आरक्षण आणि संघ

27 Jan 2017 18:34:00

काही दिवसापूर्वी जयपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमातील वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावत रा. स्वं.संघाला आरोपीच्या पिजऱ्यात उभे करण्यात आले. आरक्षणाबाबत संघाचे धोरण स्पष्ट आहे. आणि त्यानुसार संघ कामही करत आहे. पण संघाची भूमिका समजून न घेता केवळ समाजात विद्वेष पसरवण्याचया उद्देशाने बऱ्याच वेळा काही मंडळी काम करत असतात. त्यांची प्रचिती जयपूर च्या घटनेने दिली आहे.

ब्द हे भावभावना प्रकट करण्याचे माध्यम असतात. शब्दाच्या उच्चारातून त्यामागे दडलेल्या भावभावनांचे प्रकटीकरण होत असले, तरी वाक्यातील शब्दाच्या जागा बदलून किंवा नको त्या ठिकाणी वाक्य तोडून किंवा जोडून अर्थाचा अनर्थ सहज करता येऊ शकतो. समाजजीवनावर प्रभाव टाकणारा, जगण्याशी जोडलेला विषय असेल, तर अशा तोडण्या-जोडण्याचा हमखास परिणाम दिसून येतो. अगदी ताजे उदाहरण द्यायचे, तर जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये रा.स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांचे वक्तव्य. आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर मनमोहन वैद्य बोलले. या वक्तव्यातून त्यांनी आरक्षणाबाबतची संघाची भूमिका मांडली. पण जेव्हा प्रसारमाध्यमातून या वक्तव्याची बातमी झाली, तेव्हा त्यातून गंभीर स्वरूपाची सामाजिक तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. जयपूरच्या या कार्यक्रमात मनमोहन वैद्य काय बोलले? आणि माध्यमांनी काय छापले? या दोन गोष्टींचा विचार केला तर असे लक्षात येते की समाजात जे जे प्रभाव निर्माण करणारे विषय आहेत, ज्यांच्या साहाय्याने समाजस्वास्थ्य बिघडवून उद्रेक निर्माण होऊ शकतो, असे विषय कशा प्रकारे हाताळावेत याचाच आता पुन्हा नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आरक्षणासारखा विषय हाताळताना तर याबाबत नक्कीच काळजी घ्यायला हवी.
'आरक्षण' या विषयाशी देशातील बहुसंख्य लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. 'आरक्षण' हा आत्मोध्दाराचा एक मार्ग आहे. आरक्षणातून नव्या समाजजीवनाची आणि सामाजिक सन्मानाची, समतेची प्रस्तावना होऊ शकते, अशी घटनाकारांची उदात्त भावना होती. असा समतायुक्त समाज निर्माण करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. दुर्दैव हे की, आज आपला समाज समतायुक्त जीवनाची अनुभूती घेऊ शकत नाही. तशी परिस्थिती आजही आपण निर्माण करू शकलो नाही. त्यामुळे आरक्षण हा विषय आजच्या काळात खूप महत्त्वाचा आणि संवेदनशील होऊन बसला आहे. आरक्षण हा आमचा घटनादत्त अधिकार आहे असा मानणारा एक वर्ग तयार झाला आहे, तर घटनेमध्ये आरक्षणांची तरतूद कोणाला आणि कशामुळे करण्यात आली हे मुळात समजून न घेता आरक्षणाला विरोध करणारा एक वर्गही तयार झाला आहे. अशा परिस्थितीमुळे सातत्याने आरक्षणाचा विषय चर्चेचा करून समाजजीवनात सातत्याने वाद-विवाद होत असतात. त्यामुळे त्यांचे समाजजीवनावर परिणाम होऊन वेगवेगळया प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असतात. आरक्षणाच्या समर्थनार्थ जसे व्यासपीठीय वाद-विवाद होतात, वैचारिक युध्दे लढली जातात, तशीच रस्त्यावर उतरून हिंसक कृतीही केली जाते. या दोन्ही गोष्टी इतक्या टोकाला जातात की, आरक्षणाबाबत त्रयस्थ असणारा, सहानुभूती बाळगणारा गटही अस्वस्थ होतो. किंवा तो आरक्षणाबाबत काहीही बोलू लागतो. परिणामी 'आरक्षण' या विषयाला सकारात्मक चालना मिळण्याऐवजी नकारात्मक भाव अधिक बळकट होत जातात.
