ऑलिम्पिकच्या निमित्ताने...

16 Aug 2016 15:01:00

2016च्या ऑलिम्पिकमध्ये 45 टक्के महिला खेळाडू आहेत. त्यामुळे भारतीय स्त्री-शक्तीच्या अहवालात 2005मध्ये नमूद केलेल्या परिस्थितीत आणि 2016च्या महिला खेळाडूंच्या जागतिक परिस्थितीत गुणात्मक फरक पडला नसेल, तर त्याला जबाबदार कोणाला धरायचे? असा वातावरणात महिला खेळाडूंची कामगिरी उंचावण्याची अपेक्षा कशी धरायची? पदकांच्या तालिकेत आपण मागे आहोत, राहणार आहोत याची खंत व्यक्त करताना रिओ ऑलिम्पिकच्या निमित्ताने आपण स्त्रिया व खेळ या विषयातल्या 'जेंडर' या घटकाचा जरूर विचार करायला हवा!


हा लेख प्रसिध्द होईपर्यंत रिओ-दि-जानेरो येथे भरलेल्या 'रिओ 2016' ऑलिम्पिक स्पर्धा शेवटच्या आठवडयाकडे पोहोचल्या असतील. क्रिकेट असो, फुटबॉल असो की राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा असो की ऑलिम्पिक...  सगळयाच स्पर्धा खेळाइतक्याच किंवा खेळापेक्षाही खेळबाह्य कारणांसाठी अधिक गाजतात. पूर्वी 'शिमगा गेला, कवित्व उरलं' अशी एक म्हण होती. मात्र आताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या विस्फोटकारी युगात 'शिमग्यापूर्वीच' कवित्वाची चर्चा होते. रिओ ऑलिम्पिकही त्याला अपवाद नाही.

या ऑलिम्पिकमधील निर्वासितांचा संघ आणि ट्रान्सजेंडर ऍथलीट्सचा सहभाग हे दोन मुख्य विषय आणि याच्या जोडीला चर्चा होते आहे ती 2016 ऑलिम्पिकमधील महिलांचा सहभाग, कामगिरी आणि महिला खेळाडूंना अनुभवाला येणाऱ्या लिंगभेदभावाची. खेळाच्या स्पर्धा आणि उत्तेजक सेवनाचे आरोप, चाचण्या, स्पर्धेतून बाद होणे हेही महाचर्चेचे विषय! सुमारे तीन हजार वर्षांची परंपरा आणि परिवर्तनाचीही अनेक आवर्तने झेललेल्या या स्पर्धा मात्र खिलाडूवृत्तीपेक्षा जीवघेण्या स्पर्धा बनल्या आहेत. 'गोळीबार नसलेले युध्द' हे जॉर्ज ऑरवेलने केलेले त्याचे वर्णन यथार्थ ठरते. या युध्दाला आर्थिक दृष्टीकोनाने अधिक धारदार बनवले आहे. ब्राझिलच्या आर्थिक स्थितीला ऑलिम्पिक आयोजनाने झळाळी येईल की भव्यदिव्य आयोजन, भ्रष्टाचार यामुळे त्याची झिलई कमी होईल, हे लवकरच स्पष्ट होईल. सर्वसामान्य माणसे, स्त्रिया यांच्यावर अशा भव्य आयोजनांचा काही परिणाम होतो का? जगातल्या सर्व घडामोडींमध्ये - मंगळयान मोहिमेपासून ते दहशतवादी कारवायांपर्यंत - स्त्रियांचा वाढता सहभाग ऑलिम्पिक व खेळ दुनियेत कसा आहे व स्त्री अभ्यासकांना तो कसा दिसतो, हे पाहणेही अगत्याचे आहे.

