''हिंदू भावजागृतीसाठीच हिंदू चेतना संगम'' - सुनील सप्रे

18 Nov 2017 16:44:00

 

 7 जानेवारी 2018 रोजी रा.स्व. संघाच्या कोकण प्रांतात हिंदू चेतना संगमचे आयोजन केले आहे. कोकण प्रांतातील ग्रामीण भागात तालुका आणि नगरीय क्षेत्रात नगर पातळीवर या हिंदू चेतना संगमचे आयोजन होत असून त्या निमित्ताने प्रांतभर पूर्वतयारीसाठी विविध उपक्रम सुरू आहेत. प्रांतात पहिल्यांदाच विकेंद्रित स्वरूपाचा कार्यक्रम होत असल्यामुळे नगरस्तरावरील कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाच्या आयोजनाची व नियोजनाची संधी प्राप्त झाली आहे. एकाच दिवशी 263 ठिकाणी हिंदू चेतना संगमचे आयोजन होईल. हाही एक विक्रम असणार आहे. 'सज्जन शक्ती सर्वत्र' हे सूत्र घेऊन होणाऱ्या हिंदू चेतना संगमविषयी कोकण प्रांत कार्यवाह सुनील सप्रे यांच्याशी साधलेला संवाद.

 7 जानेवारी 2018 रोजी होणाऱ्या हिंदू चेतना संगमची मध्यवर्ती संकल्पना काय आहे?

'हिंदुत्व' ही आपल्या देशाची ओळख आहे. रा.स्व. संघ हिंदुत्वाचा विचार घेऊन गेली 93 वर्षे काम करत आहे. हिंदुत्व हीच या देशाची राष्ट्रीयता आहे. सर्वांना एका सूत्रात बांधणारा धागा आहे. आजच्या काळात जग जवळ येत आहे, एक होत आहे. या संपूर्ण जगाला आश्वासक असा हिंदुत्वाचा विचार आहे. ही हिंदुत्वाची चेतना जागवणे, आपल्या देशाच्या परमवैभवासाठी जागृती करणे हा संघाचा स्थापनेपासूनचा उद्देश राहिला आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी या विचाराप्रमाणे आपले व्यवहार करावेत. 'हिंदव: सोदरा: सर्वे' म्हणजेच आपण सर्व जण एकमेकांचे बंधू आहोत या बंधुभावाने एकत्र राहावे. शाश्वत मूल्य कायम ठेवून परिवर्तनशील राहणारा असा आपला हिंदुत्व विचार आहे. त्याआधारे आपले समाजजीवन बलशाली व निर्दोष करण्याचा निर्धार सर्व समाजाने करावा, ही कल्पना समोर ठेवून आपण कोकण प्रांतात सर्व तालुका व नगर पातळीवर हिंदू चेतना संगमचे आयोजन करत आहोत.

प्रांतात विकेंद्रित स्वरूपात होणाऱ्या या हिंदू चेतना संगमची पूर्वतयारी कशा प्रकारे चालू आहे?

