खरंच इतका सोपा आहे का एखादं कुटुंब सांभाळण्याचा विचार? इतकं अविचाराने करण्याचं कृत्य? लग्न किंवा त्यानंतर मुलं जन्माला घालण्यात फक्त सामाजिकदृष्टया तुम्ही आता स्थिर झालात आणि मुलं - त्यातही मुलगा जन्माला घालून तुम्ही आता तुमचा पुरुषार्थ सिध्द केलात, एवढाच विचार? तुम्ही तुमच्या कुटुंबाला सर्वार्थाने सुरक्षिततेचं एक कवच देऊ शकता आहात का? त्यांच्यातलं आणि तुमच्यातलं नातं समृध्द, विकसित, आरोग्यपूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल, याचा विचार, नियोजन तुम्ही केलं आहे का...
फोनची बेल वाजली आणि मी फोन उचलला. पलीकडून आवाज आला, ''मी अबकडे बोलतोय.'' ''ओह, नमस्कार, अबकडे, बोला! बोला!'' मी सहज प्रतिसाद दिला. श्रीयुत अबकडे म्हणजे माझ्याकडे गाणं शिकणाऱ्या आठ वर्षाच्या एका मुलीचे पालक! अबकडे आज नेहमीसारखे बोलत नाहीयेत, त्यांचा आवाज रागीट आहे, हे माझ्या लक्षात आलं ते अबकडयांच्या पुढच्या अत्यंत संतप्त आणि तिखट विधानानंतर! ''काय हो, आठ आठ, नऊ नऊ वर्षांची मुलं काय तयार गातात, तुमचं ते शास्त्रोक्त गातात, ख्याल का काय ते गातात, माईकसमोर गातात, स्पर्धा जिंकतात, आऽ ऊऽ करतात दहा दहा, वीस वीस मिनिटं आणि माझी पोरगी गेली दोन वर्षं तुमच्याकडं शिकतीय, तिला चार गाण्यांच्या पुढं कायपण येईना! काय शिकवता का काय करताय?'' श्रीयुत अबकडयांच्या या वाक्ताडनानंतर माझी बोलतीच बंद झाली. त्यांचं बोलणं संपल्यानंतर अगदी शांतपणे मी त्यांना म्हटलं, ''ठीक आहे. मी तुम्हाला उत्तम शिकवणाऱ्या काही गुरूंची नावं सांगते. तुम्ही अबोलीला दुसऱ्या कोणाही संगीत गुरूंकडे गाणं शिकवायला पाठवू शकता.'' पुढे काहीही न बोलता मी फोन ठेवून दिला.
मी फोन ठेवून दिला खरा, पण त्यानंतर माझ्या मनात माझ्याशीच झालेला संवाद पुढे कधीतरी अबोलीच्या आईवडिलांशी मला साधावाच लागणार होता. अबोली ही साधारणपणे वयाच्या सहाव्या वर्षापासून माझ्याकडे गाणं शिकायला यायला लागली. अगदी गोड, सुरेल आवाज. मनापासून गाणं शिकायची. कधीही दंगा, बडबड करायची नाही. अबोलीची आई नोकरी करणारी आणि वडीलही खूपच बिझी! माझ्या घरापासून बऱ्यापैकी दूर राहणारी अबोली शाळा संपली की दप्तर आणि युनिफॉर्मसहच माझ्या घरी यायची. बहुतेक वेळा तिची वयोवृध्द आजी तिला पोहोचवायला-न्यायला यायची.
हळूहळू अबोलीशी माझा संवाद सुरू झाला आणि मला कळलं की अबोलीला आणखी दोन भावंडं आहेत आणि ती तिच्याहीपेक्षा लहान आहेत. आई नोकरीवरून आली की नैसर्गिकपणे तिच्या दोन छोटया भावंडांकडे तिला पाहावं लागतं. अबोलीचे बाबा रात्री बरेच उशिरा घरी येतात. बहुधा ते अबोलीला भेटतच नाहीत. शनिवार, रविवारीच भेटतात. अबोलीची आजी तिला टॅक्सीत घालून गाण्याच्या क्लासला आणते, पण ती स्वत: साक्षर नसल्यामुळे अबोलीच्यात आणि तिच्यात अबोलीच्या विकासासाठी पोषक असा संवाद होत नाही. आजीला अबोलीच्या गाण्यात, अभ्यासात काहीच स्वारस्य नाही. केवळ लादलेलं कर्तव्य म्हणून ती नातीला क्लासला सोडायला येते. अबोलीच्या आईवडिलांची तिच्या अभ्यासाबद्दल, शाळेबद्दल, गाण्याबद्दल केवळ कर्तव्य म्हणून प्रायॉरिटी आहे. ते तिला कधीही गाणं म्हणून दाखवायला सांगत नाहीत की शाळा, क्लासमधल्या गमतीजमती विचारत नाहीत.
अबोली नियमितपणे गाण्याच्या क्लासला यायची, पण ती खूप दमून जायची. बहुतेक वेळा गाणं शिकवायला सुरुवात केली की ती पेंगायला लागायची. मग मीच तिला ''झोप थोडा वेळ'' असंही कधीकधी म्हटलेलं आठवतं. तिचे आईवडीलही कधी आवर्जून ''वर्षामावशी, कसं चाललंय अबोलीचं शिक्षण?'' असं कौतुकाने विचारायला आल्याचं स्मरत नाही. आणि आज हा असा फोन.... अचानकच!
