उत्तर प्रदेशात 'हानिकारक बापू'..?

07 Jan 2017 13:30:00

उत्तर प्रदेशातली 'यादवी दंगल' आणि मुलायम-अखिलेशमधील भांडणसुध्दा ट्रेंडिंगमध्ये सर्वात वरच्या जागी होते. ह्या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध जोडून, संपूर्ण उत्तर प्रदेशात सोशल मीडियावर कार्टून्स, पोस्ट्स, कॉमेंट्स यांचा महापूर आला होता. मात्र ह्या सर्वांतून एक संदेश अगदी स्पष्टपणे लोकांपर्यंत जात होता - 'हानिकारक बापू'चा..! उत्तर प्रदेशातल्या ह्या यादवीत 'बापू', म्हणजेच नेताजी मुलायमसिंह हे खलनायकाच्या भूमिकेत उभे होते आणि लोकांची सहानुभूती अखिलेश यादवकडे वळलेली दिसत होती!
ज्या
वेळेस 'दंगल' ह्या चित्रपटातले गाणे, 'बापू, सेहत के लिये तू तो हानिकारक हैं...' हे सोशल मीडियावर ट्रेंड होत होते, नेमके त्याच वेळेस उत्तर प्रदेशातली 'यादवी दंगल' आणि मुलायम-अखिलेशमधील भांडणसुध्दा ट्रेंडिंगमध्ये सर्वात वरच्या जागी होते.

ह्या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध जोडून, संपूर्ण उत्तर प्रदेशात सोशल मीडियावर कार्टून्स, पोस्ट्स, कॉमेंट्स यांचा महापूर आला होता. मात्र ह्या सर्वांतून एक संदेश अगदी स्पष्टपणे लोकांपर्यंत जात होता - 'हानिकारक बापू'चा..! उत्तर प्रदेशातल्या ह्या यादवीत 'बापू', म्हणजेच नेताजी मुलायमसिंह हे खलनायकाच्या भूमिकेत उभे होते आणि लोकांची सहानुभूती अखिलेश यादवकडे वळलेली दिसत होती!

उत्तर प्रदेशातल्या राजकारणाच्या दृष्टीने ही फार मोठी घटना होती. फक्त तीन दिवसांत समाजवादी पक्षाचे केंद्र मुलायमकडून सरकून अखिलेशकडे आलेले दिसत होते. आजपर्यंत समाजवादी पक्ष ज्यांनी स्थापन केला, चालवला, दोनदा ह्या पक्षाला उत्तर प्रदेशात सत्ता मिळवून दिली, ते मुलायमसिंह या सर्व प्रकरणात असाहाय्य आणि दयनीय दिसत होते. अपवाद सोडल्यास पूर्ण पक्षच अखिलेशच्या नेतृत्वात उभा राहिलेला दिसत होता.

उत्तर प्रदेशातल्या 403 विधानसभा जागांपैकी 2012च्या निवडणुकांत समाजवादी पक्षाला 224 जागांसकट पूर्ण बहुमत मिळाले होते. यापैकी 203 आमदार या क्षणी अखिलेशच्या बाजूला आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत, भाजपाच्या झंझावातासमोर टिकून राहून समाजवादी पक्षाचे जे पाच खासदार निवडून आले, त्यापैकी चार अखिलेशच्या बाजूला आहेत. गंमत म्हणजे हे पाचही खासदार 'यादव' परिवारातलेच आहेत.

थोडक्यात काय, तर समाजवादी पक्षातली 'मुखिया'ची जागा या क्षणी तुलनेने अत्यंत तरुण असलेल्या अखिलेशकडे आलेली आहे. आणि हेच उत्तर प्रदेशाच्या राजकारणातले एक मोठे आश्चर्य आहे.

अर्थात हे एका दिवसात घडलेले नाही. त्यामागे यादव परिवाराचा इतिहास आहे, आणि मुलायम-अखिलेश यांच्या कार्यशैलीतला फरकही आहे.

समाजवादी पक्ष म्हणजे खऱ्या अर्थाने मुलायमसिंह यादव यांचा परिवार. मुलायमसिंह हे पाच भावंडांतले दुसऱ्या नंबरचे. मुलायमसिहांनी पैलवानकी करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र मैनापुरीमध्ये झालेल्या त्यांच्या पहिल्याच कुस्तीत आमदार नत्थूसिंह प्रभावित झाले. नंतर नत्थूसिहांच्या छत्रछायेखाली मुलायमसिहांची राजकीय वाटचाल सुरू झाली.

