एक होऊ , नेक होऊ

24 Sep 2016 15:51:00

मराठवाडा आणि खान्देशातील बहुतेक सर्वच जिल्ह्यांत मराठा समाजाचे मूक मोर्चे प्रचंड मोठया प्रमाणात यशस्वी झाले आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणातही हेच लोण पसरू लागले आहे. मराठवाडयातील सर्वच मोर्चांनी आदर्श निर्माण केला आहे. समाजातील तळागाळातील घटकाच्या सक्रिय सहभागातून हे मोर्चे साकार झाले. कोणाच्याही नेतृत्वाशिवाय जिल्हा पातळीवर अशा प्रकारे समाज संघटित होतो आहे, ही समाजजीवनातील एक क्रांती आहे आणि या क्रांतीची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. आपल्या रास्त मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जमणाऱ्या या समूहाला हवे तरी काय? या प्रश्नाचे उत्तर आहे सहभाग आणि विकास. विकासाच्या प्रक्रियेपासून जर बहुसंख्य समाज दूर असेल, तर विकासाचे लक्ष्य गाठणे अशक्य आहे. या मराठा मूक मोर्चाने हे अधोरेखित केले आहे. आता यातून मार्ग कसा काढला जातो, यावर पुढील सामाजिक भवितव्य अवलंबून आहे.


मागच्या महिन्यापासून महाराष्ट्राचे सामाजिक व राजकीय जीवन ढवळून निघाले आहे. विषय आहे मराठा मोर्चांचा. लाखोंच्या संख्येने मराठा समाज मूक मोचर्े काढून आपल्या मनातील सल चव्हाटयावर मांडतो आहे. या मोर्चांची तुलना काही मंडळी जाट आंदोलनाशी, गुज्जर आंदोलनाशी आणि पटेल आंदोलनाशी करत आहेत. ही तुलना चुकीची आहे, कारण जाट, गुज्जर आणि पटेल आंदोलनातून जो सामाजिक संघर्ष आणि हिंसाचार निर्माण झाला, त्यापासून मराठा मूक मोर्चा कोसो दूर आहे. शिस्तबध्द आणि नियोजनपूर्ण आंदोलन कसे असावे, याचा आदर्श या मोर्चांनी उभा केला आहे. आपल्या मनात साचलेली वर्षानुवर्षांची खदखद अशा मूक मोर्चांतून व्यक्त करण्याचे काम मराठा समाजाने केले आहे. एका अर्थाने महाराष्ट्राच्या समाजजीवनाचा आधार असणाऱ्या आणि त्याला वळण देणाऱ्या या घटकाने आपले मन मोकळे केले आहे. मराठा समाजाचा मोर्चा सरकारविरुध्द नाही, तर तो व्यवस्थेविरुध्द आहे. त्याचप्रमाणे हे मोर्चे दलितांविरुध्दही नाहीत. काही लोक आपल्या गढया जपण्यासाठी मराठा मोर्चे हे दलितविरोधी आहेत, अशी आवई उठवत आहेत. खरे तर मराठा समाजाला स्वतःच्याच वर्तनाचा राग आला आहे. इतके दिवस आपण निद्रिस्त का राहिलो? विकासाचे भान आपल्या का आले नाही? आता या मोर्चातून मनातला राग व्यक्त होतोय, तोही संसदीय मार्गानेच. मराठा समाजाने आता स्वच्छ मनाने आणि स्पष्ट दिशेने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला हरकत नाही. मराठा समाजाने आपल्या मागण्या मांडताना कोणत्या गोष्टीवर भर दिला? या प्रश्नाचे उत्तर आहे - आरक्षण. जिल्ह्याजिल्ह्यात मराठा मूक मोर्चे चालू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची सूचना केली, ही आनंदाचीही बाब आहे. न्यायालयीन लढाईचा एक मार्ग यामुळे खुला झाला आहे. त्याचप्रमाणे मराठा मूक मोर्चाबाबत आपले मत व्यक्त करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे सर्व प्रश्न गंभीरपणे विचारात घेऊन त्यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे व संबंधितांशी चर्चा करून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली आहे. आता जबाबदारी मराठा समाजातील नेतृत्वाची आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संवादाचा पूल बांधण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मराठा समाजाच्या मूक मोर्चातून जे जे विषय पुढे येत आहेत, त्यांचा निपटारा कशा प्रकारे करता येईल याचा सर्वांनी विचार करण्याची ही वेळ आहे. त्यासाठी शासन आणि समाजनेतृत्व या दोघांनीही एक एक पाऊल पुढे येण्याची आवश्यकता आहे.  आरक्षणाबाबत सहानुभूतीने विचार करू असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कायद्याच्या कसोटीवर मराठा आरक्षण टिकेल अशी तयारी करून शासनाने न्यायालयात गेले पाहिजे आणि या विषयाला पूर्णविराम मिळाला पाहिजे.