खरं सांगायचं, तर कुठल्याही कलेत आपल्या मुलाने पारंगत व्हावं असं पालकांना वाटत असेल, तर त्यांचं या गोष्टीमध्ये फार मोठं योगदान असावं लागतं. 'पी हळद, हो गोरी' असा जादूचा मामला नसतो हा! त्यामागे पालकांचा वेळ, मुलाच्या कलाशिक्षणाबद्दल पालकांना असलेली आस्था आणि 'मी तुझ्या बरोबर आहे' हा विश्वास मुलाला देणारं वर्तन फार महत्त्वाचं असतं. गाण्याच्या क्लासला किंवा नाचाच्या क्लासला घालणाऱ्या पालक माता नेहमीच संपर्कात येतात, पण वाईट एवढंच वाटतं की बरेचदा त्यांच्या मुलांना आणा-पोहोचवायला नोकर मंडळी येतात. मुलांना क्लासमधून जर मुलाच्या आईने घरी नेलं, तर खूप महत्त्वाच्या गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे शिक्षकांशी भेट होते. लहान मुलांना आपल्या आई-बाबांनी आपल्या शिक्षकांशी गप्पा माराव्यात, त्यांच्याशी मैत्री करावी, आपल्याबद्दल विशेष काहीतरी बोलावं, थोडक्यात आपल्याला खास मानावं असं खूप वाटत असतं आणि दुसरं म्हणजे क्लासमधून घरी जाताना मुलांच्या मनात त्या दिवशीच्या क्लासबद्दल, मित्रमैत्रिणींबद्दल, शिकलेल्या गाण्याबद्दल अगदी ताजं ताजं खूप सांगण्यासारखं असतं. घरी जाईपर्यंत खूप महत्त्वाच्या गोष्टी न विचारताच आईला कळतात. क्लास संपल्यानंतर खूप उशिरा भेटणारी आई मग कितीही वेळा ''आज काय झालं?'' असं विचारायला लागली की मुलांना तिची कटकट होते, कारण त्या वेळेपर्यंत क्लास, शाळा, गाणं हे विषय मुलांसाठी शिळे झालेले असतात.
अबकडे कुटुंबाचा प्रश्न तर मूलभूतच होता. पुन्हा फोन करून मी या स्वत:ला सुशिक्षित म्हणवणाऱ्या आई-वडिलांना बोलावून घेतलं. बऱ्याच गोष्टी बोलले. काही बाबतीत मी अधिक लक्ष देण्याचं आश्वासनही दिलं. पण खरं सांगायचं तर आतून येणारा स्वच्छ होकार मला जाणवला नाही. आपलं काही चुकतंय हे मान्य करायलाच त्यांची तयारी नव्हती. उलट, आम्ही दिवसभर काम करून दमून येतो, तर ही पोरगी आमच्या बरोबर जागत टीव्ही बघत बसते, अशीच तक्रार सुरू झाली. मी म्हणालेही, ''अहो, लहान आहे ती, तुम्ही ती झोपल्यावर टीव्ही बघा ना....'' ''घ्या, म्हणजे आम्हाला काही एन्टरटेनमेंट नकोच की काय...'' वडिलांची मुक्ताफळं! मी खरोखरच हतबुध्द झाले. अगदी कमी अंतराने तीन मुलांना जन्म देणं (शेवटचा अर्थातच मुलगा), त्यांचं बालपण, खेळ, अभ्यास, आजार या सगळया गोष्टींना आपण पुरे पडू शकू का? आपल्या रोजच्या जीवनाचं तरी व्यवस्थापन आपण करू शकू का? या गोष्टींचा विचार त्यांनी स्वप्नातल्या स्वप्नातही केलेला दिसत नव्हता. कसंबसं ठिगळं लावून जीवनचक्र चालू होतं.
खरंच इतका सोपा आहे का एखादं कुटुंब सांभाळण्याचा विचार? इतकं अविचाराने करण्याचं कृत्य? लग्न किंवा त्यानंतर मुलं जन्माला घालण्यात फक्त सामाजिकदृष्टया तुम्ही आता स्थिर झालात आणि मुलं - त्यातही मुलगा जन्माला घालून तुम्ही आता तुमचा पुरुषार्थ सिध्द केलात, एवढाच विचार? तुम्ही तुमच्या कुटुंबाला सर्वार्थाने सुरक्षिततेचं एक कवच देऊ शकता आहात का? त्यांच्यातलं आणि तुमच्यातलं नातं समृध्द, विकसित, आरोग्यपूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल, याचा विचार, नियोजन तुम्ही केलं आहे का... याचा विचार आवश्यक नाही का? मी खूप विचार करत बसले की माझी मुलगी मला म्हणते, ''किती अतिविचार करतेस? तू काही करू शकणार आहेस का? जाऊ देत तो विषय, सोड आता!''
पण दुर्दैवाने आजही तो विषय मला फार मानसिक त्रास देतो... कारण.... एके दिवशी माझ्या हृदयाचं पाणी करणारा फोन आला - ''अबोली इज नो मोअर!''
ती खूप आजारी आहे, खूपच आजारी आहे हे तिच्या आईवडिलांना जरा उशिराच कळलं म्हणे!
(सत्यकथा, नावं बदलली आहेत.)
9594962586