अनंत अमुचि ध्येयासक्ती

27 Sep 2016 14:47:00

पॅरालिम्पिकबाबत असलेली प्रसारमाध्यमांची उदासीनता रिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आली. रिओ ऑलिम्पिकला मिळालेली प्रसिध्दी पॅरालिम्पिकला काही मिळाली नाही. भारतात तर जिथे क्रिकेटच्या सामन्याच्या प्रक्षेपणासाठी कोटींचे व्यवहार होतात, तिथे कोणत्याही वृत्तवाहिनीने पॅरालिम्पिकचे प्रक्षेपण दाखविण्याची तसदी घेतली नाही. प्रसारमाध्यमांनी तर ज्यांना बक्षीस मिळाले त्यांच्या बातम्या काही मिनिटांतच आटोपत्या घेतल्या. कोणत्याही प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध नसतानादेखील या खेळाडूंनी मिळविलेले यश अभिमानास्पद आहे.


आजही पी.व्ही. सिंधूचा रिओमधील अंतिम फेरीचा सामना भारतीयांच्या लक्षात आहे. सव्वाशे कोटी भारतीय क्रिकेटऐवजी बॅडमिंटनचा सामना पाहत होतेच, त्याचबरोबर पी.व्ही. सिंधूच्या विजयासाठी प्रार्थनादेखील करत होते. रिओ ऑलिम्पिक 2016 संपले. त्यात विजेते ठरलेल्या आणि उत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंचा गौरव समारंभही पार पडला. भारताला एक रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवता आले. 110 खेळाडूंच्या संघाला केवळ दोन पदकांची कमाई करता आली. पी.व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताला रिओमध्ये खाते उघडता आले.

तब्बल 3 आठवडे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला म्हणावे तसे यश मिळाले नाही. काही खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून भारतासाठीची झुंज कायम ठेवली होती, पण त्यांना यशाला गवसणी काही घालता आली नाही. क्रिकेटच्या तुलनेत भारतातील इतर खेळांतील सोयी-सुविधांचे मागासलेपण पुन्हा एकदा समोर आले. रिओ ऑलिम्पिक 2016च्या क्रीडा सोहळयानंतर त्या ठिकाणीच पॅरालिम्पिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. ऑलिम्पिकनंतर जागतिक स्तरावर होणाऱ्या मोठया क्रीडा सोहळयापैकी एक सोहळा आहे. 5 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. अनेकांना तर पॅरालिम्पिक खेळ म्हणजे काय याचा शोधही भारताला पदक मिळाल्यावर लागला असेल. कोणत्याही गाजावाजा न करता या पॅरालिम्पिक खेळांना सुरुवात झाली.

पॅरालिम्पिक खेळ विशेषत: दिव्यांग असलेल्या खेळाडूंसाठी आहेत. शरीराचा काही भाग - म्हणजे पाय आणि हात यांच्यात अपंगत्व असलेल्या, तरीदेखील खेळात उत्तम असलेल्या खेळाडूंसाठी पॅरालिम्पिक खेळाचे आयोजन केले जाते. यातही अपंगत्व किती प्रमाणात आहे या निकषावरून खेळाडूंना विविध स्तरात विभागले जाते. पण केवळ शरीरानेच अपंगत्व असलेले हे खेळाडू. त्यांची जिद्द आणि क्षमता, कामगिरी, खिलाडू वृत्ती आणि खेळातील नैपुण्य वाखाणण्याजोगे होते. मानसिकदृष्टया आणि कोणत्याही मानसिक दबावाला बळी न पडता त्यांनी केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले. एखाद्या धडधाकट व्यक्तीलाही ज्या गोष्टी शक्य नाहीत, त्यात या खेळाडूंनी प्रावीण्य मिळविले. 176 देशांतील 4,350 खेळाडू पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होते. भारतातर्फे 19 खेळाडूंचा रिओ पॅरालिम्पिकमध्ये सहभाग होता. जी कामगिरी भारताला रिओ ऑलिम्पिकमध्ये बजावता आली नाही, त्याहीपेक्षा उत्तम कामगिरी भारताने पॅरालिम्पिक खेळाडूंनी बजावली. 19 जणांच्या चमूने 4 पदके मिळवून भारताला पॅरालिम्पिकमध्ये मानाचे स्थान मिळवून दिले. 

