नोटबंदी... अशीही, तशीही...

04 Jan 2017 12:26:00

8 नोव्हेंबरपासून भारतात प्रचंड अर्थतज्ज्ञ निर्माण झालेत, दोन प्रकारचे - मोदी चूक, मोदी बरोबर!! दोन्ही बाजू अगदी तावातावाने भांडत असतात. दोन्हीकडे अगदी नावाजलेली तज्ज्ञ नावे आणि आपली
अवस्था संभ्रमित अर्जुनासारखी.

मी माझ्या व्यवसायानिमित्त सर्वत्र फिरतो. सार्वजनिक वाहतूक, रेल्वे-बस जास्त आवडते. खूप गोष्टी बघता येतात, ठेल्यांवर कानावर पडतात, शिकता येते - वाचनही होते. थोडाफार 'भारत वि. इंडिया' समजता येतो. नोटबंदीनंतर माझे ठाण्याबाहेर दोन प्रवास झाले. एक लगेचच 13-19 नोव्हेंबर कानपूर-दिल्ली येथे व दुसरा 18 ते 20 डिसेंबर पुणे-लातूरला.
त्यातले काही अनुभव.


8
नोव्हेंबरपासून भारतात प्रचंड अर्थतज्ज्ञ निर्माण झालेत, दोन प्रकारचे - मोदी चूक, मोदी बरोबर!! दोन्ही बाजू अगदी तावातावाने भांडत असतात. दोन्हीकडे अगदी नावाजलेली तज्ज्ञ नावे आणि आपली अवस्था संभ्रमित अर्जुनासारखी.

मी माझ्या व्यवसायानिमित्त सर्वत्र फिरतो. सार्वजनिक वाहतूक, रेल्वे-बस जास्त आवडते. खूप गोष्टी बघता येतात, ठेल्यांवर  कानावर पडतात, शिकता येते - वाचनही होते. थोडाफार 'भारत वि. इंडिया' समजता येतो. नोटबंदीनंतर माझे ठाण्याबाहेर दोन प्रवास झाले. एक लगेचच 13-19 नोव्हेंबर कानपूर-दिल्ली येथे व दुसरा 18 ते 20 डिसेंबर पुणे-लातूरला. त्यातले काही अनुभव.

कानपूर प्रवास लगेचच असल्याने धाकधूक होती. 'येथे फारच रांगा असल्याने तुम्ही पैसे घेऊन या' अशी सहकाऱ्यांनी तंबी दिली होती. गाडीत चर्चा - 'मी पैसे कसे काढले?' सोन्याच्या दुकानातली गर्दी, नोटा बदलीचे भाव (30%-40%) इ.इ. पण विरुध्द कोणीच नाही. शेजारी पूर्ण रोख धंदावाला होता, पण तोही विरुध्द नव्हता. विक्रेते येत जात होते. एका हरहुन्नरी माणसाने जुन्या 500च्या नोटा घेत नेहमीच्या तिप्पट, चौपट धंदा केला होता.


कानपूरला लॉजवाला नेहमीचा होता. त्याने उरलेल सुट्टे द्यायचे कबूल केले होते. ''नोटा बदलायचा दर बाहेरच्यांना 500 व स्थानिकांना 300 आहे. तुम्ही माझ्या नावावर 4000 काढू शकता'' असेही सांगितले. जवळच फळ-भाजीबाजार होता. '100पर्यंत काही Problem नाही, भरपूर सुट्टे आहेत. फक्त हल्ली माल आणायला नोटांच्या पाकिटाऐवजी सुटया पैशांची पिशवी न्यावी लागते.' कानपूरच्या सहकाऱ्याने सांगितले की धोबी, वाणी, दारूची दुकाने इ. सर्वांनी 500/1000 रुपये घेऊन खाती उघडली आहेत. ATMला प्रचंड रांगा होत्या. अगदी खेडयांतही. फरीदाबादला दिल्ली-हरयाणा सीमा. एकाच दारूच्या दुकानात प्रचंड गर्दी होती, कारण तो Credit Card घेत होता. बाकी सर्व रिकामी. दिल्ली मेट्रो-रिक्षात 2000/-च्या सुट्टयाचे वाद होते. पण मुंबईत विमानतळ ते घर रिक्षाने 500/-ची नोट घेतली होती. Cards व 2000च्या नोटा होत्या. पुण्याच्या टोलवर 2000ची नोट दिल्यावर त्याने फुकट सोडले - सुट्टे नाहीत म्हणून. पुणे-सोलापूर रस्त्यावर चारपैकी दोन टोलवर Paytm स्वीकारले, तर उरलेल्या दोघांनी (जाता-येता दोन्ही वेळा) 2000चे सुट्टे 65/- च्या टोलवर काहीही न बोलता दिले. लातूरला ICICI-HDFCच्या ATMमध्ये पैसे होते. रांगा मुळीच नव्हत्या. SBIसमोर तीन-चार माणसे दिसली. या प्रवासात खूप सुट्टे जमले. ते मी ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना वाटलेही. (ठाण्यातल्या लोकपुरमधील मित्रानेही असेच अनुभव सांगितले. त्याने फेसबुकवर अनुभव लिहिले, तर लोक मोदी-भक्त म्हणून चिडवू लागले, म्हणून गप्प झाला.)