विकासाचा मार्ग

न्यायालयात शासन कशा प्रकारे मराठा आरक्षणाचा विषय मांडते आणि त्यावर न्यायालय कशा प्रकारे निर्णय देते, यावर मराठा आरक्षणाचे भवितव्य अवलंबून असले, तरी आणि आता मराठा समाजाला आरक्षण मिळण्यांची शक्यता निर्माण झाली असली, तरी केवळ आरक्षणातून मराठा समाजाचा सर्वार्थाने विकास होईल काय? मराठा समाजाची लोकसंख्या आणि गरिबीचे प्रमाण लक्षात घेता मिळणारे आरक्षणही अपुरे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा पार्श्वभूमीवर विकासाचे अन्य मार्ग नजरेआड करून जमणार नाही. मराठा मूक मोर्चातून समाजवास्तव पुढे येत आहे आणि ते पुरेसे बोलके आहे. गावगाडयात राबणाऱ्या शेतकरी-शेतमजुरांचे जीवन हलाखीचे आहेच, त्याचबरोबर अज्ञानाच्या आणि अंधरूढींच्या विळख्याने तो बांधला गेला आहे. आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान इत्यादी गोष्टींपासून दूर असणारा हा समाजघटक केवळ आणि केवळ आरक्षणाने उभारी घेईल आणि विकासाच्या मार्गाने चालेल असे मानणे चूक ठरेल. त्यामुळे वंचित, उपेक्षित असणाऱ्या मराठा समाजाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आरक्षणाबरोबरच अन्य मार्गांचा तातडीने स्वीकार व्हायला हवा. कोणते आहेत ते मार्ग? मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत, ते गरिबीशी जोडलेले आहेत. म्हणजे अर्थकारणाशी जोडलेले आहेत. त्यामुळे आरक्षणाबरोबरच आर्थिक सबलीकरणासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील. 1995 साली महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले, तेव्हा सत्तेवर आलेल्या भाजपा-सेना युतीने मराठा समाजाच्या आर्थिक विकासाचा एक छोटा मार्ग उपलब्ध करून दिला होता. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या रूपाने. पण पुढे नवे सरकार आले आणि हे महामंडळ अडगळीत पडले. शासनाने युध्दपातळीवर या महामंडळाची पुनर्उभारणी केली पाहिजे आणि त्याचे बजेट करताना महाराष्ट्रातील मराठा समाजाचे दैन्य लक्षात घ्यायला हवे. कारण हे दैन्य जितक्या लवकर दूर होईल, तितक्या लवकर महाराष्ट्राचे भले होईल. विकास हा केवळ आरक्षणाच्या किंवा आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून साध्य होणार नाही, तर शेतीपूरक ज्ञानाच्या आणि साधनसुविधांच्या उपलब्धतेतून होणार आहे. आजही सर्वसामान्य शेतकऱ्याला आपल्या शेतातील मातीच्या परीक्षणासाठी कृषी विद्यापीठांवर अवलंबून राहावे लागत असेल, तर कोणत्या भरवशावर शेती आणि शेतकऱ्याची नवी पिढी उभी करायची? आज सर्वक्षेत्रीय बदल लक्षात घेऊन मराठा युवकांच्या हाताला काम आणि घामाला दाम कसे मिळेल याचा विचार केला पाहिजे. अशा योजना करताना 'सब घोडे बारा टक्के' असे न करता महाराष्ट्राचा विभागशः विचार करावा लागणार आहे. महाराष्ट्रातील मराठयांच्या प्रदेशनिहाय समस्या वेगवेगळया आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्याच्या बांधावर सरकारच्या योजना कशा पोहोचतील याचा विचार सरकारने करायला हवा, तर कमीत श्रमात जास्तीत जास्त उत्पादन कशातून मिळेल अशा शेतीचा अंगीकार मराठा समाजाने करायला हवा. आधुनिक तंत्रज्ञान गावागावापर्यंत कसे पोहोचेल, समाजविकासासाठी त्याचा कशा प्रकारे उपयोग करता येईल, याचा विचार करायला हवा.

