दूरदर्शी नेतृत्व

14 Nov 2017 14:58:00

 पंतप्रधान म्हणून नेहरूंनी देशाच्या भविष्याचा विचार केला. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील उंच भरारीसाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टीची मुहूर्तमेढ नेहरूंनीच घातली. अवकाश तंत्रज्ञान संशोधन संस्था, अणुउर्जा, आयआयटी अशा महत्त्वाच्या संस्थांची स्थापना त्यांनी केली. त्याचा आज आपल्या देशाला फायदा होत आहे. या नेहरूंच्या दूरदृष्टीचे कौतुकच करायला हवे...

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला. वडील मोतीलाल आणि आई स्वरूपराणी यांचे हे सुपुत्र. पंडितजींनी इंग्रजी, पर्शियन आणि संस्कृती या भाषांचे मनापासून अध्ययन केले होते. गीता, उपनिषदांच्या संस्कारामुळे नेहरूंची आध्यात्मिक पार्श्वभूमी तयार झाली होती. सन 1912 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. नेहरू कायदेपंडित झाल्यावर त्यांच्यासमोर प्रश्न उभा होता की, 'देशसेवा की वकिली?' शेवटी देशसेवा हेच अंतिम उद्दिष्ट निश्चित झाले. 1916 साली पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांची पहिल्यांदा भेट झाली आणि ते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. 1921 मध्ये होणाऱ्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागतावर सर्वच काँग्रेस नेत्यांनी बहिष्कार टाकला. हे पाहून इंग्रज सरकार खवळले आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणून काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना बंदिवासात टाकले. त्यात मोतीलाल आणि जवाहर या पितापुत्राचा समावेश होता.

सन 1929 मध्ये लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनात नेहरूंची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. 31 डिसेंबर 1929 मध्ये रावी नदीच्या किनारी दिलेल्या ओजस्वी भाषणात पंडित नेहरू म्हणतात, ''आता यापुढे भारत पारतंत्र्यात राहणार नाही.'' या भाषणाचा जनतेवर खूपच प्रभाव पडला आणि पंडितजींना जनतेने आपल्या हृदयस्थ सिंहासनावर विराजमान केले. 14 एप्रिल 1930 साली झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांना पुन्हा बंदिवासात जावे लागले. देशव्यापी असहकार आंदोलन उभे राहिले. त्यात त्यांना बंदिवास झाला. या बंदिवासाचा उपयोग त्यांनी मनन, चिंतन आणि लेखनासाठी केला. 'भारत एक शोध' नावाचा खूप महत्त्वाचा ग्रंथ याच काळात त्यांनी लिहिला.

15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंनी शपथ घेतली. त्या वेळी ते 57 वर्षांचे होते. त्यांनी या देशाचे नेतृत्व स्वीकारले आणि जाहीर केले की, मी भारतीय जनतेचा सर्वोच्च सेवक आहे. महात्मा गांधींनी पंडितजींना आपला उत्तराधिकारी मानले होते आणि म्हणूनच पंडितजींनी आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यांची योग्य जाण ठेवून भारताच्या लोकशाही प्रजासत्ताकाला सबळ बनवणे हेच आपले परमकर्तव्य ठरविले. याच कारणाच्या पूर्तीसाठी भारताच्या राज्यघटनानिर्मितीत नेहरूंनी अथक योगदान दिले. 26 जानेवारी 1950ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले.

पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्यासमोर विविध समस्या होत्या आणि एकेका समस्येचे स्वरूप अतिशय गुंतागुंतीचे व अजस्र होते. या सर्वातून मार्ग काढून पंडित नेहरूंना भारत नावाचे राष्ट्र उभे करायचे होते. त्याची धुरा वाहायची होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वात प्रथम देश स्थिर करून देशाचे आंतरराष्ट्रीय धोरण निश्चित करायचे होते. ज्या काळात आपला देश स्वतंत्र झाला त्याच काळात जग एका बिकट कालखंडातून मार्गक्रमण करत होते. या पार्श्वभूमीवर पंडित नेहरूंनी आपल्या प्रतिभेतून नवी नीती तयार केली. एका अर्थाने ती पंडित नेहरूंची दूरदृष्टी होती. आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी समजून घेऊन राष्ट्राची नीती ठरविण्यासाठी लागणारी कणखर अशी राष्ट्रनिष्ठा नेहरूंच्या ठायी होती. नेहरू हे मानवतावादी होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मुत्सद्दी होते. त्याही आधी ते कट्टर राष्ट्रभक्त होते. आपल्या राष्ट्रीय गरजांच्या व्यापक आकलनातून ते आंतरराष्ट्रीयवादी झालेले होते.