या कार्यक्रमासाठी आपण काम करतो आहोत असे नाही. कारण संघाचे काम सातत्याने चालू असते. सर्व स्वयंसेवक 'हिंदू चेतना संगम'कडे कार्यवृध्दीचे साधन म्हणून पाहत आहेत. त्यामुळे सातत्याने चालणाऱ्या संघकामाला थोडी अधिक गती आणि काही नवे पैलू जोडले गेले आहेत. एका अर्थाने आजवरचे प्रांतातील सर्व संघकाम हे हिंदू चेतना संगमची पूर्वतयारी आहे आणि 7 जानेवारीनंतरचे काम हा पाठपुरावा आहे, असे म्हणायला हरकत नाही. गेल्या काही वर्षांत संघाला जोडून घेणाऱ्याची संख्या वाढत आहे. आधी प्रांताचा एकच प्राथमिक शिक्षा वर्ग होत असे. पण या वर्षी महाविद्यालयीन तरुण आणि व्यावसायिक गट असे दोन स्वतंत्र वर्ग करावे लागले. अशा प्रकारे जी ताकद संघाला मिळते आहे, तिच्या बळावर आणि प्रतिभेवर नगर आणि तालुका पातळीवर हिंदू चेतना संगम होणार आहेत. कोकण प्रांतात हिंदू चेतना संगम करावा या विषयाची निश्चिती एक वर्षांपूर्वी झाली, तेव्हापासूनच नित्य संघकामाला अधिक गती देण्यासाठी काही कार्यक्रम सुरू झाले आहेत. कार्यविस्ताराच्या दृष्टीने नगरीय क्षेत्रात वस्तिस्थानापर्यंत आणि ग्रामीण भागात मंडलापर्यंत आपला संपर्क आणि विचार पोहोचवण्यासाठी मागील काही महिन्यांत विशेष उपक्रम झाले. छोटया बैठका, स्वयंसेवकाची भरती, 'जॉइन आरएसएस'च्या माध्यमातून संपर्क, रेल्वे स्टेशनवर स्टॉल लावून केलेली नोंदणी अशा अनेक छोटया छोटया उपक्रमांचा उल्लेख करता येईल. संघ स्वयंसेवक दर वर्षी रक्षाबंधनाचा उत्सव करतात. या वर्षी त्याला स्वदेशी सुरक्षा अभियानाची जोड मिळाली. या अभियानाअंतर्गतही विविध संस्था, व्यक्ती यांच्याशी संपर्क साधला गेला आहे. सहज संवाद हा संघस्वयंसेवकाचा स्थायिभाव असतो. या स्थायिभावाला हिंदू चेतना संगमच्या निमित्ताने आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली गेली. गुरुपौर्णिमेपासून हिंदू चेतना संगमची नोंदणी सुरू झाली. त्यासाठी एक मोबाइल ऍप तयार करण्यात आले असून त्यावर सध्या नोंदणीचा दुसरा टप्पा सुरू आहे. नोंदणी जरी ऍपवर करायची असली, तरी ती स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन करणे अपेक्षित आहे. पहिल्या टप्पात जवळजवळ 41 हजार नोंदणी झाली आहे. सध्या दुसरा टप्पा चालू असून त्यात सामाजिक संस्था, संघटना यांच्याशी संपर्क करून नोंदणी चालू आहे. संघाच्या समविचारी संघटना व त्यांचे कार्यकर्ते यांनाही या हिंदू चेतना संगममध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले असून त्या कार्यकर्त्यांकडूनही पूर्वतयारीसाठी सहभाग नोंदवला जात आहे. संघाच्या माध्यमातून देशभर जवळजवळ दीड लाख सेवाकार्ये चालवली जातात. कोकण प्रांतात सुमारे अडीच हजार सेवाकार्ये आहेत. या कार्यात सहभागी असणारे कार्यकर्ते, साप्ताहिक मिलन, मासिक मिलन यात कार्यरत असणारे सर्व कार्यकर्ते आपापल्या पातळीवर पूर्वतयारीचे काम करत असून संघाच्या एकूणच कार्याला अधिक गती प्राप्त झाली आहे.


नियोजित हिंदू चेतना संगमचे स्वरूप काय असणार आहे
?

कोकण प्रांतात होऊ घातलेला हिंदू चेतना संगम हा प्रांतभर 263 स्थानी होईल. या हिंदू चेतना संगममध्ये दोन गोष्टी समान आहेत, त्या म्हणजे स्वयंसेवकांची पूर्ण गणवेशात उपस्थिती आणि हिंदू चेतना संगमचे गीत. या दोन गोष्टींव्यतिरिक्त अन्य बाबींचा विचार करून त्या त्या ठिकाणच्या रचना होतील. हा कार्यक्रम जरी स्वयंसेवकांना पूर्ण गणवेशात जाण्याचा असला, तरी तो प्रकट कार्यक्रम असल्यामुळे समाजातील सर्व स्त्री-पुरुष नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असा प्रयत्न स्वयंसेवक करत आहेत. त्या त्या ठिकाणच्या सोईनुसार प्रदर्शन, माहितीपट किंवा संघ विचारविश्वाचा परिचय करून देणारे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातील.

आगामी काळातील उपक्रम काय असतील?