1989 ते 1991 या काळात ते उत्तर प्रदेशात जनता पक्षाच्या सरकारचे मुख्यमंत्री होते. पुढे 1992च्या ऐतिहासिक कारसेवेच्या फक्त तीन महिने आधीच त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि पुढे दोनदा ते मुख्यमंत्री झाले. या सर्व प्रवासात यादव कुटुंबाचा मुलायमसिहांवर प्रचंड भरवसा आणि विश्वास होता. मुलायमसिहांनीही सर्व परिवाराला वेगवेगळी पदे देत, सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका घेतली होती.

अखिलेश यादव हा त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेला एकुलता एक मुलगा. अखिलेश झाल्यांनतर लगेचच त्यांची पत्नी मालतीदेवी आजारी राहू लागल्या. त्यामुळे काका रामगोपालसिंहांनी अखिलेशचा जास्त सांभाळ केला. म्हणूनच आजही काका-पुतण्याची जोडी उत्तर प्रदेशाच्या राजकारणात ठामपणे उभी आहे.

साधारण 1989च्या सुमारास साधना गुप्ता ही महिला मुलायमसिंह यादव यांच्या संपर्कात आली. आज ज्या प्रतीक यादवला मुलायमसिंह यांचा दुसरा मुलगा समजले जाते, तो प्रतीक तेव्हा एक वर्षाचा होता. साधना गुप्ता आणि त्यांचे पती चंद्रप्रकाश गुप्ता यांचा हा मुलगा. पुढे मुलायमसिंहांच्या 'प्रेमात पडल्याने' 1990मध्ये साधना गुप्तांनी घटस्फोट घेतला आणि मुलायमसिंहांबरोबर त्या लिव्ह-इनमध्ये राहू लागल्या. मालतीदेवी ह्या दम्याने पीडित होत्या. त्यामुळे त्या काळात मुलायमसिंहांचे दोन संसार चालू होते. आजारी असलेल्या मालतीदेवी पुढे 2003मध्ये मरण पावल्या आणि त्यानंतर मुलायमसिंहांनी साधना गुप्ताला पत्नी आणि प्रतीक यादवला मुलगा म्हणून अधिकृतरित्या स्वीकार केले.

मुलायमसिंहांची ही व्यक्तिगत मसाला स्टोरी ह्या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाच्या भूमिकेत आहे, कारण ह्या यादव परिवारात 'यादवी' होण्यामागे साधना गुप्तांची भूमिका मध्यवर्ती समजली जाते. प्रतीकला मुळात राजकारणाची आवड नव्हतीच. तो बॉडीबिल्डर आहे आणि लखनऊमध्ये सध्या जिम आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करतो.

मात्र त्याच्या आईला वाटते की प्रतीकची उपेक्षा होतेय. हे साधना गुप्ता प्रकरण ज्या शिवपाल यादव ह्यांना सर्वप्रथम समजले होते, ते शिवपालकाकासुध्दा प्रतीकला पुढे आणण्याच्या प्रयत्नात असतात. आणि त्यात भर म्हणून, प्रतीकची बायको - पूर्वाश्रमीची अपर्णा बिष्ट हीदेखील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि राजकारणाची आवड असलेली आहे. ही अपर्णा यादव, मुलायमसिंहांच्या उमेदवारांच्या सूचीमध्ये लखनऊ-केंट विधानसभा क्षेत्राची समाजवादी पक्षाची उमेदवार आहे.

आजारी आई आणि वडिलांचे पूर्णवेळ राजकारण, ह्यामुळे अखिलेश यादव यांचे अधिकांश शिक्षण बाहेरच झाले. धौलपूरच्या राजस्थान सैनिकी शाळेत त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे मैसूरच्या एस.जे. अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी सिव्हिल इंजीनियरिंग केले आणि नंतर ऑॅस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठातून त्यांनी पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये एम.एस. केले. अर्थातच, काहीशा सुधारलेल्या, पुढारलेल्या, शिक्षित अशा लोकांकडे अखिलेश यादव यांचा कल असणे स्वाभाविकच आहे आणि म्हणूनच व्यवसायाने प्राध्यापक असलेल्या रामगोपाल यादव ह्या काकांकडे त्यांचा ओढा आहे.
ह्याच्या उलट, सध्या मुलायमसिंहांच्या सर्वात जवळ असलेले त्यांचे धाकटे बंधू शिवपाल यादव यांचे शिक्षण जरी बी.पी.एड.पर्यंत झाले असले, तरी त्यांचा गोतावळा अल्पशिक्षित आणि गुंडप्रवृत्तीच्या लोकांचा आहे. समाजवादी पक्षात मुख्तार अन्सारी ह्या कुख्यात डॉनचा पक्ष विलीन करवण्यात शिवपाल यादव यांचीच मोठी भूमिका होती, तर अखिलेश यादव यांनी ह्या विलीनीकरणाचा विरोध केला होता.