या ऑलिम्पिकमध्ये 206 देशांचे सुमारे अकरा हजार खेळाडू सहभागी होत आहेत. अठ्ठावीस क्रीडा प्रकारांमध्ये तीनशे सहा स्पर्धा होणार आहेत. त्यात सुमारे 45% महिला खेळाडू असणार आहेत. भारतातूनही जाणाऱ्या 121 खेळाडूंमध्ये 54 महिला आहेत. गेल्या पन्नास वर्षांत हे प्रमाण या पातळीवर गेले आहे. 1960पूर्वी क्रीडा स्पर्धांमध्ये महिलांचा सहभाग हाताच्या बोटावर मोजण्याइतकाच असायचा.

'स्त्रीवादी' दृष्टीकोनातून महिला खेळाडूंचा सहभाग, ऑलिम्पिक असोसिएशन्सच्या पदाधिकारी व समिती सदस्य, महिला प्रशिक्षक, स्पर्धा प्रायोजक, स्पर्धा पाहायला जाणाऱ्या प्रेक्षक, त्यांच्याविषयी येणाऱ्या बातम्या, महिला क्रीडा प्रकारांना लाभणारे प्रेक्षक, त्यांचे हेतू, मुलाखती व बातम्यांमधले प्रतिनिधित्व, विचारले जाणारे प्रश्न, महिला खेळाडूंना भेडसावणारे प्रश्न, भेदभाव, शारीरिक क्षमता, मासिक पाळीच्या काळात खेळताना येणाऱ्या अडचणी, निवासाच्या सोयी आणि सगळयात महत्त्वाचा 'सेक्सिस्ट' - लिंगमूलक दृष्टीकोन यांचा अभ्यास करण्याची गरज आहे.

भारतीय स्त्री शक्तीने 2005मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या साहाय्याने केलेला 'ए स्टडी ऑन जेंडर इश्यूज इन स्पोर्ट इन इंडिया' हा अध्ययन अहवाल आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तो मुळातून वाचायला हवा. गेल्या दहा वर्षांत त्या परिस्थितीत संख्यात्मक व थोडाफार गुणात्मक फरक पडला असला, तरी आपल्याला बरेच अंतर चालून जायचे आहे, याची जाणीव करून देणारा तो अहवाल आहे. 'लिंगमूलक' दृष्टीकोन आणि टिप्पण्या हा काही फक्त भारतीय मानसिकतेचा प्रश्न नाही, तर जगभराचा आहे. स्त्री व पुरुष खेळाडूंकडे माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून पाहिले जात नाही, तर 'विशिष्ट लिंगाची' व्यक्ती म्हणून कसे पाहिले जाते, याची वानगीदाखल काही उदाहरणे पाहू.

काही दिवसांपूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान असलेल्या सानिया मिर्झाला एका प्रसिध्द पत्रकाराने विचारलेला प्रश्न व त्याला तिने दिलेले सडेतोड उत्तर व पत्रकाराने मागितलेली माफी हा अतिचर्चेचा, विनोदाचा व किश्श्यांचा प्रकार फार जुना नाही.

अनेक मुलाखतींमध्ये 'सेलिब्रिटी' स्त्रिया - मग त्या उद्योगिनी (उद्योगपती नव्हे) असोत, उच्चपदस्थ अधिकारी असोत, सिनेतारका असोत की खेळाडू - हमखास प्रश्न विचारला जातो तो संसार, मुले, स्वयंपाक इ.बद्दल. सानियाला प्रश्न विचारताना तीच चूक केली आणि त्याचे तिने जाहीर उत्तर दिले. 'बाई, तू कितीही शिकलीस, खेळलीस, व्यवसाय-उद्योग केलास किंवा मंगळावर पोहोचलीस तरी घर-संसार-मुले व स्वयंपाक याशिवाय तुझ्या जीवनाला 'परिपूर्णता' नाही' असा संदेश आपण आणखी किती वर्षे मुलींना देणार?