 सध्या वस्ती स्तरावरच्या बैठका आणि संपर्क मोहीम चालू आहे. त्याचप्रमाणे स्वयंसेवकांचे गणवेश पूर्ण करून घेण्याचा आग्रहही चालू आहे. डिसेंबर महिन्यात हिंदू चेतना संगमच्या आयोजनात सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांचे एक संमेलनही होईल. त्या संमेलनात आढावा घेताना पुढील काळात करण्याच्या कामाची निश्चिती केली जाईल. लवकरच पत्र परिषद घेऊन सर्व हिंदू समाजबांधवांना हिंदू चेतना संगममध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले जाईल. संघाच्या संपर्क विभागाच्या माध्यमातून 10 व 11 डिसेंबर 2017 या काळात प्रांतात विशेष संपर्क मोहीम राबवली जाणार असून त्यात समाजातील सर्व स्तरांत संपर्क साधला जाणार आहे. या संपर्क मोहिमेसाठी एक पुस्तिका तयार करण्यात आली असून त्यात कोकण प्रांतातील संघ विश्वाची माहिती, निवडक सेवाकार्याचा परिचय करून देण्यात आला आहे. ही पुस्तिका देऊन समाजातील मान्यवरांना हिंदू चेतना संगमसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. एकूणच संघाचे सर्व कार्य विभाग आणि स्वयंसेवक आगामी काळात हिंदू चेतना संगमच्या यशासाठी काम करत राहतील.

'सज्जन शक्ती सर्वत्र' हे घोषवाक्य निश्चित करण्यामागे काय भूमिका आहे?

आपल्या हिंदू समाजात समाजाविषयी आस्था असणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था कार्यरत आहेत. या समाजाचे भले व्हावे अशी धारणा मनाशी ठेवून ते काम करत असतात. अशा समहितैषी लोकांना सोबत घेऊन मार्गक्रमण करणे ही संघाची सुरुवातीपासून कार्यपध्दती राहिली आहे. अशा समविचारी आणि समाजहितैषी लोकांना जोडण्यासाठी संघ सातत्याने कार्यक्रम करत असतो. पू. सरसंघचालकांच्या विजयादशमी भाषणावर चर्चा करण्यासाठी जेव्हा आम्ही समाजातील मान्यवरांना बोलावतो, तेव्हा त्याचा खूप चांगला प्रतिसाद लाभत असतो. सद्भाव बैठकांमध्येही सर्व स्तरांतील समाजबांधव उपस्थित राहतात. विविध संस्था, मंडळे, नववर्ष स्वागत यात्रा अशा माध्यमांतून समाजात एक मोठी सज्जनशक्ती विद्यमान आहे. ही सज्जनशक्ती जागृत व सक्रिय असेल, तर त्या आधारावर हिंदू समाजात सौहार्दाचे आणि विश्वासाचे वातावरण राहील. समाजात सर्वत्र सज्जनशक्ती आहे, त्या शक्तीला एका सूत्रात बांधून हिंदुहितासाठी कार्यविस्तार अशी भूमिका यामागे आहे.

या हिंदू चेतना संगमच्या माध्यमातून संघाला काय साध्य करायचे आहे?

साधारणपणे संघकामाचे वर्णन करताना सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शीअशा दोन शब्दांचा वापर केला जातो. या निमित्ताने ग्रामीण भागात मंडलापर्यंत आणि नगरीय क्षेत्रात वस्तिस्थानापर्यंत संघविचार पोहोचवण्याचा प्रयत्न होईलच, त्याचबरोबर संघाचा सेवाविभाग 1989पासून देशभर जी सेवाकार्य करतो आहे, त्यात समाजाला सहभागी करून घेत त्यातून समाजाचा विकास घडवून आणणे असा एक दृष्टीकोन सुरुवातीपासूनच आहे. आज संघाचे कार्यकर्ते सामाजिक समरसता, ग्रामविकास, पर्यावरण रक्षण, योग, जल व्यवस्थापन, कुटुंबप्रबोधन अशा असंख्य विषयात काम करत आहेत. ही सर्व कामे समाजाला सबळ करण्यासाठी चालतात. त्या कामांना या निमित्ताने गतिमान करणे हा उद्देश या आयोजनामागे आहेच, त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू चेतना संगमच्या निमित्ताने आम्ही सर्वच समाजबांधवांना आवाहन करत आहोत की संघ हा अनुभूतीचा विषय आहे. संघ समजून घेण्यासाठी संघात या. संघ विचारविश्वाचे सहप्रवासी व्हा. सर्वत्र स्त्री-पुरुष नागरिकांना संघप्रेरणेतून चालणाऱ्या विविध कार्याशी जोडून घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने होईल.

9594961860

 

 

Powered By Sangraha 9.0