आय वर्क @ होम

01 Aug 2016 14:40:00

महिलांसाठी अर्धा वेळ नोकऱ्या, घरून कामाची सवलत असे शब्द उच्चारले तरी संबंधितांना 'महिलांचा मसीहा' म्हणून पाठ थोपटून घेता येईल. घर व काम यातले संतुलन जमवून आणण्यासाठी भारतात नव्हेतर जगात मुख्यत: महिलाच असे जॉब घेतात. वरवर पाहता हा त्यांनी स्वत:हून निवडलेला पर्याय वाटत असला, तरी मूल जन्माला घालण्याची निसर्गदत्त जबाबदारी, त्यातून आलेली संगोपनाची जबाबदारी आणि गृहकर्तव्य ही समाजाने मानलेली जबाबदारी फक्त बाईची यांचा तो परिपाक आहे. याचा दबाव इतका मोठा आहे की याहून वेगळे काही करणे ना समाजाला रुचतेना विचारविश्वात येते.

०१६ च्या पहिल्या अर्धवर्षात भारतातल्या आघाडीच्या दोन बँकांनी एकसारख्या बातम्या दिल्या. हा नैसर्गिक प्रकार की 'हम भी कुछ काम नहीं' हे दाखवण्याचा कुरघोडीचा प्रयत्न हे तुम्हीच ठरवा. एक आहे सार्वजनिक क्षेत्रातली बलाढय बँक स्टेट बँक आणि दुसरी खाजगी क्षेत्रातली बलाढय आयसीआयसीआय. दोन्हीच्या प्रमुख महिला आहेत हा आणखी एक योगायोग. २०१६ च्या जागतिक महिला दिनाला चंदा कोचर यांनी iWork@home या उपक्रमाची घोषणा केली. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांना एक वर्षापर्यंत घरून काम करण्याची संधी किंवा सवलत मिळेल. नुकतीच स्टेट बँकेने महिला कर्मचाऱ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. सध्या स्टेट बँकेच्या सुमारे ४५ हजाराहून अधिक महिला कर्मचारी आहेत. सध्या चर्चेत असलेल्या सहयोगी बँक विलीनीकरणामुळे ही संख्या आणखीनच वाढेल. सध्या बँकांमध्ये असलेले काम व कर्मचारी हे प्रमाण व्यस्त असल्यामुळे कुठेही जा, कधीही जा, लांबच लांब रांगा झेलाव्या लागतात. अशा स्थितीत असुविधा झाल्यावर किंवा घर व काम यातले संतुलन बिघडत असले तर नोकरी सोडण्याचे प्रमाण खूप आहे, त्यात महिलांचा क्रमांक वरचा आहे. याचे मुख्य कारण नोकरी करणाऱ्या बायकांच्या तीन-चार पिढया होऊनही, अजूनही कुटुंबपूरक म्हणून त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन, अर्थार्जन हे पुरुषाचे क्षेत्र आणि प्रथम कर्तव्य मानण्याची आपली वृत्ती. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांमधले talent नोकरीत टिकवून ठेवण्यासाठी त्यांना ही सुविधा देत असल्याचा खुलासा बँकेच्या वतीने केला जातोय. सेवा क्षेत्राला पूरक अशा महिलांच्या गुणवत्तेची बँकेला कदर वाटते आहे, ही भावनाही सुखद आहे.

वरवर पाहता महिलांना खूश करणारी ही बातमी असली, तरी त्यातली मेख समजून घ्यायला हवी.

  1. बँक किंवा कोणतीही आस्थापना कर्मचाऱ्यासाठी जी योजना आणते, ती प्रथम कंपनी हिताची असते आणि नंतर कर्मचारी हिताची. आत्ता ही सुविधा प्रायोगिक असली, तरी उद्या ती सर्वमान्य झाल्यास महिला कर्मचाऱ्याच्या हिताचे पुण्य गाठीशी लागेलच, पण संसाधनाची, overheadsची बचत व खर्चात कपात होईल हा छुपा हेतू नसेलच असे नाही. गेल्या काही वर्षात बँकिंग क्षेत्रातही आउट सोर्सिंगने ठाण मांडले आहेच. हा प्रयोग यशस्वी झाल्यास नियमित कर्मचाऱ्याच्या वेतन व भत्त्यावर खर्च करण्यापेक्षा ते फायद्याचे ठरते. म्हणून ही सुविधा फक्त नियमित महिला कर्मचाऱ्यांना उपलब्ध होणेही महत्त्वाचे आहे.
  2. ही योजना महिलासांठी, म्हणजे चूल आणि मूल या पारंपरिक भूमिकांच्या जोडीला एक लॅपटॉप दिला तरी त्याच भूमिका अधोरेखित करते. घर सांभाळणे आणि मुले वाढवणे ही फक्त बाईचीच जबादारी? योजना तरी जेन्डर न्यूट्रल असायला नको का? सुरुवातीला जास्तीत जास्त महिलाच त्याचा लाभ घेतील, हे शक्य आहे; पण ज्यांना अशा लवचीक कामाची गरज असेल, असे अपवादात्मक पुरुषही त्यात असतील (असावेत). आज याचा इतका विचार केला नसेल, तरी पुढे जाऊन ती योजना सर्वांसाठी करणे हे काळाशी सुसंगत, स्त्री-पुरुष समानता या मूल्यावर आधारित धोरण ठरेल. सर्व महिलांना एकाच तागडीत टाकण्याऐवजी खास बाब म्हणून, ज्यांना गरज आहे अशा स्त्रियांना व पुरुषांना ही संधी देणे हेही शहाणपणाचेच ठरेल.