लातूरची एक गंमत-विषयांतर आहे तरीही सांगतो. कौतुकाने मांजरा नदीवरचे काम बघायला बाहेर पडतो. शहरात रिक्षांना (3-4 ठिकाणी), पानवाला, चौकात, सुशिक्षित वाटणाऱ्या, दुकानांत, नाश्ता-जेवण करताना कसे जायचे म्हणून चौकशी केली. सर्व साई पर्यटनचा रस्ता सांगत होते. शेवटी MIDCत कंपनीत जाताना विवेकानंद कॅन्सर व जलयुक्त शिवाराकडे फलक दिसला. त्या दिशेने गाडी हाकली. पुढे कुठेच फलक नाहीत. गावाबाहेर पानवाल्याकडे चौकशी केली. पूर्ण रस्ता सांगितला. माहितीही दिली. तरीही वाटेत थांबून चहा, भाजी, रिक्षावाले, चकाटया पिटणारे लोक, 16-18 वर्षांचे तरुण यांना मुद्दाम विचारत गेलो. प्रत्येकाने छान माहिती सांगत रस्ता दाखवला. त्यातल्या तिघांनी काका कुकडेंचे काम म्हणूनही सांगितले. धरणाच्या जागेतून जलाशय पाहिला. खूप छान वाटले. मनही भरून आले. लोकसहभागातून इतके प्रचंड काम कदाचित प्रथमच झाले असावे. कुठेतरी जलाशयाजवळ फलक असावा, निदान कामाची नोंद असावी असे वाटले. ज्या शहराला फायदा होतो, तेथे अनभिज्ञता.. तर गावात सर्वांना माहिती? गंमत वाटली. असो!!

या सगळयात बँक कर्मचारी, त्यांचे कष्ट यावर खूप बातम्या होत्या. बँकानी जास्त काउंटर उघडले का? टोकन देऊन वा इतर तऱ्हेने कामाची वाटणी, Planning केले का? माहीत नाही. MIDCत काही महत्त्वाचे पैसे भरायचे होते. DD हवा होता. एका आठवडयानंतर यायला सांगितले. शेवटी सहकारी बँकेतून दिला. एकाच बँकेतला चेक महाराष्ट्र बँकेने स्वीकारून लगेच Transfer करायला नकार दिला. शेवटी तक्रार करू म्हटल्यावर पास केला होता. अजूनही AXIS, ICICI, HDFC खात्यांचे चेक SBIमधून लवकर पास होत नाहीत.
व्यवसायावर परिणाम? नक्कीच झालाय. बाहेरगावचे मजूर (मुख्यतः उत्तरेकडचे) न आल्याने काही कंपन्या बंद आहेत. 'लाइनमध्ये 300/400 मिळतात दिवसाला, तिथे कशाला येऊ?' रोखीतल्या कंपन्या बंद आहेत. भिवंडी, तिरुपूर, कानपूर, सुरत, अहमदाबाद, मोरवी, लुधियाना या ठिकाणी जास्त प्रश्न आहेत. कापड, चर्म, सिरॅमिक, हिरे, चांदी-सोने थंड आहेत. हे कायमचे बंद होतील? शक्य नाही, सर्व कायदेशीर करायला त्यांनाही वेळ हवाय. जेव्हा अर्थव्यवस्थेत हा व्यवहार येईल तेव्हा फरक पडेलच ना?

दिल्लीत 70 वर्षांचा म्हातारा भेटला. छोटासा स्टेशनरीचा व्यवसाय. टेंपोतून दुकानात सामान उतरत होते. Bill Copy दाखवत म्हणाला. ''आयुष्यात पहिल्यांदा VAT लावून नीट Bill आलंय नि चेकने पेमेंट मागितलंय; सचमुच देश बदल रहा है।'' शेजारचा वाणी, फोटोग्राफर Credit Card घेऊ लागलेत. भाजीवाले Paytm वापरतायत. घरची कामवाली, दूध, पेपर, गाडी धुणारा चेक घेतायत. बदल नक्की घडतोय. पण हा देश खूप खूप प्रचंड आहे, गरिबी-अज्ञान खूप आहे. सर्वत्र बँका आहेत. पण Logistic Data? कुठे रक्कम जास्त पोहोचलीय, कुठे पोहोचायचीय.... सर्वच गोष्टी सर्वांच्याच सोयीच्या होणार नाहीत. त्रास होणारच, पण सुधारायची इच्छा दिसतेय. वेळ हवाय, तो द्यायला हवा.

मोदीभक्त वा मोदीद्वेष्टे काहीही म्हणोत, हा बदल मात्र निश्चितच आहे. चांगला आहे.

9869263056

mrudulad@yahoo.com

 

Powered By Sangraha 9.0