सर्वसाधारणपणे 'आरक्षण' आणि 'संघ' यांना एकमेकांच्या विरोधात उभे करून समाजात तेढ निर्माण करण्याचा काही मंडळींचा प्रयत्न असतो. मनमोहन वैद्य यांच्या वक्तव्याचा अशाच प्रकारे उपयोग केला गेला. गेल्या वर्षी बिहार निवडणुकीच्या आधी मा. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्याही वक्तव्याचा विपर्यास करून संघ हा आरक्षणविरोधी आहे असा ढोल वाजवला गेला. प्रत्यक्षात मोहनजी भागवत काय बोलले? त्यांचे संदर्भ काय होते? याबाबत सर्वसामान्य जनतेला सांगण्याऐवजी त्यांच्या एका वाक्याचा चुकीचा अर्थ लावून बातम्या चालवल्या गेल्या. दूरचित्रवाणीवरून चर्चा घडवल्या गेल्या आणि देशभर संघ हा दलितविरोधी आहे, त्याला आरक्षण मान्य नाही, घटना मान्य नाही, म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरही मान्य नाही, संघाचा समतेवर विश्वास नाही अशा प्रकारचा गदारोळ करण्यात आला. वास्तव आणि स्वप्नरंजन यांच्यात जितके अंतर असते, तितकेच अंतर अशा प्रकारच्या विखारी प्रचारात आणि प्रत्यक्ष संघविचाराच्या कृतीत आहे. संघ आरक्षणाचे शंभर टक्के समर्थन करतो; एवढेच नव्हे, तर आरक्षणांची अंमलबजावणी व्हावी यासाठी पुढाकार घेतो. संघविचारविश्वातील सहकारी संस्था, आस्थापना यांचा कुणी अभ्यास केला तर ही गोष्ट सहज लक्षात येईल. संघ आरक्षण म्हणजे समानतेची, समतेची संधी मानतो आणि जास्तीत जास्त प्रकरणात ही संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी म्हटले आहे की ''If untouchability is not wrong, nothing in the world is wrong.'' अस्पृश्यता वाईट नसेल तर मग जगात काहीच वाईट नाही. तेव्हा अस्पृश्यता वाईट आहे आणि ती समूळ नाहीशी झाली पाहिजे यासंबंधी दुमत असण्याचे कारणच नाही. सर्व लोकांनी त्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत बोलताना बाळासाहेबांनी हे उद्गार काढले आहेत. अस्पृश्यतेचा समूळ नाश झाला पाहिजे असे आग्रहाने सांगताना आरक्षणाबाबत ते म्हणतात, ''आपले जे दलित बंधू आहेत, त्यांना करुणा नको आहे, त्यांना बरोबरीचे स्थान पाहिजे आहे. आणि ते बरोबरीचे स्थान त्यांना आपल्या पुरुषार्थाने मिळवायचे आहे. असे असल्याने ते त्या दृष्टीने विचार करतात हे मला माहीत आहे. आतापर्यंत ते मागे राहिले असल्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या सवलती देणे आवश्यक आहे. त्या सवलती त्यांनी घ्याव्याही. त्या सवलती मागण्याचा त्यांचा हक्क आहे आणि त्या सवलती किती काळ चालू ठेवायच्या हाही त्यांचाच प्रश्न आहे. ते त्यांनीच ठरवायचे आहे. पण सरतेशेवटी सर्व घटकांच्या बरोबरीने त्यांना राहायचे आहे आणि त्यांना सिध्द करायचे आहे. हे त्यांच्याही मनात आहे हे अनेकांशी बोलणे होत असल्यामुळे मला माहीत आहे. तेव्हा हे कसे करायचे, योग्य काळ कोणता होईल हे त्यांनीच ठरवायचे आहे. पण शेवटी तो दिवस आला पाहिजे की जेव्हा आपण सगळे समान आहोत आणि योग्यतेच्या दृष्टीने समान आहोत, हे या समाजामध्ये प्रस्थापित होईल.''