महिलांसाठी अर्धा वेळ नोकऱ्या, घरून कामाची सवलत असे शब्द उच्चारले तरी संबंधितांना 'महिलांचा मसीहा' म्हणून पाठ थोपटून घेता येईल. घर व काम यातले संतुलन जमवून आणण्यासाठी भारतात नव्हे, तर जगात मुख्यत: महिलाच असे जॉब घेतात. वरवर पाहता हा त्यांनी स्वत:हून निवडलेला पर्याय वाटत असला, तरी मूल जन्माला घालण्याची निसर्गदत्त जबाबदारी, त्यातून आलेली संगोपनाची जबाबदारी आणि गृहकर्तव्य ही समाजाने मानलेली जबाबदारी फक्त बाईची यांचा तो परिपाक आहे. याचा दबाव इतका मोठा आहे की याहून वेगळे काही करणे ना समाजाला रुचते, ना विचारविश्वात येते. नाहीतर घरामधून काम, अर्धवेळ काम या पर्यायांकडे केवळ (बहुसंख्य) महिलांची सोय असे न पाहता कुटुंबाचे हित म्हणून पाहिले गेले असते. कामकाजी पुरुषांसाठी तो जास्तीत जास्त वेळ घरात-कुटुंबात घालवण्याचा पर्याय ठरला असता आणि स्त्रियांसाठी ऑॅफिस हा अधिक सहृदय समानतेचा आविष्कार झाला असता. दुसऱ्या महायुध्दानंतर स्त्रिया नोकरीसाठी घराबाहेर पडू लागल्या. इतकी वर्षे जाऊनही घरातल्या पारंपरिक कामाच्या वाटण्यामध्ये बदल झाला नाही, ना दृष्टीकोनात. आणि अशा योजना 'फक्त' महिला कर्मचाऱ्यांसाठी राबवून आपण त्या बदलू इच्छित नाही, हेच अधोरेखित करतो आहोत.

अर्धा वेळ नोकऱ्या, घरून कामाचा पर्याय स्वीकारण्यामागे अनेक कारणे आहेत. मुख्यत: कामाच्या वेळेची लवचीकता, बालसंगोपन, गृहकृत्य, प्रवासाचा वेळ व खर्च वाचणे, कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवणे, ट्राफिक समस्येवरचा उपाय इ. गेल्या काही वर्षांत कॉम्प्युटर व इंटरनेट क्रांतीमुळे या शक्यता वाढल्या असल्या, तरीही सेवा व रिटेल क्षेत्रातच अशा संधी उपलब्ध आहेत. अनेक नोकऱ्या अशा आहेत की त्या घरून करणे अशक्य. पुन्हा संघटित क्षेत्रात अशा संधी मिळणे आणि असंघटित क्षेत्रातल्या अशा संधी यातही आर्थिक व गुणात्मक फरक आहेत.

आज एका बाजूला उच्चशिक्षित स्त्री-पुरुषांसाठी करियरच्या अगणित संधी, त्यातून आलेल्या अर्थार्जनाच्या संधी आहेत, दुसऱ्या बाजूला जगण्याचा घसरता दर्जा, त्याची फार मोठी सामाजिक किंमतही मोजावी लागतेय. दोघांचे अर्थार्जन ही अपरिहार्य गोष्ट झालेली आहे. या पार्श्वभूमीवर, ठरवून मर्यादित उत्पन्न स्वीकारूनही जगण्याचा दर्जा टिकवू पाहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यात महिला आघाडीवर असल्या, तरी पुरुषांना ती संधी डावलणे योग्य होणार नाही. 'वाहम् - WAHM' आणि वाहम् - SAHM' अशा नव्या संकल्पना त्यातून जन्माला आल्या आहेत.