गांधीजी हे दरिद्री जनतेचे आणि भारतीय खेडुतांचे प्रतिनिधी होते. त्यांच्यापाठी भारताचे स्वातंत्र्य म्हणजे खेडयांचे स्वातंत्र्य होते. नेहरूंना गांधींचा खेडयावरील भर मान्य होता. त्यांचा तातडीचा कार्यक्रम मान्य होता, पण यंत्राकडे पाहण्याची गांधींची पध्दत मान्य नव्हती. ग्रामोद्योग व चरखा या बाबी तातडीच्या आणि व्यवहार्य म्हणून मान्य होत्या, पण तिथे नेहरू थांबण्यास तयार नव्हते. ते मोठया यंत्रांना अनुकूल होते. त्यांना शेतीमध्येसुध्दा ट्रॅक्टरसारखे यंत्र आवश्यक वाटत असे. जनतेच्या समोरचा तातडीचा प्रश्न दारिद्रयाचा आहे. हा प्रश्न सोडवायचा असेल तर शेती उद्योगात असणारे लोकसंख्येचे आधिक्य कमी केले पाहिजे, असे नेहरूंना वाटे. सर्वांचेच जीवनमान उंचवायचे असेल, शेतीवरील माणसांची संख्या कमी करायची असेल आणि जनतेचे बहुतेक प्रश्न सोडवायचे असतील, तर देशात वेगाने औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरण झाले पाहिजे, असे नेहरूंचे मत होते. औद्योगिकीकरणाबाबत नेहरूंनी म्हटले आहे, ''आधुनिक जगाच्या संदर्भात विचार करायचा तर कोणतेही राष्ट्र आपल्याजवळ असलेल्या सुप्त साधनशक्तीचा जास्तीत जास्त वापर केल्याशिवाय आणि मोठया प्रमाणात औद्योगिकीकरण करून शक्ती संचय केल्याशिवाय त्या राष्ट्राला स्वावलंबन शक्य नाही. त्यांच्या राजकीय, आर्थिक स्वातंत्र्याला वास्तविकताही नाही. नव्या जगाच्या संदर्भात आहे त्या चौकटीत आपले स्थान आपल्यालाच सन्माननीय जागी निश्चित करावे लागेल.  मागासलेले राष्ट्र पुन:पुन्हा जगाचा समतोल नाहीसा करते आणि विकसित राष्ट्रामध्ये सुप्त असलेल्या आक्रमक प्रवृत्तीला खतपाणी घालते. अशा प्रचंड प्रमाणावरच्या औद्योगिकीकरणाशिवाय एखाद्या राष्ट्राला आपले नाममात्र स्वातंत्र्य टिकवून धरता येईल; पण हे स्वातंत्र्य नाममात्रही असेल, आर्थिक गुलामी पत्करणारे असेल आणि ते स्वातंत्र्य अस्थिरही असेल. जेव्हा दुसऱ्या राष्ट्राच्या आर्थिक प्रभुत्वाखाली आपण जातो त्या वेळी शोषण अपरिहार्य असते आणि शोषण अस्तित्वात असेल तेव्हा छोटया उद्योगांवर आधारलेली त्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडते. जे असलेले जीवन टिकविण्याचा आपण ध्यास धरीत आहोत ते जनतेचे स्वातंत्र्य छोटया उद्योगांमुळे सुरक्षित राहील असे आपण समजत आहोत. ते सगळेच मोठया यंत्रांना आणि औद्योगिकीकरणाला विरोध केल्यामुळे संकटात येत असते.''