घरांमधून, शाळा-कॉलेजांमधून आपण स्त्रियांच्या खेळातील सहभागाला प्रोत्साहन देताना आपण त्यांनाही समान मानधन देतो का? महिला हॉकी असो वा क्रिकेट, समान प्रमाणात प्रायोजकत्व देतो का? नोकऱ्यांमध्ये समान संधी देतो का? स्पर्धांच्या ठिकाणी राहण्याच्या, प्रवासाच्या सोयींपासून सुरक्षित वातावरणापर्यंत आपण त्यांना काय उपलब्ध करून देतो? प्रशिक्षकांपासून सहखेळाडूंपर्यंत महिलांशी गैरवर्तन, चुकीचे शेरे, चुकीचे वृत्तांकन करणारे पत्रकार, वाहिन्या यांच्यावर आपण काय कारवाई करतो? प्रशिक्षक, पंच, पदाधिकारी या पदांवर किती महिलांना समाविष्ट करतो? अशा प्रश्नांच्या सकारात्मक उत्तरावर महिला खेळाडूंचे भवितव्य, कामगिरी, जिंकणाऱ्या पदकांची संख्या, 'रोल मॉडेल' म्हणून त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी, प्रेरणास्थान हे अवलंबून असणार आहे याची खूणगाठ या ऑलिम्पिकच्या निमित्ताने आपण बांधली पाहिजे.

2016च्या ऑलिम्पिकमध्ये 45 टक्के महिला खेळाडू असल्या, तरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नव्वद सदस्यांमध्ये केवळ 22 महिला आहेत. ऑलिम्पिकच्या वृत्तांकनात 21% महिला पत्रकार आहेत आणि गेट्टी इमेजिस या फोटो एजन्सीत केवळ 2 महिला छायावृत्तकार (फोटोग्राफर्स) आहेत.

या दारुण आकडेवारीनंतर महिला क्रीडापटूंच्या छाया वृत्तांकनात त्यांच्या क्रीडाकौशल्यापेक्षा शरीराच्या कोनांना महत्त्व देणाऱ्या, स्तन आणि मांडया दाखवणाऱ्या कॅमेऱ्यांना पायबंद बसण्याची अपेक्षा कशी ठेवावी? ऍथलीट्सचे शरीरसौष्ठव दाखवताना कॅमेरा स्त्रियांच्या व पुरुषांच्याही कोणत्याही अवयवांवर रेंगाळतो, खेळ अधिक प्रेक्षणीय होण्यासाठी प्रायोजक कशाबद्दल आग्रही असतात? याचे अनुभव खेळाडूंनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले आहेत.

जेस वॉर्निश या ब्रिटिश सायकलपटूला पंचविसाव्या वर्षी वृध्द ठरवणाऱ्या, वाढलेल्या नितंबांच्या आकारामुळे 'जा आणि मुले जन्माला घाल' असे अवमानकारक शब्द वापरणाऱ्या शेन सुटॉनला राजीनामा द्यावा लागला. रिओ ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर फ्रीस्टाईल पोहण्याच्या शर्यतीत व अन्य शर्यतीतही पदके व सुवर्णपदक मिळविलेल्या लेडेकी (Katie Ledecky)चे निर्विवाद यश 'बीटन... बाय ए गर्ल' अशा अपमानास्पद टिप्पणीने झाकोळले जाते. तिच्या क्षमतेचे निभर्ेळ कौतुक न करणाऱ्या मुलाखतकार कोनोर डायरच्या 'शी ब्रेक्स गाईज' या वाक्यावर ट्वीट्सचा भडिमार झाला.

हंगेरीच्या कत्निका होसझु (Katnika Hosszu)ने 400 मीटर पोहण्यातला जागतिक विक्रम मोडला याचे श्रेय तिचे कौशल्य, परिश्रम आणि प्रशिक्षक यांना जात असले, तरी क्रीडा समालोचक डॅन हिक्सने केलेली टिप्पणी समाजाच्या स्त्रियांबद्दलच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकणारी आहे. तिचा प्रशिक्षक आणि नवराही असलेल्या शेन टयूसुपला त्याने त्याचे श्रेय देऊन टाकले. तो म्हणाला, ''आपल्या बायकोला यशस्वी स्विमर बनवणारा पुरुष म्हणजे तिचा नवरा-प्रशिक्षक.''