विकास हा केवळ सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून होत नसतो. समाजही आपल्या अंगभूत गुणाचा विकास करून विकासाच्या मार्गाने जाऊ शकतो. पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, वीज, पाणी, शिक्षण इत्यादी गोष्टी शासनाने केल्या पाहिजेत. पण व्यक्तिगत विकासासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यासाठी 'एक मराठा, नेक मराठा' झाले पाहिजे. सध्या चालू असलेल्या मोर्चांतून मराठा समाज एक होत असल्याची प्रचिती येत आहे. पण ही प्रचिती समाजाचा स्थायिभाव व्हायला हवा. समाजांतर्गत असणारी उच्चनीचतेची भावना लयाला जायला हवी. तरच एकत्वाची प्रचिती येईल. मराठा समाजाचा मूक मोर्चा हा सकल मराठा समाजाचे दर्शन घडवतो. पण हे मराठा समाजाच्या एकत्वाचे दर्शन आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण समान वेदना, समान दुःख यातून मराठा समाज एकत्र आला आहे. ही सहवेदना संवेदना व्हायला हवी. मराठा समाजात जे जे म्हणून वाईट असेल, ते लयास जाऊन नवा जागृत समाज उभा राहायला हवा. विकासाकडे जाण्याची एक पूर्वअट आहे. समान पत, समान मत आणि समान दिशा असेल, तरच विकासाचे स्वप्न साध्य होणार आहे.        

