ऑलिम्पिकची सुरुवात भारतासाठी कुछ खट्टा और कुछ मीठा अशी झाली. पण जसेजसे दिवस पुढे सरकत गेले तसा भारताच्या निम्म्याहून अधिक खेळाडूंनी आपला गाशा गुंडाळला. दिग्गज खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा होती, पण त्यांच्या पदरी निराशा आली. एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केल्यावर त्याला डोक्यावर घेणं आणि तो अयशस्वी ठरला तर त्याची निंदानालस्ती करणं ही काहीजणांची वृत्ती आहे. त्यामुळेच अभिनव बिंद्राच्या अपयशानंतर सोशल मीडियावर त्याच्याबाबत टिकेची टिवटिव होऊ लागली. अर्थात याला भारतीय क्रीडाप्रेमींनी योग्य उत्तर देऊन खेळाडूंना पाठिंबाही दिला. आपण
पराभवासाठी खेळाडूंना दोषी मानतो. पण खरं तर कित्येक खेळाडू हे दयनीय परिस्थितीशी झगडून ऑलिम्पिकस्पर्धेत भाग घेतात. त्यांची मेहनत आणि भारताच्या गौरवासाठी खेळण्याची जिद्द हेच त्यांच्या उत्तम खेळामागील प्रेरणा असते. इतर देशातील खेळाडू पदक मिळवतात याचं आपल्याला कौतुक असतं. इतर देशातील खेळाडूंना मिळणाऱ्या सोई-सुविधा आपल्या खेळाडूंना फार कमी वेळा मिळतात. आपल्या खेळाडूंना लागणाऱ्या मूलभूत सोई-सुविधांचा अभाव, खेळातील अद्ययावत, प्रगत साधनसामग्रीचा अभाव, तंत्रज्ञानाशी करावी लागणारी तडजोड या सगळया गोष्टींकडे अापण कानाडोळा करतो. काही खेळाडू आपल्या वैयक्तिक खर्चाने खेळाची साधने विकत घेऊन सराव करतात. पण सगळयाच खेळाडूंना हे परवडते असे नाही. त्यात खेळाडूंना अधिकाऱ्यांकडून मिळणारी दुय्यम वागणूक, त्यातील राजकारण या सगळया दिव्यातून बाहेर पडून खेळाडू ऑलिम्पिकसाठी सज्ज होतो. या सगळया गोष्टींवर मात्र कोणीही कुठेही भाष्य करताना दिसत नाही. त्यांच्या पराभवावर मात्र आपण लगेच बोट ठेवतो. हे खेळाडू स्वत:साठी नाहीतर तर देशाच्या
खेळाडूंवर असलेला मानसिक दबाव आणि कोटयवधी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे याचे दडपण त्यांच्या खेळावर येते. 100 मीटर नेमबाजी स्पर्धेत खेळणाऱ्या सगळयाच खेळाडूंच्या चेहऱ्यावर तो दबाव दिसून येत होता. हेही त्यांच्या पराभवाचे कारण असू शकते. जे भारतीय खेळाडू भारताच्या गौरवासाठी अहोरात्र मेहनत करून ऑलिम्पिक स्पर्धेत खेळतात त्यांचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीय क्रीडाप्रेमींचे प्रेम आणि प्रोत्साहन हे या खेळाडूंचे पाठबळ आहे.
ऑलिम्पिकमध्ये पर्दापण करणाऱ्या बॉक्सर विकास यादवने स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच उत्तम खेळ दाखविला होता. विकासने 75किलो वजनी गटात बॉक्सिंगमध्ये अमेरिकेच्या चार्ल्स कोनवेलचा पराभव करून भारतीयांच्या पदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
भारताचा नौकानयनपटू दत्तू भोकनल याला नौकानयन स्पर्धेत 4थ्या क्रमांकावर समाधानी राहावे लागले. मराठवाडा ते ऑलिम्पिक या खडतर प्रवासानंतरही त्याने आपली जिद्द कायम ठेवली होती. आता उर्वरित खेळाडूंकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. खेळाडूंनी अपेक्षांच्या ओझ्यापेक्षा, पदक मिळविण्याच्या दृष्टीने रिओ ऑलिम्पिकच्या रिंगणात उतरावे.