लोहपुरुषाची अखेर

11 Aug 2016 12:26:00

सुरेशराव वरवर रूक्ष वाटले, तरी एक जिव्हाळा, आपुलकी त्यांच्या मनात असे. ते स्वत:पुरते जास्त कठोर होते. एखाद्या लोहपुरुष प्रथम आजाराने अशक्त झाल्याचे बघितले व मन हेलावले. त्यातून पुढे ते सावरलेच नाहीत. तब्येत आणखीनच ढासळत गेली.  अशा या कर्मयोग्याला, लोहपुरुषाला संस्कार भारतीतर्फे व वैयक्तिक आमच्या कुटुंबाकडून आदरांजली!

 

मी जम्मूच्या प्रवासात असताना अचानक बातमी आली - मा. सुरेशराव केतकर यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. सर्व जुन्या आठवणी डोळयासमोर आल्या.

दादरला आयनापुरे बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर त्या वेळी संघकार्यालय होते. आज जिथे पितृछाया उभे आहे, महाराष्ट्राचे (प्रांताचे) त्या वेळचे शा.शि.प्र. सुरेशराव केतकर पिळदार शरीर, दंड, बैठका, जोर काढत त्या वेळी बघण्यासारखे दृश्य असायचे. लहानपणी कविता होती, 'बळकट दणकट स्नायू ज्यांचे, लोखंडाचे वळले नाग.' एक आदरयुक्त भीती असायची. खालून येताना दिसले की आम्ही सर्व एकदम एकमेकांना सांगायचो, ''ए, Boss आले.'' सर्व वातावरण बदलून जायचे.

एक दिवस मला म्हणाले ''रवी, सुधीर फडके माहीत आहेत का?'' मी म्हटले, ''म्हणजे बाबूजी ना?'' त्यावर म्हणाले, ''गाणारे फडके एकच आहेत ना. चल त्यांच्याकडे जायचंय. चला.'' मराठा इन्फंट्रीतून त्यांनी एक गाणे आणले होते - 'मर्द आम्ही मराठे खरे, दुष्मनांना भरे कापरे'. त्याला बाबूजींनी उत्तम चाल लावली होती. त्यांना म्हणाले, ''याला चाल सांगा.'' मी 2-4 वेळा म्हटली व लगेच दुसऱ्या दिवशी चेंबूरला संघ शिक्षा वर्ग चालू होता तिथे मला, सर्व शिक्षकांना शिकवायला सांगितले. नंतर पुढे त्या गाण्यात 'मर्द आम्हीच हिंदू खरे' असा बदल झाला. त्या काळात 'चरण चालू दे सदा', 'बलसागर भारत होवो' व पुढे 'हिंदू सारा एक' अशा अनेक पदांना बाबूजींनी चाली लावून दिल्या व म्हटल्या.

सुरेशरावांना संगीताची आवड होती की नाही ते कळले नाही, पण एखादी गोष्ट ठरवली की ती कर्तव्यबुध्दीने तडीस न्यायची. एखादे काम कोणाला सांगायचे हे त्यांचे ठरलेले असायचे. पत्रव्यवहार सतत चालू असायचा. पुढे अखिल भारतीय शा.शि.प्र. झाल्यावर मी आखाती देशात नोकरी करून आल्यामुळे केरळचा स्वयंसेवक व त्याच्याबरोबर दोघांना मला भेटवले व म्हणाले, ''यांना गल्फला जायचेय. थोडे मुंबईतील मार्गदर्शन कर.''

1997 सालापासून माझ्याकडे संस्कार भारतीचे काम आले व एक दिवस नागपूरच्या बैठकीत समजले की मा. सुरेशराव संस्कार भारतीचे मार्गदर्शक आहेत व भेट झाली. मला तर खूपच नवल वाटते की कलाक्षेत्र व सुरेशराव... पण संघाने सांगितलेले काम करायचे. आम्हाला गंमत वाटायची. त्यांना फुले, पुष्पगुच्छ, टाळया वाजवणे वगैरे फार रुचत नसे व नंतर ते समोर यायचेच नाहीत. एकदम बैठकीचा समारोप असायचा. अतिशय मोजक्या शब्दांत त्यांचे बोलणे असायचे. त्यांनी एकदा 'एक जीवन एक मिशन' असा विषय आम्हा सर्वांपुढे मांडला. त्यांचे बोलणे नेहमीच मुद्देसूद व उद्बोधक असायचे. आपल्या जीवनात आपल्याला कळायला लागले की प्रत्येकाने ठरवून मिशनसारखे काम करायला पाहिजे. आपला संसार, नोकरी व जबाबदाऱ्या सांभाळून केवळ एकच ध्येय - संस्कार भारतीसाठी मी काम करीन असे ठरवले पाहिजे. एकदा ठरवले की आपोआप वेळ मिळतो. आपल्या जीवनाच्या प्रायॉरिटीज ठरवणे आपल्या मनावर असते. ते कार्याच्या आवश्यतेवर ठरते. हे काम आपणास पटले की आपण कामाचे नियोजन करणे अपेक्षित आहे. मी दोन वर्षे काम करत आहे, त्यातून समाजाच्या हिताचे काही निर्माण झाले का? असे आपणच आपले मूल्यांकन करण्याची आपणास सवय लागली पाहिजे.

