बलुचिस्तान विरुध्द पाकिस्तान

17 Sep 2016 14:29:00

बलुचिस्तानात आज तांब्याच्या खाणी मिळाल्या आहेत. सोने, लाइमस्टोन, गंधक यांच्या खाणी उजेडात येत आहेत. त्यामुळे हे सर्व विदेशी कंपन्यांना शोधायला सांगून त्याचा वाटा त्यांना देण्यापेक्षा तो आम्हाला द्या, अशी या प्रदेशाची आणि ब्रह्मदाग बुग्ती यांची मागणी आहे. ग्वादार बंदराचा विकास करण्यासाठी चिनी तंत्रज्ञान घेणारे, चीनला त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊ देत आहेत हे त्यांना न रुचणारे आहे. 7 हजार चिनी कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यायला 15 हजार पाकिस्तानी सैन्य तैनात केले जाणार, ही तर पैशाची उधळपट्टी आहे असे त्यांना वाटते. त्यातूनच बलुचिस्तान विरुध्द पाकिस्तान असे चित्र उभे राहिले आहे. हा संघर्ष किती वाढतो, त्याबरोबरच अफगाणिस्तानमध्ये कुणाकडे सत्तेचे केंद्र झुकते आणि अमेरिकेची तिथून संपूर्ण माघार कधी होते यावरच पुढल्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत.