एकता हीच शक्ती

गेली साठ वर्षे सत्तेची ऊब चाखणाऱ्या मराठयांना कशासाठी हवे आरक्षण? सहकार चळवळ ज्यांच्या घरी पाणी भरते, त्यांना कसली आली गरिबी? सारे शिक्षणसम्राट याच समाजाचे, तरी मग हे मागास कसे? हे असे आणि असे असंख्य प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. असे प्रश्न विचारणाऱ्यांना एक तर मराठा समाजाबाबतची पूर्ण माहिती नसते किंवा केवळ राजकीय दृष्टीकोनातून अशा प्रश्नाच्या फैरी झाडल्या जात आहेत. कोणताही नवा विचार, नवी कृती केली जात असताना अशा प्रकारचे प्रश्न नेहमीच विचारले जातात, मराठा समाजालाही ते विचारले जात आहेत. या प्रश्नांना मराठा समाजाने उत्तरे देण्याची आवश्यकता नाही, कारण बांधावर बसून नांगर कसा हाकावा हे सांगणारे खूप भेटतात. मराठा समाजाला आपल्या वाटेतील अशा प्रश्नाची ढेकळे फोडूनच पुढे जावे लागणार आहे आणि अशी ढेकळे फोडण्याचे आयुध आहे आंतरिक एकता. काही मूठभर सत्ताधीश, सहकारसम्राट, शिक्षणसम्राट म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही, याची नोंद घेण्यास मराठा मूक मोर्चाने भाग पाडले आहेच. त्याचप्रमाणे केवळ मतपेढीसाठी जातीची गणिते मांडणारे मराठा नेतेही आमचे नाहीत, हे या मोर्चांनी दाखवून दिले आहे. मोर्चांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन यशाचे माप आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तथाकथित स्वयंभू नेत्यांना त्यांची योग्य जागा दाखवून देण्याचे कामही मराठा समाजाने केले आहे. हे मराठा समाजाच्या एकतेमुळे शक्य झाले आहे. एकता हीच शक्ती आहे याची जाणीव सध्या मराठा मूक मोर्चांतून वृध्दिंगत होत आहे. समाज एकत्र येत आहे आणि शांतपणे आपल्या समूहशक्तीची प्रचिती देत आहे. लाखोंच्या संख्येने होणाऱ्या या मोर्चामुळे कुठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उत्पन्न झालेला नाही की कुठेही वाहतुकीची कोंडी झाल्याची बातमी प्रकाशित झाली नाही. हे कशामुळे शक्य झाले? यामागे मराठा समाजाची एकता उभी आहे. मराठा समाजबांधवांना भूक आहे विकासाची, समतेची आणि सन्मानाची. ही भूक भागवण्यासाठी एकतेची आवश्यकता होती. ती एकता अनुभवास येत आहे. आता या एकतेला गलिच्छ राजकारण्यांपासून दूर ठेवण्याची जबाबदारी मराठा समाजाच्या खांद्यावर आलेली आहे. मोर्चांना मिळणारे यश पाहता अनेक जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे श्रेय घेण्यासाठी पुढे आले आहेत. त्यांचे उद्देश केवळ आणि केवळ राजकीय स्वरूपाचे आहेत. त्यांना तर दूर ठेवलेच पाहिजे, त्याचबरोबर जे या एकतेत फूट पाडून आपली वेगळी चूल मांडू पाहत आहेत, त्यांनाही वेळीच आवर घालावा लागणार आहे. 18 सप्टेंबरला अशाच घरभेद्यांची एक बैठक पुण्यात झाली. 'समतावादी' अशी बिरुदावली लावून मिरवणाऱ्या अनेक स्वयंघोषित अखिल भारतीय संघटना या बैठकीत होत्या. संभाजी बिग्रेड व बीआरएसपी यांचा त्यात पुढाकार होता. समतावादी मुस्लीम, ओबीसी, बीसी संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मंडळींचा मराठा आरक्षणाशी काय संबंध? जिल्ह्याजिल्ह्यात सकल मराठा समाज मूक मोर्चांचे आयोजन होत असताना ही वेगळी चूल कशासाठी? मराठयांच्या होऊ घातलेल्या एकजुटीत फूट पाडण्याचा हा डाव नाही ना? कारण गेली पंधरा-वीस वर्षे मराठा सेवा संघाची, संभाजी बिग्रेडची मंडळी, मराठा समाजाचे स्वयंघोषित नेते आणि तारणहार म्हणून मिरवत होते आणि विकासाचा, उन्नतीचा कोणताही विषय न करता केवळ भावनिक आवाहन करून समाजात विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता सकल मराठा एक होत असताना अशा स्वयंघोषितांची गच्छंती निश्चित आहे, हे लक्षात आल्याने असे उद्योग चालू नाहीत ना, हे मराठा समाजाने तपासून घेण्याची गरज आहे. अशा भुरटया लोकांपासून समाजाला वाचवले पाहिजे. मूक मोर्चाच्या निमित्ताने निर्माण झालेली ही एकता अखंडित कशी ठेवता येईल, याचा आता विचार करायला हवा. स्वतःचे क्षुद्र स्वार्थ साधण्यासाठी समाजात फूट पाडू पाहणाऱ्यांना वेळीच आवर घातला पाहिजे.