देशात खूप मोठया प्रमाणात औद्योगिकीकरणाचा प्रारंभ पंडित नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली झाला. त्यांनी अजस्र कारखान्यांची उभारणी केली. 'हीच नवसमाजाच्या विकासाची मंदिरे आहेत' अशी त्यांची भूमिका होती. नेहरूंनी स्वातंत्र्योत्तर काळात शक्य तितक्या वेगाने मोठया उद्योगधंद्यांची उभारणी करण्याचा प्रयत्न केला. या उभारणीमागे सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्याची त्यांची उत्कट इच्छा तर होतीच, पण त्याचबरोबर आर्थिक साम्राज्यवादाला भारत बळी पडू नये, त्याचे स्वातंत्र्य बलवान असावे, अशी प्रबळ राष्ट्रवादी इच्छाही होती. त्यामुळे पंडितजींनी भाक्रा-नानगलसारख्या मोठया योजना आखल्या आणि त्या प्रत्यक्षात आणल्या. पंडित नेहरूंनी श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले. 'आराम हराम है' अशी घोषणा देऊन सर्व भारतीयांना भारताला सामर्थ्यशाली करण्यास प्रवृत्त केले. भारताचे नवनंदनवन उभारण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे, असे ते सातत्याने सांगत असत.

पंडित नेहरू हे स्वत: कडवे राष्ट्रवादी होते. कोणत्याही राष्ट्रवाद्याला आपल्या देशातील एखाद्या गटाने किंवा व्यक्तिसमूहाने मार्गदर्शनासाठी किंवा प्रेरणेसाठी देशाच्या बाहेर इतरत्र कुठे तरी पाहणे मुळीच आवडत नाही. राष्ट्रवाद्यांना या घटनेची विलक्षण चीड असते. कम्युनिस्टांच्या भारताबाहेर पाहण्याच्या प्रवृत्तीविषयी नेहरूंच्या मनात तीव्र नापसंती होती. नेहरूंना याची जाणीव होती की, आशियात राष्ट्रवाद ही सर्वात बलवान अशी शक्ती राहणार आहे. परकीय साम्राज्यसत्तांच्या प्रभुत्वाखाली असणारी राष्ट्रे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या संदर्भातच विचार करणार, हे घडणे स्वाभाविक असते, पण या राष्ट्रवादाच्या सामर्थ्याबरोबरच सर्व जगात बदल घडवून आणणारा बलवान आर्थिक प्रवाहही त्यांच्या डोळयासमोर होता.

आर्थिकदृष्टया सक्षम व्हायचे, राष्ट्राला उभे करायचे, तर मोठया प्रमाणात औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाला स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव पंडित नेहरूंना होती. औद्योगिक क्रांतीनंतर काही गंभीर स्वरूपाचे प्रश्न उत्पन्न होतात. त्यांची उत्तरे कशी शोधायची? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरेतून शोधले होते. औद्योगिकीकरणाचे बरे-वाईट परिणाम सांगताना ते म्हणाले होते, ''औद्योगिक दृष्टीने समृध्द झालेल्या आणि म्हणून समृध्द जीवन जनतेलाही उपलब्ध करून देणाऱ्या मोठया राष्ट्रांच्या समोर क्रमाने नवे प्रश्न निर्माण होताहेत. विशेषत: अमेरिकेसमोर रिकामपणाचा योग्य वापर कसा करावा, हाच एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे. दररोज तरुणांमधील वाढत्या गुन्हेगारीच्या कथा ऐकू येत आहेत. या कथा एकटया अमेरिकेच्या नाहीत. त्या सर्वच समृध्द देशांतील तरुणांच्या आहेत. अमेरिकेत समृध्दी अधिक म्हणून तरुणांतील गुन्हेगारी अधिक आहे. ज्या देशात स्वयंचलित यंत्राचा वापर मोठया प्रमाणात होतो, त्या देशातील लोकांना मोठया प्रमाणात रिकामपण उपलब्ध होणार आहे. हे रिकामपण योग्य प्रकारे कसे वापरावे? असल्या प्रकारचा प्रश्न वैज्ञानिक दृष्टिकोनाने कसा हाताळावा हे मला समजू शकत नाही. अशा वेळी काही आध्यात्मिक मूल्ये आणि नैतिक मूल्ये महत्त्वाची होऊन जातात. समृध्द जीवनात होणारी गुन्हेगारीची वाढ नैतिक प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यामुळे झालेली आहे. या परिस्थितीला अध्यात्माच्या आधारे काही उत्तर हुडकावे लागेल. मानवी मन कोणत्या तरी खोल अशा भुकेने पीडित आहे. या भुकेचे उत्तर नैतिक आणि आध्यात्मिक समृध्दीतून द्यावे लागेल. नुसती भौतिक समृध्दी कवडीमोलाची होईल. मी धार्मिक माणूस कधीच नव्हतो, पण जीवनाला श्रध्दा असाव्यात यावर माझा विश्वास आहे. मी श्रध्दांची जपणूक केलेली आहे. सामान्य पातळीवरच्या दैनंदिन जीवनापासून वर उचलून व्यक्तिमत्त्वाला एक नवा नैतिक दर्जा आणि आध्यात्मिक परिणाम देणाऱ्या श्रध्दा मला अभिप्रेत आहेत. मग तुम्ही त्याला धर्म हे नाव द्या, की अजून कोणते नाव द्या.''