लुचिस्तानमध्ये पाकिस्तानने चालवलेल्या कारस्थानी कारवायांना आता अधिक उग्र स्वरूप आले आहे. पाकिस्तानी सैनिकांकरवी रोज कोठे ना कोठे बलुच निष्पापांची कत्तल चालते. आतापर्यंत वीस हजारांवर बलुच व्यक्तींचा ठावठिकाणा सापडलेला नाही. पाच हजार जणांना गेल्या काही वर्षांत पाकिस्तानी सैनिकांनी ठार केले आहे. बलुचिस्तानात रात्री-अपरात्री अनेकांना घरातून उचलून नेण्यात येते आणि त्यांचे पुढे काय होते ते कळायला मार्ग नसतो. अगदी काल-परवा नसिराबाद आणि डेरा बुग्ती या दोन ठिकाणच्या लष्करी कारवायांमध्ये 22 जणांना ठार करण्यात आले. त्यात लहान मुले आणि स्त्रिया यांचा समावेश आहे. पाकिस्तान हा देश आतापर्यंत दहशतवाद्यांचे नंदनवन म्हणून समजला जात होता, तो आता 'दहशतवादाचा कारखाना' बनला आहे. तेच दहशतवाद्यांना तयार करतात आणि काश्मीरच्या सरहद्दीवर, अफगाणिस्तानात किंवा बलुचिस्तानमध्ये त्यांचे स्थलांतर करून मोकळे होतात. अफगाणिस्तानातून आलेल्या तालिबान्यांना बलुचिस्तानात आश्रय देण्यात येत असतो. तोही हेतुपुरस्सर आहे. त्यांना बलुच जनतेच्या विरोधात कारवाया करण्यासाठी मोकळे सोडण्यात येते. त्यामुळे क्वेट्टा असो की डेरा बुग्ती, ते येतात आणि निष्पाप जनतेला मारून मोकळे होतात, क्वचित ते माघारी जातात. तरीही पाकिस्तान चोराचा उलटा शंखनाद करतच असतो. काश्मीरमधल्या भारतीय 'अत्याचारां'च्या आणि 'मानवाधिकाराच्या हनना'बद्दलच्या कथा जगाला ऐकवण्यासाठी पाकिस्तानने आता नॅशनल असेंब्लीच्या 22 सदस्यांचे पथक तयार केले असून त्यास जगातल्या प्रमुख देशांकडे पाठवायची तयारी केली आहे. पाकिस्तानच्या या खोटारडेपणाला वाचा फोडणारी अशी एक घटना म्हणजे न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला आरंभ होत असताना त्यासमोरच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची हाक देणाऱ्यांनी अलीकडेच निदर्शने केली. तशी ती जगभरात अन्यत्रही चालू आहेत. ही निदर्शने होऊ नयेत, यासाठी पाकिस्तानने सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले, पण ते व्यर्थ गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी बोलताना बलुचिस्तान, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर यांचा केवळ 72 सेकंदांचा उल्लेख केला, तर तो पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. हा उल्लेखही त्यांनी पाकिस्तानी राजकारण्यांसारखा केलेला नव्हता. या भागातल्या जनतेने आपले आभार मानले आहेत, एवढेच ते म्हणाले. हे आभार का आणि कशासाठी, हेही त्यांनी सांगितले नाही. त्यावरून पाकिस्तानने 'तरी आम्ही म्हणत नव्हतो की, भारत बलुचिस्तानात दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला आहे म्हणून...' यासारखा आक्रस्ताळेपणा केला. बलुचिस्तानात भारताने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आजवर केलेला नाही, तो करायची गरजही नाही. क्वेट्टा हे बलुचिस्तानच्या राजधानीचे शहर आहे. मात्र तिथेही पंजाबी आणि पठाण यांना आणून वसवण्यात येते. हे सगळे लष्करी छावणीच्या मार्गदर्शनाखाली घडवले जात असते. तिथली लोकसंख्या 20 लाख ते 25 लाख या घरात आहे. बलुचिस्तानची कोणतीही सरहद्द भारताला लागून नाही. ती अफगाणिस्तान आणि इराण या देशांना चिकटून आहे. बलुचिस्तानची लोकसंख्या 1 कोटी 31 लाख 65 हजारांच्या घरात आहे. पाकिस्तानचे क्षेत्रफळ 8 लाख 84  हजार 413 चौरस किलोमीटर आहे, तर बलुचिस्तानचे क्षेत्रफळ 3 लाख 47 हजार 190 चौरस किलोमीटर आहे. म्हणजेच पाकिस्तान बलुचिस्तानच्या सुमारे अडीचपट आहे. बलुचिस्तान वगळता इतर भागात सिंध, पंजाब, खैबर पख्तुनख्वा हे प्रांत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीरला आपलाच एक भाग असल्याचे त्या देशाने मानलेले असले, तरी तांत्रिकदृष्टया तो त्या देशात नाही, पण तिथे नियंत्रण पाकिस्तानचेच आहे. गिलगिट-बाल्टिस्तान हा भाग पाकिस्तानात असला, तरी तोही स्वायत्त 'नॉर्दर्न एरिया' म्हणून ओळखला जातो. या प्रांतात वीस हजार फुटांहून अधिक उंचीची पन्नास शिखरे आहेत. जगातले दुसऱ्या क्रमांकाचे के-2 शिखरही याच भागात आहे आणि तिथे भारतीय गिर्यारोहकांना कधीच जाता येत नाही. हा भागही पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचा अनेकांचा समज आहे. पण 72 हजार 981 चौरस किलोमीटरचा हा प्रदेश महाराजा हरिसिंहांनी 1935मध्ये ब्रिटिशांना लीजने दिला होता. त्यावर महाराजांनी आपले स्काऊट प्रतिनिधी निरीक्षक म्हणून नेमले होते. फाळणी होणार हे 1946च्या सुमारास जेव्हा त्यांना कळून चुकले, तेव्हा त्यांनी उठाव केला आणि आपला हा प्रदेश पाकिस्तानला जोडण्यात येत असल्याचे जाहीर केले. पाकिस्तानने काश्मीरचा लचका तोडण्यापूर्वी त्यांना हा प्रदेश मिळाला होता, किंबहुना त्यातूनच त्यांनी उरलेला काश्मीर मिळवायचा डाव टाकला. सध्या हा प्रदेश नॉर्दर्न एरिया म्हणून न ओळखला जाता तो एक स्वायत्त प्रदेश म्हणून परिचित आहे. त्यावर पाकिस्तान सरकारनियुक्त गव्हर्नर आहे. तिथे नामधारी मुख्यमंत्रीही आहे. स्कर्डू ही या प्रदेशाची राजधानी आहे.


11 ऑॅगस्ट हा दिवस बलुचिस्तानचा स्वातंत्र्यदिन मानला जातो. त्या दिवशी क्वेट्टा असो वा बलुचिस्तानमध्ये असलेले कोणतेही लहानमोठे गाव, तिथे या दिवशी पाकिस्तानी लष्कर मोठया प्रमाणात शस्त्रास्त्रांसह फ्लॅग मार्च करते. ही ब्रिटिशांची परंपरा आहे असे सांगितले जाते, पण तसे नाही. कोणत्याही परिस्थितीत कुठेही बलुचिस्तानचा स्वतंत्र ध्वज फडकवण्यात येऊ नये, यासाठी हे धमकावणारे संचलन असते. पाकिस्तानी राष्ट्रध्वज एका जीपवर लावून त्यासह संचलन करण्यात येते. फर्टियर कोअर हे त्या संचलनात अग्रभागी असते आणि कुठेही बलुचिस्तानचा ध्वज दिसला तर तो टरकावून टाकण्यासाठी हे सैनिक जीव खाऊन पुढे येत असतात. स्वातंत्र्यवादी कुणीही पुढे येणार नाही, अशी ही व्यवस्था आहे. 11 ऑॅगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांनी बलुचिस्तानला स्वातंत्र्य दिले, पण पुढे मार्च 1948 मध्ये पाकिस्तानने ते हिरावून घेतले.

