागांतही वैद्यकीय शिबिरांचं आयोजन केलं.

वृक्षारोपण, स्वच्छ परिसर मोहीम याद्वारे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन नागरिकांसमोरही तसा आदर्श निर्माण करतात. यंदाच्या पावसाळयात भास्कर कॉलनी, बी-केबिन, नौपाडा आदी भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी डॉ. मढवी आणि भाजपाचे अन्य कार्यकर्ते स्वत: घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करू लागले.

प्रतिभा मढवी यांनीही नागरिकांच्या छोटयातील छोटया समस्येकडे लक्ष देऊन आपल्या परिसरात अनेक विकासकार्य केली. प्रभागातील पाणी, सांडपाणी प्रश्नांचं निवारण करण्यात त्या नेहमी पुढे असतात. व्यापाऱ्यांच्या घनकचराविरोधी आंदोलनातही त्या सक्रिय होत्या. त्याचबरोबर महिलांसाठीही त्या सातत्याने विशेष उपक्रम राबवत असतात. नुसतंच हळदीकुंकूसारखे सांस्कृतिक कार्यक्रम नव्हे, तर महिलांसाठी मैदानी क्रीडास्पर्धाही भरवल्या जातात. महिलांना सक्षम करायचं तर त्यांनी स्वत:च्या पायावर उभं राहिलं पाहिजे. एक महिला म्हणून याचं महत्त्व त्या जाणून होत्या. त्यात त्यांना पतीचीही साथ असतेच. महिलांना शिवणकला, बेकरी, गृहोद्योग यांसारखं प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन करण्यात त्या नेहमीच आघाडीवर असतात. महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात या दांपत्याने अबोली रिक्षाचालक महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचं कौतुक केलं.

डॉ. राजेश मढवी आणि प्रतिभा मढवी यांनी यंदाची दिवाळीही ठाणेकरांसोबत अनोख्या पध्दतीने सादर केली. दिव्यांग मुलांसाठी त्यांनी 'एक पहाट आपुलकीची' हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचबरोबर क्षयग्रस्तांना दिवाळी फराळ, भेटवस्तूंचं वाटप, पोस्टातील कर्मचाऱ्यांचा - विशेषत: पोस्टमन आणि पोस्टवुमन यांचा सत्कार आणि भेट व फराळाचं वाटप अशा उपक्रमांतून त्यांनी अनेकांची दिवाळी आनंदाची आणि प्रकाशमान केली.

क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा अनेक उपक्रमांतून ठाण्यातल्या गुणिजनांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिलं. ठाणे शहर स्वच्छ, निरोगी बनवतानाच तेथील राहणीमान अधिक चांगलं बनावं, यासाठी मढवी दांपत्याचे सुरू असलेले प्रयत्न म्हणजे राजकारणाच्या मार्गावरील समाजकारणाचं पाऊल आहे, असंच म्हणावं लागेल.

 

Powered By Sangraha 9.0