एका बाजूला आधुनिकता आणि दुसऱ्या बाजूला इथल्या मातीतील रूढी, परंपरा आणि संस्कार यांच्याबाबतचा आदर आणि अंगीकाराची भूमिका अशा दुहेरी मार्गाने पंडित नेहरू स्वतंत्र भारताला राष्ट्र म्हणून उभे करत होते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 'भारत' या राष्ट्राचे अस्तित्व अधोरेखित करत होते. भारताच्या समृध्द इतिहासाच्या अध्ययनामुळे पंडितजी अशा प्रकारचे विचार मांडत होते. या अध्ययनामुळे त्यांना वाटे की, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सम्यक आणि समृध्द असला पाहिजे. केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन हा जीवनाचा सम्यक दृष्टिकोन असू शकत नाही. जीवनाचा सर्वांगीण विकास केवळ विज्ञानामुळे होऊ शकणार नाही. विज्ञानाखेरीज कला, तत्त्वज्ञान, नीतिमूल्ये, परंपरा यांनीही व्यापलेला जीवनाचा फार मोठा भाग आहे. म्हणून सम्यक जीवनदृष्टीत विज्ञानाबरोबर तत्त्वज्ञान असले पाहिजे.

कोणत्याही राष्ट्राची ओळख तेथील राज्यसत्तेवरून होते. लोकशाही ही राज्यसत्ता पध्दत आदर्शवत आहे. जगभर तिचा स्वीकार होतोय. भारतीय लोकशाहीची पायाभरणी करण्याचे महत्त्वपूर्ण काम पंडित नेहरू यांनी केले आहे. देशात स्वातंत्र्याच्या आरंभकाळी पहिली काही वर्षे तरी वैधानिक सत्तेला बळकटी असावी लागते. त्याशिवाय शासन स्थिर होत नाही. स्थिर शासन अस्तित्वात येण्यासाठी समाजात जे तातडीचे बदल करावे लागतात ते करताच येत नाहीत. परिणामत: वैधानिक सत्ता, संविधान, लोकशाही, न्यायालये या सर्वांचे लोकशाहीविषयीच्या श्रध्दा त्यांच्या मनात दृढ आणि बळकट होत्या. भारतीय जनतेला लोकशाही कशी अंगभूत आहे यावर भर देताना नेहरूंनी पुन:पुन्हा राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संस्थांचा व प्रथांचा विचार मांडला आहे. बहुमताचा निर्णय कसा करावा याचे भारतीयांना प्राचीन काळापासून शिक्षण आहे. त्यांच्या मनात प्राचीन भारतीय लोकशाहीविषयी आदर होता आणि देश लोकशाही मार्गाने चालावा, त्यासाठी आवश्यक असणारे संविधान तयार व्हावे यासाठी त्यांनी आग्रह धरला आणि डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधानाची मसुदा समिती गठित करून देशाचे नवे संविधान तयार करविले. या संविधाननिर्मिती प्रक्रियेतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. नेहरूंनी आपले काम लोकशाहीच्या चौकटीत राहून केले. लोकशाहीची चौकट त्यांचे हात बांधत होती म्हणून त्यांचा नाइलाज होता असे म्हणणे बरोबर नाही. उलट त्यांना स्वत:लाच या चौकटीविषयी दृढ प्रेम होते. त्याचा विचार लोकशाही भूमिकेतून वाढलेला आणि रुचलेला होता. त्यामुळे असे खात्रीशीरपणे म्हणता येईल की, देश त्यांच्या कारकीर्दीत हुकूमशाहीकडे जात नव्हता. नेहरूंची तशी इच्छाही नव्हती. उलट त्यांचा अशा प्रयत्नांना विरोध होता.