पॅरालिम्पिकचा इतिहास

1904 साली जर्मन वंशाचा अमेरिकन खेळाडू जॉर्ज इजिअर याने कृत्रिम पायाच्या आधारे ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर झालेल्या ऑलिम्पिक खेळांमध्येही शारीरिक अपंगत्व असलेले अनेक खेळाडू सहभागी झाले होते. पुढे दिव्यांग खेळाडूंची वाढती संख्या पाहता ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये काही दिवस दिव्यांग खेळाडूंसाठी राखीव ठेवण्यात आले. ऑलिम्पिकसोबतच या खेळांचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे 'पॅरलल टू ऑलिम्पिक गेम्स' म्हणून त्यांना 'पॅरालिम्पिक' असे नावे पडले. 1948 साली पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर खेळाचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या महायुध्दानंतर पॅरालिम्पिक स्पर्धेत बरेच महत्त्वाचे टप्पे आले. पॅराप्लेजिक - म्हणजे मणक्यांचा आजार असलेले खेळाडू मोठया प्रमाणात पॅरालिम्पिक खेळात सहभागी होत असत. कालांतराने शारीरिकदृष्टया अन्य अपंगत्व असलेल्या खेळाडूंना यात सहभागी करून घेण्यात आले. 1960 साली रोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक स्पर्धेत 23 देशांतील 400 खेळाडूंनी भाग घेतला होता. सामान्य खेळांडूप्रमाणेच दिव्यांग खेळाडूंसाठी अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करणे हे क्रांतिकारक पाऊल होते. शारीरिक अपंगत्व आलेल्या खेळाडूंना आपल्या खेळातील नैपुण्य दाखविण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने दिले. Spirit in Motion हे पॅरालिम्पिकचे ब्रीदवाक्य आहे.

ती सुवर्णउडी

मरियप्पन थांगावेलून हे पॅरालिम्पिकमधील गेल्या काही दिवसातील चर्चेतील नाव. पॅरालिम्पिक 2016च्या स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा हा खेळाडू. त्याची उंच उडी केवळ पदकासाठी नव्हतीच. कित्येक वर्षांची मेहनत आणि भारताच्या गौरवासाठी होती. सुवर्णपदक मिळविण्याचे ध्येय जणू त्याने मनाशी बाळगले होते. कोटयवधी लोकांनी ती सुवर्णउडी पाहिली आणि मरियप्पनच्या या उडीला सलाम केला. अवघ्या 21व्या वर्षी त्याने ही सुवर्ण कामगिरी बजावली. रिओच्या मैदानात पहिल्यांदा भारताचा ध्वज वर आल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता.

वयाच्या 5व्या वर्षी एका अपघातात मरियप्पनचा एक पाय निकामी झाला. त्याच्या घरची परिस्थिती अगदी जेमतेमच होती. घरात अठरा विशे दारिद्रय असतानाही मरियप्पनने कुठेही कच न खाता पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मरियप्पन हा शालेय स्तरावरील चांगला व्हॉलीबॉलपटू होता. त्याच्या खेळातील नैपुण्य, चपळता पाहता मरियप्पनचे आताचे प्रशिक्षक असलेल्या सत्यनारायण यांनी त्याच्यातील हे गुण हेरले. त्याला दिव्यांगांसाठी असलेल्या खेळात भाग घेण्यास प्रोत्साहन दिले. त्याला पुढच्या प्रशिक्षणासाठी बंगळुरूला नेण्यात आले. 14व्या वर्षापासून मरियप्पन वेगवेगळया स्तरावरील उंच उडीच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाला. रिओ पॅरालिम्पिक 2016मध्ये मरियप्पनने 1.89 मी. उडी मारून सुवर्णपदकाला गवसणी घातली.