WAHM म्हणजे Work at Home Moms आणि SAHM म्हणजे Stay at Home Moms. इंटरनेटवर त्यांच्या साइट्स आहेत, त्या ब्लॉग्ज लिहितात, एकमेकींना सल्ले देतात, सपोर्ट ग्रूप्स चालवतात आणि बरेच काही. Mom bloggers असा सर्च दिल्यावर खूप काही समोर येते. मी कॉलेजला गेले, करियर केले ते काय दिवसभर डायपर बदलण्यासाठी? अशी खंत करणाऱ्या आणि बालसंगोपनामुळे घराच्या चार भिंतीत नव्याने अडकलेल्या या नवमाता गावातल्या-देशातल्या नव्हे, तर जगातल्या वाचकांशी कशा कनेक्ट होतात, हे छानच आहे. एक काळ WAHMबद्दल - म्हणजे  Work at Home Momsबद्दल 'बिचाऱ्या' अशी भावना होती. आता मात्र SAHMबद्दल म्हणजे Stay at Home Momsबद्दल सन्मानाची भावना जागा घेतेय. अगदी गृहिणी आणि होममेकरसारखी. आपण निवडलेल्या SAHM म्हणजे Stay at Home Moms पर्यायाबद्दल तिला खंत नाही, तर कौतुकही आहे. अनेकींनी घरातच त्यांचे विधिवत ऑॅफिस किवा वर्क स्टेशन बनवले आहे. नोकरी न करणे, करियरचा त्याग किंवा सुपर वूमन सिन्ड्रोम या मागच्या दोन पिढयांनी अनुभवलेल्या दोन्ही पर्यायांतून त्यांनी सुटका करून घेतली आहे. आईपण निभावताना त्या ते एन्जॉयही करतात - अर्थात ज्यांनी हे पर्याय स्वत:च्या मर्जीने निवडले आहेत. ज्यांना ते परिस्थितीने लादले जातात, सक्तीने निवडावे लागतात, त्यांना ते आनंददायी वाटत नसतील, नाहीत.

वर्क फ्रॉम होमच्या ज्या संधी या बँका देऊ पाहत आहेत, त्यालासुध्दा एक स्वयंशिस्त, नियमितता यांची गरज आहे. कामाच्या वेळा व प्रकाराची लवचीकता आणि कामगिरी - उत्पादकता (performance) यांची सांगड घातली नाही, तर प्रायोगिक तत्त्वावरच्या या योजना बंद व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे ज्यांनी हा पर्याय निवडलाय, त्यांच्यावर सिध्द करण्याची मोठी जबाबदारी आहे. बालसंगोपनाच्या काळात घरून कामाची संधी हे तिचे रोजचे ताण कमी करणारे, मुलांना गुणात्मक वेळ देऊन नवी पिढी घडवण्यासाठी महत्त्वाचे असले, तरीही घरून काम करण्यातले सकृतदर्शनीचे फायदे आणि कुठच्या श्रेणीतले काम मिळेल, नोकरीतून होणारे सामाजिकीकरण, घराबाहेर पडण्याची संधी आणि आवश्यकता, घर या पारंपरिक जबाबदारीत पुन्हा बंदिस्त होणे, त्या जबाबदारीत पुरुषांचा व इतर सभासदांचा सहभाग, तिचे उत्पन्न प्रमुख नव्हे तर हातभार, बाईच्या नोकरीकडे, कामाकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टीकोन, प्रमोशनच्या संधींवर होणारा परिणाम, कार्यालयीन निर्णयप्रक्रियेत सहभागाची संधी आणि शक्यता अशा मोजपट्टयाही लावून पाहावे लागेल. एक लवचीकता देताना नवे ताण निर्माण होणार नाहीत, याची पुरेशी काळजी - व्यक्तिगत आणि संस्थात्मक पातळीवर - घ्यावी लागेल.

शेवटी घरून कामाची सवलत काय किंवा चाइल्ड केअर लीव्ह, सबाटिकल लीव्ह यासारख्या सुविधा ही मर्यादित व विशेष काळाची गरज म्हणून देण्यात आल्या आहेत याचे भान ठेवले नाही, तर कुटुंबातले, समाजातले दुय्यम स्थान महिला कर्मचाऱ्यांना लेबर मार्केटमधल्या दुय्यमतेकडे ढकलत आहे, हा धोका आपल्याला कसा दिसणार? महिला हा एक संघटित वर्ग न राहता त्या घर-कुटुंब-गाव-जात अशा वेगवेगळया गटात आधीच विभागलेल्या असतातच. त्यात अशा वैयक्तिक कारणांनी कामगार क्षेत्रातही त्या संघटित क्षेत्राकडून असंघटिततेकडे जाताहेत, याचे भान या निमित्ताने ठेवायला हवे.

9821319835

nayanas63@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0