नेहरू हे भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे प्रमुख शिल्पकार मानले जात; किंबहुना भारताच्या परराष्ट्रीय धोरणाला आकार देण्यात त्यांच्या बरोबरीचे दुसरे नावच दाखवता येणार नाही. त्यांच्या परराष्ट्र धोरणात ध्येयवाद आणि व्यवहारवाद यांचा अतिशय चांगला समन्वय होता. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून स्वाभाविकच नेहरूंना असे वाटे की, आपल्या देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या जीवनाचा फार मोठा भाग खर्ची पडला आहे. म्हणून भारताचे परराष्ट्रीय धोरण अशा बेताने आखले पाहिजे की, ज्यात नवस्वातंत्र्याचे संरक्षण आणि संवर्धन होईल. साम्राज्यवादाला विरोध हे धोरण भारताच्या परंपरेशी सुसंगत, स्वातंत्र्यलढयाशी सुसंगत आणि एक ध्येयवादी धोरण होते तितकेच ते व्यवहार म्हणूनही भारताच्या हिताचे होते. शेकडो नवस्वतंत्र राष्ट्रे उदयास येत आहेत. या वातावरणातच परकीय आक्रमणापासून भारताच्या स्वातंत्र्याचे संरक्षण होणे शक्य होते. दुसरी गोष्ट नेहरूंना शांतता हवी होती. आंतरराष्ट्रीय शांततेशिवाय भारतात आर्थिक विकास शक्य नाही आणि आर्थिक विकासाशिवाय भारतीय स्वातंत्र्याला व लोकशाहीला अंतर्गत धोक्यापासून  संरक्षण नाही, असे पंडित नेहरूंचे मत होते. नेहरूंच्या साम्राज्यवादविरोध आणि शांततावाद या दोन सूत्रांत ध्येयवाद आणि देशहित यांचा सुरेख समन्वय झालेला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

नेहरूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अलिप्ततावादांची भूमिका घेतली. अलिप्ततावाद नकारात्मक नाही, तर भारत जागतिक शांततेसाठी सतत प्रयत्न करत आहे, कारण त्यात भारताचे हित आहे. भारताला प्रगतीची संधी आहे, पण त्याचबरोबर सर्व मानवजातीचे हित आहे. जगाची शांतता शांततेवर व्याख्याने देत आणि युध्दाची तयारी करत सिध्द होत नसते, तर शांततेसाठी स्वतंत्र प्रयत्न करावा लागतो. हा प्रयत्न म्हणजेच अलिप्ततावाद. अलिप्ततावादाच्या भूमिकेत भारताची आणि जगाची प्रगती, समृध्दीचा विचार करणारा विधायक दृष्टिकोन सामावलेला आहे अणि जगाच्या इतर सर्व राष्ट्रांतील शांतता आणि समृध्दीबरोबरच भारताची प्रगतीकडे वाटचाल होणार आहे. हा दृष्टिकोन भारतीयांनी स्वीकारला पाहिजे, असा पंडित नेहरूंचा आग्रह होता.

जवळजवळ सतरा वर्षे पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते. तितकाच काळ ते देशाचे परराष्ट्रमंत्रीही होते. पंडित नेहरूंच्या या सतरा वर्षांच्या कालखंडात उद्यमान भारताचे बीजारोपण झाले. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, रोजगार, अवकाश संशोधन, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत पंडित नेहरूंनी देशाच्या भविष्याचा विचार करून कामाला सुरुवात केली आणि प्रखर राष्ट्रवादाच्या पायावर त्या त्या विषयांना आकार दिला. 1962 साली पंचायत राज्याची निर्मिती करून ग्रामविकास आणि ग्रामवैभवास नवी दिशा प्राप्त करून दिली. सामूहिक विकास योजनेद्वारे भूमिहीन शेतकऱ्यांना भूमिदान केले. भारतात उद्यमीकरण करून बुध्दिवाद आणि विज्ञान यांना श्रेष्ठत्व मिळवून दिले.

पंडित नेहरूंना जागतिक राजकारणात मानाचे स्थान प्राप्त झाले होते. अखिल विश्वातील पददलितांना आशेचा किरण दाखविणारे ते दीपस्तंभ ठरले. म्हणूनच त्यांना विश्वपुरुष मानण्यात आले. विश्वशांती हे त्यांचे लाडके स्वप्न होते. या स्वप्नातूनच 'पंचशील' आकाराला आले होते. 1962 साली चीनने आक्रमण केले तेव्हा सारा देश पंडितजींच्या पाठीशी उभा राहिला होता.

