अखेर नरसिंग यादव मागील शुक्लकाष्ठ संपले. उत्तेजक पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी त्याच्या खेळण्यावर बंदी आणण्यात आली होती.पण सोमवारी नाडाच्या अधिकाऱ्यांनी नरसिंग यादवला या आरोपातून क्लिन चिट दिली आणि तो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकतो असे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरसिंग यादवला टि्वटरवरून शुभेच्छा दिल्या. ''चांगली कामगिरी केलीस तर तुझ्यावर कोणत्याही अन्याय होणार नाही'' असा कानमंत्रही दिला.
भारताचा संघ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी रवाना झाला. भारताकडून ऑलिम्पिक स्पर्धेत जाणाऱ्या खेळाडूंची शंभरी ओलांडली गेली. १०७ खेळाडूंचे पथक, आणि सुमारे ४०/४१ प्रशिक्षक यांच्या भारतीय चमूने ऑलिम्पिक नगरीमध्ये प्रवेश केला. भारत सरकारने व भारतीय ऑलिम्पिक संघटनेने ऑलिम्पिकसाठी निवडलेल्या खेळाडूंसाठी शुभेच्छा समारंभाचे आयोजन केले होते. ज्याप्रमाणे भारतीय खेळाडू या क्रीडायुध्दासाठी सज्ज झाले आहेत, त्याचप्रमाणे इतर देशांनीही आपली कंबर कसली आहे.
२०७ देश रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार आहेत. ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेकडून तब्बल ५५५ खेळाडूंचा संघ जाणार आहे. या संघामध्ये २९२ महिला आणि २६३ पुरुष आहेत. ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या देशाकडून सर्वाधिक महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यानंतर अव्वल असणाऱ्या चीनने एकूण ४१२ खेळाडूंना ऑलिम्पिकच्या रिंगणात उतरविलेले आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा संघ येतो. इंग्लंडने रिओ ऑलिम्पिकसाठी ३३६ खेळाडूंचा संघ पाठविला आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये काही खास गोष्टींकडे लक्ष असेल. रिओमधील स्पोर्ट्स व्हिलेज असो किंवा खेळाडूंची संख्या हे आधीपासूनच चर्चेत आहे. ऑलिम्पिक स्पर्धा रिओमध्ये होणार हे जाहीर झाल्यापासूनच काही ना काही अडथळे येतच आहेत. ऑलिम्पिक सुरू होण्याआधीच या स्पर्धेला ब्राझिलवासीयांच्या असंतोषाला सामोरे जावे लागले. वाढते प्रदूषण व झीका विषाणूचा धोका अशा बऱ्याच घटना सातत्याने घडत आहेत. झीकाच्या भीतीने बऱ्याच खेळाडूंनी घेतलेली माघार, स्पोर्ट्स व्हिेलजच्या महापौरपदाचा वाद, भ्रष्टाचार, लोकांच्या पायाभूत सुविधांना डावलून ऑलिम्पिक सोहळयासाठी झालेला अव्वाच्या सव्वा खर्च यामुळे ब्राझिलला आर्थिक मंदीला सामोरे जावे लागत आहे. राजकीय वादाची जोड किंवा ऑलिम्पिक स्पर्धेवर आतंकवाद्यांच्या हल्ल्याचे सावट अशा बऱ्याच गोष्टींमुळे रिओ ऑलिम्पिक गाजत आहे. जशाजशा ऑलिम्पिक स्पर्धा जवळ येऊ लागल्या, तसेतसे नवनव्या वादांना तोंड फुटू लागले. गेल्या दोन ते तीन आठवडयांत अशा वादांच्या बातम्यांचा जोर वाढला आहे.
रिओ ऑलिम्पिकमधील वादाला 'ऑलिम्पिक टॉर्च' समारंभापासूनच सुरुवात झाली. या समारंभात ब्राझिलच्या सैन्याने समारंभाच्या शेवटी एका बिबटयावर गोळया झाडल्या व त्यात त्याचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणानंतर ब्राझिल सैन्याला जागतिक पातळीवर टीकेला सामोरे जावे लागले. हा बिबटया या समारंभातील एक भाग होता.
ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच एका देशाला स्पर्धेत भाग घेण्यापासून बंदी करण्यात आली.ऑलिम्पिकने रशियाच्या सगळयाच खेळाडूंवर बंदी घातली होती. ऍंटी डोपिंगच्या अंतर्गत या खेळाडूंवर उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. रशियाच्या राजकीय दबावाला बळी पडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने ही बंदी उठविली. ऑलिम्पिक स्पर्धेत उत्तेजक पदार्थाचे सेवन व त्यानंतर होणाऱ्या कारवाया हे जणू पाचवीलाच पूजले आहे. अकरा वर्षांपासून रशियन खेळाडूंना अशा प्रकाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. सक्षम राजकीय पाठबळ आणि आर्थिक बळ याच्या जोरावर या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता आले.
रिओ शहरावरील झीका विषाणूचा धोका अजूनही टळला नाही. दोन गोल्फ खेळाडूंना झीका विषाणूची लागण झाल्यामुळे त्यांना या वर्षीच्या ऑलिम्पिकमधून माघार घ्यावी लागली.
टेनिसपटू रॉजर फेडरर यानेही ऑलिम्पिक स्पर्धेतून काढता पाय घेतला आहे. रॉजर फेडररच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून सुरू असलेल्या या त्रासामुळे त्याने फें्रच खुल्या स्पर्धेमधूनही माघार घेतली होती. 2008 सालच्या ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक मिळविले होते. स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार नाही, ही खंत त्याने आपल्या फेसबुक पेजवर मांडली.
