बिटकॉइन नावाचं 'गूढचलन' नव्या युगाचा मुक्त डिजिटल पैसा!

15 Dec 2017 19:17:00

***प्रसाद शिरगावकर***

पैसा आणि व्यवहारांच्या ह्या सरकारी, अधिकृत आणि नियंत्रित पध्दतीला पूर्णपणे छेद देऊन संपूर्णतः विकेंद्रित, कोणाच्याही मालकीची नसलेली आणि संपूर्ण मानवी समुदायाचं नियंत्रण असलेली चलनपध्दत आणि व्यवहार व्यवस्था म्हणजे गूढचलनं अर्थातच बिटकॉइन... बिटकॉइन्स विकत घेणं, विकणं किंवा जवळ बाळगणं बेकायदेशीर नाही. बिटकॉइन्स वापरून ऑॅनलाईन व्यवहार करणंही बेकायदेशीर नाही. मात्र कोणत्याही मुळात बेकायदेशीर असलेल्या व्यवहारासाठी बिटकॉइन्स वापरणं किंवा बिटकॉइन्सच्या सट्टेबाजीतून किंवा गुंतवणुकीतून झालेल्या नफ्यावर टॅक्स न भरणं हे मात्र बेकायदेशीरच आहे आणि हे केलंत तर तुमच्यावर कारवाई होऊ  शकते!!

बिटकॉइन नावाचं नवं 'गूढचलन' सध्या जगभरात गाजत आहे. त्यासारखी इतर अनेक गूढचलनं (cryptocurrencies) जगात आली आहेत. ही नेमकी काय भानगड आहे, याचा वेध घेण्याचा प्रयत्न.

चलन म्हणजे काय?

आपण किराणा मालाच्या दुकानात जातो. आपल्याला हव्या त्या वस्तू विकत घेतो. त्या वस्तूंच्या बदल्यात, वस्तूंच्या किमतीइतकी किंमत छापलेले कागदाचे तुकडे त्याला देतो. हे कागदाचे तुकडे म्हणजे आपल्या देशात चलनात असलेल्या नोटा. 

कागदाला स्वत:चं असं काहीच मूल्य नसतं. पण चलनी नोटांवरच्या सरकारच्या (RBI गव्हर्नरच्या) सहीमुळे त्यांच्यात मूल्याची 'प्राणप्रतिष्ठा' होते. त्या कागदांना सरकारने पाठबळ दिलेलं असतं, म्हणून क्षुल्लक कागदाच्या तुकडयांना शे-पाचशे-हजार 'रुपये' इतकं 'मूल्य' मिळतं. 

डिजिटल युगात तर ह्या नोटांचंही महत्त्व कमी होत चाललं आहे, होणार आहे. किराणा मालाच्या दुकानातून वस्तू विकत घेतल्यावर तिथे डेबिट / क्रेडिट कार्ड स्वाइप करता येतं. वस्तू आपण घरी घेऊन येतो आणि 'पैसा' हा आपल्या व्हर्चुअल बँक अकाउंटमधून दुकानदाराच्या व्हर्चुअल बँक अकाउंटमध्ये जातो. प्रत्यक्ष चलन हस्तांतरित न होताही हा व्यवहार होतो. कारण डिजिटल चलन आणि बँक व्यवस्थेवर आपला विश्वास असतो आणि त्यांना सरकारी पाठबळ असतं.

चलनाची अगदी सोपी व्याख्या करायची, तर दोन अनोळखी व्यक्तींमधला व्यवहार होण्यासाठी वापरली जाणारी, दोघांचाही ज्यावर विश्वास आहे अशी एखादी, स्वत:ला काही आंतरिक मूल्य नसलेली गोष्ट म्हणजे चलन.

गेली काही हजार वर्षं जगभरात सर्वत्र, व्यवहारासाठी उपयुक्त अशी चलनं, आधी राजे-रजवाडे आणि नंतर सार्वभौम देशांची सरकारंच व्यवहारात आणत आली आहेत. सध्याही प्रत्येक देशाला स्वत:चं चलन असतं आणि त्यावर त्या त्या देशाच्या सरकारचं पूर्ण नियंत्रण असतं. 

