परदेशी नागरिकांबरोबर राहताना, वावरताना कोणते वागणे शिष्टसंमत नाही हेही माहीत असायला हवे. परदेशी व्यक्तीशी लग्न करताना आपल्या व जोडीदाराच्या देशांचे विवाहविषयक कायदे, मुलांचे हक्क, पालकत्वाबद्दलचे कायदे, घटस्फोट, संपत्ती याबद्दलचे कायदे तर माहीत हवेतच, त्याशिवाय ज्या देशात आपण राहतो आहोत, तिथलेही कायदे माहीत हवेत. दुर्दैवाने अशी वेळ आल्यास अवचित पकडले जाण्याचा धोका टाळता येईल. एक काळ असा होता की मुलीला परदेशस्थ भारतीय नवरा मिळाला की तिच्या व आपल्याही जन्माचे सार्थक झाले असे वाटायचे.
आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सगळेच लोक जणू एका वैश्विक खेडयात राहत आहेत. शिक्षण आणि नोकरी-रोजगार ही देशाटनाची मुख्य कारणे, आणि तिसरे म्हणजे परदेशस्थ मुलांशी लग्न करून स्थलांतरित होणाऱ्या मुली. स्थलांतरण होण्याची सुरुवात झाली ब्रिटिश राजवटीच्या काळात. एकतर देशाटनासाठी आवश्यक वाहतुकीच्या सोयी त्यांनी आणल्या आणि ब्रिटिश वसाहतीमध्ये मजूर म्हणून भारतीय आणि उपखंडातील लोकांची भ्रमंती सुरू झाली. जागतिक महायुध्दामध्ये सैनिक म्हणून अनेक लोक गेले, लढले आणि मेलेही. वाचले, त्यातले काही तिथे स्थायिक झाले.
आजघडीला अन्य देशांत वास्तव्य करणाऱ्या, स्थलांतरित झालेल्या संख्येमध्ये भारत अव्वल स्थानावर आहे. सुमारे तीन कोटी लोक आज परदेशात वास्तव्य करून आहेत. ते भारताच्या आणि त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थेत भरही टाकत आहेत. उच्च शिक्षणासाठी किवा नोकरीसाठी परदेशात गेलेल्या, आर्थिकदृष्टया सक्षम व त्या त्या देशाच्या सामाजिक, राजकीय पटलावरही ठसा उमटवणाऱ्या या 'Indian Dispora'चा उदंड उत्साह आपण पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्याच्या वेळी अनुभवला.
भारतीय स्थलांतरित केवळ अमेरिका, युरोप यासारख्या पुढारलेल्या देशातच आहेत असे नव्हे, तर संयुक्त अरब अमिरातीसारख्या श्रीमंत देशात आणि येमेन, लिबियासारख्या देशातही आहेत. प्रमाण कमी-जास्त. या परदेशस्थ भारतीयांबद्दलच्या बातम्या अधूनमधून येतात. काही सुखावणाऱ्या, काही अभिमान वाटाव्या अशा; काही वांशिक भेदभावाच्या, तर काही धोक्याचे इशारे देणाऱ्या. अशीच एक बातमी पूर्वी पटेलची.
पूर्वी पटेल ही अमेरिकेतल्या इंडियानामध्ये राहणारी भारतीय-अमेरिकन नागरिक युवती. जुलै 2013मध्ये तिने गर्भपाताच्या प्रयत्नात अपुऱ्या दिवसांच्या बाळाला जन्म दिला, बाळ पिशवीत घालून कचऱ्याच्या पेटीत टाकून दिले आणि न थांबलेल्या रक्तस्रावावर इलाज करायला ती हॉस्पिटलमध्ये भरती झाली. नको असलेले मातृत्व संपवण्यासाठी तिने गर्भपात घडवून आणणारी औषधे स्वत:च घेतली, अशी कबुलीही दिली. इंडियानाच्या कायद्यांतर्गत तिच्यावर भ्रूणहत्या आणि बाळाकडे दुर्लक्ष करणे या दोन कलमांतर्गत खटला चालवला गेला. एवढेच नव्हे, तर न्यायाधीशांनी तिला तीस वषर्े कारावासाची शिक्षाही दिली. त्यातली दहा वर्षांची शिक्षा कमीही केली गेली. 2015मध्ये तिला अटक झाली, तुरुंगात टाकले गेले. तिने केलेल्या अपिलावर सुनावणी होऊन आता तिला मुक्त करण्याचे आदेश दिले गेले आहेत. यावरही दोन्ही बाजूंना सर्वोच्च न्यायालयात अपील करता येईल. तिथेही पूर्वीचा युक्तिवाद ग्राह्य धरल्यास तिची अंतिमत: सुटका होईल.