आरक्षणाबाबत संघाची इतकी स्पष्ट भूमिका आहे आणि या भूमिकेचा अंगीकार स्वयंसेवकांच्या व्यवहारातून होताना दिसतो. स्वयंसेवक वैयक्तिक, सामाजिक पातळीवर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतो. आवश्यक तेथे पूरक वातावरण तयार करतो. समाजाचा एक गट दुर्बळ, वंचित राहून समग्र समाजाचा विकास शक्य नाही आणि घटनाकारांना अपेक्षित असणारी सामाजिक समताही अस्तित्वात येणार नाही यावर संघाचा विश्वास आहे आणि म्हणून एकरस, बलशाली समाजाच्या निर्मितीसाठी आणि सामाजिक उत्थनासाठी संघ आरक्षणाचे समर्थन करतो आणि ते प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्नही करतो. पू. बाळासाहेब देवरसांनी केलेले दिशादर्शन आणि त्यानंतर संघविचारविश्वातील संघटनांनी त्यांची केलेली अंमलबजावणी, संघाने आरक्षणाबाबत केलेले विविध ठराव पाहिले की यांची साक्ष पटते. पण संघ हा आरक्षणविरोधी आहे असा पूर्वग्रह अनेकांच्या मनात आहे. संघाला आरक्षण संपवायचे आहे, संघाला राज्यघटना नको आहे असा खोटा प्रचार करणाऱ्यांना संघाची आरक्षणविषयक भूमिका कशी समजून सांगायची हा आजचा प्रश्न आहे आणि यामध्ये संघ कार्यकर्ते कमी पडतात का, याचाही शोध घेणे आवश्यक आहे. संघाची भूमिका इतकी स्पष्ट असताना त्यावर टीका का होते? याचा विचार व्हायला हवा.

बऱ्याच वेळा आरक्षणासारख्या विषयावर केलेले भाष्य हा चर्चेचा विषय ठरते. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात आरक्षणाविषयी काही भाष्य केले, तर त्याची देशपातळीवर चर्चा होत असते. आणि सर्वात महत्त्वाचा वाटा असतो आपल्या माध्यमांचा. वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या यांच्या माध्यमातून अशा विषयावर चर्चा सुरू होतात. जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये मनमोहन वैद्य यांच्या मुलाखतीशिवाय अनेक विषय झाले, पण त्याविषयी माध्यमांत चर्चा झालेली नाही. त्याचप्रमाणे मनमोहन वैद्य यांचे माध्यमातून पुढे आलेले वक्तव्य चुकीचे आहे, असे या फेस्टिव्हलमध्ये उपस्थित असणाऱ्या अनेकांनी टि्वटरद्वारे सांगितले. पण माध्यमांनी आपल्या चुकीच्या बातमीबद्दल, चुकीच्या प्रसारणाबद्दल साधा खेदही व्यक्त केलेला नाही. मनमोहन वैद्य यांच्या वक्तव्याचा तुकडयातुकडयांत वापर करून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि पुन्हा एकदा संघाला आरक्षणविरोधी ठरवत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले.

खरे तर प्रसारमाध्यमे ही नीरक्षीरविवेक करणारी असावीत अशी अपेक्षा असते. आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते. प्रजासत्ताकाला म्हणजेच लोकशाहीला सबळ करून दिशादर्शन करण्याची जबाबदारी माध्यमांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे माध्यमांनी निरपेक्ष वृत्तीने काम करायला हवे, अशी अपेक्षा असते. पण आज तसे वास्तव आहे का? माध्यमे निरपेक्ष राहिली आहेत का? या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असेच आहे. माध्यमांनी कोणत्याही एका गटाची, विचाराची, राजकीय पक्षांची तळी उचलणे हे प्रजासत्ताकाच्या दृष्टीने धोक्याचे आहे. सिलेक्टिव्ह आणि टारगेटेड अशा वृत्तींचा प्रादुर्भाव माध्यमांना झाला आहे. जयपूरमध्ये जे घडले नाही, बोलले गेले नाही, ते माध्यमांतून प्रकाशित झाले. याला कारण अंध संघविरोध. संघाचा विरोध करण्यासाठी, संघाचा विचार खोडून काढण्यासाठी माध्यमांनी अवलंबलेला हा मार्ग स्वीकारार्ह नाही. उलट तो माध्यम जगताच्या गौरवशाली इतिहासाला काळिमा फासणारा प्रकार आहे. समाजस्वास्थ्याला हानिकारक आहे. त्यांच्यावर सडेतोडपणे टीका केलीच पाहिजे. पण जे घडलेच नाही, घडण्याची शक्यताही नाही अशा गोष्टी प्रकाशित, प्रसारित करून  समाजात दुही माजवण्याचे काम माध्यमांनी करू नये. जयपूर येथील वक्तव्याचा विपर्यास केल्यानंतर मनमोहन वैद्य यांनी प्रसिध्दीपत्रक काढले. परिणामी माध्यमातील चर्चा थांबली. पण तोपर्यंत समाजमन ढवळून निघाले होते आणि त्यांचे पडसादही जाणवू लागले होते. माध्यमांनी आरक्षणासारख्या विषयाचे वार्तांकन करताना समाजहिताची भूमिका घ्यायला हवी, हे आदर्शवत वाक्य आहे. आज माध्यमांचे तसे वास्तव नाही. यातून प्रजासत्ताकाला, पर्यायाने लोकशाहीलाच धोका उत्पन्न होणार आहे.

