साहित्यातील सरळ मनाची 'देशमुखी'

18 Dec 2017 13:11:00

फेब्रुवारी 2018 रोजी बडोद्यामध्ये होणाऱ्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कांदबरीकार, कथालेखक लक्ष्मीकांत देशमुख निवडून आले आहेत. लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीच्या अनुभवांना साहित्यिक रूप देऊन मराठी साहित्य रसिकांसाठी एक वेगळा पैलू घडवला. देशमुखांकडे कल्पकता आहे. ते वाङ्मयीन संस्थांना, उपक्रमांना रसिकाभिमुख बनवू शकतात. आता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी महाराष्ट्र पातळीवर वाङ्मयीन उपक्रमांमध्ये सुसूत्रता घडवून आणावी. एक वेगळा अध्यक्ष या वेळी साहित्य संमेलनाला मिळाला आहे. केवळ चार दिवसांचे संमेलनच नव्हे, तर त्यांच्या कल्पनेतून वर्षभर विविध उपक्रम आखले जावोत, राबवले जावोत, त्यांचे स्वत:चे लिखाणही बहरत जावो अशा शुभेच्छा!

लक्ष्मीकांत देशमुख साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आले आणि त्यांना ओळखणाऱ्या बहुतांश लोकांच्या मनात एकच प्रतिक्रिया उमटली - 'एका साध्या सरळ मनाचा लेखक निवडून आला.'

स्वातंत्र्यानंतरच्या, कष्ट करून शिकलेल्या एका पिढीचे प्रतिनिधित्व देशमुख करतात. फारशी अनुकूलता नसलेल्या काळात आणि प्रदेशात देशमुखांचा जन्म झाला. (जन्म सप्टेंबर 1954, मु.पो. मुरूम, जि. उस्मानाबाद). पण त्याचा बाऊ न करता चिवटपणे अभ्यासाने स्पर्धा परीक्षांच्या मार्गाने त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याची नोकरी मिळवली. या नोकरीतही इतर सर्वसाधारण अधिकाऱ्यासारखे न वागता आपली वेगळी ओळख निर्माण केली.

प्रशासकीय किचकट जबाबदाऱ्या पेलताना त्यांनी आपल्यातला लेखक मरू दिला नाही, तर उलट तो अधिक विकसित होऊ दिला. आपल्या अनुभवाचा आपल्या लेखनासाठी उलट उपयोगच करून घेतला. नांदेडच्या नगर परिषदेच्या राजकारणावरची त्यांची कादंबरी 'अंधेरनगरी' यातून त्याची साक्ष मिळते. केवळ स्थानिक राजकारणाचाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आपला अभ्यासही त्यांनी 'इन्किलाब वि. जिहाद'सारख्या बृहद कादंबऱ्यांमधून ललित भाषेत मांडला.

अधिकारी आणि त्यातही परत लेखक, मग तर तो आपल्या कोषात अधिकच गुरफटून जातो. इथेही देशमुख अपवाद ठरले. ते परभणीला निवासी उप-जिल्हाधिकारी म्हणून होते, त्या काळात परभणीच्या वाङ्मयीन चळवळीत त्यांनी आपले पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवून अक्षरश: एखाद्या सामान्य कार्यकर्त्यासारखे झोकून दिले. त्यांचे निवासस्थान म्हणजे तेव्हा सहित्य संस्थेचे अनधिकृत कार्यालयच बनले होते.  67वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करताना, त्याची आखणी करताना आणि विनाविघ्न ते पार पाडताना देशमुखांचे योगदान अतिशय मोलाचे ठरले होते.

त्यांच्या तीन वाङ्मयीन कलाकृतींचा साहित्यिक दृष्टीने विचार न करता जरा वेगळा विचार करावा लागेल. पहिली कलाकृती म्हणजे कोल्हापूरला जिल्हाधिकारी असताना त्यांनी स्त्री-भ्रूणहत्येसंदर्भात जे अतिशय मोलाचे काम केले, त्यावरचा कथासंग्रह 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी'. त्यांनी स्त्री-भ्रूणहत्येबाबत जनजागृती करण्याचे मोठे काम केले. सरकारी पातळीवर किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर हे काम न ठेवता त्याला कलात्मक रूप दिले, हे महत्त्वाचे. साहित्याचे प्रयोजन काय आहे? यावर निव्वळ पुस्तकी चर्चा करणाऱ्यांनी हे उदाहरण लक्षात घ्यायला पाहिजे.