एखाद्या विदेशी नागरिकाने स्थानिक नियमांना तोडून वर्तन केल्यास, देशविघातक कृत्य केल्यास, गुन्हा केल्यास शिक्षा होणे स्वाभाविकच. यात आतंकवाद, दहशतवाद, माहितीची चोरी, खून, दरोडा, सायबर गुन्हे, ड्रग्ज बाळगणे अशा देशविघातक कृत्यांचा - गुन्ह्यांचा समावेश करता येईल. पण वैवाहिक - घटस्फोटाचे कायदे, संपत्ती, मुलांची कस्टडी, ऍबॉर्शन अशा कारणांसाठी होणाऱ्या शिक्षांचा वेगळा विचार करावा लागेल आणि तो लागतोही. कायदा बनण्याची प्रक्रिया आणि न्याय प्रक्रिया यांच्यावर संबंधित व्यक्तींच्या ज्ञानाचा, आकलनाचा, अनुभवांचा, कौटुंबिक-सामाजिक-धार्मिक संस्कारांचा प्रभाव पडलेला असतो. आणि या देशाटनामुळे जगातल्या विविध धारणा व धार्मिक श्रध्दा असलेल्या व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा काही ताणतणाव, मतभिन्नता तर निर्माण होतातच, त्याचबरोबर कायद्याचे प्रश्नही निर्माण होतात. स्थलांतर करताना या कोनाचा विचारही करायला हवा.
पूर्वी पटेलने केले ते योग्य/अयोग्य याची चर्चा-विचार न्यायालयाने केला आहे. त्यावर टिप्पणी करणे योग्य नाही. मात्र समाजमाध्यमांमध्ये चर्चा झाली ती या प्रश्नांची. अमेरिकेसारख्या देशात वेगवेळया राज्यांचे कायदे वेगवेगळे आहेत. गर्भपातासारख्या गुन्ह्याला 30 वर्षे कारावास ही शिक्षा योग्य आहे का? महिलेच्या सर्जनअधिकारांवर हे अतिक्रमण आहे का? पूर्वीचा गर्भपात हा तेविसाव्या-चोविसाव्या आठवडयात केलेला होता. पण अवांछित मातृत्व नाकारायचा अधिकार स्त्रीला आहे की नाही? गर्भपाताचा कायदा आणि भ्रूणहत्या नाकारणारे किवा भ्रूणाचे संरक्षण अधिकार कायदे परस्परविरोधी आहेत का? भ्रूणाचे अधिकार संरक्षित करताना गर्भवती महिलेच्या अधिकारांना डावलले जाते का? एखादी महिला डॉक्टरांशी गर्भधारणा किवा गर्भपात याबद्दल विश्वासाने बोलते, सांगते, डॉक्टर ते पोलिसांना सांगतात, यात गोपनीयतेचा भंग होत नाही का?
पूर्वी पटेलला दिलेली तीस वर्षांची कारावासाची शिक्षा ही गुन्ह्यापेक्षा फार जास्त आहे, हाही मोठा चर्चेचा विषय झाला. त्या विरोधात आणि त्या निमित्ताने स्त्रियांच्या मातृत्व अधिकारांची, तिच्या शरीरावरील अधिकाराची चर्चा झाली. काही वर्षांपूर्वी आयर्लंडमधल्या एका हॉस्पिटलने सविता हलप्पनवार या महिलेचा गर्भपात करण्यास नकार दिला आणि अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. त्या वेळीही स्त्री, तिचे प्रजनन व मातृत्व अधिकार आणि गर्भपाताचे कायदे, यावर चर्चा होऊन त्या देशाला गर्भपाताचा कायदा करावा लागला. धार्मिक श्रध्दा, समजुती प्रबळ ठरून अधिकारांची कशी पायमल्ली होते, याचे ते उदाहरण होते.
या निमित्ताने कायदे, त्यांची भाषा, त्या अंतर्गत झालेले निवाडे, देशी व विदेशी नागरिकांवर त्याचा परिणाम समान होतो का - होईल का, अशा मंथनाची गरज आहे. केवळ कौटुंबिक नव्हे, तर अनेक कायदे बहुसंख्याकांच्या बाजूने, स्त्री-पुरुष यांच्यावर वेगळे परिणाम करणारे, आर्थिक दुर्बल, स्थलांतरित यांच्यावर वेगळे परिणाम करणारे असू शकतात याचे भानही आपल्याला ठेवायला हवे. न्यायव्यवस्थेने कायदे काळानुरूप व कालसुसंगत ठेवण्यासाठी त्यांचे पुनर्निरीक्षण करायला हवे.
