प्रदूषणमुक्त भारतासाठी बायोगॅस

13 Aug 2016 16:06:00

  सर्व प्रकारची जीवाश्म इंधने आता हळूहळू संपायला लागतील, तेव्हा सूर्याच्या ऊर्जेप्रमाणेच बायोगॅस हा शाश्वत ऊर्जा देणारा आणखी एक स्रोत आहे. आता यातील संशोधनाने यापुढे आणखीही लहान आकाराचे व अधिक ऊर्जाक्षम बायोगॅस संयंत्र हे भविष्य आहे.


'स्मार्ट सिटी'च्या संकल्पनेच्या माध्यमातून आधुनिकतेकडे सुरू झालेला आपल्या देशाचा प्रवास अधिकाधिक गतिमान होत आहे. ह्या गतिमानतेचे, तसेच संगणकीकरणाच्या व डिजिटायझेशनच्या युगाचे आपल्या ऊर्जावापरावर परिणाम होत आहे. आपण दिवसेेंदिवस अधिकाधिक ऊर्जा वापरणाऱ्या समाजाकडे प्रवास करीत आहोत. ऊर्जाउत्पादनाची साधने व ऊर्जेचे स्रोत मात्र कमी होऊ लागले आहेत. वाढत्या शहरीकरणाने शहरांतर्गत कचऱ्याचे व्यवस्थापन हा जटिल प्रश्न बनू लागला आहे. विशेषत: जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावताना दुर्गंधी, अनारोग्य आणि व प्रदूषण यासारख्या अनेकविध संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागते. म्हणूनच जैविक कचऱ्याचे अप्रदूषणकारी विघटन, तसेच ह्या विघटनातून तयार होणाऱ्या बायोगॅसचा ऊर्जानिर्मितीसाठी, इंधन म्हणून उपयोग ह्या दोन्ही गोष्टींसाठी बायोगॅसचे तंत्रज्ञान सर्व नव्या आस्थापनांना वरदानच ठरत आहे.

बायोगॅसचे तंत्रज्ञान काय आहे?

सर्व जैविक वस्तू - म्हणजे ज्यांचा जन्म आणि अस्तित्व जैविक आहे, त्या हायड्रोकार्बनयुक्त आहेत. या सर्व वस्तू नैसर्र्गिकरित्या विनाश पावतात, म्हणजे त्यांचे कणांमध्ये रूपांतर होते. ही प्रक्रिया घन अवस्थेत चालली, तर त्याला कंपोस्टिंग म्हणतात. पण ह्या विघटनामध्ये जर वायुनिर्मिती झाली, तर त्याला बायोगॅस असे म्हणता येईल. विशिष्ट प्रकारचे जीवाणू ऑक्सिजन नसताना ह्या जैविक हायड्रोकार्बनचे मिथेन, इथेन वा प्रोपेन अशा छोटया वायुरूप कार्बन संयुगांमध्ये तुकडे करतात. हे सर्व वायू ज्वलनशील असल्यामुळे त्यांचा इंधनाप्रमाणे वापर करता येतो.

आज स्वत:च्या घराच्या गच्चीवर किंवा आपल्या गृहसंकुलातून एखाद्या वस्तीमध्ये किंवा एखाद्या प्रशासकीय इमारतीमध्ये अशा प्रकारचे संयंत्र सहजपणे बसविता येते आणि कोणत्याही धोक्याशिवाय हा बायोगॅस आपली ऊर्जेची गरज काही प्रमाणात भागवू शकतो. आपण फुकट जाणाऱ्या कचऱ्यापासून जर ऊर्जानिर्मिती करणार असू, तर आपण राष्ट्रीय संपत्तीमध्ये भर घालू शकतो.

आपल्या मोठया गृहसंकुलातील सर्व जैविक कचरा एकत्र करून त्यावर एखादे मोठे संयंत्र चालविल्यास त्यातून आपल्याला सार्वजनिक ठिकाणी लागणाऱ्या ऊर्जेची निकड भागू शकते.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी या तंत्रज्ञानाच्या आधारावर मोठी संयंत्रे उभारून शहरामधील विविध आस्थापनांत निर्माण होणारा जैविक कचरा अत्यंत उत्तम व्यवस्थापनाने एकत्र केल्यास शहराच्या काही रस्त्यांवरील रात्रीच्या उजेडासाठी लागणारी ऊर्जा त्यातून उपलब्ध होऊ शकते.

सर्व प्रकारची जीवाश्म इंधने आता हळूहळू संपायला लागतील, तेव्हा सूर्याच्या ऊर्जेप्रमाणेच बायोगॅस हा शाश्वत ऊर्जा देणारा आणखी एक स्रोत आहे. आता यातील संशोधनाने यापुढे आणखीही लहान आकाराचे व अधिक ऊर्जाक्षम बायोगॅस संयंत्र हे भविष्य आहे.

म्हणजे सर्व प्रकारच्या जैविक वस्तूंपासून बायोगॅस तयार होऊ शकतो का? याचे उत्तर जरी 'हो' असे असले, तरीही विशिष्ट अवस्थेतील जैविक वस्तूपासून अधिक बायोगॅस मिळतो आणि काही वस्तूंपासून अतिशय कमी बायोगॅस मिळतो. या बायोगॅसचे विशिष्ट प्रमाण, योग्य तापमान व ऑक्सिजनची उपलब्धता यावरच बायोगॅसचे ज्वलन होते.