ह्या संपूर्ण संकल्पनेला छेद देणारी नवी 'गूढचलनं' जगात आली आहेत. ही कोणत्या एका देशाच्या सरकारने तयार केलेली चलनं नसून ती अत्यंत क्लिष्ट सॉफ्टवेअरने तयार केलेली चलनं आहेत. त्यावर कोणा एकाची मालकी नसून ती चलनं वापरणाऱ्या सगळयांच्या मालकीची आहेत आणि त्यांचा वापर आणि दर हा कोणी एक सरकार ठरवत नसून एकूण सर्व वापरकर्त्यांचा विश्वास, मागणी आणि पुरवठा यावर आपोआप ठरला जात आहे. 

व्यवहार, चलन आणि पैशाचं हे कदाचित भविष्य आहे. 

ही नक्की काय भानगड आहे, ती अस्तित्वात कशी आली, सध्या काय परिस्थिती आहे आणि भविष्यात काय घडू शकेल याचा वेध घ्यायचा प्रयत्न या लेखामध्ये आहे.

गूढचलन : तयार कसं होतं, मिळवायचं कसं?

प्रत्येक देशाचं सरकार आपापल्या देशाच्या चलनी नोटा छापतं. ते ते चलन त्या त्या देशात लीगल टेंडर असतं आणि साधे कागदी तुकडे असूनही ते देशातल्या सर्व व्यवहारांसाठी वापरले जातात.

बिटकॉइन्स हे मात्र कोणी एक सरकार, कंपनी, संस्था किंवा व्यक्ती तयार करत नाही. ते चलन कोणाच्याच मालकीचं नाही. कोणा एकाचं त्यावर नियंत्रण नाही. ते चलन वापरणाऱ्या सर्व 'नेटवर्क'च्या मालकीचं आहे.

बिटकॉइन हे मुक्तस्रोत (ओपन सोर्स) सॉफ्टवेअरमधून तयार होणारं आणि वापरता येऊ शकणारं चलन आहे. बिटकॉइन संबंधित सॉफ्टवेअर्स वापरून 'नेटवर्क'साठी ठरावीक काम करणाऱ्या लोकांना नवी बिटकॉइन्स मिळतात.

ह्या कामाचं मुख्य स्वरूप काही अत्यंत क्लिष्ट गणिताचे प्रश्न सोडवणं असं असतं. (गणितं वगैरे सोडवून करन्सी मिळेल असं लहानपणी कोणी सांगितलं असतं, तर निदान पाढे तरी पाठ केले असते! पण ते असो). अर्थात ती अत्यंत क्लिष्ट गणितं सोडवायचा प्रयत्न करणारीही सॉफ्टवेअर्स असतात आणि ती आपल्याला आपल्या कॉम्प्युटरवर चालवत ठेवायची असतात. ह्याला बिटकॉइनचं खाणकाम उर्फ 'मायनिंग' म्हणतात. हे मायनिंग करत करत काही ठरावीक गणिती कोडं सोडवलं की ते सोडवणाऱ्याला ठरावीक बिटकॉइन्स मिळतात.

ही गणिती कोडी सहज गंमत म्हणून घातलेली कोडी नसून ती कोडी सोडवल्याने बिटकॉइनचे व्यवहार अधिकाधित सुरक्षित होत असतात. आणि गंमत म्हणजे आधीची कोडी सुटली की येणारी नवी कोडी जास्त जास्त क्लिष्ट बनत जातात.

पण अशी अनंत कोडी सोडवत राहून अमर्याद बिटकॉइन्स तयार होणार नाहीत, कारण जगात एकूण किती बिटकॉइन्स तयार होणार यावर मर्यादा आहे, तसंच दर महिन्या-वर्षाला किती नवी बिटकॉइन्स तयार होणार यावरही मर्यादा आहे. त्याची सुरुवात ज्यांनी केली, त्या डेव्हलपर्सनी दोन्ही मर्यादा आखून देऊन सॉफ्टवेअरमध्येच अंतर्भूत केल्या आहेत. जगातल्या सर्व डेव्हलपर्सनी आणि सर्व नेटवर्कनी मान्य केल्याशिवाय ह्यात बदल होणार नाही.

तर अशा पध्दतीने तयार झालेल्या बिटकॉइन्सचं लोक करतात काय?