मरियप्पन पाठोपाठच भारताची मान उंचविणारा खेळाडू म्हणजे वरुण सिंग बाठी. यानेही उंच उडी प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले. पॅरालिम्पिकच्या इतिहासात जसे भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले, त्याचप्रमाणे एकाच खेळात दोन पदके मिळविण्याचा पराक्रम भारतीय खेळाडूंनी केला.

पॅरालिम्पिकमध्ये दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले ते देवेंद्र झांझरिया याने. भालाफेक स्पर्धेत एफ 46 प्रकारात त्याला सुवर्णपदक मिळाले. 2004 साली देवेंद्रने पहिले सुवर्णपदक मिळविले होते. तब्बल 12 वर्षांची अथक मेहनत आणि कठोर परिश्रम याचे चीज झाले. देवेंद्रने स्वत:चाच विक्रम मोडून नवा विक्रम केला आहे. 'जेव्हा तुमच्यात इच्छाशक्ती असते तेव्हा कोणतीच गोष्ट अशक्य नसते' हे त्याचे बोल त्याच्यातील जिद्दीचे प्रतिबिंब आहेत.

मलिक नावाची किमया

रिओमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देण्याचा मान साक्षी  मलिकला मिळाला होता. दीपा मलिकने याच विजयाची पुनरावृत्ती केली. मलिक या नावातच जिंकण्याची आस आहे, हे पुन्हा एकदा दीपा मलिकने सिध्द केले. किती योगायोग आहे पाहा ना.. दीपा कर्माकर आणि साक्षी मलिक यांची रिओतील कामगिरी उत्तम होती. आणि याच नावाचे समीकरण असलेल्या दीपा मलिकने पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेक स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. भारताला पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवून देणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. 4.61 मीटर अंतरावर गोळा फेकून तिने या पदकावर आपले नाव कोरले. वयाच्या 46व्या वर्षी तिने हे पदक मिळविले. दीपा ही कर्नल (निवृत्त) बी.के. नागपाल यांची मुलगी आहे. त्यामुळे संकटांशी लढण्याचा गुण तिच्या रक्तातच आहे. एका शस्त्रक्रियेत तिच्या काही नसा दाबल्या गेल्या, यामध्ये तिच्या कमरेखालचा भाग निकामी झाल्याने दीपा यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला. पण 'हिम्मत-ए-मर्दा, तो मदद-ए-खुदा' या उक्तीप्रमाणे दीपाने खऱ्या अर्थाने आपले आयुष्य जगायला सुरवात केली. दीपा ही उत्तम बाईकर आहे. तिने हिमालयातल्या सगळयात कठीण मार्गांवर बाईक चालविण्याचा विक्रम केला होता. आतापर्यंत विविध साहसी खेळांत दीपाला तब्बल 19 पुरस्कार मिळाले आहेत. केवळ बाईकच नव्हे, तर मोटार स्पोर्ट्सच्या विविध रॅलीमध्येही ती सहभागी झाली होती. 2012 साली तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दीपाच्या पराक्रमांची नोंद लिम्का बुकने घेतली आहे.