2001नंतर अफगाणिस्तानचा प्रश्न निर्माण झाला आणि बलुचिस्तानमध्ये अफगाण तालिबानांनी शिरकाव केला. 2002मध्ये अफगाणिस्तानात असलेली राजवट उधळली गेल्यावर त्यांचा नेता मुल्ला उमर बलुचिस्तानातच आश्रयाला आला. अफगाण तालिबान हे अर्थातच प्रामुख्याने पठाणच होते. आज बलुचिस्तानात 40 टक्के लोकसंख्या पठाणांचीच आहे. खुद्द क्वेट्टा शहरातही तीच स्थिती आहे. अफगाणिस्तानमध्ये शिरलेल्या अमेरिकेला विरोध करण्यासाठी क्वेट्टा शूराच्या नावाखाली एकत्र आलेले अफगाण तालिबान सध्या बलुचिस्तानमध्ये तळ टाकून आहेत, असे अमेरिकन गुप्तचरांचे म्हणणे आहे. पाकिस्तानच्या 'इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स' या लष्करी गुप्तचर संस्थेचा क्वेट्टा शूराला पाठिंबा आहे. अफगाण तालिबानांनी पाकिस्तानच्या  लष्कराशीच एक करार करून टाकलेला आहे की, ते बलुचिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारचा धुमाकूळ घालणार नाहीत आणि बलुच पठाणांमध्ये सरकारविरोधी बंडखोरी होऊ देणार नाहीत, मात्र या बदल्यात त्यांना त्रास होऊ दिला जाता कामा नये. अफगाण तालिबान खैबर पख्तुनख्वामध्ये हत्याकांडांचा अतिरेक करण्यात अग्रेसर राहिले, पण त्यांनी बलुचिस्तानात काही घातपात केलेला नाही. अफगाण तालिबान्यांना सिंधमध्ये - विशेषत: कराचीमध्ये मुहाजिरांच्या विरोधात लढवण्यात येत असते. मुहाजिरांमध्ये अलीकडे पडलेली फूट हे त्याचेच द्योतक आहे. तिथल्या ख्रिश्चन समाजाच्या विरोधातही या तालिबानांच्या कारवाया चालतात. त्यांनी ल्यारी या कराचीमधल्या कायमच दहशतीच्या छायेत असलेल्या भागात हिंसाचार माजवला आहे. तिथे ते पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात कायमच आक्रमक असतात. या बदल्यात त्यांना शेजारच्या बलुचिस्तानमध्ये सुरक्षित सहवास मिळतो. बलुचिस्तानातल्या पठाणांना आपल्या जवळ बाळगणे हे सरकारी यंत्रणेला आणि लष्कराला अधिक महत्त्वाचे वाटत असते. पाकिस्तानी पत्रकार या तालिबानांशी कधीही, केव्हाही मुलाखतीच्या मिषाने भेटू शकतो, पण बाहेरच्या पत्रकारांना तशी भेट मिळू शकत नाही. केवळ अमेरिकेच्या वाढत्या दडपणामुळेच बलुचिस्तानच्या उत्तरेस असलेल्या पठाणबहुल भागात क्वेट्टा शूराचे स्थलांतर झाले आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेचे सैन्य आहे, तोपर्यंत हे अफगाण तालिबान 'फटा' भागात, म्हणजेच 'फेडरली ऍडमिनिस्टर्ड ट्रायबल एरिया'मध्ये लपून राहतील. अफगाणिस्तानात आणि बलुचिस्तानात त्यांची जा-ये चालूच असते. पेशावरच्या शाळेवर आणि अन्यत्र 'तेहरिक ए तालिबान पाकिस्तान' या दहशतवादी संघटनेने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने त्यांच्या विरोधात 'झर्ब ए अज्ब' ही मोहीम हाती घेतली. त्या वेळी अफगाण तालिबानांना दुसरीकडे आश्रय घेऊ दिला. इस्लामिक मूव्हमेंट ऑॅफ उझ्बेकिस्तान, ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट, लष्कर ए झंगवी, अल काईदा, जुंदाल्लाह यांच्या विरोधात लष्कराने कारवाई केली, पण हक्कानी नेटवर्कला हात लावला नाही. या अशा वेचक कारवाईमुळे अमेरिकाही पाकिस्तानवर वैतागलेलीच आहे.