एकुणात नुकत्याच घडत असलेल्या यादवीची ही पार्श्वभूमी आहे. या कहाणीत शिवपाल यादव, अमर सिंह, साधना गुप्ता-यादव ही सर्व मंडळी (जर अखिलेश यादवला नायक समजले, तर) खलनायकाच्या भूमिकेत आहेत.

जे घडायचे, ते आता घडून गेलेले आहे. अखिलेश आणि मुलायम हे दोघेही आपापल्या मार्गावरून फार पुढे गेलेले आहेत. त्यांनी तिथून परतण्याची किंवा समाजवादी पक्ष परत नेताजींच्या (मुलायमसिंहांच्या) नेतृत्वाखाली एक होण्याची शक्यता अगदी धूसर आहे. निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. 11 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक चौथ्या दिवशी उत्तर प्रदेशात मतदान होणार आहे. 11 मार्चला निकालांची घोषणा आहे.

अशा पार्श्वभूमीवर या 'यादवी'चा उत्तर प्रदेशातल्या राजकारणावर काय परिणाम होईल, हे बघणे महत्त्वाचे ठरते.

'यादवी' सुरू होतानाचे चित्र हे समाजवादी पक्षाच्या किंवा अखिलेश यादवच्या बाजूचे नव्हते. प्राथमिक आणि प्रारंभिक सर्वेक्षणात भाजपा आणि बसपा हे पक्ष समाजवादी पक्षाच्या बरेच पुढे होते. मात्र उत्तर प्रदेशात ही 'दंगल' सुरू झाल्यानंतर चित्र बदलायला सुरुवात झाली. सुरुवातीला भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली. कारण समाजवादी पक्षात भांडण होणे आणि तो पक्ष कमकुवत होणे म्हणजे मुस्लीम मते बसपाच्या पारडयात जाणे. उत्तर प्रदेशात अनेक विधानसभा क्षेत्रांत मुस्लीम मते निर्णायक ठरतात. आणि मुस्लीम समाज हा ताकदवान पक्षालाच मते देतो. त्यामुळे त्यांची एकगठ्ठा मते बसपाला मिळाली, तर भाजपाला त्याचा फटका बसू शकतो, हे गणित समोर दिसत होते.

मात्र समाजवादी पक्षात झालेल्या ह्या 'दंगली'नंतर अखिलेश यादव हे अधिक शक्तिशाली बनून समोर आले आहेत. साफ-सुथरी, गुंडप्रवृत्तींना विरोध करणारी आणि विकासाला कटिबध्द अशी त्यांची प्रतिमा मतदारांच्या नकळत निर्माण झाली आहे. त्यांनी रेकॉर्ड वेळेत निर्माण केलेल्या आग्रा हायवेसारख्या प्रकल्पांमुळे ती छबी अधिकच उजळ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत समाजवादी पक्षाच्या सरकारचा ऍंटीइन्कम्बन्सी फॅक्टर मुलायमसिंह-शिवपाल यादव-अमर सिंह यांच्या रूपाने समोर आला आहे आणि त्यामुळे अखिलेश सरकारवरचा ऍंटीइन्कम्बन्सीचा प्रभाव आणि नाकर्तेपणाचे आरोप बाजूला सारले गेले आहेत.
हे जरी असले, तरीही एकटया अखिलेशसिंहांच्या बळावर सत्ता मिळवणे हे ह्या विभाजित समाजवादी पक्षाला शक्य नाही आणि म्हणूनच बिहार निवडणुकांच्या धर्तीवर 'महायुती' (महागठबंधन) तयार करण्याचे अखिलेशसिंहांचे सर्व प्रयत्न आहेत. त्या दृष्टीने काँग्रेसबरोबर त्यांची बोलणी चालू आहेत. इकडे काँग्रेस तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे. त्यांचे रणनीतिकार असलेल्या प्रशांत किशोरच्या लक्षात आलेले आहे की काँग्रेस पक्ष एकाकी लढला, तर त्याचे पानिपत निश्चित आहे. त्यामुळे दोन्हीकडून आतुरता आणि इच्छा असलेली ही अखिलेश-काँग्रेस युती होणार हे आता निश्चित आहे. या युतीमध्ये अजितसिंहाचे लोकदल आणि इतर लहान पक्ष येऊ  शकतात. आणि तसे जर झाले, तर उत्तर प्रदेशात त्रिकोणी संघर्ष होऊ  शकतो.