परदेशात शिक्षणासाठी वा नोकरीसाठी जाताना स्थानिक कायद्यांची माहिती, अभ्यास करायला हवा. या निमित्ताने सामाजिक घुसळण इतकी होते आहे की मित्र-मैत्रिणी, सहाध्यायी, प्राध्यापक-शिक्षक, घरमालक, एका घरात शेअरिंग करून राहणारे, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे, भारतीय किंवा परदेशी-परधर्मीय जोडीदार स्वीकारणारे, मुलांना पाळणाघरात ठेवणारे, शेजारी, सहप्रवासी, ऑॅफिसातले सहकारी अशा अनेक नात्यांनी एकमेकांबरोबर व्यवहार करावा लागतो. जसा कायदे करणाऱ्यावर, त्यांच्या विचार पध्दतीवर धर्म-संस्कृतीचा पगडा असतो, तसा नागरिकांच्याही. उदा. 'दोन धपाटे घातल्याशिवाय अक्कल येत नाही' अशा भारतीय मानसिकतेत लहानाचे मोठे झालेल्या आपल्याला असे दोन धपाटे घालणे म्हणजे 'चाईल्ड ऍब्यूझ' आहे हे माहीत असायलाच हवे.
परदेशी नागरिकाबरोबर राहताना, वावरताना कोणते वागणे शिष्टसंमत नाही हेही माहीत असायला हवे. परदेशी व्यक्तीशी लग्न करताना आपल्या व जोडीदाराच्या देशांचे विवाहविषयक कायदे, मुलांचे हक्क, पालकत्वाबद्दलचे कायदे, घटस्फोट, संपत्ती याबद्दलचे कायदे तर माहीत हवेतच, त्याशिवाय ज्या देशात आपण राहतो आहोत तिथलेही कायदे माहीत हवेत. दुर्दैवाने अशी वेळ आल्यास अवचित पकडले जाण्याचा धोका टाळता येईल. एक काळ असा होता की मुलीला परदेशस्थ भारतीय नवरा मिळाला की तिच्या व आपल्याही जन्माचे सार्थक झाले असे वाटायचे. जेव्हा विपरीत अनुभव सांगोवांगी कानावर यायला लागले, अमेरिकेतही भारतीय मुला-मुलींसाठी विवाह मार्गदर्शन केंद्र सुरू करावे लागले, तेव्हा पालकांचे डोळे उघडले. पूर्वी घराणे पाहून विवाह व्हायचे, कारण या घराण्यातला मुलगा किंवा मुलगी चांगलीच असणार किंवा विशिष्ट विचारपध्दतीची असणार असा विश्वास. आता या सामाजिक घुसळणीमुळे त्यात वेगळेपणा असण्याची शक्यता खूपच जास्त असते. लग्न भारतात असो की परदेशात, घराण्याइतकीच व्यक्तीचीही विचार व आचार पध्दत समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. परदेशात नोकरीसाठी किंवा लग्न करून जातानाही आपल्या पासपोर्ट, बँक खाते, भारतीय दूतावासाचा पत्ता व संपर्क क़्रमांक, परिचितांचे पत्ते, परकीय चलनविषयक बाबींची माहिती व त्याविषयक कायदे यांची किमान माहिती असली पाहिजे. अमुक एका मुलीचा पासपोर्ट काढून घेतला आणि बायको म्हणून नेलेल्या मुलीला घरकामाला ठेवले, स्वत: मैत्रिणीबरोबर राहतो वगैरे कहाण्या अतिरंजित वाटल्या, तरी शक्यता नाकारता येत नाहीत. म्हणून आपले स्वत्व जपण्यासाठी या कागदपत्रांचा आधारही लागतो, हे माहीत असायला हवे.
भारतीय मुलगा अनेक वषर्े अमेरिकेत राहणारा. लग्न भारतीय मुलीशी झाले. परदेशस्थ मुलांची होतात तशीच - आधी पत्रिका वगैरे जमवून, आईवडिलांनी शॉर्टलिस्ट करून ठेवलेल्या मुली पाहिल्या व एका भेटीत लग्न ठरले. पुढच्या भारतभेटीत लग्न झालेही. 'चट मंगनी, पट ब्याह'चा नमुना. काही कारणाने दोघांचे बिनसले. मुलीने अमेरिकेत घटस्फोटासाठी अर्ज केला आणि तिथल्या कायद्यानुसार त्याला वर्षानुवषर्े किंवा आख्खी हयात पोटगी म्हणून अर्धा पगार द्यावा लागतो. अशा उदाहरणाच्या आधारे परदेशी जाणाऱ्या मुला-मुलींचे कायदेविषयक समुपदेशन व्हायला हवे. ती काळाची गरज आहे.
9821319835
nayanas63@gmail.com