जागृती कायम राहो

मराठा समाजाला नक्की काय हवे? असा प्रश्न या निमित्ताने अनेक जण विचारत आहेत. या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्यायचे तर एवढेच म्हणता येईल की तळागाळातील मराठा समाजाची विकासाची भूक भागवायची आहे. काही मोजकीच तालेवार घराणी हिमालयाच्या उंचीची झाली म्हणजे संपूर्ण मराठा समाज उन्नत झाला असे नाही. जे परिस्थितीमुळे आणि स्थानिक राजकारणामुळे विकासाच्या परिकक्षेत आले नाहीत, तेच आज मैदानात उतरले आहेत. आतले दुःख, दैन्य चव्हाटयावर मांडत आहेत. ही जागृतीची लाट आहे. या जागृतीतून मराठा समाज राजकारणापेक्षा समाजकारणात आणि अर्थकारणात आपले स्थान निश्चित करू इच्छित आहे. मराठा समाज मूक मोर्चातून आपल्या जागृतीचे दर्शन घडवतानाच त्याची विकासाची भूकही व्यक्त करत आहे. आपल्या गरजा मांडणे आणि त्यासाठी संघटितपणे शांततेचा आग्रह धरत रस्त्यावर उतरणे गैर नाही. मराठा समाज आपल्या मागण्या घेऊन  रस्त्यावर उतरला आहे. हे करत असताना तो कुणाला टीकेचे लक्ष्य करत नाही. तो व्यवस्था बदलण्याचा आग्रह धरतो आहे. विकासाच्या संधी त्याच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत, त्या मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे आणि समाज जागृत झाल्यामुळे ही मागणी पुढे आली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

या सर्व आंदोलनातून समाजाची एकजूट दिसून येत आहे. मोर्चाच्या आयोजनात आधुनिक व्यवस्थापनाची मदत घेतली जात आहे, त्याचप्रमाणे सोशल मीडियासारखे मुक्त माध्यमही वापरले जात आहे. संपर्क, नियोजन, संवाद यासाठी या माध्यमाचा खूप चांगला उपयोग होत असतानाच काही ठिकाणी मात्र आततायी प्रकार होताना दिसत आहेत. याला वेळीच आवर घालायला हवा. कारण समाजात तेढ निर्माण करणारे, जातीय विद्वेष पसरवून सामाजिक जीवन प्रदूषित करणारे आणि मराठा मूक मोर्चाच्या उद्देशालाच हरताळ फासणारे संदेश काही उत्साही समाजबांधव प्रसारित करत असतात. आपल्या या कृतीचा काय परिणाम होतो, याची त्यांना कदाचित जाणीव नसावी. आपल्या ध्येयाकडे जाताना आपल्या कृतीचा कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम हाती घेतलेल्या कामांवर होणार नाही, याची दक्षता सर्वच समाजबांधवांनी घ्यायला हवी. मराठा समाजाचे हे मोर्चे कोणाच्या विरोधात नाहीत, याची प्रचिती देणारा सर्वस्तरीय अनुभव या निमित्ताने देण्याची जबाबदारी संपूर्ण मराठा समाजाची आहे.