सर्व प्रकारच्या जैविक वस्तूंच्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती होऊ शकते. पण अशा त्याज्य किंवा कचरा वस्तूंपासून आपल्याला किती प्रमाणात बायोगॅस मिळेल हे निश्चित नसते. बायोगॅसमध्ये काम करणाऱ्या सूक्ष्मजीवांवर हे अवलंबून असते. एकाच प्रकारचे, एकाच गुणधर्माचे पदार्थ मोजून नियमितपणे टाकल्यास आपल्याला अधिक बायोगॅस मिळू शकतो.

या बायोगॅसच्या अभ्यासाची सुरुवात ही एका चॉकलेट कंपनीच्या कचऱ्यात जाणाऱ्या चॉकलेटमुळे झाली. कंपनीच्या बाजारात पाठवलेल्या सर्व चॉकलेटमधील काही नमुने काढून ते त्याच्या एक्स्पायरी डेटपर्यंत सांभाळल्यावर ते जाळून टाकावे लागायचे. प्रयोग म्हणून जेव्हा या चॉकलेटचा उपयोग बायोगॅसमध्ये केला, तेव्हा अपेक्षेपेक्षा तिप्पट बायोगॅसची निर्मिती झाली आणि मग अभ्यास केल्यावर कळले की साखर, शर्करा, पिष्टमय पदार्थयुक्त वस्तूंचा वापर जर बायोगॅसमध्ये केला, तर त्यापासून अधिक बायोगॅसची निर्मिती होते. म्हणजे चांगल्या प्रतीचे फीड नियमितपणे केले, तर एखाद्या विद्युतजनित्राप्रमाणे बायोगॅसही नियमित तयार होऊ शकतो.

मग या बायोगॅसवर काम करणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा शोध सुरू झाला. डॉ. आनंद कर्वे यांच्या 'आरती' संस्थेने घरी वापरता येण्याजोगी, सिंटेक्सच्या प्लास्टिकच्या नळया वापरून बायोगॅसची छोटयात छोटी संयंत्रे तयार केली आहेत. सहज सोपी पध्दती आणि सोबत कृती करण्याच्या माहितीची सी.डी. हे त्याचे वैशिष्टय. काही मुलांनी हे संयंत्र आमच्या आवारात बसविले आणि मग बायोगॅस हे आमच्या ऑफिसचे इंधन झाले आणि आमच्या अंकुर थीम पार्कमध्ये एक नवीन संयंत्र दिमाखात बायोगॅसच्या निर्मितीची अनुभूती देऊ लागले. त्यानंतर त्या संयंत्रावर अनेकविध प्रयोग करून त्यामध्ये विविध जैविक पदार्थ वेगवेगळया प्रमाणात टाकून किती बायोगॅसची निर्मिती होते याचा पर्यावरण विषयात पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यास केला.


आपल्या सर्वांनाच ज्यांच्या स्मरणाने चैतन्य येते, अशा विवेकानंद यांच्या नावाने व वास्तव्याने पुनित झालेल्या विवेकानंद केंद्राचे 'नार्डेप' या कार्यक्रमांतर्गत एक सुंदर, फायबर ग्लासमध्ये बनविलेले बायोगॅसचे संयंत्र कन्याकुमारीहून रस्तामार्गे आमच्या थीम पार्कमध्ये दाखल झाले. वासुदेवजींच्या अथक संशोधनकार्यातून साकारलेल्या ह्या बायोगॅस संयंत्राने अनेकांना बायोगॅस तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेण्याची व वापरण्याची स्फूर्ती मिळाली.

पुणे येथे स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून शहरातील उपाहारगृहातील शिजवलेल्या अन्नाचा कचरा गोळा करून त्यावर चालविलेल्या बायोगॅसपासून संयंत्राला किर्लोस्करच्या जनरेटर सेटची साथ मिळाली आणि बायोगॅसपासून वीजनिर्मिती होऊ लागली. हे तंत्रज्ञान आता चांगलेच स्थिरावले आहे.

ठाणे जिल्ह्यामधील दुर्गम अशा भागामध्येही केवळ शेणावर चालणाऱ्या बायोगॅसची जागा आता अशा पदार्थांवर चालणाऱ्या बायोगॅसने घेतली. तेलाच्या घाण्यामधील पेंड, फुकट गेलेला गूळ, खराब झालेली धान्ये, कडधान्ये, वाया गेलेले पीठ, मका अशा पदार्थांवर बायोगॅस चालवून त्यापासून नियमित वीजनिर्मिती होऊ लागली.

या सर्व प्रवासामध्ये जैविक वस्तूंची योग्य त्या प्रकारे व कोणतेही प्रदूषण न होता विल्हेवाट लागू लागली. त्यापासून निर्मित इंधनाला प्रदूषणमुक्त इंधन म्हणून ओळखले गेले आणि त्यामधून अशा प्रकारची संयंत्रे सर्वत्र उपलब्ध होऊ लागली. भाभा अणुसंशोधन केंद्रामधील डॉ. शरद काळे यांनी संशोधित केलेले 'निसर्गऋण' हे संयंत्र आज मोठया प्रमाणात अनेक शहरांतून कार्यरत झाले आहे.

9869065547

 

Powered By Sangraha 9.0