क्वेट्टयाच्या न्यायालयाच्या आवारात अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे भारताची 'रॉ' ही गुप्तचर संघटना असल्याचा कांगावा पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने केला, पण ते तोंडघशी पडले. मानवी बाँबच्या साह्याने आपण हा हल्ला घडवून आणला, असा 'इस्लामिक स्टेट' आणि 'तेहरिक ए तालिबान पाकिस्तान' या दोन्ही संघटनांनी दावा केल्यामुळे पाकिस्तान सरकारचा खोटारडेपणा उघड झाला. अशा तऱ्हेने पाकिस्तानात शहरी भागात मुसंडी मारण्यापर्यंत इस्लामिक स्टेटची मजल गेली असेल, तर त्याचा पाकिस्तानलाच नव्हे, तर भारतीय उपखंडालाही धोका आहे हे उघड आहे. इस्लामिक स्टेटच्या खुरासनाची ही तयारी आहे. पाकिस्तान जोपर्यंत चांगले तालिबान आणि वाईट तालिबान, किंवा चांगले दहशतवादी आणि वाईट दहशतवादी अशा दुहेरी चश्म्यातून पाहायचे सोडून देत नाही, तोपर्यंत पाकिस्तानला असलेला धोका संपणारा नाही. बलुचिस्तानला लागून सिंधची सीमा आहे. सिंधी जनतेतही मूळचे बलुच आदिवासी बरेच आहेत. ते तसे पंजाब्यांमध्येही आहेत. ते सगळे मुस्लीम संतांची परंपरा मानणारे आहेत. ते दर्ग्यांमध्ये जातात आणि त्यांच्यापैकी बहुतेकांचा सुफीवादावरही विश्वास आहे. हे जे बलुच आदिवासी आहेत, त्यांच्यापर्यंत मुख्य प्रवाहातला एकही राजकीय पक्ष पोहोचलेला नाही. तालिबानही त्यांना बदलून टाकू शकलेले नाहीत, 


किंबहुना असेही म्हणता येईल की इस्लामकडे पाहायच्या त्यांच्या पध्दतींना या आक्रस्ताळया तालिबानी विचारांच्या आणि भडक माथ्याच्या मंडळींकडून खो घालता आलेला नाही. काही बलुच टोळीवाल्यांमध्ये शिया सिपाह ए साहबा किंवा शिया हजरा यांच्याबद्दल राग आहे, त्यातूनच अलीकडे त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत, पण तरीही खरा बलुच त्यापासून दूर आहे. म्हणूनच आताच्या या बलुचिस्तानच्या जनतेविषयी आत्मीयतेने बोलणारे त्यांचे नेते - बलुचिस्तान रिपब्लिकन पार्टीचे नेते ब्रह्मदाग बुग्ती यांनी ''आपण आणि आपला बलुच समाज धर्मनिरपेक्षता मानतो'' असे सांगून पाकिस्तानी राजकारण्यांना सैरभैर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवेदनाचे स्वागत केल्याबद्दल ब्रह्मदाग, तसेच हरबियार मर्री, बानयुक करिमा बलोच यांच्यावर पाकिस्तानी फौजदारी कायद्याच्या 120, 121,123 आणि 353 कलमांखाली आरोपपत्र दाखल केले आहे. ब्रह्मदाग बुग्ती यांच्या विरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटिस काढण्यात यावी यासाठी बलुचिस्तानच्या पोलिसांनी तयारी सुरू केली असली, तरी ती निघेल अशी शक्यता कमी आहे, कारण ब्रह्मदाग हे एका राजकीय पक्षाचे नेते आहेत. ते 33 वर्षांचे असून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ते 'साहिब' या टोपणनावाने ओळखले जात असतात. ते आधी काबूलला गेले आणि 2010मध्ये पाकिस्तान सरकारने जेव्हा काबूलकडे त्यांची मागणी केली, तेव्हा ते स्वित्झर्लंडमध्ये पळून गेले. बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री नवाब अकबर बुग्ती यांचे ते नातू आहेत. नवाब अकबर बुग्ती यांना जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या सत्तेच्या काळात कोहलूमध्ये एका चकमकीत ठार करण्यात आले होते. त्याचेही कारण मुशर्रफ यांच्या अहंमन्य वृत्तीत आहे. 2005मध्ये ते कोहलू परिसराला भेट द्यायला गेले असता त्यांच्या हेलिकॉप्टरवर बलुचांनी गोळीबार केला. त्यानंतरच मुशर्रफ यांच्या सैन्याने 26 ऑॅगस्ट 2006 रोजी नवाब बुग्ती यांना एका गुहेत गाठून ठार केले. बलुचिस्तान रिपब्लिकन आर्मी ही दहशतवादी संघटना त्याच वर्षी बनवण्यात आली. पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात कारवाया करण्यासाठी ही संघटना बनवण्यात आली आहे. पाकिस्तानी सैन्याशी ती गनिमी तंत्राने संघर्ष करत असते. या संघटनेने बलुचिस्तानमध्ये परकीय गुंतवणुकीलाही आक्षेप घेतलेला आहे. बलुचिस्तानच्या डोंगराळ भागात या संघटनेच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येते आणि ते पाकिस्तानी सैन्याच्या नाकात कायमच दम आणत असतात. त्यांच्या बहुतेक कारवाया या डेरा बुग्ती आणि त्या परिसरातच चालू असतात. याउलट बलोच रिपब्लिकन पार्टीचे प्रवक्ते शेर मोहम्मद बुग्ती यांनी पाकिस्तानी सैनिक आता बलुचिस्तानात नागरिकांविरुध्द बाँब आणि हवाई हल्ल्यांचा आधार घेत असल्याचा आरोप केला आहे.