दुसरा कथासंग्रह आहे 'पाणी ! पाणी !!'. फार आधीपासून - कदाचित शासकीय उच्चपदस्थ म्हणून काम करताना असेल, पण त्यांना पाणीप्रश्नाची तीव्रता जाणवली होती. पाणीप्रश्न तेव्हा आताइतका तीव्र झालाही नव्हता. टँकर लॉबी अजून महाराष्ट्रात सक्रिय झाली नव्हती. नदीपात्रातून वाळू काढून नेणारे 'वाळू माफिया' माजले नव्हते. अशा वेळी काळाची पावले ओळखून त्यांनी ज्याप्रमाणे शासकीय पातळीवर काम केले, त्याचप्रमाणे या समस्येला कलात्मक रूपही दिले आणि सर्वसामान्य वाचकांसमोर ते मांडले.

तिसरी कलाकृती होती 'प्रशासननामा'. प्रशासकीय पातळीवर येणाऱ्या समस्या, त्यांची उत्तरे, त्यातून सामान्य माणसाला न्याय कसा मिळवून देता येईल याची एक अधिकारी म्हणून शोधलेली उत्तरे. हे सर्व त्यांनी 'प्रशासननामा' मध्ये नितळपणे साध्या भाषेत मांडले.

ज्याप्रमाणे मारुती चितमपल्ली यांनी आपल्या वनखात्यातील नोकरीच्या निमित्ताने पशु-पक्षी-जंगले यांचा अभ्यास-निरीक्षणे ललित भाषेतून रसिकांसमोर मांडली आणि मराठी वाङ्मयाला श्रीमंती प्राप्त करून दिली, त्याचप्रमाणे लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीच्या अनुभवांना साहित्यिक रूप देऊन मराठी साहित्य रसिकांसाठी एक वेगळा पैलू घडवला.

'बखर : भारतीय प्रशासनाची' ही लेखमालाच त्यांनी लिहिली होती. पुढे त्याचेच ग्रंथरूप त्याच नावाने सिध्द झाले.

महाराष्ट्र शासन राज्य नाटय स्पर्धा घेत असते. या स्पर्धांमध्ये तीच तीच नाटके येतात, असे लक्षात आल्यावर नवीन संहिता असल्या तरच प्रवेशिका ग्राह्य धरली जाईल अशी अट घालण्यात आली. याला प्रतिसाद देत त्यांनी 'अखेरची रात्र'सारखे नाटक लिहिले. तेव्हा ते हौशी कलाकारांकडून रंगभूमीवर सादरही झाले. त्याला बक्षिसेही मिळाली.

'इन्किलाब विरुध्द जिहाद'सारखी अफगाण प्रश्नाचा आढावा घेणारी त्यांची महा-कादंबरी अजूनही समीक्षकांनी फारशी विचारात घेतली नाही. खरे तर अशा महा-कादंबऱ्यांची संख्या मराठीत फारच कमी आहे. त्यातही परत विषय जेव्हा आंतरराष्ट्रीय असतो, तेव्हा तर अशा कलाकृतीच मराठीत आढळत नाहीत. या पार्श्वभूमीवर देशमुखांची ही कादंबरी पाहायला हवी.

ज्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत, अध्यक्षाच्या निवडीबाबत, जागतिक संमेलनाबाबत आजकाल सतत टीका होत आहे, त्याचे अध्यक्षपद देशमुखांना आता मिळाले आहे. तेव्हा या चळवळीला काही वेगळे आयाम प्राप्त करून देणे ही त्यांची जबाबदारी आहे.