एखाद्याकडे मायनिंग करून बिटकॉइन्स जमली की ती तो ऑॅनलाईन गोष्टी विकत घेण्यासाठी वापरू शकतो किंवा जगातल्या दुसऱ्या कोणालाही पैसे म्हणून बिटकॉइन्स पाठवू शकतो.

तसंच अनेक बिटकॉइन एक्स्चेंजेसही सुरू झाली आहेत. जवळचे बिटकॉइन्स विकून साधा सरकारी पैसा घ्यायचा असेल किंवा सरकारी पैसा देऊन बिटकॉइन्स विकत घ्यायची असतील, तर ते ह्या एक्स्चेंजेसवर जाऊन करता येतं.

गूढचलनातल्या व्यवहारांची नोंद कशी होते?

आपण चेकने किंवा डेबिट कार्डाने व्यवहार करतो, तेव्हा तो 'बँक' या व्यवहार करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना मान्य असलेल्या मध्यवर्ती संस्थेद्वारे करतो. चेक देणाऱ्याच्या अकाउंटचं बँकेमध्ये रेकॉर्ड असतं. त्यात पैसे आहेत का हे तपासून त्यातून पैसे वजा करून चेक घेणाऱ्या माणसाच्या अकाउंटला चेकजमा करण्याचं काम बँक करते. दोन्ही खाती एकाच बँकेत आहेत असं गृहीत धरलं, तर या दोन व्यक्तींमधल्या व्यवहाराची नोंद एकाच बँकेच्या लेजरमध्ये होते.

गूढचलनांना अशी कोणती मध्यवर्ती संस्था नसते. इथे घडणाऱ्या व्यवहारांच्या लेजरच्या नेटवर्कवर अगणित प्रती असतात. नेटवर्कवरच्या कोणाहीकडे लेजरची प्रत असू शकते आणि सर्व प्रतींमधल्या व्यवहारांची माहिती तंतोतंत सारखीच असते - किंबहुना ती एकसारखीच असावी, कोणत्याही व्यवहाराची माहिती कोणालाही बदलता येऊ  नये ह्या गुणधर्मावरच गूढचलनाची संपूर्ण व्यवस्था उभी राहिली आहे.

एक अगदी सोपं उदाहरण बघा. समजा, एकमेकांवर अवलंबून असलेल्या दहा माणसांचा एक गट आहे. हे सारे एकमेकांमध्येच व्यवहार करतात. गटात कोणताही व्यवहार झाला की व्यवहार करणारे आख्ख्या गटाला तो सांगतात. आणि गटातला प्रत्येक जण त्या व्यवहाराची आपापल्या वहीत नोंद करून ठेवतो. ही नोंद 'अमुकने तमुकला इतक्या तारखेला इतके पैसे दिले' अशी साधी असते. मात्र कोणीही परस्पर आपल्याकडच्या नोंदीमध्ये फेरफार करू नये म्हणून या नोंदीसोबत एक संकेताक्षरही नोंदवून ठेवतात. गटातला कोणीतरी व्यवहार करणाऱ्या दोघांना 'ओ के, तुमचा व्यवहार नोंदवला' असं सांगतो आणि मगच तो व्यवहार पूर्ण झाला असं मानलं जातं.

ह्या उदाहरणातल्या दहा जणांना लाखांनी गुणलं आणि नोंद ठेवायच्या प्रत्येकाच्या वहीऐवजी त्यांच्या संगणकावरची एक प्रणाली आहे असं मानलं, तर जे होईल ती संपूर्ण गूढचलनाची व्यवस्था आहे. एकमेकांना जोडलेल्या संगणकांच्या नेटवर्कवर हे सगळं घडत असल्याने अमुकला तमुकशी व्यवहार करायचा आहे हे नेटवर्कवरच्या जगभर पसरलेल्या सर्व संगणकांना क्षणार्धात कळवलं जातं. तो व्यवहार ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार घडत आहे ना? हे आपोआप तपासलं जातं. तो सर्व संगणकांच्या लेजरमध्ये नोंदवला जातो. आणि सगळीकडे तसाच नोंदवला गेला आहे ना? हे तपासलं जातं.