प्रसारमाध्यमांची उदासीनता

पॅरालिम्पिकबाबत असलेली प्रसारमाध्यमांची उदासीनता रिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आली. रिओ ऑलिम्पिकला मिळालेली प्रसिध्दी पॅरालिम्पिकला काही मिळाली नाही. भारतात तर जिथे क्रिकेटच्या सामन्याच्या प्रक्षेपणासाठी कोटींचे व्यवहार होतात, तिथे कोणत्याही वृत्तवाहिनीने पॅरालिम्पिकचे प्रक्षेपण दाखविण्याची तसदीही घेतली नाही. प्रसारमाध्यमांनी तर ज्यांना बक्षीस मिळाले त्यांच्या बातम्या काही मिनिटांतच आटोपत्या घेतल्या. कोणत्याही प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध नसतानादेखील या खेळाडूंनी मिळविलेले यश अभिमानास्पद आहे. इतर खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधांच्या तुलनेत दिव्यांगांना मिळणाऱ्या सुविधा खूप अपुऱ्या आहेत. या खेळाडूंना लागणारे साहित्य, त्या खेळातील आधुनिक यंत्रणा याची मोठी तूट आहे. त्यात या खेळात सहभागी झालेले आर्थिकदृष्टया सबळ नाही. केवळ पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडूच नव्हे, तर दिव्यांगांचा क्रिकेट संघ व इतर खेळातील खेळाडू हे नेहमीच दुर्लक्षित राहिले आहेत. अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवूनही या खेळाडूंना सरकारदरबारी मदतीसाठी उभे राहावे लागते.

आज भारतात अनेक दिव्यांग खेळाडू आहेत. पण केवळ अपुरे आर्थिक पाठबळ आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे या खेळाडूंना पुढे येऊन काही करण्याची संधी मिळत नाही. काहींना तर सरकारी नोकरी देण्याची आश्वासनेही देण्यात आली, पण प्रत्यक्षात त्या नोकरीवर रुजू होण्यासाठी त्यांना सरकारी कार्यालयांमध्ये बरेच खेटे घालावे लागतात. सोयी-सुविधांपासून वंचित असतानाही या खेळाडूंनी आपापल्या खेळांमध्ये उत्तम यश मिळविले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवणाऱ्या खेळांडूचे कौतुक करण्याचे कष्ट कोणत्याही राजकीय पक्षांनी घेतले नाहीत. या खेळाडूंना कोणाच्याही सहानुभूतीची किंवा दयेची गरज नसते, तर फक्त कौतुकाची थाप हवी असते. हे  खेळाडू दिव्यांग आहेत, पण त्यांच्यात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द आहे.

कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय व प्रसिध्दीशिवाय या खेळाडूंनी चार पदकांची कमाई केली. त्यांची ध्येयेही खूप मोठी  आहेत. आपल्या अपंगत्वावर मात करून केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविले आहे. या खेळाडूंच्या यशाची दखल घेऊन सरकारतर्फे या खेळाडूंसाठीही काहीतरी उपाययोजना तयार करण्यात येतील, हीच अपेक्षा आहे.

 

मिशन टोकियो 2020

पढोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे बनोगे खराब असेच काहीसे आपल्या भारतीयांच्या बाबतीत होतेय. क्रिकेट सोडल्यास आपल्याला इतर खेळांविषयी आस्था नाहीच. त्यामुळे इतर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी व रिओ ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक 2016च्या पार्श्वभूमीवर भारतात खेळाची संस्कृती रुजविण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही योजना आखल्या आहेत.

*  प्रत्येक राज्यामध्ये खेळासाठी एक विद्यापीठ असेल.

*  शालेय जीवनात त्याचप्रमाणे महाविद्यालयात खेळासाठी तास असायचा. पण आता खेळ हा एक महत्त्वपूर्ण विषय म्हणून अभ्यासक्रमात समाविष्ट होईल.

*  खेळाडूंवर खर्चाचा विशेष भार पडू नये, यासाठी टोकियो ऑलिम्पिक 2020साठी विशेष निधी गोळा केला जाईल.

*  खेळांविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी वेगवेगळया खेळांची ओळख करून देणारे अनुबोधपट (डॉक्युमेंटरी) सरकारमार्फत तयार करण्यात येतील.

*    खेळाला प्रोत्साहन देण्याआधी उत्तम खेळाडूंचा शोध घेणे गरजेचे आहे. आणि त्याची सुरुवात ग्रामीण भागापासून करायला हवी.

8286650578

sshruti261191@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0