मेरी कोमच्या नवरा व मुलांच्या आजारपणातही तिच्या खेळण्याला तिच्या कौशल्यापेक्षा आधिक प्रसिध्दी दिली जाते. वृत्तवाहिन्या किंवा वृत्तपत्रेही दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवलेल्या कोरे कॉग्डेलचा उल्लेख 'अमुकअमुकची पत्नी' किंवा डेबोरा फेल्प्सचा उल्लेख 'मायकेल फेल्प्सची आई' असा करतात, तेव्हा प्रश्न निर्माण होतो तो लेखकाच्या, निवेदकाच्या लिंगभाव समानतेचा. अशा मुद्दयांवर चर्चा करण्याऐवजी 'तुम्ही आई, बायको या भूमिका नाकारता का?' अशाकडे ही चर्चा नेली जाते. प्रश्न भूमिका नाकारण्याचा किंवा स्वीकारण्याचा नाही. त्या भूमिका वैयक्तिक असतात, त्याचा स्वीकार अथवा नकार ही खेळाडूची व्यक्तिगत बाब आहे हे आपण लक्षात घेत नाही आणि क्रीडाकौशल्यापेक्षा व्यक्तिगत बाबींची जाहीर चर्चा करतो हे गैर आहे. पुरुष खेळाडूंना असे प्रश्न आपण विचारत नाही, फक्त स्त्रियांनाच विचारतो, हे गैर आहे. क्रीडा समालोचनाच्या वकूबाऐवजी मंदिरा बेदीच्या कपडयांवर चर्चा करतो, हे गैर आहे.

हा लेख लिहिताना वेगवेगळया ऑलिम्पिक स्पर्धांच्या वेळी प्रकाशित झालेली पोस्टर्सही पाहिली. गेल्या सव्वाशे वर्षांतल्या पोस्टर्समध्ये स्त्री खेळाडूंच्या प्रतिमा, चित्रे मोजून चार-पाच पोस्टर्समध्ये आढळली. मग प्रश्न पडतो की स्त्रियांच्या वाढलेल्या प्रतिनिधित्वाचा आनंद मानायचा की अजूनही त्या स्पर्धेशी संबंधित अनेक मुद्दयांबद्दल 'अदखलपात्र' असल्याबद्दल खंत मानायची?

पुरुषांपेक्षा स्त्रिया प्रेक्षक दूरदर्शनवरून ऑलिम्पिक स्पर्धा बघतात, असे टीआरपी पंडित सांगतात. त्यांची नजर आकडेवारीपेक्षा बाजारपेठेवर असते हे सांगणे न लगे! तरीही इतक्या 'क्रीडाप्रेमी' महिला त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात बेसिक फिटनेस, व्यायाम, आहार याकडे दुर्लक्ष का करतात? हा प्रश्नही विचारला पाहिजे.

भारतीय स्त्री-शक्तीच्या अहवालात 2005मध्ये नमूद केलेल्या परिस्थितीत आणि 2016च्या महिला खेळाडूंच्या जागतिक परिस्थितीत गुणात्मक फरक पडला नसेल, तर त्याला जबाबदार कोणाला धरायचे? असा वातावरणात महिला खेळाडूंची कामगिरी उंचावण्याची अपेक्षा कशी धरायची? पदकांच्या तालिकेत आपण मागे आहोत, राहणार आहोत याची खंत व्यक्त करताना रिओ ऑलिम्पिकच्या निमित्ताने आपण स्त्रिया व खेळ या विषयातल्या 'जेंडर' या घटकाचा जरूर विचार करायला हवा! अन्यथा ऑलिम्पिक म्हणजे चार वर्षांनी घडणारा उत्सव व व्यापारी घडामोड या पलीकडे आपण वाढलो असे कसे म्हणायचे?

&  9821319835

nayanas63@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0