(थोडी तांत्रिक माहिती : या व्यवहारांच्या ठरावीक नोंदींचा एक गट असतो, त्याला ब्लॉक म्हणतात. एक ब्लॉक दुसऱ्या ब्लॉकला जोडण्यासाठी जे संकेताक्षर वापरतात, त्याला हॅश म्हणतात आणि असे ब्लॉक्स जोडून जोडून एक मोठी साखळी तयार होते त्याला ब्लॉकचेन. मघाशी 'किचकट गणिती कोडं सोडवणं' असं जे म्हटलं, ते म्हणजे हे संकेताक्षरांचे 'हॅश' शोधून काढणं. हे करण्याचं काम मायनर्स करतात आणि हे काम केल्याबद्दल त्यांना नवी बिटकॉइन्स तयार करून दिली जातात)

अगदी थोडक्यात सांगायचं, तर दोन व्यक्तींमधला व्यवहार एका मध्यवर्ती संस्थेने एकाच ठिकाणी नोंदवायच्याऐवजी जगभर पसरलेल्या नेटवर्कने अनेक ठिकाणी नोंदवून ठेवणं, त्या व्यवहारांच्या नोंदींमध्ये कोणालाही बदल करता येत नसल्याने आणि कोणालाही कोणतीही नोंद तपासून बघणं शक्य असल्याने साऱ्यांचा या नेटवर्कवर विश्वास बसतो. ह्या विश्वासार्हतेमुळे गूढचलनं व्यवहारांसाठी वापरली जातात.

गूढचलनाचा इतिहास आणि सद्यःस्थिती

गूढचलनं अस्तित्वात कशी आली आणि झपाटयाने जगभर पसरली कशी, याचा इतिहास फारच रोचक आहे. 1998 साली निक झाबो नावाच्या एका संगणक शास्त्रज्ञाने 'विकेंद्रित डिजिटल चलनाची' संकल्पना मांडली. त्याने 'बिट गोल्ड' नावाच्या एक प्रणालीची संकल्पना मांडली. क्लिष्ट गणिती कोडी सोडवण्याच्या बदल्यात लोकांना व्हर्चुअल पैसे देणं आणि मग ते पैसे वापरून झालेले व्यवहार नोंदवून चलनव्यवस्था उभी करणं अशी त्याची कल्पना होती. तेव्हा ह्या मॉडेलमधल्या काही अडचणींमुळे ती प्रत्यक्षात आली नाही.

त्यानंतर दहा वर्षांनी सातोशी नाकामोटो नावाच्या एका गूढ व्यक्तिमत्त्वाने बिट गोल्डच्या मूळ प्रस्तावात सुधारणा करून 'बिटकॉइन'ची व्यवस्था तयार केली. त्याने नुसता प्रस्ताव न मांडता ही सर्व चलनव्यवस्था चालवणारं सॉफ्टवेअरही तयार केलं आणि त्यावर आपली मालकी वगैरे न ठेवता ते मुक्तस्रोत (Open Source) म्हणून प्रकाशितही केलं. Cryptographyमध्ये काम करणाऱ्या अनेकांना त्याचा प्रस्ताव खूप आवडला. शिवाय सॉफ्टवेअर मुक्त असल्याने अनेकांनी ते वापरायला आणि वापरून बिटकॉइन्स तयार करायला सुरुवात केली.

दोन-तीन वर्षांतच बिटकॉइनचं सॉफ्टवेअर वापरणारी एक कम्युनिटी जगभर तयार झाली. मग त्याचा निर्माता असलेल्या सातोशी नाकामोटोने त्याच्या वेबसाइटपासून ते सॉफ्टवेअरपर्यंत सर्व गोष्टींचे हक्क सोडून दिले आणि कम्युनिटीला - म्हणजे जगाला देऊन टाकले. नावावरून जपानी वाटणारी ही व्यक्ती काळी का गोरी हे कोणालाही माहीत नाही. हे त्याचं खरं नाव आहे का, हेही कोणाला माहीत नाही. ती एकच व्यक्ती होती की निनावी ग्रूप होता, याचा कोणाला अंदाज नाही. कुठल्याशा अज्ञात व्यक्तीने किंवा गटाने जगाला कलाटणी देणारी काहीतरी प्रणाली तयार केली आणि ती जगाला अर्पण करून ती पुन्हा अज्ञाताच्या पडद्याआड नाहीशी झाली, ही एक विलक्षण थक्क करणारी गोष्ट आहे!