अशा स्थितीत बलुचिस्तानला पाकिस्तानी सरकारच्या वरवंटयाखालून सोडवायचे म्हटले, तरी ते भारतापुढे मोठे संकट असणार आहे. ते तसेही अवघड आहे. याचे कारण आपल्याला एकतर हवाई मार्गाने जायचे म्हटले, तर पाकिस्तानची सरहद्दच नव्हे, तर पाकिस्तानचा बराच मोठा प्रदेश ओलांडून जावे लागणार आहे. तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानी लष्कराच्या पराभवाची कारणे अनेक आहेत, पण त्या देशाला भारतावरून पूर्व पाकिस्तानात जाणे अवघड बनले, हे त्यापैकी एक कारण आहे. सांगायचा मुद्दा हा की, बलुचिस्तानमध्ये अगदी टोकाचा संघर्ष जेव्हा होईल तेव्हा पाकिस्तान हे राष्ट्रच अस्तित्वहीन बनेल. बलुचिस्तानात आज तांब्याच्या खाणी मिळाल्या आहेत. सुईमध्ये नैसर्गिक वायू इतका आहे की तो एक तृतीयांश पाकिस्तानची गरज भागवू शकणार आहे. सोने, लाइमस्टोन, गंधक यांच्या खाणी उजेडात येत आहेत. त्यामुळे हे सर्व विदेशी कंपन्यांना शोधायला सांगून त्याचा वाटा त्यांना देण्यापेक्षा तो आम्हाला द्या, अशी या प्रदेशाची आणि ब्रह्मदाग बुग्ती यांची मागणी आहे. ग्वादार बंदराचा विकास करण्यासाठी चिनी तंत्रज्ञान घेणारे, चीनला त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊ देत आहेत हे त्यांना न रुचणारे आहे. 7 हजार चिनी कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यायला 15 हजार पाकिस्तानी सैन्य तैनात केले जाणार, ही तर पैशाची उधळपट्टी आहे असे त्यांना वाटते. त्यातूनच बलुचिस्तान विरुध्द पाकिस्तान असे चित्र उभे राहिले आहे. हा संघर्ष किती वाढतो, त्याबरोबरच अफगाणिस्तानमध्ये कुणाकडे सत्तेचे केंद्र झुकते आणि अमेरिकेची तिथून संपूर्ण माघार कधी होते यावरच पुढल्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. मोदींनी बलुचिस्तानचा लढा किंवा तिथल्या फुटीर कारवाया यावर भाष्य केलेले नसताना त्यावर पाकिस्तानने आकाशपाताळ एक करायचे खरे तर काहीही कारण नव्हते. पण तो पाकिस्तान आहे आणि त्याला भारत हे सर्वात मोठे शत्रुराष्ट्र वाटते आहे.

9822553076

 

Powered By Sangraha 9.0