भारतालाही डोपिंगचा डंख
रिओ ऑलिम्पिक 2016मधील वादांच्या भोवऱ्यापासून भारतही अलिप्त राहिला नाही. ऑलिम्पिकमध्ये भारत सहभागी होण्यापासूनच वादाची किनार लागली होती. सदिच्छादूत म्हणून अभिनेता सलमान खान याची निवड असो अथवा सुशीलकुमार आणि नरसिंग यादव यांच्या प्रवेशाचा तिढा असो, साऱ्या गोष्टींमुळे खेळातदेखील राजकारणाचा समावेश असतो याची प्रचिती आणून दिली. भारतीय खेळाडू रिओमध्ये दाखल झाल्यानंतरही भारताच्या नरसिंग यादव याच्यावरील वादाची संक्रात कायम राहिली. त्याने उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावरदेखील कारवाई करण्यात आली. या सर्व प्रकरणावर त्याचे असे म्हणणे आहे की, ''माझ्या विरोधात हा कट रचण्यात आला आहे. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत मी असे काही करीन का? मला या सर्व प्रकारात अडकविण्यात आले आहे. सोनिपतच्या कॅम्पमध्ये माझ्या जेवणात कोणीतरी भेसळ केली होती. हेच जर मी मुंबईमध्ये ट्रेनिंगसाठी गेलो असतो तर आज माझ्यावर अशी वेळ आली नसती. सोनिपतच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये हा कट रचण्यात आला. त्यामुळे मी या चाचणीत दोषी आढळलो.'' नरसिंग यादवला ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळालेल्या दिवसापासूनच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुशील कुमारसारख्या अनुभवी खेळाडूला मागे टाकून त्याने हे तिकीट मिळविले होते. कुस्तीपटू सुशील कुमारला ऑलिम्पिकमध्ये स्थान न मिळाल्यामुळे हरियाणातील सोनिपतमध्ये कुस्ती संघात दोन गट तयार झाले आणि याच गटाबाजीचा बळी ठरला तो नरसिंह यादव. नरसिंहच्या जेवणात ही भेसळ करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी एका आंतरराष्ट्रीय कुस्तीगिराचा भाऊ असल्याचे चौकशीदरम्यान लक्षात आले. त्यामुळे नरसिंहवरील आरोप किती खरे व किती खोटे, या निकालाची वाटसुध्दा न पाहता भारतीय ऑलिम्पिक संघटनेने प्रवीण राणाला ऑलिम्पिकच्या सरावासाठी निवडले आणि ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे नरसिंग यादवचे स्वप्न भंगले.
या सर्व धक्क्यातून भारतीय खेळाडू बाहेर येत नाहीत, तोपर्यंत भारताच्या गोळाफेकपटू इंद्रजीत सिंह याच्यावरही उत्तेजक पदार्थाच्या सेवनाचे आरोप करण्यात आले. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेमार्फत करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये इंद्रजीत सिंह दोषी आढळला. आता इंद्रजीतने एनएडीएकडे पुन:चाचणीची मागणी केली आहे. भारताचा एकमेव गोळाफेकपटूदेखील या स्पर्धेतून बाद झाल्यामुळे भारतीय चमूमध्ये निराशेचे वातावरण आहे.
भारताकडून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये बऱ्याच खेळाडूंची आर्थिक परिस्थितीही जेमतेम आहे. तरीदेखील आपल्या खेळातील कामगिरीच्या जोरावर त्यांनी ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळविला. ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत राजकारण असते, तिथे खेळाचे रिंगणही या राजकारणाला बळी पडले. राष्ट्रीय क्रीडा समिती व राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यांच्यातील वादात बऱ्याच होतकरू खेळाडूंचा बळी जातो. अशाच राजकारणाचा बळी ठरला तो नरसिंह यादव.
ऑलिम्पिकसाठी तयारी करत असताना हे खेळाडू चार वर्षे कठोर परिश्रम आणि मेहनत घेत असतात. कारण ऑलिम्पिक प्रवेश ही त्यांच्यासाठी 'लाईफटाईम अचिव्हमेंट' असते. अशा वेळी आपल्याच देशातील लोक त्यांना मागे ओढू पाहतात. नरसिंह यादव किंवा सुशील कुमार या दोहोंपैकी कोणीही भारताचे प्रतिनिधित्व केले असते, तरीही देशासाठीच पदक मिळवून आणले असते. वैयक्तिक मान-अपमान याच्या जाळयात अडकल्याने दोन्ही खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेला मुकले आहेत. आता नरसिंह यादव याच्या खांद्यावरून प्रवीण राणा या खेळाडूच्या खांद्यावर भारताच्या अपेक्षांचे ओझे आले आहे. नरसिंह आणि इंद्रजीत यांच्यावरील आरोपामुळे भारतीय संघात मात्र आता चिंतेचे वातावरण आहे. या सर्व प्रकारावर कुस्तीगीर योगेश्वर दत्त याचे ट्वीट अधिक बोलके ठरते -
''किन लोगों के लिए सेना के जवान जान की बाजी लगा रहे है, और किन लोगों के गर्व के लिए खिलाडी दिन रात पसीना बहा रहे है।'' योगेश्वरचे शब्द कटू जरी असले, तरी ते खरे आहेत. भारतात क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांना मिळणारे दुय्यम स्थान व खेळाडूंना मिळणारी वागणूक या सगळया गोष्टींवर योगेश्वरचे हे ट्वीट प्रकाश टाकते आहे.