आज ठरवलेले काम झाले का व उद्याचे नियोजन अशा पध्दतीने रोज काम केले, तर जे स्वप्न डॉ. हेडगेवारांनी आपल्या सर्वांसमोर ठेवले आहे, ते पूर्ण लवकर होईल असे वाटते.

 सुरेशराव वरवर रूक्ष वाटले, तरी एक जिव्हाळा, आपुलकी त्यांच्या मनात असे. ते स्वत:पुरते जास्त कठोर होते. आम्ही पुढे नाशिकला राहावयास आल्यावर एक दिवस प्रवासात आवर्जून घरी आले. माझ्या वडिलांना भेटण्याच्या निमित्ताने. सहसा ते फोटो काढायला सहमती देत नसत, पण आमच्याकडे आमच्या भाच्याने त्या वेळी एक उत्तम फोटो काढला होता.


चिकुनगुनियातून बरे झाल्यावर नाशिकला आमच्याकडे तीन दिवस राहावयास होते. त्या वेळी एवढा लोहपुरुष प्रथम आजाराने अशक्त झाल्याचे बघितले व मन हेलावले. त्यातून पुढे ते सावरलेच नाहीत. तब्येत आणखीनच ढासळत गेली.

अशा या कर्मयोग्याला, लोहपुरुषाला संस्कार भारतीतर्फे व वैयक्तिक आमच्या कुटुंबाकडून आदरांजली!

(लेखक संस्कार भारतीचे अ.भा. मंत्री

व कोषवृध्दी प्रमुख आहेत.)

 

 संघसमर्पित जीवन हीच खरी प्रेरणा

वय आणि आजारपण ही या दुःखद घटनेची कारणे असली तरीही आपल्याबरोबर असणाऱ्या व कायम प्रेरणा देणाऱ्याचा मृत्यू पचवणं खरोखर कठीण असतं.

मला सुरेशरावांच्या शिस्तीचं आणि त्यांच्या स्वतःवरील बंधनांचं कायम कौतुक वाटत असे. काही वर्षांपूर्वी सुरेशरावांच्या विनंतीवरून सुदर्शनजींनी हिंदीचे अभ्यासवर्ग घेतले होते. तेव्हा मी दिल्ली कार्यालयात निवासाला असल्यामुळे मलाही या वर्गाचा लाभ झाला होता. सुरेशरावांच्या आत्म्याला सद्गती मिळावी अशी मलेशिया संघ परिवाराच्या वतीने प्रार्थना.

ओम् शांती! शांती! शांती!

- टी.एम. रामचंद्रन (रामाजी),

ज्येष्ठ प्रचारक - हिंदू स्वयंसेवक संघ, मलेशिया

 

दिग्गज स्वयंसेवक आणि कर्मनिष्ठ प्रचारक असणारे सुरेशराव केतकर यांच्या निधनाची वार्ता ऐकून अतिशय दुःख झाले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी व सद्गती प्राप्त व्हावी यासाठी यूकेमधील आम्ही सगळे जण प्रार्थना करतो.

1992 सालच्या नोव्हेंबर महिन्यात विलेपार्लेतील उत्कर्ष मंडळात मा. सुरेशरावांना भेटण्याचा योग आला होता.

- सुरेंद्र शाह,

ज्येष्ठ स्वयंसेवक - हिंदू स्वयंसेवक संघ, युनायटेड किंग्डम

मा. सुरेशराव केतकरांच्या निधनाची दुःखद वार्ता मिळाली. गेल्या वर्षांपासून त्यांना लातूरला जाऊन भेटण्याची इच्छा करीत होतो. पण ती भेट राहिलीच. बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांचा संबंध होता. पुण्याला समन्वय रुग्णालयात काही वर्षांपूर्वी झालेली त्यांची भेट शेवटचीच ठरली. त्यांच्या कर्तव्यकठोर आणि संघसमर्पित जीवनापासून सर्वांनाच प्रेरणा प्राप्त होईल.

- डॉ. शंकरराव तत्त्ववादी,

माजी विश्व विभाग संयोजक

 

माझ्याकडे सुरेशजींच्या अनेक आठवणी आहेत. डेगवेकरांनी माझा त्यांच्याशी परिचय करून दिला. 1972 साली मी अनेक दिवस पुणे कार्यालयात राहायला होतो, तेव्हा सुरेशजी मला सोनीजींच्या घरी जेवायला घेऊन जात असत. त्यांची आणि माझी शेवटची भेट बाबासाहेब आपटेंच्या घरी झाली होती.

भावपूर्ण श्रध्दांजली!

- स्वामी अक्षरानंद, गयाना

 

 

Powered By Sangraha 9.0