छत्रपतींचा भगवा खांद्यावर घेऊन मराठा समाज आज मैदानात उतरला आहे. त्यामागे व्यापक जागृती आहे. ही जागृती केवळ आंदोलनापुरती मर्यादित राहता कामा नये. या जागृतीतून 'एक होऊ - नेक होऊ' ही मनोभूमिका तयार व्हायला हवी. तात्कालिक कारणासाठी भावनिक आंदोलने होत असतात, मात्र मराठा समाजाचे आंदोलन तसे नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आपणास विकासाच्या मार्गाने जायचे आहे, तर मग आपली वैगुण्ये त्यागली पाहिजेत. मराठा समाजात अनेक छोटीमोठी वैगुण्ये आहेत. त्यांची इथे चर्चा करण्याची आवश्यकता नाही. पण आपले आपणच आत्मपरीक्षण करून स्वतःला काळानुरूप बदलायला हवे. जोपर्यंत प्रत्येक समाजबांधव असा निर्धार करत नाही, तोपर्यंत मराठा समाजात बदल होणे शक्य नाही. अशा बदलाची प्रक्रिया ही दीर्घकालीन आणि धीम्या गतीने होणारी असते. म्हणून कायम जागृत राहणे आवश्यक आहे. मराठा समाज मूक मोर्चांतून जी विधायक ऊर्जा प्राप्त झालेली आहे, त्या ऊर्जेचा उपयोग सारे भेद संपवण्यासाठी आणि मने स्वच्छ करण्यासाठी केला पाहिजे. कारण विकासाच्या वाटेने जाताना मराठा समाजाला मागचा भूतकाळ विसरावा लागेल आणि भविष्याचा वेध घ्यावा लागणार आहे.


पवारसाहेब, राज्यसभेत मराठा आरक्षणासाठी खाजगी विधेयक आणा.

''मराठा समाजाचा उद्रेक वेळीच समजून घेतला नाही, तर तो सरकारला भारी पडेल'' अशा आशयाचे उद्गार शरद पवार यांनी नुकतेच काढले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे ते आग्रहाने बोलले होते. याआधी शरद पवारांनी तळागाळातील मराठा बांधवासाठी काय केले, हे आपण विसरून जाऊ या. आता उच्च न्यायालयातही पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबत नव्याने चर्चा होणार आहे. न्यायालयीन लढाईबरोबरच संसदीय लढाईतूनही मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकतो. त्यामुळे मराठयाचे भले करण्याची एक संधी शरद पवारांकडे आहे. पवारांनी त्या संधीचा फायदा घ्यावा, असा आपण आग्रह करावा का? शरद पवार राज्यसभेत खासदार आहेत. त्यांनी खाजगी विधेयक आणून मराठा आरक्षणाबाबत संसदेत चर्चा घडवून आणावी. पवारांनी असे खाजगी विधेयक आणले, तर मराहाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार त्यांच्या पाठीशी नक्की उभे राहतील. तेव्हा पवारांनी राज्यसभेत मराठा आरक्षणासाठी खाजगी
विधेयक आणावेच.

 

सामाजिक एकतेला बाधा नको

 मराठा मूक मोर्चा हा कोणत्याही समाजाच्या विरुध्द नाही, दलितांविरुध्दही नाही हे याआधीच स्पष्ट केले गेले आहे. मराठा मोर्चाविरुध्द प्रतिमोर्चे काढू नका, अशी भूमिका ऍड. प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे. त्याबाबत त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. रामदास आठवले यांनी दलित-मराठा ऐक्य परिषदेचे आयोजन करण्याचेही घोषित केले आहे. अशा प्रयत्नामुळे महाराष्ट्राचे समाजजीवन आणि सामाजिक एकता अभेद्य राहण्यास मदत झाली आहे. मराठा समाज मोर्चातून ऍट्रॉसिटी ऍक्टमध्ये बदल करावा अशी मागणी सुरुवातीला झाली होती. मुळात या कायद्याच्या वापराबाबत काही मंडळींचा अक्षेप आहे आणि तो समन्वयाने, संवादाने दूर होऊ शकतो. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांनी याच भूमिकेतून प्रतिमोर्चे काढू नका असे आवाहन केले होते. कारण अशा प्रतिमोर्चांतून समाजस्वास्थ बिघडू शकते. पण काही विघ्नसंतोषी मंडळी या एकतेत बाधा आणू पाहत आहेत आणि तापल्या तव्यावर आपल्या अस्तित्वाची पोळी भाजून घेत आहेत. अशा कृतीतून समाजात उभी फूट पडणार नाही, याची सर्वांनीच काळजी घ्यायला हवी.

 

9594961860

 

Powered By Sangraha 9.0