बिटकॉइनचा प्रस्ताव आणि सॉफ्टवेअर दोन्ही मुक्त असल्याने ते कॉपी करून त्याच्यासारखी इतर चलनं किंवा चलनव्यवस्था बनवणं सहज शक्य होतं... जे झालंही. बिटकॉइनची कल्पना आणि सॉफ्टवेअर कोड वापरून त्यासारखी अनेक चलनं जगात आली आणि अजूनही येत आहेत. बिटकॉइनव्यतिरिक्त आजमितीला एथिरियल, बिटकॉइन कॅश, रिपल, लाइटकॉइन, पियरकॉइन ही आणि अशी तब्बल तेराशे गूढचलनं जगात आली आहेत.

आणि जेमतेम आठ वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या ह्या सर्व गूढचलनांचं आजचं बाजारमूल्य साडेचारशे अब्ज डॉलर्स इतकं आहे!

अर्थात आद्य गूढचलन बिटकॉइन हेच सगळयांत जास्त लोकप्रिय आणि बाजारमूल्यातही आघाडीवर आहे (साडेचारशेतलं साडेतीनशे अब्ज डॉलर्स हे बिटकॉइन्सचं मूल्य आहे.)

बिटकॉईन्स कायदेशीर आहेत का बेकायदेशीर?

बिटकॉइन्स आणि एकूणच सर्व गूढचलनं यांच्या नियंत्रणासाठी भारत, अमेरिकेसह जगातल्या बहुसंख्य देशांमध्ये कायदेच नाहीत. किंबहुना, जगातल्या कोणत्याही देशाच्या नियंत्रणामध्ये न राहता जगातल्या ज्याला वापरावंसं वाटतंय त्या कोणाच्याही मालकीचं 'मुक्त' चलन असावं, या हेतूनेच गूढचलनांची निर्मिती झाली होती.

बिटकॉइन्सचं मायनिंग करणं, ती जवळ बाळगणं, ती वापरून व्यवहार करणं हे काहीही म्हणजे काहीही, जगातल्या बहुसंख्य देशांमध्ये बेकायदेशीर नाही, भारतातही नाही.

मात्र सध्याच्या कायद्यांनुसार जे बेकायदेशीर आहेत असे व्यवहार बिटकॉइन्स वापरून करणं हे निश्चितच बेकायदेशीर आणि दंडनीयही आहे. उदा. सध्याच्या कायद्यांनुसार हवाला किंवा money laundering करणं, दहशतवादी किंवा देशद्रोही कारवायांसाठी फंड पुरवणं, मादक पदार्थ विकणं/विकत घेणं हे अत्यंत गंभीर गुन्हे आहेत. हे करण्यासाठी बिटकॉइन्स वापरली, तरी ते गुन्हेच समजले जातात आणि वापरणाऱ्यावर कठोर कारवाई होऊ शकते.

तसंच भारतात परकीय चलन व्यवस्थापनासाठी FEMA नावाचा कायदा आहे. ह्या कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती किती पैसे (मुख्यत: परकीय चलन, डॉलर्स) देशाबाहेर खर्च किंवा गुंतवणुकीसाठी पाठवू शकते, यावर बंधन आहे. (सध्या ते बंधन 25000 डॉलर्स प्रतिवर्ष असं आहे). बिटकॉइन्स विकत घेण्यासाठी जर तुम्ही याहून जास्त पैसे देशाबाहेर पाठवले, तर चौकशी होऊन तुम्ही 'फेमा'च्या फेऱ्यात अडकू शकता.

भारतात सध्या कोणीही व्यापारी, दुकानदार बिटकॉइन्स स्वीकारत नाहीत. म्हणजे भारतात बिटकॉईन्स वापरून काहीही 'व्यवहार' करणं शक्य नाही. सध्या जे लोक बिटकॉइन्स विकत घेत आहेत, ते केवळ गुंतवणुकीसाठी किंवा सट्टेबाजीसाठी विकत घेत आहेत. बिटकॉइन्सचे भाव सटासट वाढत आहेत, हे बघून त्यात ट्रेडिंग करून झटपट पैसे कमवावेत या हेतूने बिटकॉइन्स घेत आहेत. गुंतवणूक, सट्टेबाजी किंवा 'झटपट श्रीमंत होणं' हे काही बेकायदेशीर नाही. मात्र बिटकॉइन्स घेऊन आणि विकून झालेला नफा 'इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये' न दाखवणं आणि त्यावर टॅक्स न भरणं मात्र बेकायदेशीर आणि दंडनीय आहे.