देशमुख स्वत: उत्तम लेखक आहेतच, त्याशिवाय एक चांगले आयोजकही आहेत. प्रशासकीय पातळीवर त्यांनी विविध योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्या आहेतच. तसेच साहित्य संमेलनांचे नेटके आयोजन करून, त्यातून पैसे वाचवून त्या कायमस्वरूपी निधीतून त्यांनी वाङ्मयीन उपक्रम, दिवाळी अंकाचे प्रकाशन करून दाखवले आहे. हे त्यांचे वेगळेपण आहे.

मधू मंगेश कर्णिक यांनी केशवसुतांचे स्मारक मालगुंडला उभारून दाखवले, त्याच धर्तीवर लक्ष्मीकांत देशमुखांनी बी. रघुनाथ यांचे देखणे सुंदर स्मारक परभणीला उभारून दाखवले. त्यासाठी शासकीय पातळीवरचे अडथळे दूर करणे, निधी मिळवणे ही सगळी कामे जिकिरीने केली, म्हणून तर ते स्मारक उभे राहिले.

तेव्हा आता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी महाराष्ट्र पातळीवर वाङ्मयीन उपक्रमांमध्ये सुसूत्रता घडवून आणावी. साहित्य महामंडळ म्हणजे मोजक्या लोकांची संकुचित विचारांची टोळी असे स्वरूप होऊन बसले आहे. या महामंडळाचा विस्तार होऊन त्यात ग्रंथालये, इतर वाङ्मयीन संस्था, प्रकाशक परिषदा यांचा समावेश व्हायला हवा. सामान्य रसिक या संमेलनांपासून दूर जाताना आढळत आहे. मागच्या वर्षी डोंबिवलीसारख्या, मराठी माणसांचे आगर असणाऱ्या महानगरात संमेलनात केवळ रिकाम्या खर्ुच्यांनी गर्दी केली होती. ही नामुश्की टाळायला हवी.

देशमुखांकडे ही कल्पकता आहे. ते वाङ्मयीन संस्थांना, उपक्रमांना रसिकाभिमुख बनवू शकतात. त्यांनी प्रशासकीय पातळीवर उच्चपदस्थ म्हणून काम केले आहे. तेव्हा साहित्य संस्था, सार्वजनिक ग्रंथालये, सांस्कृतिक सभागृहे यांचा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी जे प्रशासकीय अडथळे येतात, ते दूर करण्यासाठी त्यांनी काही ठोस योजना शासनाकडे मांडाव्यात अशी अपेक्षा आहे. उदा. शासन प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथ महोत्सव घेते, पण त्याच्या तारखा चुकीच्या निवडल्या जातात, तसेच जागाही चुकीची असते. देशमुखांसारखा अनुभवी माणूस हे सगळे समजून घेऊन त्यावर उपाय सुचवू शकतो. आणि हे सगळे प्रशासनातून कसे मंजूर करून आणावयाचे, हेसुध्दा सांगू शकतो.

शासकीय मर्यादेत काम करताना उद्योजक, व्यापारी, कंत्राटदार यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेऊन उपक्रम चांगला करणे याचाही देशमुखांना अनुभव आहे. साहित्य महामंडळाला त्यांच्या या अनुभवाचा फायदा मिळू शकतो. महाराष्ट्रभर वाङ्मयीन उपक्रम सातत्याने व दर्जेदार रितीने होण्यासाठी देशमुख आपल्या अनुभवाच्या काही योजना आधाराने तयार करू शकतात.

एक वेगळा अध्यक्ष या वेळी साहित्य संमेलनाला मिळाला आहे. केवळ चार दिवसांचे संमेलनच नव्हे, तर त्यांच्या कल्पनेतून वर्षभर विविध उपक्रम आखले जावोत, राबवले जावोत, त्यांचे स्वत:चे लिखाणही बहरत जावो अशा शुभेच्छा! त्यांच्या उपक्रमांमध्ये आमच्यासारख्या रसिकांनी आधीही सक्रिय सहभाग नोंदवला होता. आताही त्यांनी हाक द्यावी, कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीशी सहज उभी राहील हा आम्हाला विश्वास आहे.

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

9422878575

 

Powered By Sangraha 9.0