27 मे 1964 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यांच्या अखेरच्या इच्छेप्रमाणे त्यांची रक्षा देशातील पवित्र नद्या आणि देशाची सुजलाम सुफलाम भूमी यांच्यात मिसळण्यात आली. या मातीशी समरस झालेले, इथल्या परंपरा, संस्कृतीचा अभिमान बाळगणारे पंडित नेहरू या देशाच्या मातीत एकरूप झाले.

पंतप्रधान म्हणून नेहरूंनी देशाच्या भविष्याचा विचार केला. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील उंच भरारीसाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टीची मुहूर्तमेढ नेहरूंनीच घातली. अवकाश तंत्रज्ञान संशोधन संस्था, अणुउर्जा, आयआयटी अशा महत्त्वाच्या संस्थांची स्थापना त्यांनी केली. त्याचा आज आपल्या देशाला फायदा होत आहे. या नेहरूंच्या दूरदृष्टीचे कौतुकच करायला हवे; पण काही बाबतीत नेहरूंचे दुर्लक्ष होणेही देशाला महाग पडले. कृषि क्षेत्र हे त्यातील एक उदाहरण आहे. नेहरूंनी कृषि नितीचा फार विचार केला नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या सुप्रसिध्द पंचवार्षिक योजनातही कृषी क्षेत्राचा समावेश नव्हता. परिणामी त्यांच्या हयातीतच देशाला तीव्र अन्नटंचाईचा सामना करावा लागला. कृषी क्षेत्राप्रमाणेच सैन्यदल आणि संरक्षण सबळता याविषयीही नेहरू उदासिन होते. परिणामी 1962 साली चीनकडून आक्रमण झाले. काश्मीरबाबतचे त्यांचे धोरण हे वास्तवाला धरून नव्हते. काश्मीर प्रश्न 'युनो'मध्ये नेण्याची त्यांनी घाई केली. त्याचे परिणाम आजही भोगावे लागत आहेत.

नेहरू हे हिंदूचिरंतन संस्कृतीचे चाहते होते. आपल्या कृतीला-विचाराला त्यांनी मात्र संस्कृतीचे अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय अलिप्ततावादाचा पुरस्कार करताना त्यांनी आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा निर्माण केली आणि त्यांचा आधार घेऊन त्यांच्याच काळात हिंदू धर्म, संस्कृती आणि परंपरा यांच्यावर टीका करणे, नाकारणे म्हणजेच पुरोगामित्व अशी मानसिकता रूढ झाली हेही मान्य करायला हवे.

पंडित नेहरूंच्या व्यक्तित्वाचा आढावा घ्यायचा तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा आधार घ्यावा लागतो. पंडित नेहरूंबद्दल गुरुदेव लिहितात, 'त्यांनी केलेले कार्य मोठे असले तरी नेहरू हा माणूस आणि त्यांचे व्यक्तित्व त्याहीपेक्षा मोठे होते आणि ज्या परिसरात, ज्या वातावरणात त्यांचे कार्य विकसित झाले, त्यातील सर्वांपेक्षा ते किती तरी प्रांजळ आहेत. भारतीय जनतेचे त्यांच्यावर प्रेम होतेच, इतके प्रेम त्यांनी कुणावर क्वचितच केले असेल. या प्रेमाचे कारण नेहरूंनी केलेला त्याग आणि भोगलेले कष्ट हे तर लोकांच्या प्रेमाचे कारण होतेच, पण त्याहीपेक्षा नेहरूंचे आकर्षण निराळे होते. त्यांचे राजकीय शहाणपण, त्यांचे बहुढंगी समृध्द व्यक्तिमत्त्व या सर्वांपेक्षा ज्या सुसंस्कृतपणे ते देशाचा कारभार पाहात असत, त्यामुळे जनतेचे त्यांच्यावर प्रेम होते. एका राष्ट्राच्या भाग्यविधात्यावर राष्ट्राची गाढ श्रध्दा असावी तशी नेहरूंवर लोकांची श्रध्दा होती. ही श्रध्दा मावळली असे त्यांच्या हातून कधीच वर्तन घडले नाही, घडण्याचा संभव नव्हता, इतके ते प्रामाणिक आणि प्रांजळ होते.                zz

 

Powered By Sangraha 9.0