थोडक्यात, बिटकॉइन्स विकत घेणं, विकणं किंवा जवळ बाळगणं बेकायदेशीर नाही. बिटकॉइन्स वापरून ऑॅनलाईन व्यवहार करणंही बेकायदेशीर नाही. मात्र कोणत्याही मुळात बेकायदेशीर असलेल्या व्यवहारासाठी बिटकॉइन्स वापरणं किंवा बिटकॉइन्सच्या सट्टेबाजीतून किंवा गुंतवणुकीतून झालेल्या नफ्यावर टॅक्स न भरणं हे मात्र बेकायदेशीरच आहे आणि हे केलंत तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते!!

बिटकॉइन्स : सट्टेबाजी आणि फसवणूक

बिटकॉइन्सना सुरुवात झाली, तेव्हा त्यांचं मूल्य अर्थातच शून्य डॉलर होतं. जसंजसं नेटवर्क वाढत गेलं, लोक बिटकॉइन्स तयार करायला लागले, ते वापरून व्यवहार करायला लागले तसं त्यांत 'मूल्य' तयार व्हायला लागलं. 2011मध्ये एका बिटकॉइनचं मूल्य साधारण 30 सेंट्स (0.3 डॉलर एवढं) होतं. ते वर्षभरात 2 डॉलर्सपर्यंत वाढलं. पुढच्या वर्षात वाढत वाढत जाऊन ते 266 डॉलर्स झालं आणि त्याच वर्षात कोसळून पुन्हा 50 डॉलर्सवर गेलं. पुढच्या दोन-तीन वर्षांत अफाट चढउतार होत राहिले. अगदी बाराशे-चौदाशे डॉलर्सपर्यंत मूल्य जायचं आणि कोसळून पाच-सहाशेवर खाली यायचं. मग दोन वर्षं सतत वाढतच राहिलं, अफाट वेगाने वाढत राहिलं आणि 2017मध्ये तर ते कैच्याकै वेगाने वाढतंय.

आजमितीला एका बिटकॉइनचं मूल्य तब्बल 16600 डॉलर्स आहे!!

सहा वर्षांमध्ये मूल्यात सोळा हजार पट वाढ झालेली ही इतिहासातली एकमेव गोष्ट असावी. ह्यामुळे बिटकॉइन्स आणि एकुणातच बाकीचीही गूढचलनं हे सट्टेबाजांचं नंदनवन बनलं आहे सध्या. जवळचे खरे पैसे टाकून एक्स्चेंजवरून बिटकॉइन्स विकत घ्यायची आणि दोन-चार महिन्यांत भाव वाढला की परत एक्स्चेंजवर विकून टाकून नफा कमावयचा, असा प्रकार सुरू आहे. ह्यात बहुधा जगभरातले मोठे सट्टेबाज सटोडिये उतरले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागणी वाढत आहे, मागणी वाढल्याने भाव वाढत आहेत आणि म्हणून आणखी जास्त सट्टेबाज ह्यात उतरत आहेत. हे असं दुष्टचक्र झालं असल्याची दाट शक्यता आहे.

ह्याशिवाय बिटकॉइनच्या किमतीतल्या देदीप्यमान प्रगतीची आणि त्यात पैसे टाकून श्रीमंत झालेल्या लोकांची उदाहरणं सांगून यात आपल्याला पैसे टाकायला उद्युक्त करणारी आणि मग शिस्तीत टोप्या घालणारी माणसं आणि कंपन्याही उगवल्या आहेत. 'काही न करता झटपट श्रीमंत व्हा' हे विकायला सगळयांत सोपं असलेलं स्वप्न आणि 'आज घेतली नाही तर ही सगळयांत मोठी संधी आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. You will miss the bus forever' ही कोणालाही घाबरावयाला सगळयांत सोपी युक्ती ह्या दोन्हीच्या आधाराने आपल्या खिशातून खरे पैसे काढून घ्यायला काही हुशार ठग टपलेले असतात. गूढचलनं आणि त्यांच्या मूल्यात होणारी वाढ ही ह्या ठगांना मिळालेली आयती संधी आहे आणि त्याचा ते पुरेपूर वापर करत आहेत.

गूढचलनांचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा उपयुक्तता, व्यवहार्यता, स्वातंत्र्य आणि आंतरिक मूल्य यांचा विचार करावाच, पण त्याचबरोबर त्यातल्या सट्टेबाजांचा आणि ठगबाजीचाही विचार करावा.

आपण जुगार खेळून, सट्टा लावून झटपट श्रीमंत होण्यासाठी गूढचलन विकत घेतो आहोत का? हे आपलं आपण तपासावं. हे करायलाही हरकत नाही. पण मग ते आपल्या आयुष्यातल्या सर्वसमावेशक आणि विचार करून केलेल्या बचत आणि गुंतवणुकीच्या योजनेनुसार असलं पाहिजे. म्हणजे साधी बचत, फिक्स्ड डिपॉझिट्स, प्रॉव्हिडंट फंड, लाइफ इन्शुरन्स, मुच्युअल फंड, जमीन, सोनं आणि शेअर्स हे सारे पारंपरिक गुंतवणुकीचे मार्ग वापरून झाल्यावर उरलेले फंडच ह्या अत्यंत जोखमीच्या गूढचलनांमध्ये सट्टेबाजीसाठी वापरावे. जे वापरायचे ते पूर्ण अभ्यास करून वापरावे आणि असलेल्या कायद्याच्या चौकटींमध्ये राहून वापरावे.

तसंच ह्या क्षेत्रात येताना आपण आपल्या खिशातले घाम गाळून कमावलेले खरे पैसे देऊन कुठलंसं आभासी गूढचलन विकत घेणार आहोत हे लक्षात ठेवावं. हे विकत घ्यायला कोणी आपल्याला उद्युक्त करत असेल, आमिषं दाखवत असेल तर सावध व्हावं. आमिषं दाखवणाऱ्या माणसांना खिशातले खरे पैसे कधीच काढून देऊ नयेत. सोन्याची कातडी दाखवणारी हरणं ही मायावी मारिच असतात, हे सतत लक्षात ठेवावं!

गूढचलनांचं भविष्य काय?

व्यवहार हा मानवी जीवनाचा स्थायिभाव आहे. दहा हजार वर्षांपूर्वी शेतीमध्ये आलेला माणूस, 'माझ्या शेतातली थोडी ज्वारी तुला घे आणि बदल्यात तुझ्याकडचा थोडा तांदूळ मला दे' म्हणून व्यवहार करायला लागला. एकमेकांवर आणि व्यवहारांवर अवलंबून असलेलं आयुष्य जगायला लागला. मग कधीतरी वस्तुविनिमय करण्याऐवजी कोण्या राजाने छापलेली सोन्या-चांदीची नाणी व्यवहारासाठी वापरायला लागला. अन मग पुढे सोन्या-चांदीच्या नाण्यांऐवजी सरकारी सहीचे कागदाचे तुकडेही वापरायला लागला, वापरतो आहे अजूनही. अगदी अलीकडच्या डिजिटल युगात, कागदाच्या तुकडयांऐवजी व्हर्चुअल पैसाही आला. मग हातातलं कार्ड स्वाइप करून किंवा मोबाइलवरचं ऍप वापरून पैसा किंवा 'मूल्य' इकडून तिकडे पाठवून व्यवहार करणं सुरू झालंय. तरीही हे मूल्य, हा पैसा स्थानिक सरकारने अधिकृत मानलेला आणि नियंत्रण ठेवलेला असतो आजही.

पैसा आणि व्यवहारांच्या ह्या सरकारी, अधिकृत आणि नियंत्रित पध्दतीला पूर्णपणे छेद देऊन संपूर्णतः विकेंद्रित, कोणाच्याही मालकीची नसलेली आणि संपूर्ण मानवी समुदायाचं नियंत्रण असलेली चलनपध्दत आणि व्यवहार व्यवस्था म्हणजे गूढचलनं!

ही उपयुक्त आहे का आणि टिकेल का, हे आज माहीत नाही. कारण आपणच सगळे हे ठरवणार आहोत!

(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर

 काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत.)

9850828291

prasad@aadii.net

 

Powered By Sangraha 9.0