प्रसारमाध्यामातून जरी हा विषय थांबलेला असला तरी माध्यमांनी तयार केलेली चुड हाती घेऊन समाजात आग लावण्याचा काही लोकांचा प्रयत्नअसतो. कारण तेच त्यांचे अस्तित्व असते.आपले अस्तित्व दाखवण्यासाठी जणु ते संधीची वाटच पहात असतात.जयपुर येथील मनमोहन वैद्य यांच्या वक्तव्यानंतर प्रकाशित झालेल्या बातम्याचा आधार घेऊन सामाजिक शांतता भंग करण्याचा काही ठिकाणी प्रयत्न झाला,संघाचा निषेध करण्याचा प्रयत्न झाला.तर काही मंडळीची आरक्षणासारखे विषय घेऊन त्या आधाराने संघावर गरळ ओकण्याचे काम सातत्याने करत असतात.त्यांचे तेच जिवित कार्य असते.अशा मेडळीनी कधी संघ आणि संघ विचार समजू न घेण्याचा प्रयत्न केलेला असत का? हे तथाकथित ठेकेदार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात आणि समता,बंधुता यांनाच हरताळ फासतात.आरक्षणाच्या नावाने राजकारण करुन ,समाजात फुट पाडून आपले पोट भरणाऱ्या मंडळीनी कधी तरी संघ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.

आरक्षणासारखा विषय हाताळताना खूप काळजी घ्यायला हवी. विशेषतः संघ आणि संघपरिवारातील कार्यकर्त्यांनी तर नक्कीच याचा विचार करायला हवा. आपल्या वाक्याचा, शब्दाचा विपरीत अर्थ काढला जाऊ शकतो, हे लक्षात घेऊन सावधपणे सार्वजनिक ठिकाणी बोलायला हवे. आपली धारणा, विचार स्पष्ट आहेत. आपण केवळ विचाराने नव्हे, तर कृतीने आपण आरक्षणाचे समर्पण करत असतो. तेव्हा माध्यमांसमोर त्यांचे प्रकटीकरण व्हायला हवे. माध्यमे त्यांच्या सोयीसाठी सनसनाटी निर्माण करण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकतात, हे लक्षात घेऊन आपली अभिव्यक्ती असली पाहिजे. कारण संघाच्या नावाने काहूर माजवून आपले स्वार्थ साधू पाहणारे अनेक जण आहेत. समाज अस्थिर करणे आणि स्वतःची तुंबडी भरणे हाच त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे आपण सावध राहणेच उत्तम ठरेल.

'आरक्षण आणि संघ' हा विषय मागील काही वर्षांपासून सातत्याने चर्चिला जातो आहे. पुढेही त्यावर घणाघाती चर्चा होत राहील. प्रश्न असा आहे की 'आरक्षण' हा चर्चेचा विषय नाही, तर तो अंमलबजावणीचा विषय आहे. स्वातंत्र्यानंतर आजवरचा अभ्यास केला, तर आरक्षणाच्या अंमलबजावणीची गती खूप क्षीण असल्याचे आपल्या लक्षात येते. त्यामुळे आरक्षणाच्या नावाने सामाजिक विद्वेष पसरविणाऱ्यांनी, गोंधळ घालणाऱ्यांनी या विषयावर लक्ष केंद्रित करायला हवे. कारण आरक्षणाचा अर्थ 'संधी' असून ती सामाजिक समतेची पूर्वअट आहे. सर्व समाज एका पातळीवर आणण्याचा आरक्षण हा एक मार्ग आहे. सर्वांना समान भावविश्वात आणि समान सन्मानाची अनुभूती देणारा हा मार्ग आहे. तो जास्तीत जास्त प्रशस्त करणे आणि समतायुक्त समाज उभा करणे ही काळाची गरज आहे. संघ त्या मार्गाने चालला आहे. माध्यमांनी काय करावे या प्रश्नाचे उत्तर मात्र शोधायला हवे!

9594961860

 

Powered By Sangraha 9.0