4 जानेवारीला निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर उत्तर प्रदेशाच्या राजकारणाला प्रचंड वेग आलेला आहे. या सर्व परिस्थितीत अखिलेश-काँग्रेस युतीचा फायदा भाजपाला होईल की नाही, हे आज तरी स्पष्ट नाही. पण ही 'दंगल' झाली नसती, तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र येणे कठीण होते आणि तसे जर झाले असते, तर अखिलेश यादवचे काही खरे नव्हते, हे निश्चित!!

 9425155551

 telemat@airtelmail.in

 

टीम अखिलेश - पाठीमागचे बळ

ज्या आत्मविश्वासाने अखिलेश यादव या 'यादवी'ला सामोरे गेले, त्यामागे त्यांच्या सहकाऱ्यांची योजना, रणनीती आणि मेहनत होती. हे आपले सहकारीसुध्दा अखिलेश यादवांनी काळजीपूर्वक निवडले आहेत. ही 'टीम अखिलेश' समर्पित सहकाऱ्यांची आणि पडद्यामागे राहणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे.


l अखिलेश यादव यांच्या एकूण राजकीय प्रवासावर प्रभाव आहे तो अमेरिकेचे रणनीतिकार आणि हार्वर्ड विद्यापीठात 'पब्लिक पॉलिसी' या विषयाचे प्राध्यापक असलेले स्टीव जॉडींर्ग यांचा. तेच सध्या निवडणुकांची रणनीती तयार करत आहेत.

l उदयवीर सिंह हा त्यांचा शाळेपासूनचा मित्र, मात्र त्यांच्या दोन वर्षे मागे असलेला. जे.एन.यू.मधून एम.ए. आणि एम.फिल. केलेले उदयवीर सिंह, अखिलेश यादव यांचे 'खास' आहेत. अत्यंत 'लो प्रोफाइल' असलेला हा माणूस अखिलेश यादवांच्या राजकारणातली महत्त्वाची बाजू सांभाळतो.

l सुनील यादव 'साजन' हा समोर असलेला राजकीय चेहरा. अखिलेश यादवच्या युवा ब्रिगेडचे सूत्रधार. गेल्या आठवडयात पक्षात चाललेल्या दंगलीच्या दरम्यान मुलायमसिंहांच्या घरासमोर युवा ब्रिगेडला दिवस-रात्र बसवून ठेवून दबाव आणण्याचं तंत्र यांचंच.

l आनंद भदौरिया हे 'टीम अखिलेश'चे प्रमुख सदस्य. छात्रसंघ राजकारणाच्या माध्यमातून अखिलेश यादवच्या संपर्कात आलेले. लोहिया वाहिनीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य.

l संजय लाठर - पत्रकारितेत डॉक्टरेट केलेले आणि कायद्यात स्नातकोत्तर झालेले. सध्या विधान परिषद सदस्य आणि अखिलेश यादव यांना प्रोजेक्ट करण्याच्या मोहिमेचे सूत्रधार.

l एस.आर.एस. यादव - पूर्वी मुलायमसिंह मुख्यमंत्री असताना त्यांचे अत्यंत ताकदवान ओ.एस.डी. असलेले. सेवानिवृत्त झाल्यावर सध्या अखिलेश यादवांचे विश्वासपात्र.

l आलोक मिश्रा - आय.आय.एम., अहमदाबाद येथे प्रोफेसर असणाऱ्या या मिश्राबाबूंना अखिलेश यादवांनीच राजकारणात आणले आणि मंत्रीही बनवले. अखिलेश यादवांच्या शासकीय योजनांचे रणनीतिकार.

 

Powered By Sangraha 9.0